हे जीवन सुंदर आहे (भाग २७)

Manasi's story

हे जीवन सुंदर आहे! (भाग २७)

 

कॉलेज कॅम्पसमध्ये रोजच्या सारखीच वर्दळ होती. राघव, मानसी आणि ग्रुपमधले सर्वजण गप्पा करत क्लासरूमकडे चालत जात होते. तेवढ्यात गाडीचा कर्णकर्कश हॉर्न वाजला. सगळ्यांचीच नजर कॉलेजच्या गेटकडे गेली. भरधाव वेगाने एक काळ्या रंगाची स्पोर्ट्स बाईक आत आली. त्याने कॉलेजमधल्या पार्किंगच्या जागेजवळ ती बाईक थांबवली आणि एक्सिलरेटर अजून वाढवलं… एकाच ठिकाणी बाईक उभी करून एक्सिलरेटर वाढवल्याने बाईकचा आवाज जास्तच येऊ लागला. जवळपास सगळ्यांचंच लक्ष बाईककडे आणि बाईकस्वाराकडे गेलं.
 

त्याने बाईक बंद केली आणि बाईकवरून तो खाली उतरला. अंगात ब्लॅक लेदरचं महागडं जॅकेट, ब्लॅक ट्राऊझर, ब्रँडेड शूज, हाताची बोटं उघडे असलेले लेदरचे हँड ग्लोव्हज्, डोक्यावर ब्लॅक हेल्मेट आणि त्या हेल्मेटला ब्लॅक काच… त्यामुळे त्याचा चेहरा कोणालाच दिसत नव्हता. तो कोण असेल याची उत्सुकता अगदी सर्वांना लागली होती. जो कोणी असेल ती व्यक्ती नक्कीच श्रीमंत घरची असणार हा कयास त्याला पाहिलेल्या सर्वांनी आतापर्यंत लावला होता.
 

त्याने डोक्यावरचं हेल्मेट काढलं आणि आपल्या केसांवर अलगद एक हात फिरवला. दिसायला अगदी गोरा..  उंचपुरा…धाड धिप्पाड… केसांचा छानसा कट आणि केस जेल लावून अगदी व्यवस्थित सेट केलेले… त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वावरून तो नियमित जिमला जात असेल हे नक्कीच कळणारं होतं. बाईकच्या हँडलमध्ये समोरच्या बाजूने ठेवलेली छोटी वही काढून तो ती हातावर फिरवत आणि शीळ वाजवत चालत निघाला.
 

"वीरेन! पण वीरेन इथे कसा येईल?" मानसी त्याला दुरूनच पाहून पुटपुटली. तो चालत चालत अजून पुढे आला. त्याचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता.
 

"वीरेन!" मानसी आश्चर्याने ओरडली आणि सगळ्यांनी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. मानसी धावत त्याच्याकडे गेली. इतक्यावर्षांनी वीरेनला बघून तिला खरंतर त्याला एक मिठी मारावीशी वाटली; पण तिने स्वतःला कसंबसं रोखलं.
 

"वीरेन! व्हाट अ प्लेझन्ट सरप्राईज! तू इथे कसा? आणि किती वर्षांनी भेटतोय आपण? मला न सांगताच कुठे निघून गेला होतास?" मानसीची प्रश्नांची सरबत्ती सुरू होती.
 

"अगं हो, श्वास तर घेशील की नाही? आता मी रोजच तुला भेटणार आहे बरं." वीरेन
 

"म्हणजे?" मानसी
 

"ऍडमिशन झालीये माझी…! इथेच! या तुझ्या कॉलेजमध्ये! मॅनेजमेंट कोट्यातून बरं का!" वीरेनने बोलताना मॅनेजमेंट कोटा या शब्दावर जरा जास्तच भर दिला.
 

"खरंच! वॉव!" मानसी
 

"मग काय! माझा प्लॅन तुझ्या वाढदिवसाच्या दिवशीच यायचा होता; पण ऍडमिशन प्रोसेसला वेळ लागला थोडा." वीरेनने थोडं गुर्मीतच सांगितलं.
 

"जाऊ दे. आता आलास ना! आपण सोबत आहोत हेच काय कमी आहे का?" मानसी आणि वीरेन दोघे सोबत बोलत जात होते. वीरेन भेटल्यापासून मानसीने ग्रुपकडे जणू दुर्लक्षच केलं होतं. मानसी आणि वीरेन पुढे आणि बाकीचा ग्रुप त्यांच्यापासून थोडं अंतर मागे असे सगळे क्लासरूमकडे निघाले.
 

"मानसी नेहमी वीरेन बद्दल बोलायची तो हाच वीरेन आहे तर." कबीर
 

"हो तर, ती नेहमी सांगायची तिचा तो खूप चांगला बालमित्र आहे म्हणून. चांगलाच श्रीमंत दिसतोय!" दिनेश
 

"हो आणि हँडसम पण!" अर्चना
 

"हो ना… काश असा मित्र असता माझा तर…! हाये…! मी तर त्याच्यासाठी जीवपण दिला असता… सच अ हँडसम हंक…! उsssssम्मा…" प्रिया
 

"ओ मॅडम, या खाली! त्याच्या विचारात उडून झालं असेल आता! तो आधीच तिकडं बुक आहे म्हटलं." अर्चना
 

"कशावरून गं? तो तर मानसीचा मित्रच आहे फक्त… मग असं का म्हणतेस तू?" प्रिया
 

"हो… नुसता मित्र असता तर आपली ओळख करून दिली असती ना." अर्चना
 

प्रिया आणि अर्चना क्लासरूमकडे जाताना बोलत होत्या. राघव त्या दोघींचं बोलणं ऐकत होता.
 

"खरंच असं असतं का? जुनं कोणी भेटलं की नवीन मित्रांचाही विसर पडतो… ही तीच मानसी आहे ना? स्वतःहून ओळख करुन घेणारी? मैत्रीचा हात पुढे करणारी… न म्हणताच मनातलं समजून घेणारी? आजच्या तिच्या वागण्यावरून तर असं काहीच वाटत नाहीये…" राघव मानसीच्या विचारात वर्गात येऊन पोहोचला. राघवच्या बेंचवर वीरेन बसलेला होता. त्याला बघून राघव सरळ मागच्या बेंचवर जाऊन बसला..लेक्चर सुरू झाले होते; पण राघवचं लेक्चरमध्ये लक्ष काही लागत नव्हतं. तरी तो खूप लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करत होता.
 

लंच ब्रेक झाला. राघवला वाटलं की मानसी आता तरी त्याच्यासोबत बोलेल; पण मानसी लगेच वीरेनजवळ गेली. मानसीच्या मागे ग्रुपमधले बाकी लोकंपण गेले. सगळ्यांचं मिळून काहीतरी बोलणं झालं आणि सगळे बाहेर निघून गेले.

राघवने बॅगमधून डब्बा काढला, माईने मानसीला आवडतो म्हणून शिरा दिला होता. राघवने डब्ब्यावरून हात फिरवला आणि त्याला गलबलून आलं. डब्बा तसाच ठेऊन त्याने रजिस्टर उघडलं आणि लेक्चरमध्ये काढलेल्या रनिंग नोट्स वाचत बसला. रनिंग नोट्स लिहिता लिहिता त्याने बरेचदा नोट्समध्ये मानसीचं नाव लिहिलं होतं. स्वतःच्याच या कृतीवर त्याला खूप चीड आली. बेंचवर तो डोकं धरून बसला होता.
 

"राघव, तू इथे आहेस का? मी किती शोधलं? तू दिसलास नाही मला?" मानसी वर्गात येत बोलली.
 

"बघायचं ठरवलं असतं तर दिसलो असतो, बघायचंच नाही ठरवलं तर मग कसा दिसणार ना?" राघव
 

"व्हॉट? एनिवेझ्, चल ना, तिकडे कॅन्टीनमध्ये बसलोय आम्ही. वीरेनला कॉफी प्यायची होती तर तिकडेच गेलो आणि आता तिथेच बसून डब्बा खाणार आहोत." मानसी
 

"मानसी, तुम्ही लोकं डब्बा खाऊन घ्या. आज माईने तुझ्यासाठी शिरा दिला होता. हे घे." राघव मानसीला डब्बा देत बोलला.
 

"तू चल ना सोबत." मानसी
 

"मानसी, प्लिज, आग्रह करू नको. मघा लेक्चर सुरू असताना मी काही नोट्स काढल्या होत्या, त्यात थोड्या चुका झाल्या आहेत, लायब्ररीतुन पुस्तक घेऊन त्या तेवढ्या आधी दुरुस्त करतो, त्याच्याशिवाय मला चैन पडायचा नाही." राघव बोलला आणि तडक उठून लायब्ररीमध्ये निघून गेला. मानसीही परत कॅन्टीनमध्ये गेली. लंच ब्रेकनंतर प्रॅक्टिकल्स होते, वीरेन दुसऱ्या ग्रुपमध्ये होता. मानसी राघवसोबत बोलण्याचा खूप प्रयत्न करत होती; पण राघव तिला टाळत होता. राघव असा का वागतोय हे मानसीला काही कळत नव्हतं. कॉलेज सुटल्यावर कोणासोबत न बोलता राघव लगेच घरी निघून गेला. घरी गेल्यावरही त्याची विनाकारण चिडचिड सुरू होती. आईस्क्रिम पर्लरमध्येही त्याचं वागणं तसंच होतं.
 

रात्री राघव पलंगावर झोपला होता आणि माई आणि रजनी जमिनीवर अंथरून टाकून झोपल्या होत्या. रात्री राघवला झोपही येत नव्हती. त्याच्या मनाची चलबिचल होत होती.
 

"राघव, झोप येत नाहीये का बाळा?" राघव उठून पलंगावर बसला होता, माई त्याच्याजवळ येऊन, त्याच्या डोक्यावर हात फिरवत बोलल्या आणि त्याच्याजवळ बसल्या. राघवने त्याचं डोकं माईंच्या मांडीवर ठेवलं.
 

"काय झालं? संध्याकाळपासून बघतेय… कोणी काही बोललं का?" माई
 

"काही नाही गं माई." राघव
 

"बरं नको सांगू…. मला सांगण्यासारखं नसेल तर राहू दे." माई
 

"तसं नाही गं माई." राघव
 

"मग कसं?" माई
 

"माई, असं का असतं गं? कोणी जुनं माणूस भेटल्यावर लगेच नव्या माणसाचा विसर का पडतो?" राघव
 

"कदाचित तो जुना माणूस खरंच जवळचा असू शकतो. आधी त्याने पडत्या काळात साथ दिलेली असू शकते कदाचित त्या जुन्या माणसामुळेच मैत्री, प्रेम म्हणजे काय असतं ते कळालं असू शकते…" माई
 

"पण माई, मग असा आपण दुसऱ्याला इतका जीव लावायचाच नाही ना, की कोणी आपल्यात गुंतून जाईल." राघव
 

"काय झालं राघव? नेमकं कोणाबद्दल बोलतोय तू? मानसीबद्दल?" माई
 

"माई, किती मनकवडी आहेस गं तू…माझ्या मनातलं किती सहज कळलं तुला… माई, कॉलेजमध्ये मानसीचा एक जुना मित्र आला आजपासून… आमच्याच वर्गात आहे… आणि आज तो आल्यापासून मानसी थोडं वेगळंच वागतेय… माई तुला म्हणून सांगतोय…मानसी मला पहिल्याच भेटीत आवडली होती गं… तिचे निळे डोळे पाहिले की आजही मला तिच्या डोळ्यांत हरवल्यासारखं होतं… पण आज तिचा तो मित्र आला आणि… आणि मला असं वाटतं की मानसीला तो आवडतो… मग या सगळ्यात मी कुठेय…? आणि माझ्या भावनांचं काय मग? त्यांना काहीच मोल नाही का ग? माझ्या प्रेमाला काहीच अर्थ नाही का?" राघव हतबल झाल्यासारखा बोलत होता. त्याच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं.

 

"कोण म्हणे प्रेमाला अर्थ नाहीये? प्रेमाचा दुसरं नाव माहिती काय आहे ते… त्याग! आपल्याला जी व्यक्ती आवडते ती मिळवण्यातच प्रेम असतं अस नाहीये… त्या व्यक्तीच्या सुखासाठी, आनंदासाठी आपण निरपेक्ष भावनेने जे करू शकतो ते असतं प्रेम…! मानसी तुला आवडली हे तुझ्यापर्यंतच मर्यादित आहे, तू कधी तिच्या मनात काय आहे हे जाणून घेतलं का? कदाचित तिच्या मनात पहिलेपासूनच दुसरं कोणी असेल… एवढा गुंता सांभाळेपर्यंत तिची मैत्री सांभाळणं सोपं नाही का? चांगली मुलगी आहे मानसी… एक मैत्रीण म्हणून तिला नक्कीच जप… तिची काळजी घे… तिला साथ दे…" माई बोलल्या आणि राघवच्या विचारांचं मळभ दूर झालं, जणू नात्यांमध्ये एक प्रकारचा स्वच्छ प्रकाश संचारला….
 

दुसऱ्यादिवशी राघव उठला. सगळा आसमंत कसा मोकळा-मोकळा, निर्मळ वाटतं होता…
 

क्रमशः
© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all