हे जीवन सुंदर आहे (भाग २६)

कथा मानसीची
हे जीवन सुंदर आहे! (भाग २६)


राघवने त्याच्या घरी बोलावले होते, पण त्याच्या घरी जावं की नाही म्हणून मानसी विचार करत होती.


"मानसी, परत एकटीला यावं लागेल त्याचा विचार करतेय ना? परत येताना मी येईल सोबतीला." राघव


"नाही म्हणजे अगदी तसं काही नाही…प्रिया, चल ना जाऊन येऊ." मानसीने प्रियाला गळ घातली. प्रियाला मानसीचं मन मोडावस वाटलं नाही. ती मानसीसोबत जायला तयार झाली. एरव्ही रोज कॉलेजला पायी जाणं-येणं करणाऱ्या राघवने आज चक्क रिक्षा केली होती. रिक्षात मागच्या सीटवर मानसी आणि प्रिया दोघी बसल्या होत्या तर राघव समोर ड्रायव्हरच्या बाजूला थोडा अकडून तिरपा बसला होता. समोरच्या आरशात त्याला मानसीचा चेहरा अगदी स्पष्ट दिसत होता.


कॉलेजपासून बरंच अंतर गेल्यावर राघवने एका घराजवळ रिक्षा थांबवली. मानसी आणि प्रिया रिक्षातून खाली उतरल्या. दोघी तिथला परिसर न्याहाळत होत्या.

"चला, थोडंस पायी जावं लागेल. जवळच आहे घर." राघव म्हणाला आणि दोघी त्याच्यासोबत चालत जात होत्या. राघव एका बऱ्या घराजवळ येऊन थांबला. त्याने घरासमोरचं फाटक उघडलं. मानसी आणि प्रिया दोघी आत आल्या.


"मानसी, घर तर बरं दिसतंय याचं. तरीपण पार्ट टाईम जॉब का करत असेल हा? स्कुटर पण आहे की दारात…! मग हा पायी का येतो?" प्रिया मानसीच्या कानात खुसपुसली. मानसीने \"चूप बस\" म्हणून तिचा हात दाबला.


"या ना.. इकडे जायचंय." राघवने समोरच्या दारातून न जाता घराच्या बाजूने दोघींना आत नेलं.


"माई, आलोय गं मी." राघवने दारातूनच आवाज दिला. रजनी पळतच बाहेर आली.


"दादू, लवकर आलास आज! अरे माई ना तिकडे पलिकडच्या जोशी काकु नाहीत का त्यांच्याकडे गेलीये गहू साफ…" रजनी राघवच्या मागे मानसी आणि प्रियाला बघून बोलायचं थांबली.


"या…आत या…" राघवने दोघींना घरात नेलं. 


राघवचं घर म्हणजे एक छोटीशी रूम, त्या रुमध्ये दोन जुन्या फायबरच्या खुर्च्या ठेवलेल्या, त्यातही एक खुर्चीचा पाय तुटलेला आणि तारेच्या साहाय्याने तो पाय बांधलेला होता. त्या खुर्च्यांसमोर एक लोखंडी पलंग टाकलेला, त्यावर गादी आणि जुनीच पण स्वच्छ धुतलेली चादर टाकलेली होती. एका बाजूला भिंतीला एक जुना टेबल ठेवलेला आणि त्यावर बरीचशी पुस्तकं ठेवलेली होती. त्या टेबलच्या बाजूने आत जायला एक दरवाजा होता, तिथे आत जाऊन एक माणूस उभं राहून स्वयंपाक करू शकेल एवढी जागा होती… म्हणायला वेगळं स्वयंपाक घर! मानसी आणि प्रिया घराचं निरीक्षण करत पलंगावर बसल्या. तितक्यात माई परत आल्या. माईंना बघून दोघी ताडकन उठून उभ्या राहिल्या.

माई दोघींकडे बघून गोड हसल्या.


"बसा गं पोरींनो!" माई बोलता बोलता आतल्या घरात गेल्या आणि पाणी घेऊन आल्या. 


"माई, ही मानसी आणि ही प्रिया. दोघी माझ्याच वर्गात आहेत. आमच्या ग्रुपमध्ये अजून मुलं-मुली आहेत; पण ते लोकं आले नाहीत." राघव


"हो का? बरं बरं…" माईंनी बोलता बोलता पदराच्या कोपऱ्याला बांधलेली गाठ सोडली आणि रजनीच्या हातात काही पैसे देत तिच्या कानात काहीतरी बोलल्या. रजनी ते पैसे घेऊन बाहेर गेली.


"आणि माई, अजुन एक बरं का… आज ना मानसीचापण वाढदिवस आहे." राघव


"मानसीचापण म्हणजे अजून कोणाचा वाढदिवस आहे?" प्रिया


"अग आमच्या राघवचा! मीच त्याला म्हटलं होतं, तुझ्या मित्रांना बोलाव म्हणून… म्हटलं त्या निमित्ताने आमच्या घरी याल तुम्ही सगळे." माई


मानसीने राघवकडे आश्चर्याने पाहिलं.


"वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राघव…" मानसीने शुभेच्छा देण्यासाठी हात पुढे केला.


"सेम टू यु…!" राघवने थरथरत्या हाताने मानसीचा हात पकडला.


"ए…  भारीच ना… आपण असं दसरा-दिवाळीला किंवा काही सणाला सेम टू यु म्हणतो… वाढदिवसाच्या दिवशीपण असं कोणाला म्हणायला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं." मानसीला या गोष्टीचा खूप आनंद झाला.


"हो ना, मी पण पहिल्यांदाच असं सेम टू यु म्हणतोय." राघव


"राघव, आज तुला आईस्क्रिम पार्लरवर नाही जायचं का?" प्रिया 


"आजची सुट्टी घेतलीये. कालच सांगून आलो होतो सुट्टीचं." राघव, मानसी आणि प्रियाच्या हसत खेळत गोष्टी सुरू होत्या तितक्यात रजनी समान घेऊन आली. माईंनी पिशवी आत नेली आणि औक्षणाचं ताट घेऊन बाहेर आल्या. त्यांनी मानसीला आणि राघवला औक्षण केलं. मानसी माईंच्या पाया पडली. माईंनी तिला आशीर्वाद दिला, तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. मानसीच्या डोळ्यांत अश्रूंची गर्दी जमा झाली.


"अगं वाढदिवस आहे ना आज? मग असं डोळ्यात पाणी का बरं? आईची आठवण आली का?" माईने मानसीच्या डोळ्यातलं पाणी टिपत विचारलं. मानसीने होकारार्थी मान हलवली.


"असं रडतात होय? आईला कळलं तर तिला कसं वाटेल बरं? इथे मी आहे ना, तुला कधीही घरी जावंसं वाटलं, घरचं खावंस वाटलं की इकडे येत जा." माई


"हो माई." मानसी डोळ्यातलं पाणी पुसत बोलली.


"आता तुम्ही लोकं बोलत बसा, मी पटकन स्वयंपाक बनवते. आता जेऊनच जा." माई


"माई, स्वयंपाक वगैरे राहू द्या. होस्टेलवर पोहोचायला उशीर होईल." मानसी 


" काही उशीर होणार नाही.. आता बनवते बघ." माई स्वयंपाकाला लागल्या. राघवने रजनीची ओळख करून दिली. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तोपर्यंत माईंचा स्वयंपाक तयार झाला. माईंनी चौघांची पानं वाढली. जेवायला साधाच स्वयंपाक होता… वरण-भात, भाजी-पोळी आणि शिरा…माईंच्या हातचं गरम गरम जेवण मानसी खूप आवडीने जेवली. जड अंतःकरणाने माईंचा निरोप घेऊन ती परत हॉस्टेलवर जायला निघाली. राघव दोघींना सोडायला सोबत आला होता. रिक्षा करून तिघे हॉस्टेलच्या गेटजवळ पोहोचले.


"थॅंक्यु राघव…वाढदिवसाची एवढी सुंदर आठवण दिल्याबद्दल." मानसीने तिचा हात पुढे केला. राघवने अलगद तिचा हात पकडला. दोघांनी एकमेकांना गोड स्माईल दिलं.


अंधार पडायला लागला होता. सूर्य अस्ताला जाताना क्षितिजावर रेंगाळत होता… जाता जाता मुक्त हस्ताने क्षितिजावर रंगांची उधळण करत होता. संधीप्रकाशात मानसीचा चेहरा अजूनच सुंदर भासत होता. राघव मानसीच्या निळ्या डोळ्यांकडे बघतच राहिला होता. 


खिलती महकती ये जुल्फों की शाम

हँसते खनकते ये होठों के जाम

आ झूम के साज़ उठाएं

बस नगमें तेरे प्यार के गाते ही जाएँ

ऐ काश के हम होश में अब आने ना पाएं

बस नगमें तेरे प्यार के गाते ही जाएँ


राघवला पुन्हा गाण्याची धून ऐकू येऊ लागली. मानसीचा हात राघवच्या हातातच होता.


"राघव, परवा भेटू परत." मानसी थोडी मोठ्यानेच बोलली.  राघव त्याच्या तंद्रीतून एकदम बाहेर आला.


"परवा? परवा का बरं?" राघव


"उद्याचा रविवार नाही का? कॉलेजला सुट्टी असते ना उद्या म्हणून मग परवा भेटू…  चल, येतो आम्ही." मानसी राघवचा निरोप घेऊन हॉस्टेलवर गेली. राघवही मोठ्या आनंदाने घरी परतला. मानसीच्या मनात राघवविषयी सॉफ्ट कॉर्नर तयार होत होता. राघवच साधं राहाणं मानसीला भुरळ पाडत होतं. राघवची मैत्री मानसीला हवी हवीशी वाटू लागली होती.


दिवस कसे अगदी मस्त जात होते… जणू फुलपाखरांचे पंख लागल्यासारखे… प्रत्येक दिवस निराळाच… निराळ्याच रंगाने भरलेला…बहरलेला…!


एक दिवस सकाळी राघव, मानसी आणि सगळा ग्रुप कॉलेजच्या गेटजवळ पोहोचला होता. सगळेजण गप्पा गोष्टी करत आत जात होते तेवढ्यात कोणीतरी गाडीचा कर्णकर्कश हॉर्न वाजवला. एवढ्या मोठ्याने कोणी हॉर्न वाजवला म्हणून जवळपास कॉलेजमधले सगळेजण गेटकडे बघत होते.

गेटमधून एक महागडी स्पोर्ट्स बाईक चालवत कोणीतरी आलं. त्याच्या अंगात ब्लॅक कलरचं लेदरच जॅकेट, ब्लॅक पँट होती. हातात बोटं उघडी असलेले लेदरचे हँड ग्लोव्हज, पायात महागडे ब्रँडेड शूज होते तर डोक्यावर ब्लॅक ग्लास असलेलं ब्लॅक कलरचं हेल्मेट होतं… त्यामुळे नेमकं कोण आलंय त्याचा चेहरा काही दिसत नव्हता… पण जे कोणी होतं त्याच्याकडे मात्र सगळंच कॉलेज अगदी डोळे विस्फारून बघत होतं…


क्रमशः
©डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all