हे जीवन सुंदर आहे! (भाग २५)
दुसऱ्या दिवशी राघव जरा उशिराच कॉलेजला पोहोचला. पहिल्या लेक्चरसाठी सगळेजण वर्गात बसले होते. राघव धावतच वर्गात गेला आणि दाराजवळच उभा राहीला. सर यायचे होते म्हणून त्याला थोडं हायसं वाटलं. वर्गात गेल्या गेल्या त्याची नजर मानसीला शोधत होती. फिक्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये ती अजूनच सुंदर दिसत होती. मानसीचं लक्ष दाराकडे गेलं आणि तिने त्याच्याकडे बघून एक गोड स्माईल दिलं. राघव मानसीकडे बघून तिथेच स्तब्ध उभा राहिला. पुन्हा त्याला कुठूनतरी गाणं ऐकू येऊ लागलं…
कितना हसीन चेहरा
कितनी प्यारी आँखें
कितनी प्यारी आँखें हैं
आँखों से छलकता प्यार
कुदरत ने बनाया होगा
फुरसत तुझे मेरे यार
राघवच्या खांद्यावर हळूच कोणीतरी हात ठेवला, तो दचकला आणि त्याने मागे वळून पाहिलं.
"चला, वर्गात बसून विचार करा." सर म्हणाले तसा राघव पटकन दिसेल त्या बेंचवर जाऊन बसला. वर्गातली काही मुलं त्याच्याकडे बघून फिदीफिदी हसली.
"क्लास… कीप सायलेन्स…. नाऊ वी आर गोइंग टू लर्न…" सरांचं लेक्चर सुरू झालं आणि राघवने आपलं सगळं लक्ष लेक्चरमध्ये केंद्रित केलं.
लंच ब्रेक झाला आणि राघवने आणलेल्या डब्ब्यावर सगळेजण अक्षरशः तुटून पडले. लंच ब्रेकनंतर प्रॅक्टिल्स होते. क्लासमधले सगळे जण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वाटले गेले होते. राघव आणि मानसी एकाच ग्रुपमध्ये होते, त्यामुळे राघव अतिशय आनंदीत होता. सगळे ग्रुप प्रॅक्टिकलसाठी सरांनी सांगितलेल्या लॅबमध्ये गेले. एस. बी. कॉलेजचा परिसर खूप मोठा होता. तिथे प्रत्येक विषयाच्या विभागासाठी एक संपूर्ण इमारत दिलेली होती आणि प्रत्येक इमारतींमध्ये थोडं थोडं अंतर होतं.
राघव,मानसी आणि त्यांच्या ग्रुपमधील मुली-मुलं सोबत चालत जात होते. मानसीची बडबड सुरू होती. राघव चालतानाही मानसीकडे बघत चालत जात होता. हवेसोबत उडणारे मानसीचे केस राघवला घायाळ करत होते. लॅबमध्ये गेल्यावर सरांनी प्रॅक्टिकल समजावून सांगितलं. राघवसोबत प्रॅक्टिकल करताना, "राघवच्या कन्सेप्ट्स् खूप क्लीअर आहेत" ही गोष्ट मानसीच्या लक्षात आली. ती स्वतःच्या अडचणी त्याला विचारून सगळं समजून घेत होती. राघवने बाकीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा प्रॅक्टिकलमध्ये मदत केली. त्यामुळे सगळ्यांचं प्रॅक्टिकल लवकर संपलं. सरांना विचारून सर्वजण लॅबच्या बाहेर जायला निघाले होते.
राघवच्या हुशारीवर मानसी खूप प्रभावित झाली होती. राघव आणि मानसी बोलत बोलत बाहेर येत होते. दुसऱ्या डिपार्टमेंट मधल्या मुलांचं प्रॅक्टिकल अजून संपलं नव्हतं. राघव आणि मानसी इमारतीच्या बाहेर पडणार तोच पाऊस पडायला सुरुवात झाली. मातीचा मंद सुगंध सगळीकडे पसरला होता. राघव आणि मानसी बिल्डिंगच्या पॅसेजमध्ये थांबले. मानसी डोळे घट्ट मिटून, दोन्ही हात किंचित पसरवून मातीचा सुगंध जणू साठवून घेत होती.
"राघव, तुला माहिती? मला पाऊस खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडतो." मानसी पॅसेजमध्ये अजून पुढे जाऊन पावसाचं पाणी आपल्या तळहातावर हलकेच झेलत होती. पावसाच्या काही सरी तिच्या चेहऱ्यावरही पडत होत्या. पावसाच्या थेंब तिच्या चेहऱ्यावर अगदी मोत्याप्रमाणे वाटतं होते. हातात जमा झालेल्या पावसाच्या पाण्यासोबत मानसीचं खेळणं सुरू होतं. राघवला मानसीच्या या बालिशपणाचं कौतुक वाटत होतं. मानसीचं हातात जमा झालेलं पाणी फेकणं सुरू होतं आणि एकीकडे तिची पावसासारखीच बडबड सुरू होती.
रिमझिम रिमझिम,
रुमझूम रुमझूम
भीगी भीगी रुत में,
तुम हम, हम तुम
चलते हैं….
राघवला गाण्याच्या ओळी ऐकू येऊ लागल्या. अचानक मानसी धावत आली आणि त्याचा हात धरून त्याला पावसात घेवून गेली. राघवने इकडे-तिकडे पाहिलं, आजूबाजूचे सर्वजण स्तब्ध उभे होते. मानसी आणि राघव पावसात चिंब भिजत होते.
"राघव…" कबीरने राघवच्या खांद्याला अक्षरशः धरून हलवलं.
"अरे कुठे हरवला होतास मित्रा? किती वेळचा आवाज देतोय." कबीर
"बापरे! पुन्हा स्वप्न! काही खरं नाही, दिवसासुद्धा स्वप्न पडायला लागली आजकाल तर." राघव पुटपुटला
"काय? काय बोललास तू?" कबीर
"काही नाही, आपले बाकी लोक कुठे आहेत?" राघव
"ते काय तिथे… पाऊस थांबला तर निघुया म्हटलं." कबीर त्यांच्या ग्रुपकडे हात दाखवत म्हणाला. सर्वजण गप्पा करत कॉलेजच्या मेन गेटच्या दिशेने निघाले होते. चालता चालता मानसीने करंजाची फांदी खाली ओढून जोरात हलवली. पानांवर जमा झालेलं पावसाचं पाणी मानसीच्या चेहऱ्यावर, केसांवर पडलं. राघवने मानसीकडे पाहिलं, तिचे निळे डोळे त्याला अजूनच आकर्षित करत होते.
सर्वजण कॉलेजच्या गेटजवळ येऊन पोहोचले. एकमेकांचा निरोप घेऊन सगळे आपापल्या दिशेने निघाले. राघव घरी जात होता. रस्त्यावर पावसाचं पाणी साठलेलं होतं. राघव मुद्दामच त्या पाण्यातून जात होता. रस्त्याने जाताना त्याने झाडाच्या फांद्या हलवून त्यावरचं पावसाचं पाणी मुद्दाम अंगावर घेतलं.
"पाऊस… खरंच पावसाचा आनंदही घेता येतो हे इतक्या दिवसात कधी जाणवलंच नाही. मानसी आज तुझ्यामुळे या पावसाची नव्याने ओळख झाली. खरंच तू खूप वेगळी आहेस…" राघव मानसीच्या विचारातच घरी पोहोचला.
बघता बघता कॉलेज सुरू होऊन एक महिना झाला होता. सुरुवातीला शांत वाटणारा राघव आता सर्वांशी चांगला मोकळा बोलायला लागला होता. राघवच्या हुशारीची चुणूक जवळपास सर्वच लेक्चररर्स लोकांना कळली होती, राघव सगळ्यांचा आवडता विद्यार्थी बनला होता.
एक दिवस राघव कॉलेजमध्ये पोहोचला. रोजच्याप्रमाणे त्याची नजर मानसीला शोधत होती. कॉलेजच्या गेटपासून तो मानसीला शोधत क्लासरूमपर्यंत गेला; पण मानसी वर्गातही नव्हती. तिथून तो लायब्ररीत गेला; तिथेही मानसी नव्हती.
"मानसी बहुतेक आज कॉलेजला येणार नाही असं दिसतंय. कॉलेजमध्ये यायचं असतं तर एव्हाना ती आली असती. का बरं मानसी कॉलेजला आली नसेल? तब्येत वगैरे तर ठीक असेल ना तिची. प्रिया आणि अर्चनासुद्धा दिसत नाहीयेत " या विचारात तो लायब्ररीतुन निघाला होता आणि परत कॉलेजच्या गेटच्या दिशेने चालला होता.
"ए राघव…! कुठे चालला घाई घाईने?" दिनेशने राघवला आवाज दिला.
"अरे काही नाही, एक काम आठवलं, तेवढं करून येतो." राघव दिनेशजवळ येत बोलला. दिनेशसोबत कबीर आणि शरद दोघेही होते.
"आपली गर्ल्स गँग दिसत नाहीये आज!" राघव
"अरे, मानसीचा वाढदिवस ना आज! ती त्या दोघींना सोबत घेऊन जवळपासच्या मंदिरात गेली असेल बघ, येतीलच इतक्यात. काल होस्टेलवर जाताना मानसी प्रियाला बोलली होती म्हणून मला माहिती." कबीर म्हणाला
"अच्छा, बरं मी येतो." राघव तिथून निघाला. कॉलेजच्या जवळपास दोन मंदिरं होती, मानसी कोणत्या मंदिरात गेली असेल याचा विचार करत राघव गेटजवळ घुटमळला. इकडे लेक्चरची वेळ होत होती. लेक्चरला जावं की मानसीची वाट पहावी, काय करावं राघवला काही कळत नव्हतं. तो तिथून निघाला आणि वर्गात येऊन बसला. मानसी आली नाही म्हणून त्याचं मन सैरभैर झालं होतं खिशातला पेन काढून तो विनाकारण पेनसोबत खेळत होता. इतक्यात त्याला मानसी आत येताना दिसली. सुंदरसा अबोली रंगाचा ड्रेस, त्यावर तशीच मॅचिंग ओढणी, कानात मोत्याचे लोंबते डुल, कपाळावर छोटीशी चंद्रकोर आणि त्याखाली छोटासा कुंकवाचा टीका, क्लचरमध्ये बांधून ठेवायचा प्रयत्न केलेले तिचे लांबसडक, काळेभोर रेशमी केस… आणि अथांग सागरासारखे तिचे निळे डोळे… राघव मानसीकडे बघतच राहिला… मानसी दिसायला सुंदर होतीच पण आज ती जरा जास्तच सुंदर दिसत होती.
लंच ब्रेकमध्ये मानसीने सगळ्यांना कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये छोटीशी पार्टी दिली. सर्वजण खाण्यापिण्यात गुंग होते. मानसी मात्र एका कोपऱ्यात जाऊन शांत उभी होती. राघवचं लक्ष मानसी कडे गेलं.
"बर्थडे गर्लच्या डोळ्यात चक्कं पाणी!" राघव म्हणाला तसं मानसीने तिचे डोळे पुसले.
"काही नाही रे असंच." मानसी
"असंच पाणी नसतं येत डोळ्यांत. काय झालं हे सांगायचं नसेल तर नको सांगू; पण असं रडू नको प्लिज." राघव बोलला आणि थोडावेळ तिथेच उभा होता. मानसी काहीच बोलत नाही हे बघून तो तिथून निघू लागला.
"राघव." मानसीने आवाज दिला. राघवने मानसीकडे पाहिलं.
"आईची खूप आठवण येतेय आज. यावेळी पहिल्यांदाच मी तिला सोडून असा वाढदिवस साजरा करतेय. ती ना नेहमी माझ्या वाढदिवसाला मला औक्षण करायची, घरात माझ्या आवडीचं गोड बनवायची. आज मात्र वेगळंच वाटतंय, आईसोबत नाही ना रे! ती तिकडे गावी आहे." मानसी बोलता बोलता रडायला लागली.
"मग काय झालं? तुझी आई तुझ्या सोबत नसली तरी तिने आज घरी तुझा वाढदिवस म्हणून गोड-धोड जेवण बनवलं असेल. आज तिने देवाची मनोभावे पूजा केली असेल. तुला भरभरून यश मिळावं, दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून देवाजवळ नक्कीच प्रार्थना केली असेल… आणि आईचा आशीर्वाद तर नेहमीच आपल्या सोबतच असतो. हो ना? चल मग, मस्त एन्जॉय कर सगळ्यांसोबत… " राघवने सांगितलं आणि मानसीला ते पटलं. मानसी सगळ्यांना जॉईन झाली. लंच ब्रेक संपला आणि त्यानंतर पुन्हा प्रॅक्टिलस झाले. कॉलेज सुटलं आणि सगळे आपापल्या घरी जायला निघाले.
"मानसी, तुला राग येणार नसेल तर एक विचारू का?" राघव
"हो विचार ना. मला कसला राग येणार?" मानसी
"आज माझ्याकडे… माझ्या घरी येशील का? इन्फॅक्ट तुम्ही सगळेच चला माझ्या घरी." राघव सगळ्यांना उद्देशून बोलला.
"आज नको राघव… नंतर येऊ न कधीतरी… " प्रिया आणि अर्चना दोघी सोबतच बोलल्या.
"अरे आम्ही आज सिनेमाला जायचा प्लॅन बनवला आहे. तूच चल आमच्यासोबत." दिनेश
राघवच्या घरी यायला कोणीच तयार नव्हतं. राघवने मोठ्या अपेक्षेने मानसीकडे पाहिलं.
"आपण जावं की नाही? आणि एकटीनेच कसं जावं?" मानसीच्या डोक्यात विचारांचं द्वंद्व सुरू होतं…
क्रमशः
© डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा