Login

हे जीवन सुंदर आहे (भाग २४)

कथा मानसीची



हे जीवन सुंदर आहे! (भाग २४)


डब्बा खाताना मानसीची अखंड बडबड सुरू होती आणि राघव तिची बडबड अगदी मन लावून ऐकत होता. मानसीच्या बडबडीत लंच ब्रेक चुटकीसरशी संपला. त्यानंतर पुन्हा लेक्चर्स सुरू झाले. शेवटचं लेक्चर झालं आणि कॉलेजचा पहिला दिवस संपला देखील. एकमेकांना बाय म्हणून सगळे परत जायला निघाले. मानसी, प्रिया, अर्चना, शरद, कबीर आणि दिनेश सगळे होस्टेलवर राहायचे. एकटा राघव तेवढा घरी जायला निघाला. सगळे चालत चालत कॉलेजच्या गेटजवळ आले. खरंतर तिथून पाय ओढवत नव्हता; पण उद्या कॉलेजमध्ये हे सगळे परत भेटणारच हे माहिती असल्याने राघव त्यांचा निरोप घेऊन निघाला.


रस्त्याने जाताना त्याला जिथे तिथे मानसीच दिसत होती. मानसीच्या विचारात तो घरी येऊन पोहोचला आणि हातपाय धुवून फ्रेश झाला. त्याला सकाळचा मानसीला पहिल्यांदा पाहिलेला प्रसंग आठवला, नकळतच तो गालातल्या गालात हसायला लागला.


"काय दादू, आवडलं वाटतं कॉलेज?" रजनीने त्याच्या डोक्यावर टपली मारली.


"हो, चांगलं आहे की." राघव डोक्यावर हाताने चोळत बोलला.


"चांगलं आहे की खूपच चांगलं आहे?" रजनी


"म्हणजे जसं असायला पाहिजे तसंच आहे." राघव


"असं होय… तरी मग आल्यापासून उगीचच ब्लश ब्लश करणं सुरू आहे." रजनी


"ए.. गप गं! असलं काही करत नाहीये मी… काय तर म्हणे ब्लश…" राघव वाकडं तोंड करत बोलला.


"हो का? कळेल बरं लवकरच…" रजनी


"आज अभ्यास वगैरे नाही वाटतं काही… जा मुकाट्याने अभ्यास करत बस." राघव म्हणाला आणि रजनी त्याला वाकडं तोंड दाखवून अभ्यासाला बसली. राघव आरशात बघून केस विंचरत होता. तेवढ्यात त्याला आरशात मानसीचं प्रतिबिंब दिसलं. तोच पांढरा सलवार कमीज आणि त्यावर लाल बांधणीची ओढणी… एका हातात चहा आणि एका हाताने उडणारी ओढणी आणि चेऱ्यावरच्या केसांच्या बटा बाजूला सारत उभी होती… राघव तिच्याकडे बघतच राहिला. भिंतीवरच्या फुटक्या आरशातही तिचं रूप किती खुलून दिसत होतं. राघव तिच्याकडे बघून गोड हसला.


"आता मात्र हद्दच झाली. भैरा-बिरा झालास की कुठं डोक्यावर पडलास? का कोणी झपाटलं?" आरशातून मानसीचं प्रतिबिंब अक्षरशः खेकसलं. राघवने दचकून मागे पाहिलं. माई चहाचा कप हातात घेऊन उभ्या होत्या आणि राघवच्या नावाने खडे फोडत होत्या. राघव थोडा बावचळला; पण त्याने लगेच स्वतःला सावरलं.


"माई, आज काय स्पेशल? मस्त गरमागरम चहा, तेही दुधाचा?" राघव चहाचा एक घोट घेत बोलला.


"अरे दादू, आईने त्या पलिकडच्या गल्लीतल एक स्वयंपाकाचं काम घेतलं होतं ना… तिथल्या काकूंनी आईच्या कामावर खुश होऊन आईला शंभर रुपये जास्त दिले बघ… म्हणून आज टी- पार्टी." रजनी


"माई, अजून किती कष्ट करशील गं? तू ना आता हे सगळं सोड. मी करेन सगळं नीट." राघव माईंजवळ बसला आणि त्याने त्याचं डोकं माईंच्या मांडीवर ठेवलं.


"झालं अजून काही वर्षं… एकदा का तू पास झाला आणि चांगल्या नोकरीला लागला की मी मस्त घरात बसून आराम करणार. सध्या आता तूच हे संध्याकाळचं आईस्क्रीम पार्लरवर काम करणं बंद कर आणि चांगला अभ्यास कर." माई म्हणाल्या


"बरं झालं आठवण करून दिलीस. चल, येतो जाऊन… आणि माई तुला माहितीये मी कसा अभ्यास करतो ते… हे काम आताच नाही सोडत… तेवढेच पैसे येतात हाताशी." राघव तडकन उठून तयारीला लागला. अंगावर शर्ट चढवताना त्याच्या खिशातली दहाची नोट खाली पडली.


"बसने जा म्हटलं होतं तर गेला नाहीस आणि बाहेरही काहीच खाल्लं नाहीस." माई दहाची नोट उचलत बोलल्या. त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.


"माई, तू ना उद्यापासून मस्तपैकी डब्बा देत जा… आमच्या ग्रुपने ठरवलंय की रोज डब्बा आणायचा." राघव


"अय्या! दादू तुझा ग्रुपपण झाला कॉलेजमध्ये! ए.. कोण कोण आहे तुझ्या ग्रुपमध्ये?" रजनी


"गप गं…! अभ्यास कर जरा, सगळं लक्ष इकडेच!" राघव रजनीला थोडा रागावला आणि कामावर निघून गेला. आज आईस्क्रीम पार्लरमध्ये बरीच गर्दी होती. राघव एक कस्टमरचे पैसे घेऊन त्याला उरलेले पैसे परत करत होता. तेवढ्यात त्याला मानसी येताना दिसली.


जिसे देख मेरा दिल धड़का

मेरी जान तड़पती है

कोई जन्नत की वो हूर नहीं

मेरे कॉलेज की एक लड़की है


राघवला परत गाणं ऐकू येऊ लागलं. "काय झालंय काय माहिती… आज जिथं तिथं तीच का दिसतेय?" राघवने स्वतःशीच पुटपुटत दोन क्षणासाठी डोळे मिटले आणि परत उघडले.


"राघव, टेबल नंबर तीनवर कस्टमर आले आहेत. तू त्यांची ऑर्डर घेऊन ये." दुकानदार म्हणाला आणि राघव मेन्यू कार्ड घेऊन तिथे गेला. त्याने मेन्यू कार्ड टेबलवर ठेवले आणि कागदपेन घेऊन उभा राहिला.


"राघव, तू इथे कसा?" मानसी आश्चर्याने जवळपास ओरडलीच. राघवनेसुद्धा आश्चर्याने पाहिलं. कबीर, दिनेश, प्रिया, अर्चना आणि शरद… सगळेच आईस्क्रीम खायला आले होते.


"मी कॉलेज सुटल्यावर पार्ट टाईम जॉब करतो इथे." राघवने कुठलेच आढेवेढे न घेता, कुठलीही लाज शरम न बाळगता अगदी सहज सांगितलं.


"म्हणजे कमवा आणि शिका असंच ना?" अर्चना बोलली, मानसीने तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं.


"हे राघव, कमॉन तू पण जॉईन हो ना आम्हाला." शरद


"अरे नको, असू द्या. मला बरीच कामं आहेत. तुमचे आवडते आईस्क्रीम फ्लेवर्स सांगा, मी पटकन आणून देतो. तुम्ही एन्जॉय करा." राघव


"म्हणजे तू आमच्या ग्रुपमध्ये नाहीस ना?" कबीर


"असं कधी म्हटलं मी? आपण पुढच्या वेळी नक्की सोबत आईस्क्रीम खाऊ; पण आज नको. बरं तुमचे फ्लेवर्स सांगता की मी माझ्या मनाने घेऊन येऊ." राघव म्हणला, सगळ्यांनी आपापले आवडते फ्लेवर्स सांगितले आणि राघव परत आत गेला.


"कोण आहेत रे ही मुलं? नाही तू बराच वेळ टेबलजवळ बोलत उभा होता म्हणून म्हटलं." दुकानदार


"माझ्याच कॉलेजची मुलं आहेत, माझे क्लासमेट आहेत." राघव बोलता बोलता बाऊलमध्ये आईस्क्रीम भरत होता. राघवने सहा बाऊल भरले आणि तो तिथून निघाला.


"राघव." दुकानदाराने त्याला आवाज दिला आणि अजून एक चॉकलेट आईस्क्रीमचा बाऊल त्याला दिला.


"सहाजण आहेत ते. मी बरोबर आईस्क्रीम घेतले आहेत. हे नको. राहू द्या." राघव दुकानदाराला उद्देशून बोलला.


"हे तुझ्यासाठी… तुझी चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झाली म्हणून माझ्याकडून तुला ट्रीट… तुझे क्लासमेट आहेत ना ते… जा.. त्यांच्यासोबत खाऊन घे… अरे हेच वय असतं अशी मजा करायचं." दुकानदाराने स्वखुशीने त्याला आईस्क्रीम दिलं. राघवही मोठ्या आनंदाने ते आईस्क्रिम घेऊन गेला. सगळ्यांची मिळून मस्त आईस्क्रीम पार्टी घेईल. राघवचा निरोप घेऊन मानसी आणि बाकीचे सगळे परत होस्टेलवर जायला निघाले.


"ए वाटलं नाही ना राघव असा पार्ट टाईम जॉब वगैरे करत असेल.?" प्रिया.


"आज काल नवीन ट्रेंड आहे… पार्ट टाईम जॉबचा… सगळे परदेशातल्यासारखं करतात आजकाल." शरद


"काहीही बोलू नको शरद. फॅशन म्हणून कोणती गोष्ट करणारा राघव नक्कीच नाहीये आणि तुम्हाला तर माहिती ना की माणसं ओळखण्यात चुकत नाही कधी." मानसी


"हो बाई, तूच ओळखतेस सगळ्यांना… अगदी बरोबर ओळखतेस." प्रिया


"हो मग, आठवतं ना बारावीत असताना या आर्चिच्या मागे मुलगा लागला होता आणि ही पण त्याला लगे भाव देत होती, मीच समजावलं होतं, तेव्हा कुठे हिच्या डोक्यात प्रकाश पडला. बारावीत तो पोरगा नापास झाला ना…त्याच्या मागे असती तर ही पण नापासच झाली असती." मानसी आणि बाकी सगळे बोलत चालले होते. राघव मानसीला पाठमोरं बघत तिथेच उभा होता. दुकानदार राघवला आवाज देतच होता; पण राघव मात्र मानसीमध्ये अगदी हरवून गेला होता.