हे जीवन सुंदर आहे (भाग २३)

कथा मानसीची


हे जीवन सुंदर आहे! (भाग २३)


राघव तावातावाने गेटमधून आत जात होता. वॉचमनचे शब्द अजूनही त्याच्या डोक्यात जात होते. त्याच्या आजूबाजूने कोण जातंय याकडे त्याचं लक्षच नव्हतं… आपल्याच तंद्रीत तो चालत होता आणि चालता चालता तो कोणालातरी धडकला.


"आईssssss गं!" मंजुळ आवाजाने तो भानावर आला. त्याने चमकून इकडे तिकडे पाहिले, आजूबाजूला कोणीच नव्हतं. 


"नेमकं आपण कोणाला धडकलो? भास वगैरे तर नव्हता ना?" राघवला आपल्या हातातले रजिस्टर खाली पडल्याचं एकदम लक्षात आलं आणि त्याचं लक्ष खाली गेलं. त्याचे पडलेले रजिस्टर ती गोळा करत होती.


ती…पांढरा चुडीदार कमीज आणि त्यावर लाल बांधणीची ओढणी… ती ओढणी सुद्धा हवेसोबत मस्त खेळ खेळत होती… तिच्यावर तो ड्रेस अगदीच खुलून दिसत होता… एका हातात नाजुकसं घड्याळ आणि दुसऱ्या हातात करड्या रंगांच्या मेटलच्या बांगड्या आणि हातात कसलासा धागा बांधलेला… ती… अगदी गोरी गोरीपान… कमरेपर्यंत लांब काळे सिल्की केस… दोन्ही बाजूने थोडे थोडे केस घेऊन त्याला एक क्लचर लावलेले… चेहऱ्यावर केसांच्या दोन चार बटा आलेल्या… हवा जणू तिच्या केसांमार्फत तिच्या गालाला स्पर्शून जात होती… गोड गुलाबी ओठ आणि सरळ नाक… आखीव भुवया… भुवयांच्या बरोबर मध्ये एक नाजूकशी टिकली आणि अथांग सागरासारखे निळेशार डोळे… राघव तिच्या निळ्या डोळ्यांत अगदी हरवून गेला होता. एका हाताने ओढणी सांभाळत, चेहऱ्यावरचे केस मागे करत ती उठून उभी राहिली.


"एक्सक्युज मी!" ती अगदी गोड आवाजात बोलली. राघव तिच्या निळ्या डोळ्यांकडे बघतच होता.


"एक्सक्यूज मी!" ती अजून थोडं मोठ्याने बोलली तसा राघव भानावर आला. काय बोलावं त्याला काही कळतच नव्हतं.


"सॉरी म्हणजे मी… ऍक्टच्युअली चूक माझीच होती मी गप्पांमध्ये एवढी गुंग झाले होते की माझं लक्ष समोर नव्हतं… आणि तुला येऊन धडकले बघ… तुला लागलं तर नाही ना?" ती बोलत होती. राघवच्या कानात तिचा मंजुळ आवाज घुमत होता; पण त्याचं सगळं लक्ष तिच्या डोळ्यांत होतं.


"हॅलो….!" तिने राघवच्या डोळ्यांसमोरून हात फिरवला. तसा राघव दचकलाच. तिने त्याचे रजिस्टर त्याला दिले आणि परत मैत्रिणींसोबत गप्पा करत ती निघाली. वाऱ्याने तिचे लांब लांब मोकळे केस उडत होते. राघव तिच्याकडे बघतच होता. 

कुठूनतरी त्याला गाण्याच्या ओळी ऐकू येऊ लागल्या…


उड़ता ही फिरूँ इन हवाओं में कहीं

या मैं झूल जाऊँ इन घटाओं में कहीं

एक कर दूँ आसमान और ज़मीं

कहो यारों क्या करूँ, क्या नहीं

पहला नशा.. पहला खुमार..

नया प्यार है.. नया इंतज़ार

कर लू मैं क्या अपना हाल

ऐ दिल-ए-बेकरार

मेरे दिल-ए-बेकरार, तू ही बता

पहला नशा.. पहला खुमार..


अचानक त्याला आजूबाजूच्या सर्व हालचाली अगदी मंद वाटायला लागल्या…. खट्याळ वारा अगदी वेगाने वाहू लागला… राघवने त्याच्या हाताकडे पाहिलं… हातात खूप सारी रंगीबेरंगी कागदं होती… अचानक त्याला काय झालं काहीच कळलं नाही… सिनेमातल्या हिरोसारखा तोही हातातली कागदं उडवत जणू हवेत तरंगत होता… समोरून ती चालत येत होती… तिला बघून राघव स्तब्ध उभा राहिला…


"सॉरी म्हटलं मी… फर्स्ट इअर ऍडमिशन?" ती बोलत होती आणि राघव पुन्हा तिच्या निळ्या डोळ्यात हरवला होता. तिने राघवच्या डोळ्यांसमोर पुन्हा एक चुटकी वाजवली. राघव दचकून भानावर आला. त्याने आजूबाजूला पाहिलं… विद्यार्थी ये-जा करत होते… त्याने त्याच्या हाताकडे पाहिलं… हातात त्याचे रजिस्टर जसेच्या तसे होते… त्याने रस्त्याकडे पाहिलं… रस्त्यावर कागदाचा एक चिटोराही नव्हता. "आपण चक्क दिवसाढवळ्या स्वप्न बघत होतो…" त्याच्या लक्षात आलं, त्याने स्वतःच्याच डोक्यावर एक टपली मारली आणि त्याला गालातल्या गालात हसू आलं. ती बरेच दूर गेलेली दिसली. राघव धावतच क्लास रूमकडे गेला. ती त्याच्याच क्लासमध्ये होती. क्लासमध्ये मुली एकीकडे बसल्या होत्या, ती सर्वात समोरच्या बेंचवर बसलेली होती. राघव ती दिसेल अशा हेतूने दोन बेंच मागे बसला. क्लासमध्ये अजून मुलं येतच होती. राघवचा एकंदरीत अवतार बघून त्याच्या बेंचवर कोणीच बसलं नाही. तो एकटाच होता.


सर क्लासमध्ये आले, पिरियड सुरू झाला. राघवचं लक्ष तिच्याकडेच होतं, पण तो लगेच भानावर आला. माईने किती कष्ट घेऊन त्याला इथपर्यंत आणलं होतं याची जाणीव त्याला झाली आणि राघव अगदी मन लावून लेक्चर ऐकू लागला. पहिलंच लेक्चर असल्याने सर अगदी बेसीक गोष्टी सांगत होते. लेक्चर ऐकता ऐकता राघव रनिंग नोट्स लिहीत होता कारण पुस्तक घ्यायची ऐपत नव्हती आणि लायब्ररीरीतुन सर्वच पुस्तकं मिळतील याची शाश्वती नव्हती. म्हणून मग शक्य तेवढं डोक्यात आणि वहीत उतरवणं सुरू होतं त्याचं.

एकामागे एक असे चार पिरियड झाले आणि त्यानंतर लंच ब्रेक झाला. क्लासमधली सगळी मुलं बाहेर जाऊ लागली. राघव मात्र तिथेच बसून होता, स्वतःच्या काढलेल्या नोट्स मन लावून वाचत होता. वेळ मिळाला की वाचत बसायची सवय त्याला लहानपणापासूनच होती. तेवढ्यात त्याच्या डेस्कवर कोणीतरी टकटक केलं. त्याने वर पाहिलं… समोर ती… तिचे निळे डोळे… राघव पुन्हा पुन्हा त्यात अगदी हरवून जात होता.


"हाय! मी मानसी… मानसी देशमुख." मानसीने त्याच्याकडे हात मिळवणीसाठी आपला हात केला.


"हाय! मी राघव सरपोतदार.." तो उठून उभा राहिला आणि त्याने अगदीच चाचरत आपला हात पुढे केला. 


"मेरिट लिस्टमध्ये तुझं नाव वाचलं होतं मी. आठवतं मला." मानसीने गोड हसून शेक हँड केलं.


"ही प्रिया, ही अर्चना, हा शरद, हा दिनेश आणि हा कबीर… आम्ही बारावीत पण सोबतच होतो आणि नशिबाने पुढेही एकच कॉलेज मिळालं. तुझ्या ओळखीचं नाहीये का कोणी?" मानसीने तिच्या फ्रेंड्सची ओळख करून दिली.


"नाही… म्हणजे माझे कोणी फ्रेंड्सच नाहीयेत." राघव


"असं कसं? आम्ही आहोत ना! फ्रेंड्स…!" मानसी आणि तिच्या ग्रुपने त्याच्यासमोर हात केला आणि राघवने पण तो घट्ट पकडला. आतापर्यंतच्या आयुष्यात त्याला पहिल्यांदा मित्र-मैत्रिणी भेटले होते. राघव अगदी भारावून गेला होता. माई आणि रजनीशिवाय त्याची अशी प्रेमाने विचारपूस कोणीच केली नव्हती. मानसी अखंड बोलत होती… राघव तिचं बोलणं ऐकत होता, न कळत तिच्यात गुंतत होता. मानसी अगदी जुनी ओळख असल्यासारखी भासत होती.


"चहा घ्यायचा? चला कॅन्टीनमध्ये जाऊ. इथलं कॅन्टीन खूप भारी आहे म्हणे." प्रिया म्हणाली तसा राघवने शर्टच्या खिशाला हात लावला. खिशात सकाळी माईने दिलेले दहा रुपये होते, "बसने जा रे कॉलेजला… खूप दूर आहे आणि येतांनाही बसनेच ये." असं म्हणत माईने दहाची नोट त्याच्या खिशात कोंबली होती.


"चहावर पैसे उडवण्यापेक्षा जपून ठेवावेत… असेच पैसे जमल्यावर एखादं पुस्तक घेता येईल किंवा रजनीला काही आवश्यक घेऊन देता येईल… नाहीतर कधी माईलाच गरज पडली तर परत देता येतील. हे असले चहा-पाण्याचे लाड आपल्याला काही पुरायचे नाहीत." त्याने विचार केला, दहाची नोट अलगद खिशातून काढत परत आत ठेवली आणि चहासाठी नकार दिला…  मानसीने त्याची ही कृती हेरली.


"चहा कशाला गं आताच?अजून चार वर्ष काढायचीत इथे… आजच सगळं बघून बोअर करायचं का, त्यापेक्षा इथंच बसू…  मी ना मस्त आईने दिलेला चिवडा लाडू आणलाय डब्ब्यात… ए आर्चे तू पण आणला असशील ना डब्बा? मस्तपैकी डब्बा खाऊ. आपण ना रोज असंच डब्ब्यात काहीतरी घेऊन येत जाऊ… म्हणजे एकीकडे गप्पा आणि एकीकडे पेटपूजा पण!" मानसी बोलली आणि तिने बॅगमधून डब्बा काढला. सगळेजण चिवडा लाडूवर ताव मारू लागले. राघव मात्र मानसीकडे बघत होता… तिने डब्ब्यातला एक लाडू काढून त्याच्यासमोर धरला. लाडू घेतांना तिच्या बोटांचा झालेला स्पर्श त्याच्या अंगावर मोरपीस फिरवून गेला… तिचं अस क्षणात आपलंसं करून घेणं… काळजी घेणं… मनातल्या गोष्टी क्षणात हेरणं… तिची बोलण्याची स्टाईल… चेहऱ्यावरचे हाव भाव… राघव अगदी सगळं मनात साठवत होता…. कुठूनतरी त्याला पुन्हा गाणं ऐकू येत होतं…


एक लड़की को देखा तो ऐसा लगा    

एक लड़की को देखा तो ऐसा लगा, 

जैसे खिलता गुलाब, 

जैसे शायर का ख्वाब,

जैसे उजली किरन, 

जैसे बन में हिरन, 

जैसे चाँदनी रात,

जैसे नरमी बात, 

जैसे मन्दिर में हो एक जलता दिया, हो…!


क्रमशः

© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all