हे जीवन सुंदर आहे (भाग २२)

कथा मानसीची... तिच्या संघर्षाची




हे जीवन सुंदर आहे ! (भाग २२)


रावसाहेब आणि त्यांच्या मातोश्रींचे सर्व दशक्रिया विधी वगैरे पार पडल्या होत्या. घरातले सर्व नातेवाईकही आपापल्या घरी निघून गेले होते. राघव आणि रजनीला कुशीत घेऊन माई झोपण्याचा प्रयत्न करत होत्या. रात्री उशिरा कधीतरी त्यांचा डोळा लागला. नेहमीप्रमाणे त्या सकाळी लवकर उठल्या. घरात सगळी सामसूम होती. घरातली बाकीची मंडळी अजून निद्राधीनच होती. माईंनी स्वतःच आन्हिक वगैरे आटोपून देवासमोर दिवा लावला आणि जपमाळ ओढत तिथेच बसून राहिल्या. खरंतर काहीच करायची त्यांची इच्छा नव्हती; पण रात्रीचं मुलांचं मुसमुसणं त्यांना आठवलं आणि इथूनपुढे सगळं आयुष्य मुलांसाठी खर्च करायचं असं त्यांनी मनाशी ठरवलं होतं.


सूर्योदय झाला, माईंच्या तिन्ही जावा उठल्या.


"घ्या… झाली का यांची ढोंग सुरू?" पहिली म्हणाली


"नाहीतर काय! यांनाच बरं दुःख सगळं! यांचा नवरा गेला! पण आमचीसुध्दा सासू गेली म्हटलं! आता आम्ही पण असंच देवासमोर दिवा लावून बसतो. असं देवासमोर बसून गेलेला परत येत असतोय होय?" दुसरी म्हणाली.


"काय झालं गं? अशा का बोलताय?" माई


"जरा चहा पाण्याचं, नाश्त्याचं बघा." तिसरी जाऊ जवळपास खेकसलीच. आधीच दुःखी असलेल्या माईंना जावांचं असं वागणं काही कळत नव्हतं. उगी वाद नको म्हणून त्या कामाला लागल्या. सगळ्यांनी मिळून पटापट चहा- नाश्ता संपवला. राघव आणि रजनीसाठी काही शिल्लक उरलं नाही म्हणून माई दुसरं काही बनवायला गेल्या तर त्यांच्या जावेने त्यांना पुन्हा हटकलं. तरी माई चुपचाप होत्या. दिवसभर माईंनी ढोरांसारखी कामं केली आणि रात्री थकून त्या आपल्या खोलीमध्ये जायला निघाल्या.


"राज्य गेलं म्हटलं आपलं… आता आम्ही म्हणणार तसं राहायचं बरं… ही खोली आता तुमची राहिली नाही… तसंही घर आता छोटं पडतंय… मुलं मोठी होतील तर त्यांना  ही खोली लागेल. आतापासून तुम्ही बाहेर गोठ्याजवळच्या अडगळीच्या खोलीत राहायचं, कळलं?" माईंच्या जावेने त्यांना हात धरून बाहेर काढलं. माईंनी मोठ्या अपेक्षेने दिरांकडे पाहिलं पण सगळ्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. माईंना एकदम धक्काच बसला. घरात हे सगळं नेमकं कशामुळे सुरू होतं हे माईंना काही कळत नव्हतं. माई चुपचाप अडगळीच्या खोलीत गेल्या. राघव आणि रजनी दोघही खूप घाबरले होते. दोघांनाही पोटाशी धरून माईंनी कशीबशी रात्र तेथे काढली. दुसऱ्यादिवशी सकाळी त्यांच्या जावांचं पुन्हा तसंच होतं. आता मात्र माईंनी खडसावून जाब विचारला. माईंच्या दिराने त्यांच्यासमोर मालमत्तेची सगळी कागदपत्रे ठेवली. त्यात स्पष्ट लिहिलं होतं की रावसाहेब गेल्यावर सगळी संपत्ती तिघा भावांच्या नावावर राहील आणि माईंचा आणि त्यांच्या मुलांचा यावर काहीच हक्क राहणार नाही. त्याखाली रावसाहेबांचा अंगठा मारलेला होता.


हे सगळं वाचून माई मटकन खालीच बसल्या. रावसाहेबांच्या आजारपणाचा फायदा घेऊन घरातल्या कोणीतरी त्यांना फसवून या कागदपत्रांवर रावसाहेबांचा अंगठा घेतला ही गोष्ट समजायला माईंना वेळ लागला नाही.


"मी कुठे जाऊ? माझ्या मुलांचं कसं होईल?" माई अगतिकपणे विचारत होत्या.


"इथेच राहा… घरातली सगळी कामं कर… दोन वेळेचं जेवायला नक्कीच भेटेल तुला." एक जाऊ कुत्सितपणे हसत बोलली.


"सगळी कामं करेन मी… अगदी तुम्ही म्हणाल ती… पण माझ्या मुलांना शिकू द्या." माई म्हणाल्या.


"ए… काय करायचं गं शिकून? आणि तुझ्या मुलांचा शिक्षणाचा खर्च कोणी करायचा?" दुसरी जाऊ ओरडली.


"भाऊजी, रावसाहेबांनी असाच विचार केला असता तर तुम्ही आज या पदावर असते का?" माई आपल्या दिरांकडे बघत अपेक्षेने बोलल्या. त्यांच्या दिरांनी खाली मान घातली. माई समजायचं ते समजून गेल्या. स्वतःचे आणि लेकरांचे दोन जोडी कपडे घेऊन त्या घरातून निघाल्या.


"ए बाई… थांब जरा." एक जाऊ म्हणाली. माई थांबल्या.


"त्या बोचक्यात काय आहे बघू… काही चोरून तर नेत नाहीस ना…" दुसरी बोलली आणि तिसरीने ते गाठोडं सोडलं. त्यात दोन जोडी कपडे, रावसाहेबांचा फोटो आणि त्यांचं एक घड्याळ होतं.


"घड्याळ चोरून नेत होतीस होय." पहिली खेकसली.


"माझ्या बाबांचं आहे…मी नेणार माझ्यासोबत." राघव रडत रडत बोलला.


"ने… तसंही हे जुनं झालंय… आता असली घड्याळं कोणी नाही घालत…" दुसऱ्या जावेने जरा दया दाखवली. माईंनी आपलं गाठोडं परत बांधलं. घराकडे एकदा डोळे भरून पाहिलं… त्यांनी मायेने सजवलेलं घर आज त्यांच्यासाठी परकं झालं होतं… माईंनी डोळ्यातलं पाणी पुसलं आणि तिथून वाट फुटेल तिकडं निघाल्या. मुलांचा हात धरून चालत चालत त्या रेल्वे स्टेशनवर आल्या. स्टेशनवर एक ट्रेन उभी होती. जवळ एक पैसाही नव्हता. मागचा पुढचा कोणताच विचार न करता त्या ट्रेनमध्ये बसल्या. इथे मात्र नशिबाने त्यांना साथ दिली. तिकीट चेक करायला टी. सी. आलाच नाही. ट्रेनमध्ये बसल्या बसल्या माईंचा डोळा लागला. पहाटे पहाटे जाग आली. ट्रेन एका स्टेशनवर थांबलेली होती. माईंनी आजूबाजूला पाहिलं, डब्ब्यात चिटपाखरूही नव्हतं. माई मुलांना घेऊन खाली उतरल्या. स्टेशनवरच्या नळावर तिघांनी पोटभरून पाणी पिलं. माईंना थोडी तरतरी जाणवू लागली. मुलांचा हात धरून त्या स्टेशनच्या बाहेर आल्या. मोठं शहर होतं. मोठमोठ्या इमारती होत्या. सुंदर मोठे रस्ते होते.


माई भेदरलेल्या नजरेने सगळीकडे बघत चालल्या होत्या. रस्त्यावरून जाणारा येणारा आपल्याचकडे बघतोय असं त्यांना वाटत होतं.

"आपण एकटेच आणि सोबतीला हे दोन छोटे जीव… असं घाबरून चालणार नाही. मुलांसाठी आपल्याला खंबीर राहावंच लागेल…" माईंनी मनाशीच विचार केला आणि त्या चेहऱ्यावर एक प्रकारचा विश्वास घेऊन चालू लागल्या. आता त्यांना लोकांच्या नजरा बोचत नव्हत्या.


माई रस्त्याने चालत जात होत्या. काही अंतर गेल्यावर त्यांना रस्त्याच्या बाजूने एक चहाची टपरी दिसली. दोघे नवरा-बायको मिळून ती टपरी चालवत होते. माईंनी तिथे थोडी कामाची विचारपूस केली, तिथले भांडे घासून दिले आणि त्याबदल्यात त्या टपरीवाल्यांनी माईंना आणि मुलांना चहा-पाव दिले. तेवढं खाऊनच तिघांनाही जरा बरं वाटलं. चहावालीने माईंना एक काम देऊ केलं आणि संध्याकाळी आपल्या झोपडीवजा घरी घेऊन गेली. चहावालीच्या ओळखीने माईंना एका घरी स्वयंपाकाचं काम मिळालं. माईंच्या हाताला मुळातच खूप चव होती. माईंना अजून तीन घरच्या स्वयंपाकाचे काम मिळाले. पैशांची बऱ्यापैकी सोय झाल्यावर माईंनी राघव आणि रजनीचं नाव शाळेत टाकलं. शाळा साधीच होती; पण राघव आणि रजनीला आपल्या माईंच्या कष्टाची जाणीव होती. दोघेही मन लावून शिकायचे आणि मन लावून अभ्यास करायचे…पुढे राघव थोडा मोठा झाल्यावर शाळा सुटल्यावर एका किराणा दुकानात काम करू लागला. दुकानदाराने दुकानात गिऱ्हाईक नसल्यावर अभ्यासाची परवानगी दिली होती; त्यामुळे राघवचा अभ्यासही होत होता आणि माईंना तेवढाच हातभार लागू लागला.


अकरावीत गेल्यावर  राघवने सकाळी उठून न्यूज पेपर टाकायचं कामही सुरू केलं होतं. रोज सकाळी सायकलवर पेपर टाकायला जाताना तो एस. बी. कॉलेजसमोरून जायचा. तिथं दोन क्षण थांबून कॉलेजची मोठी इमारत डोळे भरून बघायचा. त्याचक्षणी त्याने ठरवलं होतं... "पुढे शिकायचं तर एस. बी. कॉलेजमधूनच…!  खूप शिकायचं… आपल्या माईंचं… बाबांचं नाव मोठं करायचं…आपल्या काकांपेक्षाही खूप श्रीमंत व्हायचं. जे सुख आपल्या माईला, रजनीला मिळालं नाही ते त्यांच्या पायाशी आणून ठेवायचं… प्रत्येकाची एक वेळ असते… माझीही वेळ येईलच…" आपल्या मनगटावर असलेल्या रावसाहेबांच्या घड्याळावरून तो मायेने हात फिरवायचा.


राघवचं स्वप्न पूर्ण झालं होतं. माईंच्या कष्टाचं चीज झालं होतं. राघवला बारावीत खूप चांगले मार्क मिळाले होते, राघव बोर्डात तिसरा आला होता आणि त्यासोबतच त्याला स्कॉलरशिपसुद्धा मिळाली होती. त्यामुळे त्याच्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला होता… 


राघवचा कॉलेजमधला पहिलाच दिवस होता आणि वॉचमनने त्याचा त्याच्या कपड्यावरून पाणउतारा केला होता. वॉचमनचा राग मनात धरून राघव आपल्याच तंद्रीत वर्गाकडे निघाला होता…


क्रमशः
© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all