हे जीवन सुंदर आहे (भाग २१)

कथा मानसीची, तिच्या संघर्षाची




हे जीवन सुंदर आहे! (भाग २१)


एस. बी. कॉलेजचा परिसर गजबजलेला होता. फर्स्ट इअरच्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस होता; पण फर्स्ट इअरला कोणकोणते नवीन पाखरू आलेत हे बघण्यासाठी सेकंड इअर, थर्ड इअर आणि फायनल इअरचे सगळेच विद्यार्थी आले होते. त्यामुळं कॉलेजच्या परिसरात मस्त किलबिलाट होता.


तो कॉलेजच्या बाहेर, फाटकापाशी येऊन उभा होता. अंगात साधंस शर्ट आणि पँट, डोक्यावरचे केस थोडसं तेल लावून सेट केलेले, पायात चामड्याची शिवलेली चप्पल, डाव्या हाताच्या मनगटावर एक जुनं घड्याळ, उजव्या हातात दोन-चार रजिस्टर आणि शर्टला अडकवलेला निळ्या झाकणाचा रेनॉलड्सचा पेन… कॉलेजच्या गेटजवळ उभं राहून त्याने कमानीवर लिहिलेलं कॉलेजचं नाव पूर्ण वाचलं… "सरस्वती भुवन अभियांत्रिकी महाविद्यालय…" कॉलेजचं नाव वाचताच त्याची छाती अभिमानाने फुलून आली… "आपण स्वप्न तर पहात नाही ना!" त्याने स्वतःलाच एक चिमटा काढून बघितला… स्वप्न नव्हतंच मुळी ते…


त्याचं मन जरा सैरभैर झालं होतं…  थोडीशी भीतीही वाटत होती… त्याने आजूबाजूला पाहिलं… कॉलेजच्या परिसरात मुलामुलींचे ग्रुप ये-जा करत होते… बहुतांश मुलं ही चांगल्या घरातली वाटत होती…सगळ्यांच्या अंगावर छानसे, फॅशनेबल कपडे होते, पायातही चांगले शूज-चप्पल होते… प्रत्येकाच्या पाठीवर कॉलेज सॅक होती… आणि याहूनही महत्त्वाचं… प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास होता…


"एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन चूक तर नाही केली ना? सगळं कसं चकचकीत आहे… फक्त मी सोडून…" त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं… त्या विचारातच तो आत जाऊ लागला… गेटवरच्या वॉचमनने त्याला हटकलं..


"क्यू भाई… कहा जाना हैं?" आपल्या हातात असलेला छोटासा दांडा पुढे करत वॉचमनने त्याला अडवलं.


"ते… फर्स्ट इअरला ऍडमिशन झालीये ना… तर मग आत जात होतो…" तो थोडा चाचरतच बोलला.


"लग तो नहीं रहा…" वॉचमनने त्याला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळलं.


"आय.डी. कार्ड मिळालं नाही ना अजून… आज पहिलाच दिवस…" तो


"वो भी हैं। लेकिन तुम यहा अपना नाम और पता लिख दो… पता चले की कल कुछ हो गया और फिर पता चले की तुम यहा के स्तुडेंट ही नहीं हो.. ! मेरी नौकरी तोह गयी ना…" त्या वॉचमनने त्याच्यासमोर एंट्री बुक ठेवलं. तो त्यात त्याचं नाव लिहीत होता. तो काय लिहितोय हे वॉचमन बघत होता.


"राघव रावसाहेब सरपोतदार…" वॉचमनने मोठ्याने नाव वाचले.


"सरपोतदार… वाह रे! नाम बडे और दर्शन छोटे…" वॉचमन त्याच्याकडे बघत उपहासात्मक बोलला.


खरंतर वॉचमनचं बोलणं ऐकून राघवला त्याच्या कानशिलात जोराची वाजवावी वाटली; पण त्याने स्वतःला सावरलं… माईचे शब्द त्याला आठवले… "आपले शब्द आणि शक्ती योग्य तिथेच खर्च करावी… मूर्खांच्या नादी लागू नये…"


एंट्री बुकवर नाव लिहून तो आत आला… पण वॉचमनचे शब्द कानात घुमत होते…


"हाहाहाहाहा…सरपोतदार… नाव मोठं…. एकदा बघ स्वतःकडे… काय तो अवतार! आणि बाकीचे लोक बघ इथे… म्हणे इंजिनिअर होणार…!" वॉचमन अक्राळविक्राळ रूप घेऊन त्याच्यासोबत बोलतोय असं त्याला वाटत होतं… राघवने गच्च डोळे मिटले…


"परिस्थिती… आणि वेळ… एकदा आली की कोणी कितीही मोठं असो की पैशावाला असो… दोन्हीसमोर माणूस हात टेकतोच…" राघव स्वतःशीच पुटपुटला… भूतकाळ त्याच्यासोबतच होता…



रावसाहेब सरपोतदार… गावातलं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व… रावसाहेबांचे वडील हरिभाऊ… हरिभाऊंना सहा अपत्य… रावसाहेब आणि अजून तीन मुलं आणि दोन मुली… रावसाहेब घरात सगळ्यात मोठे होते… रावसाहेब पंधरा वर्षांचे असताना हरिभाऊंना देवाज्ञा झाली आणि घरातली सगळी जबाबदारी रावसाहेबांवर येऊन पडली… रावसाहेब मात्र अगदी व्यवस्थित ही जबाबदारी पार पाडत होते. रावसाहेबांनी आपल्या तिन्ही भावांना योग्य शिक्षण दिलं होतं, बहिणींचे देखील योग्य वयात योग्य स्थळ बघून लग्न करून दिलं होतं. या सगळ्यात रावसाहेबांना खंबीर साथ दिली ती त्यांची पत्नी त्रिशलाबाईंनी… 


त्रिशलाबाई त्याकाळी दहावीपर्यंत शिकलेल्या होत्या. रावसाहेबांसोबत लग्न करून आल्या आणि पूर्णपणे या घराच्याच झाल्या होत्या. रावसाहेब आणि त्रिशलाबाईंनी घरात सगळ्यांना लळा लावला होता. त्रिशलाबाई घरातल्या सगळ्यांचा सांभाळ अगदी आईप्रमाणे ममतेने करत होत्या. त्रिशलाबाईंचे तीनही दीर आणि नंदा त्यांना माई म्हणू लागले… पुढे घरातले सगळेच त्यांना माई म्हणायला लागले.


घरात रावसाहेब म्हणतील ती पूर्व दिशा होती. घरातल्या सगळ्यांना एकोप्याने बांधण्यासाठी रावसाहेबांनी काही नियम घालून दिले होते; त्या नियमाप्रमाणेच सगळ्यांना राहावं लागत होतं. घरात किती पैसा येतो, तो कुठे आणि कसा खर्च होतो याचा सगळा लेखाजमा रावसाहेबांजवळ असायचा. घरातल्या कोणालाही कसाही पैसा खर्च करायचं स्वातंत्र्य नव्हतं. प्रत्येकाला आपापल्या पैशाचा हिशोब रावसाहेबांना द्यावा लागायचा. अगदी रावसाहेबांच्या मातोश्रीदेखील याला अपवाद नव्हत्या. रावसाहेबांनी आपल्या तीनही भावांसाठी योग्य मुली निवडून अगदी धुमधडाक्यात लग्न करून दिलं. एकापाठोपाठ एक तीन नवीन सुना घरात आल्या. तिघीही जणी माईंसोबतच रहात होत्या. माईंकडून घरातले कुळाचार, चालीरीती शिकून घेत होत्या. घराचं अगदी गोकुळ झालं होतं. सगळेजण आनंदाने एका छताखाली रहात होते. भांडण, कलह याचा दूरपर्यंत संबंध नव्हता.


रावसाहेब आणि त्रिशलाबाईंच्या संसारवेलीवर राघव आणि रजनी नावाची दोन फुलं देखील फुलली होती. राघव मोठा होता आणि रजनी त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान होती. \"सुख म्हणजे नक्की काय असतं?\" हे सरपोतदार घराण्याकडे बघून कळत होतं. पण सगळं सुरळीत सुरू राहील ते जीवन कुठलं!


राघव जेमतेम आठ वर्षांचा असताना रावसाहेबांना पक्षाघाताचा झटका आला. त्यात त्यांच्या शरीराची उजवी बाजू पूर्णपणे निकामी झाली. रावसाहेबांना बोलता देखील येत नव्हतं. असा चांगला हट्टा कट्टा, चालता फिरता, पहाडासारखा भारदस्त माणूस असा अचानक अंथरुणाला खिळला हे सत्य लवकर कोणाच्या पचनी पडलं नव्हतं. रावसाहेबांनाही असं लाचार आयुष्य नको वाटायला लागलं होतं. त्याकाळी एवढ्या सोयी सुविधाही नव्हत्या. आहे त्या औषध-पाण्याला रावसाहेब काहीच प्रतिसाद देत नव्हते. साहजिकच त्यांची तब्येत अजूनच ढासळत होती. त्रिशलाबाई मात्र त्यांची अगदी मनापासून सेवा करत होत्या.


रावसाहेबांनी इतके दिवस घरातल्या पैशा-अडक्याबद्दल कोणालाच काही सांगितलं नव्हतं. रावसाहेबांच्या तब्येतीमुळे ही सर्व जबाबदारी त्यांच्या तिनही लहान भावंडांवर आली. आतामात्र घरातले सर्वाधिकार आपल्याजवळ असावेत असं तिघांनाही वाटायला लागलं. त्यामुळे साहजिकच तिघांमध्ये वाद होऊ लागले, वाद विकोपाला जाऊ लागले. तिघांनीसुद्धा घरात आपापला हिस्सा मागितला. इतके दिवस एकोप्याने बांधलेलं घर रावसाहेबांच्या डोळ्यासमोर तुटत होतं. घराच्या वाटणीसाठी रावसाहेबांनी ठाम नकार दिला. त्यानंतर काही दिवस जरा बरे गेले.


दिवसेंदिवस रावसाहेबांची तब्येत अजूनच खराब होऊ लागली. एक दिवस त्यांच्या लहान भावाने नवीन शेतीचा व्यवहार केला म्हणून बऱ्याच कागदपत्रांवर रावसाहेबांचा अंगठा घेतला. रावसाहेबांचा त्यांच्या लहान भावावर विशेष जीव होता, त्यांनीही अगदी डोळे झाकून त्या कागदांवर अंगठा दिला.


रावसाहेबांची तब्येत अजूनच ढासळली आणि एकदिवस रावसाहेबांची प्राणज्योत मालवली. रावसाहेबांच्या मातोश्रींना हा धक्का सहन झाला नाही, रावसाहेबांच्या पाठोपाठ त्याही इहलोकी गेल्या. सम्पूर्ण घरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्रिशलाबाईंच्या तर पायाखालची जमीनच सरकल्यासारखं झालं… राघव, रजनी दोघेही लहानच होते… घरात असे अचानक दोन मृत्यू झाल्याने दोन्ही लेकरं अगदीच कोमेजून गेले होते. दोघेही सतत माईंच्या जवळजवळ रहात होते. रावसाहेबांचे दशक्रिया विधी वगैरे पार पडले आणि त्यापाठोपाठ त्यांच्या मातोश्रींचेही विधी पार पडले. आलेला पै-पाहुणा आपापल्या घरी निघून गेला. घरात पाहुण्यांची वर्दळ होती तोपर्यंत तरी दुःख जरा हलकं वाटत होतं. त्यानंतर मात्र घरातली स्मशानासारखी शांतता माईंना अगदी खायला उठली होती. दोन्ही लेकरं आपल्या कुशीत घेऊन माई त्यांच्या खोलीत निजल्या होत्या. मुलं गाढ झोपली होती; पण माईंचा डोळा काही लागत नव्हता. रावसाहेबांचा विचार करता करता रात्री कधीतरी त्यांचा डोळा लागला होता.


क्रमशः

दुसऱ्या दिवशीची सकाळ काय घेऊन येणार होती? माईंच्या नशिबात अजून काय वाढून ठेवलेलं होत? पाहूया पुढच्या भागात
© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all