हे जीवन सुंदर आहे (भाग २०)

कथा मानसीची



हे जीवन सुंदर आहे! (भाग २०)


मानसी आणि वीरेनची भेट झालीच नाही. गावातून परत जाईपर्यंत, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मानसीने वीरेनची वाट पाहिली. "न जानो लहानपणीसारखा आपण निघाल्यावर मागून धावत येईल… सरप्राईज द्यायला!" मानसीच्या मनात लहानपणीची आठवण डोकावून गेली; पण यावेळी वीरेन आला नव्हता. नाईलाजाने मानसी पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी शहरात निघून गेली. शहरातल्या नामवंत कॉलेजमध्ये तिला अकरावी विज्ञान शाखेत प्रवेशही मिळाला.


"पण, वीरेन तू भेटायला हवं होतं एकदा… एकमेकांसोबत कसा कॉन्टॅक्ट करणार आपण? काहीच बोलणं झालं नाही आपलं… जाण्यापूर्वी क्षणभरही तुला वाटलं नाही मला भेटून जावं म्हणून… कमीत कमी एकदा सांगायचं तरी ना… एरव्ही माझ्यासोबत सगळं शेअर करायचास तू; पण आता मी परकी वाटले का रे तुला? आता मात्र मी ठरवलंय तू जेव्हा भेटशील तेव्हा मी माझ्या मनातलं सगळं तुला सांगून टाकणार… मला माहितीये… तुलाही तेच वाटतंय.." वीरेनने दिलेल्या आणि तिने जीवापाड जपलेल्या शंख शिंपल्यांवरून हात फिरवत मानसी पुटपुटली. वीरेनने लहानपणी आवळे बांधून दिलेला पांढराशुभ्र रुमाल मानसीने अजूनही तसाच जपून ठेवला होता. तो रुमाल तिने अलगदपणे घडी करून परत नीट ठेवला. रंगीत खडूपासून वीरेनने दिलेली प्रत्येक गोष्ट तिने जपून ठेवली होती. 


"ही दोन वर्षे फक्त अभ्यास एके अभ्यास… बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, ताई सारखं मलाही चांगल्या कॉलेजमधून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करायचंय…" हा विचार दुसऱ्याच क्षणी मानसीच्या मनात आला… वीरेनच्या आठवणी तिने अलगद बाजूला सारल्या आणि इथुनपुढे आपलं सगळं लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं… मानसीच्या कष्टाचं चीज झालं…दहावी प्रमाणेच मानसीने बारावीतही बाजी मारली… यावेळी मानसीचं नाव बोर्डात पहिल्या पाचात होतं…


मानसीचे दोन वर्षे कॉलेज, प्रॅक्टिकल, अभ्यास एवढ्यातच गेले; पण इकडे वीरेनच्या आयुष्यात या दोन वर्षात मात्र खूप घडामोडी घडल्या होत्या….


दोन वर्षांपूर्वी वीरेनच्या आयुष्यात-


वीरेन शिकायला मामाच्या घरी होता. वीरेनच्या मामाला मूलबाळ नव्हते, सहाजिकच वीरेन मामा-मामीचा अतिशय लाडका होता. कमी मार्क्स पडले तर आई बाबा रागावतील या भीतीने तो दोन दिवस आधीच मामाच्या घरी निघून आला होता. दहावीचा निकाल लागला, वीरेन जेमतेम चाळीस टक्के मार्क घेऊन पास झाला होता. पोरगं काठावर का होईना पास झालं, त्याला वाईट वाटू नये म्हणून वीरेनच्या मामीने त्याच्या आवडीचा शिरा केला होता. संध्याकाळी वीरेन घरीच होता. त्याच्या मित्रांमध्ये सगळ्यात कमी मार्क्स त्यालाच होते. तेवढ्यात मामा घरी आले.


"वीरेनsssssss.. अरे ए वीरेन…" मामांनी दारातूनच आवाज दिला. मामी आणि वीरेन बाहेर आले.


"हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय." मामा आनंदात बोलत होते.


"यामाहा आर एक्स हंड्रेड…! नवीन बाईक…!" वीरेनचे डोळे चमकले.


"मग, मी आधीच ठरवलं होतं, तू दहावी पास झाला की लगेच तुला गाडी घेऊन देणार. आधीच बुक केली होती मुद्दाम… अरे हे नवीन मॉडेल आहे… गावात तर कोणाजवळच नसेल बघ." मामा पण कौतुकाने बोलत होते.


"पण त्याला गाडी कुठं चालवता येते? गाडी शिकण्याच्या नादात उगी हातपाय मोडून घेईल बरं!" मामी


"गाडी येत नाही! आणि तेही वीरेनला! मग उगीच माझी राजदूत गावभर फिरवत असतो का? लक्ष कुठं असतं तुझं?" मामा 


"घरातले कामं सोडून आता त्याच्या मागे लक्ष देत फिरू का?" मामी


"बरं पुरे आता.. चला, गाडीची पूजा वगैरे करा आणि जेवायला काहीतरी खास बेत बनवा." मामाने फर्मान सोडलं आणि मामी तयारीला लागल्या. गाडी मिळाल्यामुळे वीरेनची गाडी तर खूपच खुश झाली होती. गाडीची पूजा करण्याचाच अवकाश की वीरेन लगेचच आपली गाडी मित्रांना दाखवायला घेऊन गेला.


"अहो, हे गाडी वगैरे जरा जास्तच नाही झालं का? जेमतेम मार्क घेऊन पास झालंय पोरगं… जिथं रागावायचं तिथं रागवावंसुद्धा थोडं… असले फाजील लाड करायची काही गरज नाही… मुळात असं कष्ट न करता, न मागता मिळत गेलं तर पोराला कोणत्याच गोष्टीची किंमत राहणार नाही आणि कष्ट करून मिळवायची वृत्तीही राहणार नाही." मामी काळजीने बोलल्या.


"या वयात रागावायचं नसतं पोरांना…त्यांचा मित्र बनावं लागतंय… आणि कशाला कष्ट हवेत त्याला… आपल्याला ना मूल ना बाळ… आपलं जे काही आहे ते त्याचंच आहे शिवाय त्याच्या घरीही तो एकटाच… जे त्याच्या बापाचं ते त्याचं… दहा पिढ्या बसून खाल्लं तरी पुरेल एवढं आहे." मामा मिशिवरून हात फिरवत ऐटीत बोलत होते.


"अहो, पण…" मामी पुढे काही बोलणार तोच मामांनी त्यांना अडवलं…


"पण बिन काही नाही… आमच्या लेकराचे लाड करायचे की नाही हे तुझ्याकडून शिकायची गरज नाहीये मला… कळलं? आता तोंड सांभाळून बोलायचं… जा जेवायचं बघा जरा…" मामा खेकसले आणि मामी स्वयंपाकघरात गेल्या.


वीरेनला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा होता; पण त्याचे मार्क्स एवढे कमी होते की त्याला कोणत्याच चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नव्हता. मामाने एका खाजगी महाविद्यालयात पाण्यासारखा पैसा ओतून वीरेनची ऍडमिशन तिथं केली. मामीचा या गोष्टीसाठी देखील विरोध होता. सत्येंद्रला ही गोष्ट कळताच त्यांचा पारा चढला… त्यांच्या तत्वात न बसणाऱ्या गोष्टी वीरेन करत होता… सत्येंद्र रागारागाने घरातून निघाले, उमाही त्यांच्यासोबत निघाली.


"उमे, बस झालं आता… वीरेनचे असले फाजील लाड मी आता खपवून घेणार नाही… आता त्याला आपल्याकडे परत आणणार… पोरगं शिकलं नाही तरी चालेल मला… शेती करेल… शेती करणंही काही वाईट नसतंय…" सत्येंद्र रागारागाने बोलत गाडी चालवत होते. रागाच्या भरात गाडीचा वेगही जास्तच होता. समोरून येणाऱ्या कंटेनरला चुकवायच्या प्रयत्नात सत्येंद्रची गाडी रस्त्याच्या बाजूच्या झाडावर जोरदार आदळली... सत्येंद्र आणि उमा हे जग कायमच सोडून गेले….


माय-बापाविना पोर म्हणून मामा वीरेनचा अजूनच लाड करायला लागले होते. मामा वीरेनपुढे चांगलं काय आणि वाईट काय याचा विचारही करत नव्हते. वीरेनने तोंडातून शब्द काढला की लगेच त्याची इच्छा पूर्ण व्हायची. वीरेन फारसा अभ्यासही करत नव्हता. ही गोष्ट मामीने मामांच्या कानावर बरेचदा टाकली; पण मामा मामीलाच काहीबाही बोलून शांत करायचे. नव्या बाईकवर ऐटीत फिरण्यापलिकडे वीरेनने कॉलेजमध्ये दुसरं काहीच केलं नव्हतं. मामांनी मॅनेजमेंटला मॅनेज करवून वीरेनला अकरावीत पास करवून घेतलं होतं. राहता राहिला प्रश्न बारावीचा… त्यासाठी मामांच्या सुपीक डोक्यात एक प्लॅन तयार होता आणि त्यानुसार त्यांनी वीरेनची बारावीदेखील पूर्ण करवून घेतली होती.


इकडे मानसीचे बारावीचे पेपर झाल्यावर तिची गावाकडे काही दिवस राहण्याची खूप इच्छा होती; पण गौरीने सगळं कुटुंब मिळून बाहेर फिरायला जायचा प्लॅन आधीच केला होता. त्यामुळे बरेच दिवस बाहेर फिरण्यात गेले आणि त्यानंतर मंदाताईंनी त्यांच्या नातेवाईकांकडे जाण्याचा प्लॅन बनवला. मानसीसुद्धा कोणाला काहीच न म्हणता सगळ्यांसोबत हवं तिथे गेली; पण वीरेनच्या आठवणी मात्र कायम तिच्या सोबतच होत्या. कधी ना कधी वीरेनची नक्की भेट होईल ही आशा तिच्या मनात कायम होती.


बारावीच्या निकालानंतर मानसीला महाराष्ट्रात टॉपवर असलेल्या एस.बी. कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली होती. मानसीचं स्वप्न… सुधीररावांच स्वप्न पूर्ण झालं होतं. इथून पुढचा प्रवास मात्र मानसीला एकटीला करायचा होता. आतापर्यंत मानसी शिक्षणासाठी घर सोडून बाहेर राहायला होती; पण मंदाताई आणि गौरी कायम तिच्या सोबत होत्या. त्यामुळे बाहेर राहूनही तिला घर सोडून राहिल्याचं कधी जाणवलच नाही; पण आता मात्र तसं होणार नव्हतं…


गौरीकडून अभियांत्रिकी कॉलेज बद्दल बरंच काही ऐकलं होतं; पण हे कॉलेज तिच्या कॉलेजपेक्षाही भरपूर मोठं होतं… 

नवीन शहर, नवीन कॉलेज… कॉलेजचं हॉस्टेल… सगळंच बदलणार होतं… सगळ्यांना आवडणारी… हवीहवीशी वाटणारी…पुन्हा पुन्हा जगावीशी वाटणारी कॉलेज लाईफ सुरू होणार होती…पंखातल्या बळाची खरी ताकद इथून पुढे कळणार होती… मानसीच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळणार होती…!


क्रमशः


कसा असेल मानसीचा हा प्रवास? वीरेन भेटेल मानसीला परत? जाणून घेण्यासाठी वाचत रहा "हे जीवन सुंदर आहे!"

© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all