हे जीवन सुंदर आहे! (भाग १९)
मानसीचा चेहरा अगदी वीरेनच्या चेहऱ्याजवळच होता. तिच्या केसांच्या दोन तीन बटा तिच्या चेहऱ्यावर खेळत होत्या. वीरेनने अगदी अलगद त्या बटा मागे केल्या. तशी मानसी वीरेनसमोरुन पटकन दूर झाली. तिच्या हाता-पायांना एक वेगळाच कंप सुटला होता. श्वासांची गती वाढली होती. "नेमकं काय होतंय? हे मलाच होतंय की वीरेनलाही असं काही होतंय?" विचार करत ती वीरेनकडे पाठ करून उभी होती. क्षणभर तिथे थांबून मानसी परत जायला निघाली.
"मानसी…" वीरेनने चाचरतच आवाज दिला. मानसी तिथेच थांबली, गळ्यातल्या ओढणीचा कोपरा हातात घेऊन तिचा ओढणीशी खेळ सुरू होता.
"मानसी…." वीरेनने परत आवाज दिल्यावर मानसीने त्याच्याकडे वळून पाहिलं.
"मानसी… ते…. आता… मला थोडं…" वीरेन स्वतःच्या डोक्यावरचे मागचे केस हाताने नीट करत, शब्दांची जुळवाजुळव करत बोलायचा प्रयत्न करत होता.
"वीरेन, मलाच तुला काहीतरी विचारायचं होतं…" हातातल्या ओढणीच्या कोपराशी चाळा करत, जमिनीवर पायाच्या अंगठ्याने उखरल्यासारखं करत, खाली मान घालून मानसी बोलत होती.
"काय… विचारायचं होतं…?" वीरेनच्या आवाजाला अजूनही कंप होता. मानसी हळूहळू चालत त्याच्याजवळ गेली. मानसीला असं जवळ आलेलं पाहून वीरेनला स्वतःच्याच हृदयाचे ठोके ऐकू येऊ लागले.
"वीरेन, थोडं खाली वाक ना." मानसी बोलत होती, वीरेन तिच्याकडे टक लावून बघत होता.
"वीरेन…. थोडं खाली वाक ना…. एक तर ताडाच्या झाडासारखाच उंच झालास… आधी कोणतीही गोष्ट तुझ्या कानात सहज सांगता येत होती… आता तू वाकल्याशिवाय कशी सांगणार?.... वाक तर खाली…" मानसीच्या बोलण्याने वीरेन भानावर आला. तो हळूच खाली झुकला. मानसी अजून त्याच्याजवळ गेली. एका हाताने तिने त्याच्या कानाची पाळी पकडली आणि एक हात आपल्या ओठांजवळ धरत ती त्याच्या कानात सांगायला अजून जवळ गेली. मानसीच्या उष्ण श्वासांनी वीरेनच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला.
"वीरेन…" मानसीच्या उष्ण, थरथरत्या शब्दाने वीरेन अजूनच घायाळ झाला.
"वीरेन… तू तोच लहानपणीचा वीरेन आहेस ना… शर्टाने शेंबूड पुसणारा!" मानसी त्याच्या कानात बोलली आणि पळतच तिथून निघाली. वीरेनला दोन क्षण कळलंच नाही काय झालं ते… एकदम करंट लागल्यासारखं त्याला मानसीचं वाक्य परत आठवलं. तोही धावतच तिच्या मागे निघाला. मानसी धाडधाड जीना उतरून खाली गेली आणि उमाताईंच्या मागे लपली.
"ए आई… हिला सांग हां… मला असलं काही बोलायचं नाही." वीरेन थोडा रागातच बोलला.
"अरे पण काय झालं…?" उमाताईसुद्धा चेष्टेने बोलत होत्या.
"काय बोलले मी?" उमाताईंच्या मागून मानसी बोलली.
"असं आईच्या मागे काय लपतेस? हिम्मत असेल तर ये मैदानात." वीरेनही थोडा तावातच होता.
"घे… आले मैदानात…" मानसी समोर आली. वीरेन तिला पकडायला जाणार तोच ती मंदाताईंच्या मागे लपली.
"अरे, आता काय लहान राहिले का तुम्ही असं भांडायला?" मंदाताई
"तेच तर… काकी, हिला सांग बरं… पुन्हा असं बोलायचं नाही म्हणून…" वीरेन अगदी काकुळतीला येऊन बोलत होता.
"हो… असं काय बोलली मी ते तरी सांग… फक्त एवढंच तर म्हटलं की तू लहानपणी शर्टाला शेंबुड पुसायचा!" मानसी वाकडं तोंड करत चिडवत बोलली. वीरेन तिच्या मागे धावला. दोघाजनांची घरभर पळत मस्ती सुरू होती. मंदा आणि उमा दोघांची धिंगा मस्ती मोठ्या कौतुकाने बघत होत्या.
मानसी आणि वीरेनची आता रोजच भेट होत होती. कधी मानसीच्या घरी, तर कधी वीरेनच्या घरी… कधी तलावाकाठी तर कधी देवळात… दोघही भेटले की आधाश्यासारखं बोलायला लागायचे… त्यातही मानसी जरा जास्तच बोलायची… वीरेन मात्र ती बोलताना तिच्या निळ्या डोळ्यांत अगदी हरवून जायचा.
एक दिवस दोघे असेच देवळाच्या पायरीवर बसले होते.
"वीरेन, पुढे काय करणार आहेस?" मानसी
"म्हणजे?" वीरेन
"अरे दहावीची परीक्षा झाली, आता काही दिवसांत रिझल्ट लागले… मग त्यानंतर काय करणार आहेस?" मानसी
"ए, गप गं… असे मोठ्या माणसासारखे प्रश्न विचारू नकोस." वीरेन
"त्यात काय मोठ्या माणसासारखं? पुढे काय शिकायचं, काय बनायचं? काही तरी ठरवलं असशील तू… स्वतःबद्दल काही तर स्वप्न पाहिली असशील की मला डॉक्टर व्हायचंय, इंजिनिअर व्हायचंय, शिक्षक, पोलीस, कलेक्टर… काहीतरी बनायचं आहे." मानसी
"तुझं तरी ठरलंय का, काय करायचंय ते की उगीच लोकांना उपदेश देत बसणार." वीरेन उपहासाने बोलला.
"हो… माझं तर पक्क ठरलंय… मला इंजिनिअर बनायचं आहे… महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये शिकून… त्यानंतर मग मस्त एका कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी… आणि चान्स मिळाला की आपलं विमान सरळ विदेशात…. झुं…." मानसी हाताचं विमान हवेत उडवत मोठ्या आत्मविश्वासाने बोलत होती. वीरेन तिच्याकडे बघत होता.
"त्यात मला जागा असेल का?" वीरेन पुटपुटला.
"काय…? काय म्हणालास तू?" मानसी
"काही नाही गं… म्हटलं हवेत उडणं झालं असेल तर ये खाली." वीरेन
"बरं, चल. अंधार पडायच्या आत घरी जाऊ दे… नाहीतर आई ओरडेल…" मानसी
"हो, चल, मी तुला घरी सोडतो." वीरेन म्हणाला आणि दोघं बोलत घराजवळ आली. तितक्यात मागून सुधीरराव आले.
"अरे वीरेन, काय म्हणतो?" सुधीरराव
"काही नाही काका… मानसीला सोडायला आलो होतो… येतो." वीरेन निरोप घेऊन तिथून सटकला.
मानसी घरात आली. हातपाय धुवून, स्वयंपाकघरात मंदाताईंच्या मागे लुडबुड करू लागली. रात्रीची जेवणं आटोपली आणि मानसी तिच्या रुममध्ये गेली.
"थोडं लक्ष असू द्या पोरीवर…ती आता लहान नाही राहिली." सुधीरराव मंदाताईंना म्हणाले.
"दोन्ही लेकरं आपलीच… काही चुकीचं पाऊल टाकायची नाहीत… तेवढा विश्वास आहे दोघांवरही." मंदाताई
"हो… पण गावात चर्चा सुरू नको व्हायला म्हणून म्हटलं… बाकी कोणावर नसला तरी आमचा आमच्या लेकीवर विश्वास आहे." सुधीरराव बोलले पण मंदाताईंचं मन पुन्हा अस्वस्थ झालं. मंदाताई देवघरात गेल्या. त्यांनी देवासमोर दिवा लावला. देवासमोर हात जोडले. देव्हाऱ्यातला मंद प्रकाश मात्र वातावरणात एक प्रसन्नता घेऊन आला.
दहावीच्या निकालाचा दिवस होता, सुधीरराव सकाळी लवकरच मानसीच्या शाळेत निघून गेले. मानसीला निकाल काय लागतो याची भीती वाटत होती, त्यामुळे ती घरीच थांबली होती. मानसीच मन सकाळपासून सैरभैर होत होतं. त्यात भरीस भर दोन दिवसांपासून वीरेनही भेटला नव्हता.
दुपारी सुधीरराव परत आले ते पेढ्यांचे बॉक्स घेऊनच.
"मंदे… पोरीनी आपलं नाव मोठं केलं बघ! जिल्ह्यातून पहिली आणि बोर्डात सातवी आली बघ आपली मनू!" सुधीरराव अतिशय आनंदाने बोलत होते. मानसी दारा आडून ऐकत होती. सुधीररावांनी तिला आवाज दिला आणि ती त्यांच्या समोर गेली. त्यांनी कौतुकाने आपल्या लेकीच्या डोक्यावरून हात फिरवला.
"खूप छान मनू! नाव केलंस बघ!" सुधीररावांनी पेढ्याचा बॉक्स तिच्या हातात दिला.
"मनू, आधी देवासमोर पेढा ठेव. चल… " मंदाताई मानसीला घेऊन देवघरात गेल्या. मानसीने देवापुढे पेढा ठेवला आणि हात जोडले. त्यानंतर तिने सुधीररावांना पेढा दिला, त्यांच्या पाया पडली. सुधीररावांनी आपल्या लेकीला तोंडभरून आशीर्वाद दिला. मानसीने मंदाताईंना पेढा दिला.
"खूप मोठी हो, खूप नाव कमव… या सगळ्या लोकांच्या तोंडी तुझं नाव होईल बघ." मंदाताईंनी आशीर्वाद दिला. मंदाताई बोलून तर गेल्या; पण त्यांच मन पुन्हा सैरभैर झालं, बारशाच्या दिवशीचा प्रसंग पुन्हा डोळ्यासमोर उभा राहिला. चेहऱ्यावरची अस्थिरता लपवत त्या चटकन स्वयंपाक घरात निघून गेल्या.
"हे काय बाबा, एवढे पेढे!" मानसी सुधीररावांनी आणलेली बॅग बघत बोलली.
"हो तर… चला, सगळ्या गावाला मी माझ्या हाताने पेढे वाटणार आहे. माझी लेक किती हुशार आहे हे कळू दे दुनियेला." सुधीरराव म्हणाले आणि दोघं बापलेक पेढे वाटायला निघाले. जो समोर येईल त्याला सुधीरराव पेढा देत होते, मानसीचं कौतुक मोठया अभिमानाने सांगत होते.
"देशमुखसाहेब, दोन्ही पोरींनी नाव काढलं बरं. गौरीच्या दहावी, बारावीच्या वेळी पण तुम्ही असेच पेढे वाटले होते. अजून आठवतं बर आम्हाला! बरं का मानसी, आता बारावीचे पण असेच पेढे मिळू दे बरं…" गावकरी असे बोलू लागले की सुधीररावांचा उर अजूनच अभिमानाने फुलत होता. मानसी आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद डोळे भरून बघत होती.
"बाबा, तुमच्या या चेहऱ्यावरचा आनंद असाच ठेवण्यासाठी मी अजून खूप अभ्यास करेन, तुमचं नाव खरंच खूप मोठं करेन." मानसीने मनाशीच पक्कं ठरवून टाकलं.
सगळ्या गावात पेढे वाटत दोघे सत्येंद्रच्या घरी पोहोचले.
"दोन-तीन दिवसांत वीरेन भेटलाच नाही, आज भेटल्यावर चांगलाच जाब विचारेन… असं रोज भेटायची सवय लावून, अचानक गायब होणं शोभतं का? चांगलं खडसावून विचारणार आहे मी." मानसीच मनातल्या मनात बडबडणं सुरू होतं.
"सत्याssssss, अरे ए सत्या…." सुधीरराव बाहेरून आवाज देत होते; पण घरात कोणतीच हालचाल जाणवत नव्हती.
"ओ…माजी सरपंच साहेब…." सुधीररावांनी दारातून एक मोठा आवाज दिला. त्या आवाजने सत्येंद्र बाहेर आले.
"अरे, तू आहेस होय! मागच्या अंगणात होतो, म्हणून आवाज आला नाही बघ. आत तर ये." सत्येंद्र
सुधीरराव आणि मानसी घरात गेले. मानसीने सत्येंद्रला पेढा दिला आणि नमस्कार केला.
"अभिनंदन पोरी, बापाचं नाव मोठं केलंस." सत्येंद्रने मानसीला पेढा भरवला.
"आपल्या वीरेनराजेंचा निकाल काय लागला? आणि स्वारी आहे कुणीकडे?" सुधीरराव
"चाळीस टक्के घेऊन पास झालेत राजकुमार…" तिकडून उमाताई तावातावाने बोलत आल्या.
"चालायचंच वहिनी, असू दे. पास झालाय ना! करेल पुढे अभ्यास… आता त्याला त्याची चूक कळली असेल, आपण कुठे कमी पडलो हे ही कळलं असेल." सुधीरराव उमाताईंना समजवणीच्या सुरात बोलले.
"हो तर, म्हणूनच दोन दिवस आधीच आपल्या मामाच्या गावी निघून गेला. त्याला माहिती होतं, कमी मार्क पडले की आपली काही खैर नाही." उमाताई
"निघूनही गेला, जाताना दोन शब्द बोलून तर जायचं होतं ना… दोन-चार दिवसांत पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी जावं लागेल… आता कधी भेट होईल काय माहिती? वीरेन… एक भेट तर घ्यायची होती…" एवढ्या आनंदाच्या क्षणी मानसीचं मन वीरेनसाठी खट्टू झालं होतं.
क्रमशः
डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा