हे जीवन सुंदर आहे (भाग १८)

कथा मानसीची...तिच्या संघर्षाची




हे जीवन सुंदर आहे! (भाग १८)


नवीन शहर आणि नवीन शाळा यांत मानसी हळूहळू रुळत होती. सुरुवातीला काही दिवस सुधीरराव मंदाताईंच्या  सोबतीला होते. नंतर मात्र सुधीरराव गावी परत गेले. आठ-पंधरा दिवसातून ते शहरात यायचे. ते शहरात आले म्हणजे गावाकडच्या गोष्टी, उमाताईंची ख्याली खुशहाली मंदाताईंना कळायची.


गावाकडून आलेल्या म्हणून सुरुवातीला मानसीला आणि गौरीला शाळेत थोडा त्रास झाला; पण दोघी बहिणींनी त्या वातावरणासोबत लवकर जुळवून घेतलं. शहरातल्या शाळेत जाऊन दोन महिन्यातच मानसी आणि गौरीच्या वागण्या-बोलण्यात, अभ्यासात, राहणीमानात कमालीचा फरक पडला होता. मुलींची अभ्यासातली प्रगती पाहून सुधीररावांना आपला निर्णय योग्य ठरला याचं समाधान झालं.


बघता बघता सहा महिने झाले. सणावाराला, सुट्टीला गावाकडे येत जाईल असं म्हणणारी मानसी शहरात गेली तशी गावाकडे आलीच नव्हती. वीरेनच्या शाळेच्या परीक्षाही संपल्या होत्या. त्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. इकडे आठ एक दिवसांनी मानसीची परीक्षा संपली आणि तिच्याही शाळेला सुट्ट्या लागल्या आणि मानसी, गौरी, मंदाताई गावाकडे परत आल्या. वीरेनला ही गोष्ट कळताच लगेच तो धावतच वाड्यावर गेला.


"मानसीsssssss…" त्याने दारातूनच आवाज दिला. वीरेनचा आवाज ऐकून मानसी धावतच बाहेर आली. तिला पाहून वीरेनने एक गाल फुगवून आपलं तोंड वाकडं केलं.


"जा गं! मी कट्टी आहे बरं तुझ्याशी! हेच सांगायला आलो होतो. कट्टी फू…!" वीरेन उजव्या हाताची करंगळी ओठाला लावून बोलत होता.


"का बरं? मी काय केलं? मी तर रात्रीच आले ना परत." मानसी केविलवाणे तोंड करून विचारत होती.


"मोठी आली काल रात्री! तू तर सणावाराला, सुट्ट्या असल्या की येणार होतीस ना? किती वाट पाहिली मी तुझी! तू आल्यावर आपण मिळून तिळगूळ वाटायला जाऊ म्हणून मी तर तिळगुळही वाटला नाही आणि तुला माहितीये तू नव्हतीस म्हणून मी होळीला रंगसुद्धा खेळलो नाही." वीरेन तोंड फुगवून बोलत होता.


"हो रे… आमच्या शाळेत ना इथल्या सारख्या घटक चाचणी आणि सहामाही परीक्षा एवढ्याच परीक्षा नसतात… दर आठवड्याला परीक्षा असते… मग कसं येणार परीक्षा बुडवून तू सांग बरं." मानसी


"असं होय. बरं ते जाऊ दे. अजून सांग ना तुझ्या शाळेतल्या गमती-जमती… कशी आहे गं तुझी शाळा?" वीरेन


"आमची शाळा ना खूप मोठी आहे… दोन मजली इमारत आहे… आणि माहिती.. इथल्यासारखं पट्टीवर नाही बसवत तिथे… तिकडे सगळ्यांना बसायला डेस्क आणि बेंच आहेत… खेळायला खूप मोठं ग्राउंड आहे… आणि माहिती… इथल्यासारखं पहिलीचा एक वर्ग, दुसरीचा एक वर्ग असं नाहीये तिकडे… प्रत्येक वर्गाच्या अ, ब, क, ड अशा चार तुकड्या आहेत…आणि माहिती आम्हाला ना प्रोजेक्टसुद्धा बनवायला लावतात." मानसी तिच्या नवीन शाळेच्या गोष्टी सांगत होती आणि वीरेन अगदी मन लावून तिचं सगळं ऐकत होता.


"आपल्यालाही अशा शाळेत जायला मिळालं तर!" त्याच्या एवढुश्या मनात विचार डोकवून गेला. मानसीच्या शब्दांतून तो मानसीची शाळा जणू जगत होता.


कच्या कैऱ्या तोडणे, मीठ लावून कैऱ्या खात गावभर हुंदडणे, हाताच्या कोपरापर्यंत हात भिजेपर्यंत आंबे खाणे, वडाच्या पारंब्यावर झोके खेळणे, वाळूच्या ढिगाऱ्यावर किल्ला बनवणे त्यासोबतच चिमणीचा खोपा बनवणे यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या अगदी भर्रकन् उडून गेल्या. जून महिना लागला आणि मानसी परत शहरात निघून गेली. मानसीच्या वाटेकडे बघत वीरेनचा एक एक दिवस सरत होता. उन्हाळ्यात परत गेलेली मानसी, दिवाळीतच आली. आधीच दिवाळीच्या सुट्या मोजक्या असायच्या त्यात फटाके, किल्ला, फराळ यात सुट्टीचे दिवस असेच संपले


दिवस कसे भर्रकन् उडाले. पहाता पहाता मानसीची नववीची परीक्षा संपली आणि दहावीचे वर्ग सुरू झाले. गौरीने पुढील शिक्षणासाठी अभियांत्रिकी शाखा निवडली. या मधल्या काळात सत्येंद्रचे वडील आबासाहेब यांना देवाज्ञा झाली. सत्येंद्रकडे सरपंच पद राहिलं नव्हतं. त्यानंतर त्यांनी वीरेनला त्याच्या मामाच्या गावी शिकायला पाठवले होते. त्याचे मामा तालुक्याच्या ठिकाणी राहायचे.


वीरेन आणि मानसीची भेट आता पूर्वीसारखी होत नव्हती. जेव्हा वीरेन गावी यायचा तेव्हा मानसी नसायची आणि जेव्हा मानसी यायची तेव्हा वीरेन नसायचा. दोघांनीही मात्र आपल्या लहानपणीच्या आठवणींचा कप्पा अगदी सांभाळून ठेवला होता. वेळ मिळाला की दोघंही आठवणींची दारं उघडून त्या आठवणी मनसोक्त जपत.


दहावीची बोर्डाची परीक्षा संपली आणि मानसी मंदाताईंसोबत गावी परत आली. खूप दिवसांनी गावात परत आल्यामुळं मानसी घरी पोहोचेपर्यंत सगळं गाव बघत होती. गावात खूप काही बदल झाले होते. मानसी आणि मंदाताई घरी पोहोचल्या. गेल्या गेल्या मानसी सुधीररावांच्या गळ्यात पडली. त्यांनीही कौतुकाने लेकीच्या डोक्यावरून हात फिरवला. दोघं बापलेक अगदी मनसोक्त गप्पा करत होते. मानसीला तर किती बोलू आणि किती नाही असंच होत होतं.

मानसीला घरी येऊनही दोन-तीन दिवस झाले होते; पण नेहमीप्रमाणे वीरेन तिला भेटायला आला नव्हता. मानसी वीरेनची आतुरतेने वाट बघत होती, पण वीरेनचा कुठेच पत्ता नव्हता.


"आई, वीरेन कसा काय आला नाही गं?" सकाळी सकाळी मानसी मंदाताईंच्या गळ्यात पडत बोलली. मंदाताई सकाळी चहा-नाश्त्याची तयारी करत होत्या.


"अगं, तो तिकडे, मामाकडे शिकायला गेला आहे ना?" मंदाताई


"हो… पण दहावीच्या परीक्षा सगळ्यांच्या सोबतच तर असतात." मानसी


"हो तेही आहेच.. काही काम निघालं असेल गं तिकडे म्हणून थांबला असेल." मंदाताई


"हुं…" मानसी एवढूसं तोंड करत बोलली.


"एक काम करू, आपण दुपारची कामं उरकली की उमाकडे जाऊन येऊ. तिकडं गेलं की कळेलच सगळं." मंदाताई असं म्हणाल्या आणि मानसीची कळी एकदम खुलली.


दुपारी दोघीजणी उमताईकडे गेल्या. उमाताई दारातच तांदूळ निसत बसली होत्या. मंदाताईंना असं अचानक बघून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. दोघी मैत्रिणी खूप दिवसांनी एकमेकींना भेटल्या होत्या. एकमेकींच्या गळ्यात पडून दोघींनीही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. उमाताईंचं लक्ष मानसीकडे गेलं.


"मानसी! अगं, किती मोठी झालीस तू! आणि किती गोड दिसतेय!" दोन्ही हात मानसीच्या चेहऱ्यावरून फिरवून त्यांनी त्यांच्या कानशीलावर बोटं मोडली. तिघीजणी आतल्या खोलीत गप्पा मारत बसल्या. बसल्या बसल्या मानसी सर्व घरावर नजर फिरवत होती. वीरेनचा कुठे काही सुगावा लागतो का हे बघत होती; पण तिला तसं काही जाणवलं नाही. मंदाताई आणि उमाताई बोलत होत्या; पण बोलताना कोणीच वीरेनबद्दल बोलत नव्हतं की विचारत नव्हतं.


"उमाकाकी, वीरेनचे पेपर कसे गेले गं बोर्डाचे?" मानसीने दोघींच्या गप्पा अर्धवट तोडत विचारलं.


"काय माहिती गं? हा पोरगा एक गोष्ट धड सांगेल तर शप्पथ! कधी म्हणतो चांगले गेले, कधी म्हणतो ठीक गेले… पास झाला तरी पुष्कळ आहे बघ. आताही बघ ना, दोन दिवसांपासून घरी आलाय; पण नुसत्या झोपा काढणं सुरू आहे. वरच्या खोलीत झोपला आहे बघ! तूच जा, उठव त्याला आणि विचार… तुला तरी नीट सांगेल." उमाताईंचं वाक्य पूर्ण होताच मानसी वरच्या खोलीकडे जायला निघाली. अगदी दबक्या पावलाने तिने जीना चढला, पण पायातल्या पैंजणाचा मंजुळ आवाज होतच होता. वरच्या खोलीचा दरवाजा उघडाच होता. वीरेन पलंगावर भिंतीकडे तोंड करून झोपलेला होता.


"हा तर ताडाच्या झाडासारखाच उंच झालाय!" पलंगाच्या थोडसं बाहेर आलेल्या पायांकडे बघत मानसी पुटपुटली.

मानसी हळूच त्याच्याजवळ गेली. आपल्या कंबरेपर्यंत वाढलेल्या वेणीने तिने त्याच्या कानावर गुदगुली केली. वीरेनची झोप चवताळली. त्याने कानाला खाजवल्यासारखं केलं आणि परत झोपी गेला. मानसीने पुन्हा तसंच केलं, वीरेनही पुन्हा तसंच करत झोपला. मानसीने पुन्हा वेणीने त्याच्या कानावर गुदगुल्या केल्या, वीरेन मात्र चवताळून उठायला गेला, त्याची आणि मानसीची धडक झाली आणि मानसी त्याच्या अंगावर पडली. दोघांच्या हृदयाचे ठोके अतिशय वाढले होते. मानसीच्या निळ्याशार डोळ्यात वीरेन हरवत होता आणि दूर कुठेतरी गाणं वाजत होतं…


सोलह बरस की बाली उमर को सलाम

प्यार तेरी पहली नज़र को सलाम   …


क्रमशः


© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all