हे जीवन सुंदर आहे (भाग १७)

कथा मानसीची... तिच्या संघर्षाची


हे जीवन सुंदर आहे! (भाग १७)

ठरल्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी सुधीरराव शहरात गेले. शहरातील काही नामांकित शाळेला भेटी देऊन त्यांनी गौरी आणि मानसीचे नाव एका शाळेमध्ये नोंदवले आणि परत गावी आले.

"चला, ऍडमिशन झाली एकदाची! खरंतर असं अर्धं वर्षं संपल्यावर ऍडमिशन मिळेल की नाही याची शंकाच वाटत होती; पण मिळाली एकदाची ऍडमिशन… पुढच्या सोमवारपासून मुली शाळेत येतील असं सांगून आलोय." सुधीरराव मंदाताईंसोबत जेवताना बोलत होते.

"लगेच पुढच्या सोमवारपासून! पण तिथे राहणार कुठे? त्याचीपण काही व्यवस्था बघावी लागेल की नाही?" मंदा

"हो… ती व्यवस्था देखील करून आलोय. आपला तो मावशीचा बंटी नाही का, त्याच्या मित्राच घर आहे तिथे… शाळेपासून जवळच आहे… अगदी पाच दहा मिनिटांच्या अंतरावर… तिथे भाड्याने राहता येईल… त्यांना ऍडव्हान्सही देऊन आलोय. सध्याची व्यवस्था झालीये, पुढचं पुढे बघू. चला तर मग, पटापट तयारीला लागा." सुधीरराव

मंदाताई अनिच्छेने तयारीला लागल्या. मायेने जोपासलेला वाडा, इथली माणसं, हे गाव सोडून जाण्याची त्यांची मुळीच इच्छा नव्हती; पण सुधीररावांपुढे त्यांचं काही चालत नव्हतं. त्यांनी मनावर दगड ठेवला आणि त्यांची एका दिवसात जवळपास सगळी तयारी झाली .

एक दिवस संध्याकाळी सत्येंद्र, उमा आणि वीरेन वाड्यावर आले. तुळशी वृंदावनात मंद दिवा तेवत होता. अगरबत्तीचा मंद सुगंध सर्वत्र दरवळला होता. मंदाताईंची वाड्यातली आवराआवर आणि एकीकडे तयारी सुरू होती.

"सुधीर, अरे खरंच मुलींना शहरात पाठवतोयस का? मला वाटलं की तू उगीचच डोक्यात खूळ घेऊन बसलास." सत्येंद्र

"हो रे… खूळ कसलं! इथं राहून काहीच होणार नाहीये… इथे प्रगती शून्य! मुलींनी शिकून खूप मोठं व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं असं स्वप्न आहे माझं." सुधीरराव

"हो रे… बरोबर आहे तुझं… माझी पण इच्छा आहे वीरेनला बाहेर शिकायला पाठवायची; पण आबासाहेब ऐकतील तर ना… \"असं विरोधकांना घाबरून पळून जाण्यात काय अर्थ आहे असं म्हणत होते… आणि ते म्हणत होते की आपण केलेल्या कामावर आपणच विश्वास नाही ठेवणार तर लोकं कसा ठेवतील…\" यावर आता मी काय बोलणार तूच सांग." सत्येंद्र

"म्हणजे? मला नाही कळलं." मंदाताई

"वहिनी, शाळा आपणच सुरू केली नाही का? मग आपणच आपलं लेकरू त्या शाळेत पाठवलं नाही तर गावकऱ्यांना कोणत्या तोंडाने म्हणणार की तुमचे लेकरं शाळेत पाठवा… असं." सत्येंद्रने मंदाताईंना समजावून सांगितले.

इकडे मोठ्या लोकांच्या गप्पा सुरु होत्या आणि तिकडे अंगणात मानसी आणि वीरेन खेळत होते. गौरी पुस्तकं घेऊन बसली होती. वीरेनने मानसीला रुमालाची बांधलेली एक पुरचुंडी दिली.

"काय आहे रे यात?" मानसी त्या रुमालाची गाठ सोडत बोलत होती.

"बघ तर, तुला नक्की आवडेल." वीरेन

मानसीच्या छोटुश्या हाताने रुमालाची गाठ काही सुटली नाही, तिने दाताने ती गाठ सोडली. त्या रुमालात सागरगोट्या, कंचे, शाळेतल्या ग्राउंडवर पडलेल्या वाळूतून गोळा केलेले शंख-शिंपले, शिंपल्यांच्या पेट्या आणि खूपसारे खडू होते.

"ए… किती सुंदर! पण आपण तर हे सगळं आपापल्यासाठी गोळा केलं होतं. माझ्याजवळ माझे शंख-शिंपले आहेत ना. हे तर तुझे आहेत की… आणि या शिपल्यांच्या पेट्यांमध्ये मोती तयार होतात ना… तू या पाण्यात का नाही ठेवल्या?" मानसी सर्व कुतूहलाने बघत बोलत होती.

"हो माझेच आहेत; पण माझी आई मला म्हणे की तू आता शहरातल्या शाळेत शिकायला जाणार… माझ्या आईने तुझ्या आईसाठी काहीतरी भेट म्हणून आणलंय म्हणून मग मी हे तुझ्यासाठी आणलं. तुला रंगीत खडू आवडतात ना, म्हणून मी रोज शाळा सुटली की वर्गात फळ्याजवळ पडलेले खडू उचलून घ्यायचो तुझ्यासाठी. एवढे मोठे जमा झाल्यावर देणार होतो तुला; पण तू आता जाणार आहेस ना, म्हणून मग आताच दिले आणि माझ्या या शिंपल्यांच्या पेट्याही तूच ठेव… त्यात मोती तयार झाले तर तुलाच राहू दे… " वीरेन एवढूसं तोंड करून बोलत होता.

"खरंच, मला तर खूप आवडलं हे आणि मी हे कोणा-कोणाला देणार नाही बघ." मानसी

"खरंच का? तुला तर नवीन शाळेत नवीन मित्र मैत्रिणी भेटतील. तुला इकडची आठवण तरी येईल का?" वीरेन

"आई म्हणत होती की सणा-वाराला, सुट्ट्या असल्या की आम्ही इकडेच येणार म्हणून." मानसी

"हो…! मग तू आली की आपण खूप खेळत जाऊ… तुझ्यासाठी मी अजून खूप शंख-शिंपले गोळा करून ठेवीन आणि रंगीत खडू पण…" वीरेन आनंदाने बोलत होता. तेवढ्यात मंदाताईंनी दोघांना जेवायला आवाज दिला. दोघेही धावतच घरात गेले. हातपाय धुवून जेवायला बसले. बाळ-गोपाळांची जेवणं झाली, नंतर घरातल्या माणसांची आणि शेवटी मंदाताई आणि उमा जेवायला बसल्या. जेवणं झाल्यावरही उमा आणि सत्येंद्र बराचवेळ वाड्यावर गप्पा करत बसले होते. वीरेन उमाच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपला होता तर मानसी मंदाताईंच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपली होती. उमा आणि सत्येंद्र रात्री बराचवेळ पर्यंत वाड्यावर थांबले होते.

दुसऱ्यादिवशी सकाळी लवकर उठून मंदाताईंनी सोबत डब्बा नेण्यासाठी म्हणून स्वयंपाक वगैरे केला. ठरल्याप्रमाणे दरात एक जीप येऊन उभी राहिली. सुधीररावांनी जीपच्या मागच्या बाजूत सामानाची बांधाबांध केली. तितक्यात उमा आणि सत्येंद्रही आले.

"काकी, वीरेन नाही आला का ग?" मानसीने एवढूस तोंड करून विचारलं.

"अग मी त्याला उठवलं झोपेतून; पण उठल्या उठल्या कुठे पळून गेला काय माहिती. येईल इकडेच… त्याला माहितीये तुम्ही जाणार आहेत ते." उमा

बराच वेळ झाला, सर्व सामानाची बांधाबांध झाली; पण वीरेन काही आला नाही. उमा आणि सत्येंद्रचा निरोप घेऊन सगळे जीपमध्ये बसले. त्यापूर्वी मंदाताईंनी वाड्यातल्या घरगड्याला काही सूचना दिल्या. मंदाताई देवघरात गेल्या.

" श्रीरंगा, तुझ्या भरवश्यावर सगळं करतेय रे. वाड्यावर तुझी कृपा अशीच राहू दे आणि तिकडेही मुलींचं सगळं एकटीने करण्याची ताकद दे." श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर हात जोडून मंदाताई श्रीरंगासोबत जणू बोलत होत्या. बाहेर येताना त्यांनी संपूर्ण वाडा डोळा भरून पाहून घेतला. तिथल्या वस्तूंवर मायेने हात फिरवला. डोळ्यातलं पाणी अलगद टिपत त्या बाहेर आल्या.

"लक्ष राहू दे ग." उमाच्या गळ्यात पडून मंदाताईंनी अश्रूला वाट मोकळी करून दिली.

"मंदा, तू पण ना! जसं काही सासरी जातेय असं बोलत आहेस." सुधीरराव बोलले तसं गहिवरलेलं वातावरण निवळलं.


वीरेनची भेट झाली नाही म्हणून मानसीच तोंड एवढूस झालं होतं. खट्टू मनाने ती जीपमध्ये मधल्या सीटवर खिडकीजवळ बसली. सगळ्यांचा निरोप घेऊन जीप निघाली. मानसी आपलं गाव, शाळा सगळं अगदी डोळ्यात साठवून घेत होती. नकळतच तिच्या निळ्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं.

जीप वेशीपाशी आली, इतक्यात दुरून एक मुलगा पळत येताना मानसीला दिसला.

"बाबा, गाडी थांबवा. तो बघा, वीरेन धावत येतोय." मानसी म्हणाली तसं सुधीरावांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला लावली. त्याने रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली. वीरेन धावत तिथे पोहोचला, त्याला दम लागला होता.

"का रे बाळा? काय झालं? आणि हे किती लागलंय तुला हातापायांना!" मंदाताई वीरेनला जवळ घेत बोलल्या.

"मानसी, हे घे एवढे मोठे आवळे… तुला आवडतात ना… म्हणून तिकडून मुद्दाम आणले." दूरवरच्या झाडाकडे बोट दाखवत वीरेनने रुमलाची एक पुरचुंडी मानसीला दिली आणि पँटच्या आणि शर्टच्या खिशातून आवळे काढून दिले.

"वा…!" मानसीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता.
मंदाताईंनी वीरेनला पाणी प्यायला दिलं. तोपर्यंत सत्येंद्रही त्याला शोधत शोधत तिथे आले.

"अरे लबाडा! इथं आहेस होय. सगळा गाव पालथा घातला मी तुला शोधत. तरी उमा म्हणलीच होती, गावा बाहेरच्या आवळ्याकडे असेल म्हणून. झालं का तुझं? निघू दे आता त्यांना." सत्येंद्र वीरेनच्या डोक्यावरून हात फिरवत बोलले.
पुन्हा एकदा एकमेकांचा निरोप घेऊन गाडी निघाली. मानसी खिडकीतून वाकून हात हलवत वीरेनला बाय करत होती. वीरेन आणि सत्येंद्र दोघेही जीप दिसेनासी होईपर्यंत तिथंच उभे होते.


क्रमशः

डॉ. किमया मुळावकर


🎭 Series Post

View all