हे जीवन सुंदर आहे (भाग १६)

कथा मानसीची... तिच्या संघर्षाची
हे जीवन सुंदर आहे! (भाग १६)

मानसीची शाळा सुरू झाली आणि त्याचबरोबर मंदाताईंची मात्र घाईगडबड सुरू झाली. गौरी, मानसी…दोघींच्या शाळा, त्यात घरातली कामं… देशमुख वाड्यावर नोकर-चाकरांची काही कमी नव्हती; पण मंदाताई सगळी कामं जातीने लक्ष देऊन करवुन घ्यायच्या. मानसीला शाळेत नेण्या आणण्याचं काम मात्र त्या स्वतः करत होत्या. नुसतं शाळेत नेणं आणणं नाही तर मानसीची शाळा सुटेपर्यंत मंदाताई शाळेच्या फाटकाबाहेर उभ्या राहायच्या. बारशाच्या दिवशीचा प्रसंग काही केल्या त्या विसरू शकत नव्हत्या. सुधीररावांच्या समाधानापुरतं त्या हसून खेळून राहायच्या; पण मानसीची काळजी त्यांना सतत सतावत होती.

बघता बघता मानसी तिसऱ्या वर्गात गेली. वीरेन आणि मानसी एकाच वर्गात होते. वीरेन सतत मानसीच्या सोबतच राहायचा. शाळेत डब्बा खायला, खेळायला मानसी आणि वीरेन सोबतच असायचे. शाळेत दिलेला गृहपाठही तो मानसीच्यासोबतच करायचा. मानसीशिवाय वीरेनचं पानही हालायचं नाही. बरेचदा वीरेन गृहपाठ करायचा नाही; पण शाळेतल्या बाई त्याला रागावतील या भीतीने मानसीच त्याचा गृहपाठ पूर्ण करायची. वयासोबतच त्यांच्यातील मैत्रीही हळूहळू वाढत होती.


"ए मानसी…" मंदाताई मानसीला आणि गौरीला शाळेत नेऊन सोडत होत्या, तेव्हा मानसीला कोणीतरी आवाज दिला. तिघीहीजणींनी मागे वाळून पाहिलं.

"वीरेन…!" मानसी धावत वीरेनजवळ गेली. उमाताई वीरेनला शाळेत सोडायला त्याच्यासोबत येत होत्या. रस्त्यात सगळ्यांची गाठभेट झाली.

"हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं?" वीरेन खिशात हात घालत बोलला.

"अय्या! आवळे!" वीरेनने खिशातून आवळे काढून मानसीच्या हातात ठेवले. आवळे बघून मानसी आनंदाने ओरडली.

"मग, काल तुला त्या पिंकीने दिले नव्हते ना; म्हणून मी मुद्दाम आणले बरं तुझ्यासाठी… आईने मला मदत केली आवळे तोडताना." वीरेन मोठ्या कौतुकाने सांगत होता. मानसीही मोठ्या कौतुकाने त्याचं ऐकत होती.

"ए मला दे थोडे आवळे." गौरी मध्येच बोलली.

"ए ताई, जा गं… मी फक्त मानसीसाठी आणलेत ते." वीरेन

"अस्सं का? मनू, मी तुझी मोठी बहीण नाही का?" कंबरेवर हात ठेवत गौरी म्हणाली तसं मानसीने तिच्या हातातले अर्धे आवळे गौरीला दिले.

"मानसी, हे घे, तू माझे आवळे घेऊन टाक." वीरेनने दुसऱ्या खिशातून अजून आवळे काढून मानसीला दिले. मानसी गोड हसली.

"मानसी, तुला काही लागलं तर मला सांगत जा, मी देत जाईल." नाकाला लागलेला शेंबूड पुसत वीरेन मोठ्या तोऱ्यात म्हणाला.

"हुं… चला शाळेत, मोठे आले आवळेवीर! शेंबूड पुसायला शिका आधी!" उमाताई

"का गं उमा असं बोलतेस लेकराला?" मंदाताई उमाला थोडं रागवत बोलल्या.

"अगं दिवसभर अशाच मोठ्या मोठ्या बाता करत असतो बघ! नाटकी कुठला!" उमाताई बोलल्या आणि दोघी हसायला लागल्या.

"ते काहीही असो; पण तिघांचं गुळपीठ किती मस्त जमलंय बघ… त्यातही गौरी आपण मोठं असल्याचा बरोबर फायदा घेते." मंदाताई आणि उमा दोघी बोलत बोलत मुलांच्या मागे जात होत्या. तिघेही जण आनंदाने, मस्त्या करत शाळेच्या दिशेने निघाले होते.

"बाकी काहीही असो हां मंदा, आपल्या घरांमध्ये असणारी ही मैत्री आपल्या या पिढीनेही पुढे नेली पाहिजे." उमाताई तिघांकडे कौतुकाने बघत म्हणाल्या.

"तर राहील की! न राहायला काय आहे?" मंदाताई

"कोणाची नजर नको लागायला म्हणजे झालं." उमताईंनी तिघांवरून हात फिरवून आपल्या कानशीलाजवळ नेऊन बोटं मोडली. बोलता बोलता शाळा आली, मुलं प्रार्थनेसाठी मैदानावर उभी राहिली. मंदाताई शाळेसमोरच्या एका झाडाखाली बसल्या.

"मंदा, असं किती दिवस अजून शाळेबाहेर बसणार तू?" उमा

"इच्छाच होत नाही गं मानसीला एकटं सोडायची." मंदा

"एकटी कुठे गं? शाळेत बाकीचे मुलं-मुली, शिक्षक असतातच ना आणि शाळेनंतर गौरी, वीरेन सोबत असतातच ना तिच्या! घरी आपण असतोच." उमा

"हो आपण सर्वच सोबत असतो तिच्या; पण मला तो बारशाचा दिवस आठवला की मानसीला एकटं सोडणं नको वाटतं बघ." मंदा

"मंदा, आता मानसी लहान आहे म्हणून तिला काही वाटणार नाही या गोष्टींचं; पण मोठी झाल्यावर तिला असं वाटायला नको की तू तिच्या स्वातंत्र्यावर गदा आणतेय… तिलाही मोकळीक दे आणि तू स्वतःही थोडी मोकळी रहा. चांगले विचार करून जग थोडं… बघ तुलाही वाटेल \"हे जीवन सुंदर आहे!\"..." उमा

उमाच्या समजावण्याचा मंदाताईंवर चांगला परिणाम झाला, मंदाताईंनी मानसीच्या सतत मागे मागे रहाणं बंद केलं.


सुधीरराव आणि सत्येंद्र गावाच्या विकासासाठी भरपूर कामं करत होते; पण चांगलं काम करणाऱ्यांना लोकं त्रास देतात अगदी त्याचप्रमाणे गावातले समाजकंटक त्यांच्या सत्कार्यात अडथळे निर्माण करू लागले. गावातल्या शाळेचे वर्ग वाढवण्याचं स्वप्न सुधीरराव आणि सत्येंद्रने पाहिलं होतं; पण समाजकंटक लोक त्याला विरोध करत होती. एवढा विरोध सुरू होता की आहे ती शाळा आणि शाळेतील शिक्षक तिथं टिकणं महत्त्वाचं झालं होतं. सत्येंद्र सलग तिसऱ्यांदा सरपंच म्हणून निवडून आले होते, समाजकंटकांनी सत्येंद्रबद्दल गावकऱ्यांच्या मनात रोष भरून द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे सत्येंद्रने कोणत्याही कामाला सुरुवात केली की गावकरी त्यात मोडता घालत होते.


एक दिवस ग्रामसभा आटोपून सुधीरराव घरी आले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता अगदी स्पष्ट दिसत होती. उमाताई वीरेनला घेऊन मंदाताईंकडे आलेल्या होत्या. सुधीरराव घरी आले तसं उमाताईही आपल्या घराकडे जायला निघाल्या. छोट्या वीरेनने मानसीला वाड्याच्या दारातून हात हलवून बाय केलं.

सुधीरराव बैठकीच्या खोलीत मागे हात बांधून फेऱ्या मारत होते. त्यांचा चेहरा अगदी त्रासिक दिसत होता.

"काय झालं? कोणती विवंचना मागे लागली? ग्रामसभेत काही झालं का?" मंदाताईंनी काळजीने विचारलं.

"किती स्वप्न पहिली होती, आपल्या गावाला एक आदर्श गाव बनवायची… पण गावकरी साथ देतील, ऐकतील तर सगळं होईल ना…" सुधीरराव त्रासिकपणे बोलत होते.

"चांगलं काम करताना थोडाफार विरोध होणारच." मंदाताई

"मंदा,थोडा विरोध हवाच! पण आजकाल कोणी काही ऐकूनच घेत नाही. गावकऱ्यांच्या मनात कोण नसत्या शंका-कुशंका टाकतं देव जाणे. आजकाल कितीही समजावून सांगितलं तरी काहीच फरक पडत नाही या लोकांत." सुधीरराव हतबल होऊन बोलत होते.

"मग आता काय करायला हवं?" मंदाताई

"मंदा,गावातलं वातावरण आता पहिलेसारखं राहिलं नाही. मी उद्याच शहरात जातो, मुलींसाठी चांगल्या शाळेत चौकशी करून येतो. आपण मुलींना शहरात शिकवू. इथे राहून त्यांची काहीच प्रगती होणार नाही. गावकऱ्यांना जेवढं पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय ते तेवढे मागे जात आहेत. जी शाळा सध्या सुरू आहे ती टिकली तरी बरं असंच म्हणावं लागेल. तसंही गौरी सहावीत आहे, पुढच्या वर्षी तरी शाळा बदलावी लागेल, त्यापेक्षा आताच बदलून घेऊ." सुधीरराव

"अहो, पण इकडचं सगळं कसं होईल? एवढी मोठीं शेती आहे, जनावरं आहेत… वाडा आहे… त्याकडे कोण लक्ष देणार?" मंदाताई

"मी इथेच थांबून हे सगळं बघेल. तू मुलींसोबत शहरात रहा." सुधीरराव

"पण…" मंदाताईंचं वाक्य सुधीररावांनी अर्धवटच तोडलं.

"बस… ठरलं आता… यावर अधिक चर्चा नको… मी उद्या शहरात जाऊन येईल." नेहमीप्रमाणे सुधीररावांनी आपला निर्णय सांगून दिला.

"मी काय म्हणत होते…" मंदाताई अडखळत बोलत होत्या.

"हुं… बोल ना." सुधीरराव

"नाही… म्हणजे, सत्येंद्र भाऊजीसोबत बोलले का तुम्ही? ते वीरेनला शहरात शिकवायला तयार असतील तर तेवढीच उमा मला सोबतीला होईल. एवढ्या मोठ्या शहरात एकटीला दोन मुली सोबत घेऊन राहायचं! मला भीती वाटतेय थोडी." मंदाताई

"त्यात घाबरण्यासारखं काय आहे? शहरात माणसंच राहतात ना? की प्राणी संग्रहालयातले प्राणी राहतात? सत्येंद्रला बोललोय मी… पण आबासाहेब या गोष्टीला होकार देतील असं वाटत नाहीये… ते थोडे जुन्या विचारांचे आहेत… कुटुंबाने एकत्र राहिले पाहिजे या मताचे आहेत… बघू… सत्येंद्र काही आबासाहेबांच्या शब्दापुढे जायचा नाही. त्याचं जे ठरेल ते ठरेल… आपलं मात्र पक्क ठरलं… मी उद्याच शहरात जाऊन येतो. तुम्ही तयारीला लागा." सुधीरराव म्हणाले.

क्रमशः

डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all