हे जीवन सुंदर आहे (भाग १४)

कथा मानसीची.. तिच्या संघर्षाची




हे जीवन सुंदर आहे! (भाग १४)


मंदाताई आणि गौरीला सोडून सुधीरराव देशमुख वाड्यात परत आले. दोघींच्या नसण्याने वाडा अगदी शांत वाटत होता. मंदाताईंच्या आणि गौरीच्या आठवणीत सुधीरराव अगदी बेचैन होत होते; \"पण त्या दोघी परत येतील तेव्हा त्यांच्यासोबत एक अजून छोटंसं कोणीतरी येईल, त्या गोड आवाजाने, त्या गोड रडण्याने वाडा पुन्हा दुमदुमून जाईल\" हा विचार सुधीररावांना आनंद देऊन जात होता.


इकडे सुधीररावांची पावसाळ्यापूर्वीची शेतीची कामं जोमाने सुरू होती. तिकडे मंदाताईच्या माहेरी एक एक दिवस डोहाळे पुरवून घेण्यात अगदी आनंदात जात होता. त्याकाळी फोन वगैरेचा एवढा काही प्रघात नव्हता. मंदाताई आणि सुधीरराव एकमेकांना पत्र पाठवून ख्याली खुशहाली विचारात होते.

 

बघता बघता पावसाळा सुरू झाला. उन्हाने तापून गेलेली धरणी पावसाचे थेंब पडताच जणू आनंदली होती. शेतांमध्ये पेरणी वगैरे झाली होती. सगळं अगदी नीट सुरू होतं, बळीराजा सुखावला होता. पाऊस पडायला लागला की मंदाताईंच्या पोटातलं बाळ खूप जास्त हालचाल करायला लागायचं; जणू त्या बाळाला लगेच पावसात खेळायला जायचंय असं मंदाताईंना वाटायचं… मंदाताईंच्या पोटातल्या बाळाची आणि पावसाची जशी काही गट्टीच जमली होती.


दिवस सरत होते. मंदाताईंना नववा महिना लागला होता. एक दिवस सकाळी मंदाताईंचे बाबा रेडिओवर सकाळच्या बातम्या ऐकत बसले होते, मंदाताईही त्यांच्यासोबत तिथेच बसून होत्या. आभाळ चांगलंच भरून आलं होतं. सकाळचे आठ वाजले होते; पण सूर्यनारायणाचे दर्शन काही झाले नव्हते.


\"पुढील तीन ते चार दिवस सर्व महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.\" मंदाताईंनी अशी बातमी ऐकली आणि भिंतीचा आधार घेत त्या दारापर्यंत चालत आल्या. बाहेर अजूनच अंधारून आलं होतं, अचानक त्यांच्या पोटातल्या बाळाच्या हालचाली अजून वाढल्या. नेहमीप्रमाणे पाऊस आणि बाळाची हालचाल याचं गणित त्यांना माहिती होतं, म्हणून त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं; पण नंतर त्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. घरात सगळ्यांची घाई गडबड उडाली.


मंदाताईंच्या भावाने ताबडतोब रिक्षा बोलावली; मंदाताईंनी हॉस्पिटलमध्ये पाय ठेवताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. इकडे मंदाताईंना प्रसव वेदनाही सुरू झाल्या होत्या. आपल्या आईला असं वेदनेमध्ये बघून गौरीचा जीव अगदी कासावीस झाला होता. आपल्या मावशीच्या कडेवर बसून ती सगळं निमूटपणे बघत होती. मंदाताईंना दवाखान्यात ऍडमिट केल्याची तार करायला त्यांचा भाऊ तेवढ्या पावसात पोस्टात गेला होता.


इकडे गावाकडेसुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. रात्रीच्या वेळीच गावाच्या पुलावरून पाणी गेलं आणि गावाचा दुसऱ्या गावांशी सम्पर्क तुटला. या भर पावसात गावातली एक गर्भार स्त्रीला शहरातल्या दवाखान्यात हलवण्याची गरज पडली; पण पुलवरून अतिशय वेगाने पाणी वाहत होतं, त्यातुन जाण्याच्या प्रयत्नात ते अक्ख कुटुंब वाहून गेलं होतं. सुधीररवांना ही बातमी कळली तेव्हा त्यांच्या पायांना कम्प सुटला; मंदाताईंना आधीच माहेरी नेऊन सोडयचा निर्णय आपण किती आधीच घेतला याबद्दल त्यांना थोडं समाधान झालं.


"देवा, सगळं काही सुरळीत होऊ दे." सुधीररावांनी मनोमन प्रार्थना केली.


हवामान खात्याचा अंदाज अगदी अचूक ठरला. तीन दिवस पावसाने अगदी थैमान घातलं होतं. तीन दिवसांनी पाऊस थांबला. चौथ्या दिवशी सगळीकडे सूर्याची किरणं पसरली. पुलावरचं पाणी ओसरायला सुरुवात झाली होती. सहाव्या दिवशी पाणी पूर्णपणे ओसरून पूल पुन्हा वाहतुकीसाठी सुरू झाला होता. दुपारच्या वेळी पोस्टमन तार घेऊन देशमुख वाड्यात आला. सुधीरराव वाड्यातच होते. मंदाताईंना दवाखान्यात भरती केल्याची तार होती. सुधीरराव सासरी जाण्यासाठी तडक बस स्टँड वर गेले. एक-दीड तास होऊन गेला होता, पण अजून बस लागली नव्हती.


"बस का आता? हीच आपली यारी! दोन शब्दांनी सांगावं वाटलं नाही का? जाऊ दे ही गाडीच विकून टाकतो आता." सुधीरावांच्या खांद्यावर हात ठेवत सत्येंद्र बोलले.


"असा काही गैरसमज नको करून घेऊस. मंदाला भरती केल्याची तार मिळाली अन् तसाच निघालो. तुझ्याशी बोलून निघावं एवढं सुचलं नाही बघ." सुधीरराव


"बस बस! लै झालं तुझं सारवासारव करणं. चल बस गाडीत; दोघेपण जाऊन येऊ." सत्येंद्र


"अरे पण तुझ्या घरी कळवलं का?" सुधीरराव


"शिरप्या सांगत आला होता की तू एक दीड तास झाले इथंच उभा आहेस, म्हणून मग उमाच बोलली की जाऊन या…" सत्येंद्र आणि सुधीररावांच्या गाडीत गप्पा सुरु झाल्या होत्या. दोघेजण तालुक्याला पोहोचले आणि मंदाताई ज्या दवाखान्यात भरती होत्या तिथे गेले. तिथे गेल्यावर \"पेशंटला डिस्चार्ज झाला\" असं त्यांना कळालं. तिथून ते दोघे सरळ मंदाताईंच्या घरी पोहोचले.


घरी पोहोचताच गौरी सुधीररावांच्या गळ्यात येऊन पडली. तिच्या आनंदाला तर पारावार नव्हता.


"बाबा, किती दिवसांनी आले तुम्ही! तुम्हाला माहितीये… डॉक्टरांनी मला खेळायला एक छोटीशी बहीण दिली…! माझ्या बाहुलीसारखीच आहे…पण ती ना मी घेतलं की खूपच रडत राहते." गौरी कौतुकाने सांगत होती.


"छोटी आहे ना अजून! थोडी मोठी झाली की खेळेल तुझ्यासोबत… " सुधीरराव 


फ्रेश होऊन सुधीरराव मंदाताईंच्या रूममध्ये गेले. मंदाताई झोपलेल्या होत्या आणि त्यांच्या बाजूला एक गोड, गुलाबी, कापसासारखी मऊ, लाल चुटुक ओठांची, छोटुश्या नाकाची जणू एवढीशी परीच निजली होती. सुधीरराव डोळेभरून त्या एवढूश्या जीवाला बघत होते, तेवढ्यात मंदाताईंना जाग आली. सुधीररावांना समोर बघून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.


"मुलगी झालीये!" मंदाताई आनंदाने म्हणाल्या; पण \"सुधीररावांना मुलाची तर अपेक्षा नसेल ना\" त्यांच्या मनात उगीचच शंका आली आणि त्यांनी ती सुधीररावांना बोलूनही दाखवली.


"मुलगा काय आणि मुलगी काय… शेवटी आपल्या दोघांचाच अंश…! उलट मुलगी झाली म्हणून मी तर खूप खुश आहे… तुझ्यासारखंच अजून एक आरस्पानी सौन्दर्य जन्माला आलं… बघ ना… तुझ्यासारखेच निळेशार डोळे, अगदी सागरात हरवल्यासारखं वाटतं तुझ्या डोळ्यांत पाहिलं की… आणि आपली ही मुलगी ही तशीच… खूपच गोड आहे, अगदी आपल्या गौरीला हवी होती तशीच. एक वेगळंच तेज आहे हिच्या चेहऱ्यावर!" सुधीररवांनी अलगद बाळाला उचललं, त्यांच्या कुशीत ते बाळ अजूनच शांत झोपलं.


"मग, काय नाव ठरवलं बाळाचं?" मंदाताई


"मानसी… मानसी सुधीर देशमुख…" सुधीरराव


"अगदी माझ्या मनातलं हेरलं तुम्ही." मंदाताई


"क्या बात हैं। पण बारसं आपल्याकडे होणार बरं! अगदी धुमधडाक्यात! मस्त सगळ्या गावाला बोलावू, गावजेवण देऊ!" सुधीरराव


"पण त्याआधी आम्हाला बाळ बघायला मिळेल की नाही?"  दाराजवळ उभं राहून सत्येंद्रने विचारलं.


"या भाऊजी." मंदाताई


"अरे, नुसतं बघतोस काय! हे घे बाळाला." सुधीरराव सत्येंद्रच्या हातात बाळ देत बोलले.


"मला घेता येत नाहीत एवढी छोटी बाळं." सत्येंद्र


"एका पोराचा बाप झालास आणि अजून तुला बाळाला घेता येत नाही." सुधीरराव सत्येंद्रला चिडवत बोलले.


"हो ना… भीती वाटते बाळाला काही व्हायची… किती नाजूक असतात ते! बघ जरा…" सत्येंद्र


"तुमचा मुलगाही चार महिन्यांचा झाला असेल ना आता? उमा अजून माहेरीच आहे की गावाकडे आली परत? नाव काय ठेवलं बाळाचं?" मंदाताई


"हो ना, बघता बघता चार महिन्यांचा झाला देखील! उमा एक महिना झाला गावी आलीये, तुमची सतत आठवण काढत असते बरं… बाळाचं बारसं तिकडे, उमाच्या माहेरीच झालं… नाव मात्र मी ठेवलं बरं बाळाचं…! वीरेन… वीरेन चौधरी…!"


क्रमशः


© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all