हे जीवन सुंदर आहे (भाग १३)

Manasi's story

हे जीवन सुंदर आहे ! (भाग १३)

मानसीच्या अशा परिस्तिथीमुळे सगळेच हतबल झाले होते. 'आपली एवढी सुंदर, अगदी परिकथेतल्या परिसारखी दिसणारी आई, तिच्या आयुष्यात नेमकं असं काय झालं होतं?' स्वराला हे जाणून घ्यायचं होतं.


मानसीचा जुना फोटो पाहून मंदाताईंना भूतकाळ अगदी स्पष्ट दिसत होता….

***********************


"गौरी, अगं थांब… अशी पळू नको बरं." एका हातात वरण भाताची प्लेट घेऊन मंदाताई चार वर्षांच्या गौरीच्या मागे पळत होत्या.


"गौरी, अगं… पकडलं! लबाड माझी राणी…! असं आईला त्रास देतात का? तुला माहिती, आईच्या पोटात ना एक छोटंसं बाळ आलंय बरं! आईला असा त्रास नको देत जाऊ. मला एक सांग तुला भाऊ पाहिजे का बहीण?" सुधीरराव गौरीला कडेवर उचलत बोलले.


"मला ना, एक बहीण पाहिजे, माझ्या बाहुलीसारखीच… निळ्या निळ्या डोळ्यांची, गोरी गोरी पान… मग मी तिच्यासोबत खूप खेळेल." गौरी आपले बोबडे बोल बोलत होती. 


"आणि समजा भाऊ झाला तर?" सुधीरराव


"मग मी त्याच्यासोबतपण खेळेल…" गौरी म्हणाली आणि सुधीररावांच्या कडेवरून उतरून बाहेर पळाली. मंदाताई स्वयंपाक घरात हात धुवायला गेल्या.


सुधीरराव देशमुख… गावातलं एक प्रतिष्ठित आणि सधन व्यक्तिमत्त्व… भरपूर शेती-वाडी, मोठा वाडा होता त्यांचा…. बेतास बेत शिकलेले पण विचाराने एकदम आधुनिक… शेतीतही निरनिराळे प्रयोग करायची आवड… देशमुख घराण्याचे ते एकुलते एक वारस होते… पैसा पायाशी लोळण घेत होता तरी त्यांचे पाय मात्र जमिनीवर होते. गावात कोणालाही कोणत्याही प्रकारची मदत लागली तर सुधीरराव मदत करायला तयार असत… त्यांचं शिक्षण कमी असलं तरी मुलींनीसुद्धा शिकलं पाहिजे या मताचे ते होते. त्यांच्या प्रयत्नामुळे गावात मुलींसाठी सातवीपर्यंत शाळा सुरू झाली होती. सुधीररावांच मंदाताई सोबत लग्न झालं आणि काही महिन्यातच त्यांच्या आईचे आणि पाठोपाठ त्यांच्या बाबांचे निधन झाले.


मंदाताई, तालुक्याच्या ठिकाणी लहानाच्या मोठ्या झालेल्या होत्या; पण सुधीररावांसोबत लग्न होऊन देशमुख वाड्यात आल्या आणि इथल्या रंगात जणू रंगून गेल्या होत्या. 


"मी काय म्हणत होतो मंदा, आता पाचवा महिना लागलाय ना तुला? पुढच्या महिन्यात तुला तुझ्या माहेरी नेऊन सोडतो." सुधीरराव


"लगे पुढच्या महिन्यातच! अहो, वेळ आहे अजून बराच." मंदाताई


"हो, इथं तू एकटी असतेस वाड्यावर, म्हणायला नोकर आहेत दिमतीला; पण घरात दुसरं कोणी बाई माणूस नाही, त्यात तुझी डिलीव्हरी भर पावसाळ्यातली. आपल्या गावाच्या पुलावरून दर पावसाळ्यात पाणी जातंच…वेळेवर काही गरज पडली तर! तालुक्याच्या ठिकणी जायची गरज भासली तर? त्यापेक्षा तू आधीच जा." सुधीरराव काळजीने म्हणाले.


"ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं; पण या पुलाचं काही तरी करा हो. दर पावसाळ्यात पुलावरून पाणी जातं आणि मग किती तरी दिवस गावाचा संपर्क तुटतो. गावकऱ्यांची किती फजिती होते." मंदाताई


"हो, मी आणि सत्येंद्र गेलो होतो आमदार साहेबांकडे, गावकऱ्यांच्या सह्या घेऊन पुन्हा पत्र दिलंय. यावर्षी तरी हे काम होऊन जाईल असं आमदार साहेब म्हणाले. बघू, काय होतं ते…" सुधीरराव बोलत होते. 


"कोणी आहे की नाही वाड्यात…?"इतक्यात कोणीतरी वाड्यात आलं.


"अरे, सरपंच साहेब, इकडे कुठे रस्ता चुकले. सैतान का नाम लिया और सैतान हाजीर! तू काही शंभर वर्षं मरायचा नाहीस!" सुधीरराव


"ए… ते सरपंच वगैरे सगळं तिकडं… पंचायतीत… इथं फक्त सत्येंद्र… कळलं का? आणि काय रे मी सैतान का? मी सैतान तर तू पण सैतान होशील ना… सैतानाचा दोस्त सैतान! कळलं का?" सत्येंद्रनाथ


"हो बाबा, कळलं. बोल….  मंदा, मस्त चहा टाक बरं." सुधीरराव


"ते चहा-बिहा राहू दे, हे घे, आधी तोंड गोड कर… बाप झालो मी! मुलगा झाला बरं!" सत्येंद्रनाथ अतिशय आनंदाने पेढ्याच्या बॉक्समधून पेढा काढुन सुधीररावांच्या तोंडात कोंबत बोलले.


"अभिनंदन भाऊजी, उमा कशी आहे? आणि कधी झाली प्रसुती?" मंदाताई


"काल पहाटेच प्रसुती झाली… हे काय आताच पोस्टमन तार देऊन गेला… तार वाचली आणि तडक इकडे निघून आलो… हे घ्या पेढ्यांचा डब्बा… आता मी जातो सासुरवाडीला… कधी लेकाला बघतोय असं झालंय मला तर!" सत्येंद्रने पेढ्याचा बॉक्स मंदाताईंच्या हातात दिला आणि ते घाई घाईने तिथून निघाले.


सत्येंद्रनाथ चौधरी… गावातलं तरुण नेतृत्व… दोन वर्षांपासून सरपंच म्हणून निवडून आले होते. सत्येंद्र आणि सुधीर… एकदम जिगरी दोस्त…लहानपणापासून एकत्र वाढलेले, सोबत शिकलेले आणि खेळलेले! सत्येंद्रचे वडील आबासाहेब आधी सरपंच होते; पण नेतृत्व तरुण असलं पाहिजे, या मताचे ते होते म्हणून त्यांनी सत्येंद्रला सरपंच पदासाठी यावेळी निवडणुकीत उभं केलं होतं. आबासाहेबांच्या पुण्याईने सत्येंद्रनाथ निवडून आले होते. सत्येंद्रही गावाच्या भल्यासाठी, विकासासाठी निरनिराळी कामं करत होते. सुधीरराव आपली शेतीवाडी सांभाळत सत्येंद्रच्या सोबतीने गावातली कामं करत होते. उमा सत्येंद्रची बायको…त्यांच्या लग्नाला सहा वर्षं झाल्यानंतर घरात पाळणा हलला होता.


सुधीरराव आणि सत्येंद्रची मैत्री अख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. ते दोघे जसे मित्र होते, तशाच दोघांच्या बायकाही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. सत्येंद्रच्या घरी त्याचे आई-वडील, बहीण-भावंडं असा मोठा परिवार होता. सत्येंद्रच्या घरचे लोकंही मंदा आणि सुधीररावांना कधीच अंतर देत नव्हते.


आपल्या मैत्रिणीला, उमाला मुलगा झाला म्हणून मंदाताई खूप खुश होत्या.

"मुलगा असेल का मुलगी? कोणीही असो… गौरीला खेळायला एक भावंडं येणार हीच किती आनंदाची गोष्ट आहे." स्वतःच्या पोटावर हात फिरवत, गालातल्या गालात हसत मंदाताई आपसूकच बोलल्या.


दिवसामागून दिवस सरत होते. मंदाताईला सहावा महिना लागला होता. इकडे ऊन मी म्हणत होतं. यंदाचा मे महिना अगदी तापून गेला होता. मे महिन्याच्याच्या शेवटी सुधीररावांनी मंदाताईला त्यांच्या माहेरी नेऊन सोडायचं ठरवलं होतं. अखेर जायचा दिवस उजाडला. मंदाताई तयारी करत होत्या.


"मंदा, ही आंब्याची पेटी आणलीये… आणि हे आपल्या शेतातलं धान्य… थोडा फार भाजीपाला आहे.." सुधीरराव शेतातून आणलेलं समान नोकराकरवी बैलगाडीतून उतरवत बोलले.


"अहो, याची काय गरज आहे. तिकडे पण आहेच की सगळं." मंदाताई


"नाहीये म्हणून देत असतं का कोणी? आपल्या घरचीच तर गोष्ट आहे. यावेळी आंबा काही जास्त आलाच नाही, म्हणून एक पेटीच दिलाय… तेवढेच आमचे साळे-साळ्या खुश होतील." सुधीरराव


"हो… ते तर अगदी चातकासारखी वाट बघताय… विशेषकरून गौरीची… पण तुम्हाला असं एकटं सोडून जाण्याची काही इच्छा होत नाहीये." मंदाताई


"हो… मला तरी तुला आणि गौरीला सोडून राहावं वाटतंय का? पण, जो नवीन जीव जन्मला येतोय, त्याचे हाल का बरं करायचे? आणि तसंही आपल्या गावात सातवीपर्यंत शाळा आहे…पुढे लेकरांच्या शिक्षणासाठी तुला त्यांच्यासोबत शहरात राहावं लागेल ना… त्याचीच रंगीत तालीम समज ही." सुधीरराव


"त्याच्यासाठी आतापासून कशाला चिंता करत बसू मी? वेळ आहे अजून… आता गौरी चार वर्षांची आहे. ती सातवीत जाईपर्यंत गावातल्या शाळेचे वर्ग वाढतीलच ना." मंदाताई


"हो, बघू पुढचं पुढे… पण आपल्या दोन्ही लेकरांना खूप शिकवायचं बरं!" सुधीरराव बोलत होते. तेवढ्यात बाहेर गाडीचा गाडीचा कर्णकर्कश हॉर्न वाजला. मंदाताई आणि सुधीरराव दोघेही दाराबाहेर आले.


"वहिनीसाहेब, चला! तुमची सवारी तयार आहे बरं!" सत्येंद्रनाथ त्यांच्या कारमधून उतरत बोलले.


"अहो भाऊजी, कार वगैरे कशाला? बसने जातो ना आम्ही." मंदाताई


"बिलकुल नाही, अशा परिस्थितीत बसने प्रवास करायचा नाही आणि ही गाडी आपली आहे, या गाडीचा उपयोग आता करायचा नाही तर मग कधी? ते काही नाही, चला बसा लवकर." सत्येंद्रनाथ बोलत होते, बोलता बोलता त्यांनी नोकरांच्या मदतीने गाडीत समान ठेवलंसुद्धा. सुधीरराव, मंदाताई आणि गौरी सत्येंद्रच्या गाडीतून पुढच्या प्रवासासाठी निघाले होते.


"बरं का गौरी, तिकडे गेल्यावर मामा-मामीला, आजी- आजोबांना, मावशीला त्रास द्यायचा नाही. आईला पण त्रास द्यायचा नाही. आईचं सगळं ऐकायचं." सुधीरराव गाडीत बसल्या बसल्या आपल्या लेकीला समजावून सांगत होते. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत गौरी झोपून गेली होती. दोन अडीच तासातच सगळेजण मंदाताईंच्या माहेरी पोहोचले. तोपर्यंत दुपार झाली होती.

दुपारची जेवणं आटोपून सर्वांनी थोडा आराम केला आणि संध्याकाळच्या वेळी सुधीरराव आणि सत्येंद्र परत निघण्याची तयारी करत होते.


"जावाईबापू, दोन दिवस थांबले असते तर तेवढंच आम्हाला बरं वाटलं असत." मंदाताईंचे वडील सुधीररावांसोबत बोलत होते.


"थांबलो असतो; पण पावसाळ्यापूर्वीची शेतीची कामं सुरू आहेत…आणि त्यासाठी एक एक दिवस किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे ना. आपण जातीने लक्ष दिलं की सगळी कामंही नीट होतात. आता आग्रह नका करू, नंतर येईल थोडा निवांत…" सुधीरराव म्हणाले.


सगळ्यांचा निरोप घेऊन सुधीरराव आणि सत्येंद्र परतीच्या प्रवासाला निघाले.

क्रमशः

© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all