हे जीवन सुंदर आहे (भाग ११)

Manasi's story

हे जीवन सुंदर आहे! (भाग ११)

पंधरा दिवस कसे पटापट निघून गेले. आश्रमातली कामं, स्वराला शाळेतून घरी आणणे, पुन्हा आश्रमात जाणे यात मानसीची चांगलीच दमछाक होत होती. अधूनमधून डोकं दुखतच होतं; पण प्रत्येक वेळी पेन किलरची गोळी घेऊन तिने त्याकडे साफ दुर्लक्ष केलं होतं. सध्या तरी तिच्या डोक्यात स्वराचा बर्थडे हा एकमेव प्लॅन सुरू होता.

शेवटी तो दिवस उगवला, ज्याची मानसी अगदी आतुरतेने वाट बघत होती. स्वराच्या बर्थडेचा दिवस… रविवारचा दिवस…

मानसी रोजच्यासारखी सकाळीच उठली. स्वतःच सगळं आवरलं आणि तिने नेहमीप्रमाणे स्वराला झोपेतून उठवायला एक आवाज दिला आणि तिच्या रूमच्या बाहेर आली. स्वरा आळस देत उठली.

"आज का बरं आईने सकाळी सकाळी उठवलं? आज तर रविवार… आई विसरली की काय आज रविवार आहे… आणि सोबत हेपण विसरली की माझा वाढदिवससुद्धा आहे. आई दरवर्षी रात्री बारा वाजताच मेणबत्त्या लावून केक कापून वाढदिवस साजरा करायची. यावर्षी तिला माझ्यासाठी काहीच करावं नाही वाटलं!" स्वरा स्वतःशीच बडबडत होती. तितक्यात तिला माईंनी आवाज दिला. माईंनी आवाज दिला म्हणून स्वरा धावतच रूमच्या बाहेर गेली. पाहते तर काय…

सगळा हॉल फुग्यांनी सजवलेला होता. हॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मेणबत्त्या ठिकठिकाणी लावलेल्या होत्या. हॉलच्या मध्यभागी भिंतीवर हॅप्पी बर्थडे स्वरा असे मोठे बलून लावलेले होते. त्यासोबतच भिंतीवर स्वराच्या पहिल्या वाढदिवसापासूनच्या फोटोंचे लाईटसोबत तोरण बनवून लावलेले होते. काचेच्या टी पॉय वर फुलांची सुंदर रचना तयार केली होती आणि त्यावर स्वराच्या आवडीचा चॉकलेट केक ठेवलेला होता. स्वरा डोळे विस्फारून सगळं बघत होती. तेवढ्यात कोणीतरी मोठ्याने ओरडले…. "हॅ…प्पी… ब…र्थ…डे… स्वरा…! सरप्राईजsssssss…"

स्वराने मागे वळून पाहिले. "आजी-आजोबा (मंदाताई आणि सुधीरराव, मानसीचे आई-बाबा), गौरी मावशी-शशांक काका (मानसीची मोठी बहीण आणि भाऊजी), ओम (गौरी आणि शशांकचा मुलगा), रजनी आत्या-हेमंत मामा (राघवची लहान बहीण आणि भाऊजी), हर्षा (रजनी आणि हेमंत यांची मुलगी)... तुम्ही सगळे…! वॉव…! किती मस्त ना…! थॅंक्यु यु सो मच…! मला कोणीच काहीच सांगितलं नाही… किती दिवसांनी भेटतोय आपण…!" स्वराच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

गौरी, शशांक आणि ओम सिंगापूरला रहात होते. गौरी आणि शशांक दोघे आय. टी. कम्पनीत जॉब करत होते. मंदाताई आणि सुधीरराव काही महिन्यांपूर्वी गौरीकडे राहायला गेले होते. रजनी आणि हेमंत दोघे मुंबईत राहायचे. हर्षा त्यांची मुलगी, स्वरापेक्षा वयाने लहान होती.

स्वराने केक कापला. सगळेजण केक खात, नाश्ता करत गप्पा करत होते. तेवढ्यात गीताने सगळ्यांसाठी चहा आणला. चहा घेत अजूनच गप्पांना रंग चढला. सकाळचे साडे दहा वाजले होते. स्वराची थोडी चलबिचल सुरू होती.

"बाबा, मी आज बाहेर जाऊ का? माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना मी पार्टी देणार आहे असं म्हटलं होतं." स्वराने राघवला चाचरत विचारलं.

"अग पण, बघ ना! तुझ्यासाठी सगळेजण किती दुरून आपल्या घरी आलेत. हवं तर उद्या दे तुझ्या फ्रेंड्सला पार्टी, शाळेतून घरी येण्यापूर्वी." राघव

"काय हो बाबा! कसं वाटतं ते! आणि तसं पण हे दहावीचं वर्ष… पुढच्यावर्षी आम्ही सगळे सोबत राहणार आहोत का?" स्वराचं भणभण करणं सुरू होतं. राघव पुढे बोलणार तेवढ्यात मानसीने त्याला थांबवलं.

"ठीक आहे, जाऊन ये तू. दुपारपर्यंत ये परत." मानसी बोलली तशी स्वराची कळी अजून खुलली.

"बाबा, जवळच जाणार आहोत. तो नवीन मॉल नाही का झाला…! तिथे… मॉल मध्ये फिरणार… आणि तिथेच काहीतरी खाऊन घेऊ आम्ही… " स्वरा अगदी एक्साईट होऊन सांगत होती.

"ठीक आहे, आई म्हणतेय तर जाऊन ये; पण लवकर परत यायचं. चंदूला तुझ्या सोबतच राहू दे.." राघव

"आम्ही मॉल फिरणार आहोत, चंदूकाका काय करतील तिथे? आणि तसंही तीन-चार वाजेपर्यंत आम्ही परत येऊ ." स्वरा वाकडं तोंड करत बोलली.

"गाडीत थांबेल तो… तुझं काम झालं की त्याच्यासोबत परत यायचं. ओम आणि हर्षाला पण ने तुझ्यासोबत… एवढ्या दुरून आलेत ते तुझ्यासाठी." राघव म्हणाला, स्वरा तयार झाली त्या दोघांना सोबत न्यायला पण ते दोघे सोबत जायला तयार नव्हते. स्वरा तिची तयारी करून निघाली होती. तिने सुंदरसा  नी लेंथ वन पीस घातला होता, काळेभोर लांबसडक केस मोकळे सोडले होते. माईंनी तिला त्यांचा फोन सोबत दिला होता. सगळ्यांना बाय करून स्वरा गेली. दुपारच्या जेवणाची तयारी करण्यासाठी मानसी स्वयंपाक घरात गेली. रजनी आणि गौरी तिच्या मागे आल्या.

"वा वहिनी! पुरणपोळी! पुरण बघूनच तोंडाला पाणी सुटलं बघ." रजनी

"पण जिच्यासाठी केलं ती तर बर्थडे गर्ल बाहेर गेली." गौरी

"असं काही नाही. तुम्ही सगळे येणार म्हणून मुद्दाम केलं." मानसी

"बरं झालं केलंस ते. किती दिवसात पुरणपोळी खाल्लीच नव्हती." गौरी म्हणाली. तिघी जणींच्या हसत खेळत स्वयंपाक घरात गप्पा सुरु होत्या. राघव, शशांक आणि हेमंत ही रम्मी खेळण्यात गुंग झाले होते. माई, मंदाताई आणि सुधीरराव यांच्या रामायण-महाभारतावर वेगळ्याच गप्पा सुरु होत्या. ओम आणि हर्षा मात्र मोबाईलमध्ये डोकं घालून बसले होते. स्वयंपाक आटोपल्यावर मानसीने जेवणाची पानं घेतली. पुरणपोळीवर सगळ्यांनी यथेच्छ ताव मारला.

"तुम्ही सगळे आता आराम करा थोडा. स्वरा घरी आली की आश्रमात जाऊ आणि त्यानंतर तिच्यासाठी सरप्राईज डिनर पार्टी आहे." मानसी

"आराम वगैरे बिलकुल नाही. आज राघव घरी आहे तर मनसोक्त गप्पा करणार आम्ही… तसही तो उद्या ऑफिसमध्ये जाणारच. मग आम्ही दिवसभर झोपा काढू." शशांक

"ठीक आहे, जशी तुमची ईच्छा." मानसी म्हणाली. सगळेजण पत्त्यांचा डाव मांडून बसले होते. बराच वेळ झाला होता. मानसीने घड्याळात पाहिलं, साडे तीन वाजले होते.

"एव्हाना यायला हवी होती स्वरा. तीन-चार वाजेपर्यंत येईल म्हणाली होती. येईल मग थोड्यावेळात." मानसीच्या मनात विचार सुरू होते. सगळे पत्ते खेळण्यात गुंग होते. पत्ते खेळता खेळता चहाचा एक राऊंडही झाला होता.

साडे चार वाजले होते. स्वरा अजून आली नव्हती. मानसीचं मन चलबिचल होत होतं. तिने चंदुला फोन लावला. 'स्वरा अजून मॉलमध्येच आहे' त्याने सांगितलं. साडे पाच वाजता मानसीने पुन्हा चंदुला फोन केला; पण त्याने फोन उचलला नाही. मानसीच्या डोक्यात वीरेनने दिलेली धमकी फिरत होती. तिने स्वराला फोन लावला, तिनेसुद्धा फोन उचलला नाही. आता मात्र मानसीचा जीव टांगणीला लागला होता. ती स्वरा आणि चंदू यांना आलटून पालटून फोन लावत होती; पण दोघेही फोन उचलत नव्हते. सहा वाजले होते, गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला. मानसीने खिडकीतून पाहिलं, गाडी फटकातून आत येताना दिसली. मानसीचा जीव भांड्यात पडला. तिने डोळे मिटले, मनोमन ती देवाचे आभार मानू लागली.

"हे काय गं स्वरा! एवढे लांब केस चक्क कापलेस! अग तुझ्या आईला तरी विचारायचं होतं ना एकदा… किती आवडीने तिने तुझे केस वाढवले होते…" माईंच्या त्या वाक्याने मानसीने स्वराकडे पाहिलं. स्वराने कंबरेपर्यंत लांब वाढवलेले केस कानापर्यंत कापून त्याचा ब्लंट कट केला होता. ते पाहून मानसीच्या डोळ्यात अश्रूंची गर्दी जमा झाली होती.

"स्वरा, छान दिसतेय की! मी तर असा विचारसुद्धा नव्हता केला की तू अशी पण सुंदर दिसशील. मस्तच! बरं, चल ड्रेस बद्दलतेस का? की हाच राहू देते? आपल्याला आश्रमात जायचंय.. तिथे सगळ्याजणी तुझी…" आपल्या मनातल्या भावना बाजूला सारून, स्वराला वाईट वाटू नये म्हणून मानसी बोलत होती, स्वराने तिचं बोलणं अर्धवट तोडलं आणि स्वरा एकदम ओरडून बोलायला लागली…

"आश्रम… आश्रम… आश्रम… नाही जायचं मला त्या आश्रमात… काहीही झालं की चालले आश्रमात… प्रत्येक बर्थडे त्या आश्रमात झालाच पाहिजे का? नाही आवडत मला ते आश्रम… ते आश्रम काय… मला मुळात तूच नाही आवडत… कशी दिसतेस बघ…! फक्त उजव्या बाजूने सुंदर दिसतेस… तुझ्या चेहऱ्याची डावी बाजू बघ जरा कशी दिसते ते… व्हॅम्पायर दिसतेस… माझ्या सगळ्या मैत्रिणी चिडवतात मला तुझ्या दिसण्यावरून… तुझ्या त्या आश्रमातल्या बायकाही तशाच… काही तर अगदी तुझ्यासारख्याच …  विद्रुप…! लहानपणी मी ना तुझ्या डाव्या बाजूलाच झोपायचे… का…? कारण तू माझ्याकडे तोंड करून झोपायची तर तुझ्या चेहऱ्याची डावी बाजू उशीवर जायची आणि तुझा चांगला चेहरा मला दिसायचा… मी केस कापले तर लगे वाईट वाटलं ना…? तुझे केस पाहिलेस का? स्वतःचे खांद्यापर्यंत स्टेप कट…त्याची एक स्टेपही इकडची तिकडं झालेली पहिली नाही मी लहानपणापासून…." स्वरा चिडून तोंडाला येईल तसं बोलत होती.

"स्वरा…" राघव खूप चिडला होता, त्याने स्वराच्या कानशिलात लावयला हात वर उचलला, मानसीने त्याचा हात धरला.

"बोलू दे राघव, तिने बोलून न बोलून सत्य परिस्थिती बदलणार नाहीये. ज्या भीतीत मी माझं लेकरू लहानाचं मोठं केलं, ती भीती आज खरी झाली. माझ्या लेकराला मी व्हॅम्पायर वाटले…  कुरूप वाटले… पण तिने जे पाहिलं ते अर्धचं आहे ना… आज तिला पूर्ण सत्य कळू दे…" बोलताना मानसीचा आवाज थरथर कापत होता. तिच्या हातापायांना पण कंप सुटला होता.

"काही गरज नाहीये त्याची…" राघव चिडून बोलत होता, मानसीने त्याला हातानेच चूप बसायला लावलं. माई, मंदाताई, सुधीरराव यांच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते. गौरी आणि रजनी यांची परिस्थितीसुध्दा काही वेगळी नव्हती.

मानसीने थरथरता हात डोक्याकडे नेला. अगदी चापून चुपुन बसवलेलं वीग तिने ओढून काढलं. स्वरा तिच्याकडे बघतच होती. चेहऱ्याची डावी बाजू जळलेली होती, त्याहीपेक्षा डावीकडची मान, कानाचा भाग आणि डोक्यावरच्या बऱ्याचशा भागाची त्वचा जळलेली होती, त्यामुळं डोक्यावर अगदी काही ठिकाणी विरळ विरळ थोडेसे केस होते. स्वराने मानसीकडे पाहिलं आणि पटकन आपला चेहरा माईंच्या कुशीत लपवला. स्वरा घाबरून रडायला लागली होती.

मानसी हातात वीग घेऊन तिच्या रूमकडे चालत निघाली होती. डोळ्यातून अश्रू तर अविरत बरसतच होते. राघव मानसीला आवाज देत होता; पण मानसी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. मानसी चालत जात होती आणि चालता चालता अचानक कोसळली.

"मानसी ssssssss" राघवच्या किंचाळण्याने सगळे मानसीकडे धावले. मानसी निपचित पडली होती. राघव तिला जोरजोरात हलवून जागी करायचा प्रयत्न करत होता. स्वराही तिच्या आईला उठवत होती.

"राघव, चल पटकन, मानसीला हॉस्पिटलमध्ये नेऊ." हेमंत बोलला आणि शशांकने बाहेर जाऊन चंदूला कार काढायला लावली. शशांक, हेमंत आणि राघवने मिळून मानसीला उचललं आणि कारमध्ये ठेवलं. गौरीसुद्धा सोबत बसली.  घरातले बाकीचे लोकं दुसऱ्या दोन कारने त्यांच्या मागोमाग निघाले…
 

क्रमशः ….

©डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all