हे जीवन सुंदर आहे (भाग १०)

Manasi's story

हे जीवन सुंदर आहे! (भाग १०)

मानसीच्या किंचाळण्याने स्वरा धावत बाहेर आली. तिच्या मागे माई आणि गीतासुध्दा आल्या. स्वराला बघून मानसीला एकदम रडू फुटलं…तिने स्वराला पटकन मिठीत घेतले… पटापट तिच्या पाप्या घेतल्या… तिच्या डोक्यावरून, चेहऱ्यावरून हात फिरवला… पुन्हा तिच्या पाप्या घेतल्या…

"स्वरा… स्वरा तू ठीक आहेस ना बाळा? हे… हे बघ…कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत बोलायचं नाही… उद्या तुला कोणीही येऊन काहीही म्हणेल… ऐकायचं नाही कोणाचं… आईला काही झालं, बाबांना काही झालं असं सांगून कोणी कुठेही घेऊन जाईल… कोणासोबत कुठेही जायचं नाही… स्वरा… " मानसी स्वराला मिठीत घेऊन रडत रडत बोलत होती… तिच्या आवाजाला कम्प सुटला होता. मानसीच्या अशा वागण्याने स्वरा भांबावून गेली होती. तिला काही कळत नव्हतं.

"मानसी… शांत हो बरं… चल घरात जाऊ आपण… काही नाही झालं स्वराला… ठीक आहे ती… चल बेटा घरात." माई मानसीला समजावत होत्या. माई, मानसी आणि स्वरा घरात आल्या. माईंनी मानसीला सोफ्यावर बसवलं. गीताने पाणी आणून दिल. मानसीने गटागट पाणी पिलं. मानसी सोफ्यावर बसली, तिचं डोकं दुखायला लागलं होतं. स्वरा मानसीच्या समोर बसली होती. माईंनी राघवला फोन करून घरी लवकर येण्यास सांगितलं.

"मानसी, काय झालं? स्वराकडे बघ एकदा, ती किती घाबरली आहे." माई मानसीला समजावून सांगत होत्या.

"स्वरा, जा बाळा तुझ्या रूममध्ये. आईला काही नाही झालं. कुठेतरी काहीतरी ऐकलं असेल म्हणून तुझी काळजी वाटली असेल तिला. तू नको काळजी करु. अभ्यास कर हो थोडावेळ." माई स्वराला म्हणाल्या आणि ती उठून तिच्या रूममध्ये गेली.

माईंचा फोन आला होता म्हणून राघव ऑफिसमधून तडकाफडकी निघून आला. मानसी माईंसोबत हॉलमध्ये बसून होती. राघव घरात आला आणि राघवला बघताच मानसीला अजून भरून आलं, ती धावत त्याच्याजवळ गेली आणि गळ्यात पडून रडू लागली.

"मानसी, काय झालंय? मी आलोय ना, सगळं नीट होईल, शांत हो बरं. असं रडू नकोस प्लिज." राघव मानसीच्या डोक्यावरून हात फिरवत होता. बराच वेळानंतर मानसी शांत झाली.

"राघव, आपल्या आश्रमाच्या जागेसंदर्भात आज कोर्टाची तारीख होती. मी कोर्टात गेले होते त्यासाठी." मानसी हुंदके देत रडत होती.

"मग? काय झालं मानसी? केस हरलो का आपण? जाऊ दे हरलो तर हरलो… पैशाचं सुध्दा टेंशन नको घेऊ… मी तुला त्यापेक्षाही मोठी दुसरी जागा घेऊन देतो." राघव

" नाही रे… केसचा निकाल लागलाच नाही अजून… पुढची तारीख दिलीये कोर्टाने…" मानसीला अजून हुंदके येतंच होते.

"ठीक आहे… कोर्ट कचेरीच्या कामांना वेळ लागणारच… पण तुला एवढं घाबरायला काय झालं?" राघव

"कोर्टात तो वीरेन चौधरी आला होता… त्याने मला धमकी दिली… म्हणत होता तुझा भूतकाळ आठव थोडा… आणि एक तुला एक मुलगी आहे हे लक्षात ठेव… राघव… आपल्या स्वराला काही नाही झालं पाहिजे… मला तिची खूप काळजी वाटते… काय करावं मला काहीच सुचत नाहीये…" मानसी रडत रडत सांगत होती. वीरेन चौधरीचं नाव ऐकताच माईंच्या पायाखालची जमीनच सरकली. माई मटकन सोफ्यावर बसल्या. 

"त्याची एवढी हिंमत! थांब… कमिशनरला फोन लावतो. आपण पोलीस प्रोटेक्शन घेऊ." राघवने रागाने मुठी आवळल्या… त्याचा चेहरा लालबुंद झाला होता… डोळ्यात चीड अगदी स्पष्ट दिसत होती.

"जे काही करायचं असेल, ते थोडं शांत डोक्याने करा. कारण आता प्रश्न आपल्यापुरता नाहीये. 'संजीवनी' च्या इभ्रतीचा आहे… तिथे असणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आहे." माई 

"हो माई, बरोबर आहे तुझं. काही तरी करावं लागेल. त्याच्या धमक्यांना घाबरून होणार नाही." राघव विचार करत बोलला.

मानसी, राघव आणि माई विचार मसलत करत बसले होते. राघवजवळ मन मोकळं झाल्याने मानसीच्या मनावरचा ताण थोडा निवळला होता.

"पोलीस प्रोटेक्शन घ्यायचं असेल तर आपल्याला वीरेन चौधरी विरुद्ध आधी तशी तक्रार नोंदवावी लागेल. उगाच सापाच्या शेपटीवर पाय दिल्यासारखं होऊ नये म्हणजे झालं. मला वाटतं आपण आपल्या लेव्हलवर गोष्ट सॉर्ट करायला पाहिजे." मानसी

"ठीक आहे, बघू… असा लगेच काही निर्णय नाही घेऊ. सध्यातरी स्वराला शाळेत सोडायला मी जात जाईल. चंदू  तिला घरी आणून सोडेल किंवा तू घेऊन येत जा; म्हणजे आपली स्वराची काळजी दूर होईल." राघव

"हो, पण ती ऐकेल का?" माई

"माई, तिला ऐकावंच लागेल… आपण कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही. मी तिला समजावतो. एक मोबाईल घेऊन देतो तिला, म्हणजे अडीअडचणीच्या वेळी कामात येईल." राघव 

"मोबाईल? बिलकुल नाही… माईंचा फोन घेऊन किती टाईमपास करते ती… स्वतःचा मिळाला तर अजूनच अभ्यास करणार नाही… आणि तसं पण तिच्या शाळेत मोबाईल न्यायला परवानगी नाहीये… ट्युशन वगैरे तर आपणच लावल्या नाहीयेत… राहता राहिला प्रश्न बाहेर कुठे जाताना तर माईंचा फोन देता येईल तेव्हढ्यापुरता." मानसी

"पण माईला फोनचं काम पडलं तर?" राघव

"मला काय काम पडणार? घरीच असते मी… आणि हा लँडलाईन आज की… गीतासुध्दा असते माझ्या सोबतीला. मला त्या फोनच काहीच काम नाही. आताही तो फोन कुठे पडून आहे ते पण मला माहिती नाही. तू बिनधास्त दे माझा फोन तिला." माई

मानसीचं म्हणणं राघव आणि माईंना पटलं. दुसऱ्यादिवशी पासून स्वराला शाळेत ने आण करायची जबाबदारी राघव आणि मानसीने वाटून घेतली.

संध्याकाळ टळून गेली होती. माईंनी देवासमोर दिवा लावला. मानसी, राघव आणि स्वरावरून मीठ मिरच्या ओवाळून टाकल्या. थोड्याशा मीठ मिरच्या घेऊन त्या गीतासोबत अंगणात गेल्या. 

"काही इडा-पीडा असलं तर टळू दे रे… दृष्ट आल्याची, दृष्ट गेल्याची, दृष्ट शेजारणीची, दृष्ट चांडाळणीची…" असं म्हणत माई सगळ्या घरावरून मीठ मिरच्या ओवाळत होत्या.

"घरालाही नजर लागते का? काहीही असतं हां माई तुझं." राघव

"असतात रे ठाणके-ठुणके, गप… आपल्या मनाचं समाधान दुसरं काही नाही." माई 

"बरं, कर तुला हवं तसं." राघव

रात्रीची जेवणं आटोपून मानसी पलंगावर आडवी झाली. स्वराच्या काळजीने तिला झोप येत नव्हती. रात्री कधीतरी उशिरा तिचा डोळा लागला.



 

दुसऱ्यादिवशी राघव स्वरासोबतच ऑफिसला जायला तयार झाला. स्वराचीही तयारी झाली होती. तेवढ्यात चंदूसुद्धा आला.

"बाबा, आज एवढ्या लवकर निघाले!" स्वरा

"हो, चल तुला शाळेत सोडतो जाता जाता." राघव म्हणला. स्वरा एकदम खुश झाली.

"स्वरा… आता रोज मी शाळेत सोडायला येणार बरं तुला आणि शाळेतून येताना आईसोबत नाही तर चंदूकाकासोबतच यायचं बरं…" राघव कारमध्ये स्वरासोबत बोलत होता.

"का बरं बाबा? काही झालंय का? आई पण काल घाबरली होती खूप?" स्वरा

"काही नाही झालं… तू लक्ष नको देऊ." राघव

"मग जाऊ द्या ना मला बसने… आमच्या ग्रुपची मजा मिस होईल माझी." स्वरा

"अग, काही दिवसांचा तर प्रश्न आहे… फार फार तर आठ-पंधरा दिवस किंवा महिनाभराचा." राघव स्वरासोबत बोलत होता. बोलता बोलता स्वराची शाळा आली. स्वरा कारमधून खाली उतरत होती.

"स्वरा… अजून एक.." राघव

"काय बाबा?" स्वरा

"आईचं ऐकत जा." राघव असं म्हणाला आणि स्वरा होकारार्थी मान डोलवून शाळेच्या गेटमधून आत गेली. राघव ती आत जाईपर्यंत तिला बघत होता.


 

मानसीसुद्धा तिचं आवरून आश्रमात जायला निघाली होती. खांद्याला पर्स लटकवून तिचं ड्रावरमध्ये काहीतरी शोधणं सुरू होतं.

"काय शोधतेय ग?" माई

"अहो माई, बघा ना एवढी औषध पडून आहेत घरात; पण कामाची एक गोळी नाही. पेन किलर शोधतेय, खूप डोकं दुखतंय. अजून पूर्ण दिवस संपायचा आहे. एक गोळी घेऊनच घेते म्हणजे थांबेल तरी दुपारपर्यंत." मानसी

"मानसी, आजकाल खूप डोकं दुखतंय बरं तुझं. दर दोन-चार दिवसाला बघतेय मी, असं दर वेळी गोळी खाणं चांगलं नाही. एकदा डॉक्टरकडे जाऊन तपासून ये." माई काळजीने बोलल्या.

"माई, कित्ती बरं काळजी करता! अहो थोडा ताण होतोय आता, नीटशी झोपही लागत नाही म्हणून दुखतंय डोकं; पण तुम्ही म्हणताय म्हणून एकदा डॉक्टरकडे जाऊन तपासून घेते, ठीक आहे? येते मी… जाता जाता मेडिकल स्टोअरमधून औषध घेते." मानसी बोलली आणि आश्रमात निघून गेली.


 

आठवडा कसा भर्रकन निघून गेला मानसीला कळलंही नाही.

कोर्ट केसची तारीख होती. मानसी कोर्टात हजर होती. केस बोर्डावर यायला वेळ लागत होता. मानसीच्या जीवाची घालमेल सुरू होती. मानसीच्या केसचा नंबर आला. यावेळी कोर्टात वीरेन आला नव्हता. त्याच्या वकिलाने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अजून थोडा अवधी न्यायाधीशांकडे मागितला होता. न्यायाधीशांनी पुढच्या महिन्यातली तारीख दिली होती. मानसीचा 'केसचा निकाल लागेल' या आशेवर पाणी पडलं होतं.

"म्हणजे अजून एक महिना काम लटकलं. बरं झालं तो वीरेन आज कोर्टात आला नाही. पुढच्या तारखेला तरी निकाल लागला पाहिजे. पुढच्या सगळ्या कामांसाठी आता महिनाभर थांबावं लागेल…" विचारांच्या तंद्रीत मानसी घरी जात होती.

"ओह शीट… कसं काय विसरले मी? स्वराचा बर्थडे आहे… मोजून वीस दिवस बाकी आहेत… माझा प्लॅन…. आणि नंतर लगेच गणेश चतुर्थी… सगळी तयारी नीट करावी लागेल… नेहमीप्रमाणे राघवची काहीच मदत होणार नाही…" स्वतःशीच बडबडत मानसीने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. पर्समधून फोन काढला, व्हाट्सअँप उघडलं, एक मोठ्ठा मेसेज टाईप केला आणि पाठवला… सेंट केलेला मेसेज पुन्हा वाचला… तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं.

क्रमशः

© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all