तो पहिला डॉक्टर

,"आशिष मागे नाही नेहमी पुढेच असणार." आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले..



वाडवडिलांची पुण्याई मुलांच्या कामी येते असे म्हटले जाते ते अगदी खरंय. चार भावांचं मोठं कुटुंब. गजबजलेला वाडा. अगदी गावाचे पाटील म्हणून माझ्या माहेरच्या माणसांना गावात खूप मान होता. पाटील म्हणून केवळ रूबाब न दाखवता स्वतः कामाला आलेल्या व्यक्तींसोबत घाम गाळत कष्ट करणारे आजोबा आणि भुकेलेल्या व्यक्तीच्या मुखात दोन घास घालणाऱ्या आजी त्यामुळेच घडलेली त्यांची संस्कारी पिढी प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेली दिसते.



पूर्वी गावात शाळा नव्हती म्हणून आजोळी शिक्षण घेण्यास गेलेले माझे मोठे दोन काका त्याकाळात बीएस्सी झाले विशेष म्हणजे आईवडील अडाणी असताना.गावी पुष्कळ जमीन होती. पण एकदाच बोलता-बोलता त्यांचे सर काकांना म्हणाले, "अरे ही स्थावर मालमत्ता घरातील सदस्यांमध्ये वाटली जाऊ शकेल पण तुम्ही मिळवलेल्या ज्ञानाचा फायदा तुम्हालाच राहील." हे सरांचे बोलणे दोघांनाही पटले आणि तेव्हापासून आपण काहीतरी बनायचे ही जिद्द त्यांनी स्वतः पुरती न ठेवता आपल्या दोन लहान भावांनाही त्याचे बाळकडू दिले. सुदैवाने ते भाऊही शिकले आणि नोकरीला लागले.



असं म्हणतात की, प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एक स्त्री उभी असते तशाच माझ्या काकी काकांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या.माझ्या काकी त्याकाळात अकरावी पास होत्या पण घोषापद्धती असल्यामुळे पाटलांची सून कशी नोकरी करणार म्हणून त्यांनी गृहिणी बनून संसार केला.आपल्या लहान सख्ख्या,चुलत सर्व दिरांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत स्वयंपाक,घरकाम करत मोठ्या वहिनी लहान दिरांच्या जणू आईच बनल्या. काकींना तीन मुले व एक मुलगी झाली. काकींचा अतिशय शांत स्वभाव, आपण भलं आणि आपलं घर भलं अशी त्यांची वागणूक. ते म्हणतात ना...! तोंडाने वाईट बोलू नये. कानाने वाईट ऐकू नये आणि डोळ्यांनी वाईट बघू नये. अशाच होत्या आमच्या काकी.आसपास घडणाऱ्या वाईट गोष्टी सांगायला कोणी आल्या, तरी त्या कानाडोळा करायच्या कारण ते त्यांच्या बुद्धीला पटतच नव्हतं. दिवसभर कामात गुंतून राहणं, मुलांचा अभ्यास आणि लहान दीर शाळेसाठी असल्यामुळे हे सगळं पाहून त्यांना थोडीच वेळ मिळणार होता अशा क्षुल्लक गोष्टींसाठी नाही ना...!



पुढे मुले मोठी झाली. मोठा मुलगा एमपीएससी पास होऊन कृषी अधिकारी झाला, दुसरा मुलगा जिल्हा परिषदेत शिक्षक या पदावर आहे. दोघांची लग्न झाली सूनाही अगदी मनाजोग्या मिळाल्या. अतिशय खेळीमेळीच घरात वातावरण. कारण सूनानीही सगळ्यांकडून ऐकलेले काकीच्या स्वभावाबद्दल, त्यामुळे त्यांच्या सुनानाही त्या सासू कधी वाटल्याच नाहीत. अगदी आईप्रमाणे प्रेम करणाऱ्या प्रेमळ, मनमिळावू काकी सुनांची आई कधी झाल्या त्यांनाही कळलच नाही.




आज "डॉक्टर डे" च्या निमित्ताने ज्याचे आभार मानावेसे वाटतात तो काकांचा तीन नंबर मुलगा. जो डॉक्टर आहे हे अभिमानाने सांगावेसे वाटते. कारण आमच्या कुटुंबातला तो पहिला डॉक्टर. काहीही झाल की हक्काने त्याच्या दवाखान्यात धाव घेतली की समाधान वाटते. आजार क्षुल्लक असला तरी त्याच्याकडून "काही नाही नॉर्मल आहे होईल कमी." एवढे ऐकले तरी बरे वाटते. लहानपणापासून शिवभक्त असलेला माझा हा भाऊ खोडकरही तितकाच आणि अभ्यासूही.तो लहान होता त्यावेळेसचा प्रसंग प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहे. आपल्या राष्ट्रगीतात एक वाक्य आहे "तव शुभ आशिस मागे." जे बोलून त्याला कोणीतरी चिडवले तेव्हा तो म्हणाला,"आशिष मागे नाही नेहमी पुढेच असणार." आणि बोले तैसा चाले म्हणत डॉ.आशिष बाळासाहेब काळेपाटील हा माझा भाऊ धाराशिवमध्ये एक प्रसिद्ध डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करत आहे याचा अभिमान वाटतो. 



भैय्याने मेडिकलला प्रवेश घेतल्यानंतर अगदी अभिमानाने सर्वांना आपल्या कष्टाचे चीज झाले म्हणून सांगणारे माझे काका तो मेडिकलच्या तिसऱ्या वर्षांत असताना हे जग सोडून गेले.कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तो अभ्यासक्रम समजून घेतानाचे कष्ट आणि वडीलांचे दुःख लहान वयातच सहन करावे लागले म्हणून खचून न जाता जिद्दीने त्याने अभ्यास केला. आणि शेवटी तो एमबीबीएस झाला. त्याच्या जिद्दीला सलाम. डॉक्टर हा पेशंटसाठी देव असतो असा हा डॉक्टर कित्येक रूग्णांना जीवनदान देतोय हे पाहून माझे काका जिथे कुठे असतील तिथून आशिर्वाद देत असतील, मनापासून आनंदी असतील असे मला वाटते.



इतरांपेक्षा कमी फीस घेऊन,  मोफत शिबिराचे आयोजन करून माझे भाऊ आणि वहिनी डॉक्टर बनून समाजसेवा करतायेत आणि देव त्यांना या सत्कार्यासाठी उदंड आयुष्य देवो. त्यांच्या आयुष्यात सुखा, समाधानाच्या सरी येवो हीच विठ्ठला चरणी आणि आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि डॉ.आशिष बाळासाहेब काळे पाटील आणि डॉक्टर विणा आशिष काळेपाटील या दोघांनाही "डॉक्टर्स डे" च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. तसेच "रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा" म्हणत कुटुंब सांभाळत, 24 तास रुग्णांच्या सेवेसाठी हजर असणाऱ्या सर्व डॉक्टरांना डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा देते.


धन्यवाद!!