हे ही दिवस जातील

About Life


"बाळा, अनघा, नशीब काढलसं हं तू, चांगला जीवनसाथी मिळाला तुला, दिसायला ही खूपचं चांगला आहे. घरचा मोठा बिझनेस आहे आणि घरातील सर्व माणसांचे वागणे,बोलणेही किती नम्र व प्रेमळ आहे.
तुझ्या बाबांच्या अकाली जाण्याने मला तर तुझ्या लग्नाची खूप चिंता होती. तुझे दोघे भाऊही इतके मोठे नाही की, तुझ्या लग्नाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडू शकतील.
मोठा विनोद तर आताच नोकरीला लागला आहे व छोटा विवेक तर अजून शिक्षण घेत आहे.तुझे नशीब चांगले म्हणून घरबसल्या एवढं चांगल स्थळ आलं, खरचं माझा देवावर विश्वास होता आणि आपले हे हि दिवस जातील व सुखाचे दिवस येतील याची खात्री होती. \"आता यापुढचे सर्व व्यवस्थित होऊ दे.\"
अशी प्रार्थना देवाला करते."
अनघाची आई,अनघाचे लग्न ठरल्यामुळे आनंदी होऊन अनघाला म्हणत होती.

अनघालाही प्रणवला पाहताच तो आवडला होता.दिसायला खरचं इतका छान होता की, त्याला पाहताच कोणतीही मुलगी त्याच्या प्रेमात पडली असती.
अनघाही दिसायला सुंदर होती. सर्व कामात हुशार होती.शिक्षणही चांगले झालेले होते. पण वडिलांना हार्ट अटॅक आला व त्यातच ते गेले. त्यामुळे घरात दुःखाचे वातावरण होते. आयुष्यात पुढे काय होईल या विचाराने सर्व चिंतेत असायचे.


आपल्या दुःखाला कुठेतरी सुखाचा मार्ग दिसतो आहे हे अनघाला आलेल्या स्थळामुळे सर्वांना वाटत होते.आणि सर्वांना कुठेतरी जगण्याचा,आशेचा किरण दिसू लागला .

वडील नव्हते तरी आई या नात्याने, अनघाच्या आईने आपल्या पद्धतीने, आपल्याकडून शक्य होईल तितके अनघाच्या लग्नात देणेघेणे केले. सासरच्या मंडळींनी फक्त मुलीचीच त्यांच्याकडून अपेक्षा केली होती पण आपल्या मुलीला नंतर काही बोलणे नको,त्रास नको म्हणून अनघाच्या आईने आपले कर्तव्य पार पाडले होते.

अपेक्षेपेक्षा खूप छान लग्न झाले. दोन्ही  घरात आनंद  ओसंडून वाहत होता. अनघाला चांगले सासर मिळाले व तिचे लग्न व्यवस्थित पार पाडल्याच्या जबाबदारीतून आपण मुक्त झालो, याचे समाधान अनघाच्या आईला व भावांना होते. तर प्रणवला सुंदर, हुशार, संस्कारी जीवनसाथी मिळाली, आता प्रणवचे आयुष्य सुखाचे होईल यामुळे त्याच्या घरातील सर्वांना समाधान वाटत होते.

लग्नानंतरचे सर्व कार्यक्रम आटोपल्यावर प्रणव व अनघा हनिमूनसाठी फिरायला गेले.
तेथे निसर्गसौंदर्याबरोबर दोघेही आपल्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत होते. एकमेकांना समजून घेत होते,आनंद देत होते व घेत होते.
हे दिवस कधी संपूच नये असे दोघांना वाटत होते.

हनीमूनचा आनंद घेऊन दोघे घरी परतले. त्यांचे आनंदी चेहरे पाहून घरातल्यांनाही समाधान वाटले.

दोन दिवसांनी अनघा माहेरी गेली. माहेरी ती आपल्या सासरचे कौतुक करत होती. तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आईला, भावांना ही आनंद होत होता.

तीन-चार दिवस माहेरी राहून, अनघा सासरी परतली. रोजचे रूटीन सुरू झाले. सासू-सासरे तिच्याशी  खूप प्रेमाने वागत होते.तिची काळजी घेत होते. दीर, जाऊ हे ही तिच्याशी छान बोलायचे, वागायचे,तिची विचारपूस करायचे, काळजी घ्यायचे. घरात श्रीमंतीचा थाट होता.कपडेलत्ते, दागदागिने, खाण्यापिण्याची हौसमौज सर्व काही होते. कशाचीही कुठेही काही कमतरता नव्हती. पण लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस प्रणवबरोबर सुखात गेल्यानंतर , अनघाला हळूहळू प्रणवच्या वागण्यात काहीतरी बदल जाणवायला लागला.


सुरुवातीला आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करणारा प्रणव कुठेतरी हरवला आहे. हे तिला जाणवायला लागले.प्रणव रोज रात्री उशिरा घरी येऊ  लागला. सासरे व दीर जसे सकाळी लवकर ऑफिसमध्ये जातात, तसा प्रणव जात नाही,उशिरापर्यंत झोपून राहतो. सासरे व दीर बिझिनेस विषयी बोलत असताना, प्रणव त्यात कधीही भाग घेत नाही. या सर्व गोष्टी अनघाच्या लक्षात येऊ लागल्या.
याबद्दल तिने प्रेमाने व बायकोच्या अधिकाराने प्रणवला विचारलेही. पण तो उडवाउडवीची उत्तरे देत होता.
अनघाने सासूबाई,जाऊबाई यांनाही त्याबद्दल विचारले पण त्यांनीही समाधानकारक उत्तरे दिली नाही.
अनघाने ही गोष्ट आपल्या आईलाही सांगितली.

तेव्हा आईने तिला सांगितले, "बेटा, सर्व गोष्टी चांगल्या आहेत. संसारात थोड्याफार गोष्टी समजून घ्याव्या लागतात. नात्यांना समजून घ्यायला वेळ लागतो. थोडा धीर धरं .. हे हि दिवस जातील आणि सर्व सुरळीत होईल. "

आईच्या अशा सांगण्यामुळे ती आहे तसे स्विकारून जगत होती..संसार करत होती..परिस्थिती बदलण्याची वाट पाहत होती.

परिस्थिती काही बदलत नव्हती पण अनघाला मातृत्वाची चाहूल लागली होती. तिच्या आई होण्याच्या या बातमीने सासरी व माहेरी सर्वांना आनंद झाला होता.प्रणवलाही  आनंद झाला होता. पण त्याचा चेहरा काहीतरी वेगळचं सांगत होता.


"अरे, प्रणव आता तू बाप होणार आहे, आता तरी सुधरं.. तुझे लग्न  झाले आहे, चांगली बायको मिळाली हे भाग्य समजं तुझं  याचे तरी भान ठेवं.
आम्हांला वाटले, तू लग्न केल्यानंतर संसारात लक्ष देशील, बिझनेस मध्ये आम्हांला मदत करशील, जबाबदारीने वागशील ..पण तुझ्या वागण्यात काहीच सुधारणा नाही. रात्री उशिराने घरी येणे, पार्ट्या करणे, वेगवेगळे व्यसन , अफेयर्स हे सर्व शोभते का आपल्या घरात ? आता तरी हे सर्व बंद कर.. तुझे चांगले व्हावे म्हणून तर तुझे लग्न केले ना आम्ही? "

असे आईबाबा प्रणवला सांगत होते,त्याच्यावर ओरडत होते आणि हे बाहेरून घरात येणाऱ्या अनघाने ऐकले. हे ऐकून तिला चक्करच आली. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. आपली खूप मोठी फसवणूक झाली हे तिच्या लक्षात आले होते.

अनघाने आपली फसवणूक का केली ? याचे उत्तर सासूसासऱ्यांना विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की,
" प्रणवला कॉलेजच्या दिवसांपासून वाईट व्यसने लागली होती , आम्ही खूप प्रयत्न करूनही तो सुधारत नव्हता. आम्हांला वाटले लग्न झाल्यानंतर संसारात रमेल आणि सुधारेल यामुळे त्याचे लग्न केले. पण आमच्या अपेक्षेप्रमाणे त्याच्यात बदल झाला नाही.
अनघा, मुलाच्या प्रेमापोटीचं हे केले गं..तुला या घरात काहीही कमी पडणार नाही गं...तू सुखात राहशील फक्त प्रणवला थोडा वेळ दे..होईल तो चांगला.. आपण सर्व मिळून त्याला चांगला करू..हळूहळू हे हि  दिवस जातील.. तू थोडी वाट बघं..."

सासूसासऱ्यांचे हे बोलणे ऐकून प्रणवबद्दलचे त्यांचे प्रेम तिला जाणवत होते, पण आपल्या मनाचे काय ? आपल्या सुखाचे काय ? घरात सुखसोयी आहेत..बाकी सर्व खूप चांगले आहे..पण आपला नवरा व्यसनी, बेजबाबदार, त्याच्याच विश्वात रमणारा ..मग आपल्या संसाराला काय अर्थ? आपल्या होणाऱ्या बाळाचे काय भविष्य?

अजून एक संधी म्हणून तिने सासूसासऱ्यांचे ऐकून, प्रणवला चांगल्या मार्गावर आणण्याचे प्रयत्न केले.पण पदरी निराशाच आली.


"हे हि दिवस जातील..." सर्वांच्या म्हणण्यानुसार तिने ऐकले आणि वागलीही पण तिच्या मनाला एक प्रश्न त्रास देत होता..
" हे हि दिवस जातील मान्य,... पण कधी? अजून किती दिवस..किती वर्ष..की पूर्ण आयुष्य... वाट पाहवी लागेल ?"

गोंडस अशा शर्विंलच्या येण्याने प्रत्येक जण आनंदी होता. बाळाचे कौतुक करण्यात सर्वांचा दिवस आनंदात जात होता. पण त्याच्या वडिलांच्या वागण्यात काहीही चांगला बदल होत नव्हता. वडीलांची जबाबदारी ही त्याला कळत नव्हती. त्यामुळे शर्विलच्या भविष्याचा विचार करता, अनघा सासरच्या सर्व सुखसोयी सोडून बाळासाठी कायमची  माहेरी निघून गेली.

तिने सर्व गोष्टींचा विचार करूनचं हा निर्णय घेतला होता.
\" हे हि दिवस जातील ...\" याची किती वाट पाहत बघायची ..त्यापेक्षा त्यातून काहीतरी चांगला मार्ग काढून ..येणारा प्रत्येक दिवस आपल्या पद्धतीने आनंदी करण्याचा प्रयत्न का करू नये ? असे अनघाला वाटले व तिने आयुष्यातील हा मोठा निर्णय घेऊन, माहेरी राहू लागली. चांगले शिक्षण व आपल्या ज्ञानामुळे तिला चांगली नोकरीही मिळाली. ती आपल्या शर्विलला प्रेम व चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करू लागली.
आणि मनाला सांगू लागली,

\"हे ही दिवस जातील 

याची किती वाट पाहशील ? 

आपणचं आपला मार्ग शोधूनी

आनंद घेवू या जीवनी \"


समाप्त 


नलिनी बहाळकर