Feb 22, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

हे गणराया

Read Later
हे गणराया

                                 हे गणराया

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हे गणराया,

 

सांगण्यासाठी तर बरंच काही आहे पण सुरुवात कुठून करावी हेच समजत नाही. तक्रारींचा पाढा वाचून दाखवायला कदाचित वेळ कमी पडेल. असो, आपण त्याकडे नंतरच वळूयात.

 

तुझं आगमन म्हणजे एक भव्यदिव्य सोहळाच आहे. या सोहळ्याची उत्सुकता अगदी वर्षभर लागून राहिलेली असते. घरोघरी कितीतरी दिवस आधीच तुझ्या येण्याची तयारी सुरू झालेली असते. घरगुती असो किंवा सार्वजनिक गणेशोत्सव, उत्साहाला उधाण आलेलं असतंच. आणि का नाही येणार बरं? तुझं नुसतं रूप पाहूनच मन प्रसन्न होऊन जातं. तुझा तेजस्वी चेहरा पाहता मनात आपसूकच सकारात्मकता जाणवते. तू आला आहेस म्हणजे आता काही काळजीच नाही, जणू हा विचारच रूजलाय. सुखकर्ता तू, सुखाची बरसात करण्यासाठी येतोस. दुःखहर्ता तू, दुःखाची राख करण्यास सरसावतोस.

 

पण खरं सांगू, काळ बदलला आहे. पूर्वी कसं सारं चैतन्यमय वातावरण असायचं, त्याला आता काहीसं गालबोट लागलं आहे असं जाणवतं. एक वेळ अशी होती जेव्हा सारं कुटुंब, शेजारीपाजारी, नातलग इ. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मनापासून एकत्र यायचे. त्यात कोणताही आपपरभाव नसायचा. असायचाच तर तो तुझ्या येण्याचा आनंद, उत्साह! भावंडांसोबत, कुटुंबासोबत वा मित्रपरिवारासोबत तुझी आरास करण्यात प्रत्येक जण प्रचंड समाधानी असायचा. एक वेगळाच उत्साह संचारलेला असायचा. याचा अर्थ असा नाही की आता ते चैतन्य, तो उत्साह राहिला नाहीये. पण एवढं सुद्धा नक्कीच आहे की प्रत्येकाचं मन आता तसंच राहिलं नाहीये!

 

हो, असंच काहीसं होतंय रे आता. म्हणजे आधीसारखा किंबहुना त्याहून जास्त उत्साह दाखवणारेही बरेच लोकं आहेत. पण हल्ली यात यंत्रवत वागणाऱ्यांची, स्वार्थ साधणाऱ्यांची, दिखावा करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढतेय. गणेशोत्सव साजरा करणं म्हणजे निव्वळ कोणाची गणपती बाप्पाची मूर्ती मोठी आहे, कोणाच्या मंडळानी जास्त देणगी मिळवली (मिळवली म्हणण्यापेक्षा कमावली योग्य असेल नाही का?), कोणाकडे जास्त लोकप्रिय लोकांनी हजेरी लावली, कोणाचा देखावा जास्त भारी आहे (आता सुंदर यासाठी नाही म्हटलं कारण सुंदरतेची व्याख्याच हळूहळू बदलत आहे. सुंदरता आणि दिखावा या दोन शब्दातला फरक अधोरेखित करणं कदाचित कठीण होत आहे.),इ. पुरता मर्यादित होत आहे. पण खरंच हे योग्य आहे का? तू खरंच या दिखाव्याचा भुकेला आहेस का? उत्तर तर साऱ्यांनाच ज्ञात आहे. माझं म्हणणं असं मुळीच नाही की देखावा तयार करताय म्हणजे दिखावा आहे. देखावा करण्यास विरोध मुळीच नाही रे माझा. पण वस्तुस्थिती हीच आहे की आज दिखाऊपणा करणारी वृत्तीच वाढतेय. तुच सांग तुला नक्की काय भावतं,स्वच्छ निर्मळ मनाने तयार केलेला देखावा की मग मनात स्वार्थवृत्ती ठेवून केलेली भपकेबाजी? आज तुझ्या या उत्सवाला सणाऐवजी व्यवसाय समजणारे ही काही कमी नाहीयेत. बरं या व्यवसायाला वाह्यातपणाचा मुलामा देण्याचं काम सुद्धा काही लोकं चोखपणे पार पाडतात. मग कसं बरं म्हणायचं या सगळ्याला निर्मळ भक्तिभाव? अशा एक ना अनेक गोष्टी आजकाल अगदी सहजपणे दिसून येत आहेत. मन तुटतं रे हे विचार पाहून. सणाचं इतकं बदलतं रूप बघवणार नाही.

आधीसारखा देदीप्यमान सोहळा आजही पार पडतो, पण त्यात झालेले सूक्ष्म बदल लक्षात न येण्याइतके अजाणते तर आपण नक्कीच नाही.

हो पण तुझी मनस्वी भक्ती करणारे, तुझ्या येण्याचा खराखुरा आनंद असणारे असंख्य भक्तगण सुद्धा आहेत बरं का! त्यांचा विचार करून तरी तू नेहमीसारखा हसत आमच्या भेटीसाठी येत रहा. तुझ्या सेवेची संधी देत रहा. आणि हो, बुद्धी देवता आहेस तू,तर भरकटलेल्या जीवांना सद्बुद्धी नक्की दे.

 

तुझं खूप खूप स्वागत.‌ असंच चैतन्यमय वातावरण टिकवून ठेव ही तुझ्या चरणी प्रार्थना. आशिर्वाद असूदे.

-©® कामिनी खाने.

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//