हे फक्त "ती"च करू शकते

कथा तिच्या संस्कारांची....
हे फक्त "ती"च करू शकते…..


"काय माल आहे यार. ते बघ ते ओढणीच्या आत.. ऊssssssम्हा.."

रेणुकाच्या कानात सतत हेच वाक्य ऐकू येत होते आणि डोळ्यांपुढे थोड्या वेळ आधी बघितलेले ते घाणेरडे दृश्य येत होते. खूप प्रयत्न करूनही तिला झोप येत नव्हती. गेले चार दिवस तिचे हेच सुरू होते. या कडावरून त्या कडावर, कशीतरी रात्र घालवत होती. झोप येणार तरी कशी? ती एक आई होती, वीस वर्षाच्या मुलाची, एकटी पालक.

रेणुकाचा मुलगा अभिराम कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता. चार दिवस आधी ऑफिस मधून घरी येताना तिने तिच्या मुलाला त्याच्या काही मित्रांसोबत एका चहा टपरीवर सिगरेटचा धुरळा उडवत मस्ती करतांना बघितले होते. त्या मस्तीखोर मुलांचा घोळका समोरून येणाऱ्या जाणाऱ्या शालेय, कॉलेजवयीन मुलींची छेड काढत अश्लील भाषेत टोमणे मारत होते. त्यात , " काय माल आहे यार. ते बघ ओढणीच्या आत..मस्त..मोठे मोठे.. सो सेक्सी, सो हॉट…ऊssssssम्हा." हे शब्द अक्षरशः तिच्या मुलाच्या तोंडून तिने ऐकले होते. काही दिवसांआधी त्याने शेजारी शिक्षणासाठी राहायला आलेल्या मुलीच्या अंगावर फुल फेकले आणि लपून बसला. ती गॅलरीमध्ये आली की त्याचे असेच काही काही तिच्या अंगावर फेकणे सुरू होते. आणि आज त्याची मजल इतकी वाढली होती की त्याने एक कंडोमचे पॅकेट तिच्या अंगावर फेकले. ते बघून रेणुकाच्या पायाखालील जमीनच सरकली होती. मुलाचे हे असे बदलेले, नीच प्रवृत्तीचे रूप तिला सहनच होत नव्हते. तिला त्याचा राग तर आला होताच, पण वाईट ही वाटत होते की, आपण आपल्या मुलावर चांगले संस्कार करण्यात कमी पडलोय. काही वर्षाआधी लोकांनी बोलले शब्द तिला जसेच्या तसे आठवत होते, ' एकटी स्त्री मुलांना सांभाळू शकत नाही. चांगले भविष्य देऊ शकत नाही..' विचार करता करता कधीतरी तिचा डोळा लागला. पण त्या मिटलेल्या डोळ्यांतून वाहत असणारी अश्रूंची धार मात्र काही केल्या थांबत नव्हती.


तसे तर रेणुका रोज पहाटेच उठून भरभर सगळी कामं आटोपून ऑफिसला जाते. घरातील शांतता आणि सकाळचे सात वाजले तरी आई उठली नाही हे बघून अभिराम आईच्या खोलीत आला.

"आई, अग ऑफिसला जायचं नाही का? सकाळ झाली." अभिरामने आवाज दिला.

"हम्म, आज रजेवर आहे." रेणुकाने त्याची नजर चुकवत उत्तर दिले.

" का? बरं वाटत नाही का?"

"ठीक आहे. थोडा थकवा वाटतो आहे. आराम करते. कॉलेज कॅन्टीनमध्ये खाऊन घे काहीतरी.."

"हो. आराम कर. माझी काळजी नको करू आणि काही लागले तर कॉल कर." बोलून अभिराम कॉलेजला निघून गेला.

रेणुकाला दिवसभर खूप अस्वस्थ वाटत होते. शेजारी जावे, त्या मुली सोबत बोलून, मुलाच्या वतीने माफी मागावी. आणि चांगले अंगभर कपडे घाल, नीट रहा, असा सल्ला त्या मुलीला द्यावा, असे तिच्या मनात आले. पण नंतर तिच्या लक्षात आले की, त्या मुलीची तर यात काही चूक नाही. आणि त्या बाहेर कॉलेज, शालेय मुली? त्यांना तरी कसे माफी मागू? बरं, हे सर्व ऐकून ती मुलगी कदाचित चिडेल, किंवा ऐकेलही, सतर्क होईल. पण अभिराम, त्याचं काय? किती दिवस त्याला असे पाठीशी घालू? त्याची ही अशी प्रवृत्त्ती तर वाढतच जाईल. तिचं मन आणखीच सैरभैर होऊ लागले.


संध्याकाळी अभिराम उशिरानेच घरी परतला.

"अभि, ते रेखा मावशीला बरं नाही म्हणे, फोन आला होता. चल भेटून येऊ." रेणुका त्याला कॉफी देत म्हणाली.


"अग आताच तर आठ दिवस आधी गेलो होतो. म्हातारी आहे, आता तिची तब्येतीची कुरबुर सुरूच असणार आहे. किती वेळा जायचे? जाऊ दे तू पण रिलॅक्स कर, ठीक होईल ती."


"असं काय करतो? चल की. आपण भेटलो की तिला तेवढच बरं वाटतं." रेणुका त्याचा मागे लागली. शेवटी तो तयार झाला.

दोघंही रेखा मावशीला भेटून परत येत होते. रात्रीचे नऊ वाजले असतील. रस्ता बऱ्यापैकी सूनसान होता.

"चल दुकान बंद व्हायच्या आत उद्यासाठी भाजी वगैरे घेऊन घेते." म्हणत रेणुका बाजूला असलेल्या एका छोट्या दुकानात गेली. पाठोपाठ अभिराम सुद्धा गेला. रेणुकाने थोडी भाजी, गरजेचे काही किराणा सामान घेतले. तितक्यात तिचा फोन वाजला.

"अभि बिल देऊन ये, मी ऑटो बघते." म्हणत ती फोनवर बोलत थोडी पुढे गेली.

अभिराम बिलाचे पैसे देऊन येतच होता की एक बाईक रेणुकाच्या दिशेने येत होती. आणि तिला काही कळायच्या आत बाईक वरील मुलाने गाडीचे एक हॅण्डल सोडून रेणुकेच्या छातीवर हात मारत तिची छाती करकचून दाबली. आणि तिची ओढणी हवेत उडवत भरधाव वेगाने निघून सुद्धा गेला.


"बे साल्या.. @#&@ @@@@#@# …" रागाने लाल झालेला अभिराम खूप घाण घाण शिव्या देत त्या बाईकच्या मागे पळाला. पण तो पोहचेपर्यंत ती बाईक निघून गेली होती. त्याने बाईकचा नंबर बघायचा प्रयत्न केला. पण अंधारात त्याला फार काही दिसले नाही. रस्त्यावर पडलेली आईची ओढणी उचलून तिच्याजवळ येत तिला ओढणी दिली. ती थोडी कण्हत होती.


" साल्या, माझ्या आईला हात लावायची हिंमतच कशी झाली? दिसत नाही का तुझ्या आईच्या वयाची आहे ते? आई, बहिणी नाही का तुझ्या घरी?" रस्त्यावरील दगड उचलून बाईक गेली त्या दिशेने मारून फेकत अभिराम ओरडत होता. त्याचा आईला कोणी अशा पद्धतीने केलेला स्पर्श त्याला सहन झाला नव्हता.

" या अशा पुरुषांना, मुलांना स्त्रियांचं वय दिसते तरी काय? चार वर्षाची आहे की सत्तर वर्षाची, त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांना फक्त स्त्रीचे शरीर दिसते.. तिचे उभारलेले अंग दिसते. तिचा पार्श्व आणि कंबरे खालील भाग दिसतो. वय, चेहरा बघायची तसदी सुद्धा ते घेत नाही. चल. " रेणुका आपली ओढणी दोन्ही खांद्यावरून नीट करत म्हणाली.


"आई, अग तू इतकी कूल कशी राहू शकते? त्याने काय केले तुला कळले नाही काय?" अभिराम अजूनही खूप रागात होता.

"त्याने माझ्या छातीला घाण पद्धतीने दाबले. मला दुखत पण आहे. पण शांत राहण्यापलीकडे काय करू शकते? तो तर त्याला हवे ते करून पळाला सुद्धा. कदाचित पुढे जाऊन परत एखादी मुलगी दिसली की करेल असेच."

अभिरामची तर तळपायाची आग मस्तकात गेली होती.


" अभिराम , या सगळ्याची मला आता सवय झाली आहे ..नाही अशी सवय करूनच घ्यावी लागते, स्त्री ना मी. कॉलेज मध्ये होते, तेव्हा रस्त्याने, वर्गात एकटे दिसले तर, कधी माझ्या शरीरावरून तर कधी दिसण्यावरून मुलं टोमणे मारायचे. तुझे बाबा गेले, एकटे पडले. मग एकटी स्त्री तर अशा पुरुषांसाठी मेजवानीच असते. ऑफिसमध्ये पण काही कमी त्रास नाही झाला. पदोपदी या अशा या काही गलिच्छ पुरुषांच्या नजरेचा , अश्लील शब्दांचा, स्पर्शाचा सामना करावा लागतो. ऑफिसमध्ये काम करणं कठीण होत होते. बस मधून प्रवास जीवघेणा वाटत होता. या सगळ्यांचा इतका त्रास झाला आहे की, खूपदा तर जीवन नको वाटत होते. आत्महत्या करावी वाटत होते. पण तू होता, त्यामुळे मरता पण येत नव्हते. तुला माहिती अभि, मी कॉलेजमध्ये असेल, तेव्हा बाजूच्या गरीब वस्तीत एक मुलगी होती. दहावीला छान ८३ टक्के घेऊन उत्तमरीत्या पास झाली होती. वडिलांना त्यांच्या टायर पंक्चरच्या कामात मदत करत पुढले शिक्षण घेत होती. खूप शिकून, नोकरी करून घरातील परिस्थिती सुधारायला हातभार लावायचे, असे तिचे स्वप्न होते. पण जो विचार करतो, तसेच घडते असे होत नाही. अशीच काही टवाळकी मुलं तिला खूप त्रास द्यायचे. अश्लील हातवारे करायचे. त्यांची खूप करमणूक व्हायची. मात्र या सगळ्या गोष्टींना त्रासून तिने आत्महत्या केली. सगळा समाज त्या मुलीला आणि तिच्या पालकांनाच दोष देत राहिला. म्हणे मुलगीच काही इशारे करत असेल. मुलं दिसली की कपडे , ड्रेसचा गळा पाडून आपले शरीर दाखवत असेल. मुलांना फसवण्यासाठी मुली असे काय काय उद्योग करतात म्हणे. अख्ख्या परिवाराची राखरांगोळी झाली रे. तेव्हा तर असे वाटले पोलिसांनी त्या मुलांना चौकात आणून मारावे. त्यांचे अवयव कापावे. एवढा तिरस्कार, एवढा राग आला होता की काही सहनच होत नव्हते. पण तुला माहिती, कितीही शिक्षा द्या, काही करा.. या अशा नीच प्रवृत्तीच्या पुरुषांना त्याचा काही फरक पडत नाही. लैंगिक शोषण, बलात्कार करून पोट भरत नाही की त्यांच्या शरीरासोबत असे कृत्य करतात की आपण विचार पण करू शकत नाही. मर्डर करून फेकून देतात. एक स्त्रीच त्या जीवघेण्या वेदना समजू शकते. खूप संताप होतो रे. पण काय करू शकतो? काहीच हातात नाही. खूप हेल्पल्स वाटते. मला सांग, आता तू माझ्यासोबत असून सुद्धा काय करू शकला?"

हे सगळं बोलतांना रेणुकेच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. ती हतबल झाल्यासारखी वाटत होती. अभिराम हातात पिशव्या घेऊन आईसोबत चालत होता. येताजाता मागेपुढे बघत होता.

" तुला माहिती, आठ दहा दिवसांपूर्वीची गोष्ट. ऑफिस सुटल्यावर बस साठी उभे होते. तर बाजूला काही मुलांचा घोळका होता. त्यातील काही मुले माझ्या बाजूला उभ्या असलेल्या दोन शाळकरी मुलींना बघून शेंगदाणे खात तर काही त्यांच्या अंगावर फेकत होते. आणि काही घाण घाण शब्द बोलत होते. त्या मुलींना तिथे उभे राहणे कठीण झाले होते. मी त्या मुलांना रागावले. त्यांना म्हणाले, " तुमच्या घरी आई बहिणी नाहीत काय? पोलिसांना बोलवेल, निघायचं इथून. तर त्यांनी बाईक सुरू केली. मला वाटले समजले. तर कुठे काय? माझ्याजवळ आले. त्यातल्या एकाने खिशातून सिगरेट काढली. लायटरने पेटवली. एक झुरका घेतला आणि माझ्या चेहऱ्यावर धुरळा उडवत म्हणाला, आंटी अब कोई भाव नही देता तो जलन होरी क्या? वैसे तेरे बॉल अच्छे है, कहो तो रात में आजाऊ दबाने? म्हणत पळाले. तुला माहिती या मुलांना अशी अग्निदिव्य दृष्टी प्राप्त झाली असते की त्यांना पूर्ण कपड्याने झाकलेल्या स्त्रीचे अंग सुद्धा अगदी क्लिअर दिसते." ती थोडीशी कुत्सितपणे हसत म्हणाली.

" बघ अशी काही गलिच्छ प्रवृत्तीचे लोक असतात. कधी कधी तर कळत नाही पशू आहेत की माणूस आहेत. असो. सगळी मुलं काही माझ्या अभिराम सारखी सोज्वळ नसतात. हो ना?" ती त्याच्याकडे बघत होती, तो काही म्हणेल, बोलेल. पण तो काहीच बोलला नाही.


घरी आल्यावर जेवण आटोपून दोघेही आपापल्या खोलीत निघून गेली. अभिराम पण शांत होता. आणि रेणुका पण नंतर फार काही बोलली नाही.

*******


दुसऱ्या दिवशी बघितले तर अभिरामचे अंग तापाने फणफणले होते. डोळे पण खूप सुजले दिसत होते.

"अभिराम, हे दूध घे. त्यानंतर हे औषध घे. ताप उतरेल. सद्ध्या सगळीकडे व्हायरल पसरले आहे. काळजी घ्यायला हवी." रेणुका त्याचाजवळ येत म्हणाली. पण त्याचे तिच्याकडे काही लक्ष नव्हते. तो खिडकीतून काहीतरी बघत बसला होता.


"आई, आलोच.." रेणुकेच्या उत्तराची वाट ही न बघता, त्याने पायात चप्पल अडकवली आणि सुसाट वेगाने बाहेर पळाला.


"पियू बेटा, थँक्यू. खूप मदत केली ग तू या आईला. काल अगदी मुलासारखी दिसत होती. आणि काय ती बाईक चालवली, एखाद्या मुलाला पण लाजवेल. तुम्ही आजकालच्या मुली खरंच खूप हुशार आहात." रेणुका फोनवर बोलत होती.

"अग मावशी, मी काहीच फार केले नाही. खरतर आता तुझ्यासारख्या आईची फार गरज आहे. जर मुलाची आई तुझ्यासारखी असेल ना, तर आम्हा मुलींच्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि हे फक्त एक आईच करू शकते. नाहीतर आहेच हा समाज, असे काही झाले की आम्हा मुलींना दोष द्यायला तयार असतो. थँक्यू मावशी." पीयु फोन वर बोलत होती.

"सॉरी. मला माफ कर. मी परत कधीच असे वाईट वागणार नाही. मी तुलाच काय, कधीच कुठल्या दुसऱ्या मुलीला सुद्धा त्रास देणार नाही की कोणाची छेड काढणार नाही. " हात जोडून अभिराम त्या शेजारच्या मुलीची माफी मागत होता. पियु सोबत बोलत रेणुका खिडकीतून बघत होती. समोरचे दृश्य बघून तिच्या ओठांवर हसू उमलले होते तर डोळ्यात आसवे जमा झाली होती.

समाप्त

*******