हे बंध रेशमाचे पर्व 2 - भाग 5

Love story

" आपलं काम होईपर्यंत तरी आनंदला हॉस्पिटलला नेता येणार नाही. त्यामुळे तो जास्तीत जास्त दिवस गावी राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपलं काम झालं की त्याला बोलवून घेऊ.... " काका म्हणाले तसं त्यांनी फक्त मान डोलावली. 

बोलून ते जायला वळले तर मागे नेहा उभी होती. 


आता पुढे

नेहाला बघुन काका घाबरले. त्यांना वाटलं हिने ऐकलं असेल का सगळं..? पण त्यांनी तसं चेहऱ्यावर दाखवलं नाही. 

" काका जरा पाणी हवं होतं.... " ती म्हणाली.

" हो देतो ना.." असं म्हणुन त्यांनी काकूंना पाणी द्यायला सांगितलं आणि हुश्श म्हणून एक निश्वास सोडला. 

दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळे कोल्हापूरला जायला निघाले. इकडे घरी वृषालीताईंची सकाळची गडबड चालू होती. गावी आल्यापासून त्या पहाटेच उठत. रोज दोन ते तीन किलोमीटर त्या फिरून येत. त्यांचं बघून बघून आता गीता मावशी देखील त्यांच्यासोबत फिरायला जात. दोघी परत आल्या की फक्कडसा चहा होई आणि मग त्या बाकीच्या कामाला लागत. वृषालीताई फुलं वेचुन आणत. घराच्या आजूबाजूला त्यांनी खूप फुलझाडं फुलवली होती. त्यांनी इतकी सुंदर बाग तयार केली होती की पाहणाऱ्याचं भानच हरपावं. एका बाजूला प्राजक्ताचा सडा पडायचा तर दुसरीकडे टपोरा गुलाब हळूच डोकं वर काढायचा. वातावरणात सुगंध दरवळला की आपसूकच चाफ्याच्या झाडाकडे पाय वळत. शिवाय नारळ , आंबा , चिकू ,जास्वंद अशी बाकीची झाडंही त्यांनी लावली होती. त्या आज फुलं वेचून घरात आल्या तोच समोरच्या कठड्यावर एक कावळा येऊन बसला.  काव काव करून त्याने ओरडायला सुरवात केली.

" का ओरडतोस सकाळी सकाळी. दरवेळी फक्त तू ओरडतोस पाहुणे काही येत नाहीत. " वृषालीताई कावळ्याला म्हणत होत्या.

" गीता त्याला जरा दही भात घाल गं...." त्या म्हणाल्या तसं गीता मावशींनी एका पानावर दही भात घालून कावळ्यासाठी ठेवला. पण तो कधीचाच उडून गेला होता. पण त्याची काव काव मात्र ऐकू येत होती. 

......................................

दुपारच्या सुमारास आनंद आणि बाकीची मंडळी गावात आली. 

" काका... आम्ही एकदम समोर गेलो तर आईला कळेल. ,त्यापेक्षा आधी तुम्ही जा. मग आम्ही येतो मागून.." आनंद म्हणाला.

" हो चालेल...." मग परांजपे काका काकू दोघेही पुढे गेले आणि त्यांनी दारावरची बेल वाजवली. वृषालीताईंनी दार उघडलं.

" परांजपे भावजी तुम्ही....?? वहिनी....? या ना.....असे अचानक कसे आलात....? " त्यांनी भडाभडा सगळं विचारलं. 


" वहिनी अहो सावकाश.. आम्ही एकटे नाही आलो. आमच्या सोबत अजुन पण कोणीतरी आलंय... " काकू म्हणाल्या.


" कोण....?? " त्यांनी उत्सुकतेने विचारलं.

" आधी तुम्ही डोळे मीटा बघु.... मग सांगते कोण ते..." 

" हे काय आता....? " 

" अहो मिटा तर डोळे..." त्यांनी वृषालीताईंना डोळे मिटून पाठमोरे उभे केले. 

मग नेहा आणि आनंद दबक्या पावलांनी आत आले. आनंदने आपल्या हातांनी आईचे डोळे झाकले. त्या आपल्या हातांनी त्याचे हात चाचपडू लागल्या.

" आनंद.......!!!!! " त्यांच्या ओळखीचा स्पर्श त्यांना जाणवला. त्याचे हात बाजुला करून त्या मागे वळल्या. 

त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आनंदने त्यांना जवळ घेतलं. थोड्या वेळाने त्यांचं लक्ष बाजूला नेहाकडे गेलं. मग त्यांनी तिलाही आपल्या जवळ घेऊन थोपटलं.

" कसं वाटलं सरप्राईज....?? " आनंद

" खूप मस्त... कारट्यानो मी फोन केला तेव्हा एका शब्दाने सांगितलं नाहीत मला...." त्यांनी त्याला एक चापट मारली.


" मी सांगत होते. तर मला सांगू दिलं नाही. " नेहाने आपली बाजू सेफ केली.

" माझी गुणाची बाय ती...." वृषालीताईंनी मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

" आता किती लाड होतील सूनबाईंचे. काय विचारू नका. लेकाकडे कोण बघतंय का...? " आनंद नाटक करत म्हणाला.

" तुम्ही दोघेही माझे लाडाचेच आहात... कळलं.." त्यांनी दोघांनाही पुन्हा जवळ घेतलं. 

....................................

दुपारी मग हसत खेळत जेवणं झाली. वृषालीताईंनी निरोप पाठवून आप्पासाहेबांना देखील बोलावुन घेतलं. आनंद आणि नेहाने त्यांना नमस्कार केला. सगळे छान गप्पा मारत बसले. तेवढ्यात परांजपे काकांचा फोन वाजला.

" मी आलोच हा......." असं म्हणुन ते बाजूला गेले.

" तुला सांगितलं ना. मला काम झाल्याशिवाय फोन करू नको म्हणुन. तुझे काय पैसे असतील ते तुला वेळेत मिळतील. पण काम चोख झालं पाहिजे..... " त्यांनी फोन ठेवला. तेवढ्यात मागुन येऊन आनंदने त्यांच्या पाठीवर हात ठेवला.

" काका... काही प्रॉब्लेम आहे का...? असेल तर सांगा. आपण मिळुन सोडवू...." तो म्हणाला. 

" नाही रे. एवढं काही नाही... मी काय असेल तर तुला नक्की सांगेन...." त्यांनी तो विषय टाळला.. " चल आपण आत जाऊ... " 

तोपर्यंत आत सगळ्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. 

" तर मग आम्ही घेऊन जातो हिला....." आप्पासाहेब म्हणाले.


" कोण कुठे जातंय....?? " त्याने विचारलं.


" ते नेहाला घरी घेऊन जातायत. इतके दिवसात तिला माहेरपणाला देखील जाता आलं नाही. म्हणून नेत आहेत ते.. येईल ती पंधरा दिवसांनी....." वृषालीताई आनंदकडे बघत हसत म्हणाल्या.


" काय....??? पंधरा दिवसांनी.....?? " त्याने नेहाकडे पाहिलं पण तिने नजर दुसरीकडे वळवली. 

" इतके दिवस कशाला.... दोन तीन दिवस राहून येऊ दे ना.... " त्याला काय बोलावं सुचेना. सगळे त्याच्या भांबावलेल्या चेहऱ्याकडे बघुन हसत होते. 


" का हसताय तुम्ही सगळे.....? " तो ओशाळून म्हणाला.

" अरे ती नुसती माहेरी जाणार म्हटल्यावर तुझी अशी हालत झालेय. मग अजुन पंधरा दिवसांनी काय होईल तुझं..." परांजपे काकू हसत म्हणाल्या.


" आणि सुनेला घरी आणायची म्हणजे तिला आधी माहेरी पाठवावच लागेल ना....?? " वृषालीताई म्हणाल्या.

आनंद आणि नेहा काहीच न कळल्यासारखे एकमेकांकडे बघत होते. 


.........................................

संध्याकाळी नेहा आप्पासाहेबांसोबत वाड्यावर गेली. आनंदचा तर चेहराच उतरला होता. तो नजरेनेच तिला जाऊ नको म्हणून सांगत होता. तिलाही ते समजत होतं. इतके दिवस दोघे सोबत होते पण त्यांना मोकळा असा वेळच मिळाला नव्हता. आणि आता एकत्र होते पण घरचे त्यांना सोबत राहू देत नव्हते. आता त्यांना एकमेकांपासून दूर राहावंसं वाटतं नव्हतं. आनंदला तर काही सुचनासच झालं.  नेहाने वाड्यावर गेल्यावर त्याला पोहचल्याचा मेसेज केला. रात्री त्याचं जेवणातही लक्ष नव्हतं. तो झोपायला गेला. पण नेहा नव्हती त्यामुळे त्याला चैन पडत नव्हतं. रात्र वाढत होती. आणि इकडे आनंदची चुळबुळ देखील. शेवटी न राहवुन आनंद घराबाहेर पडला ते नेहाला काही झालं तरी भेटायचंच असं ठरवुन...!!


क्रमशः.... 
 

कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथा कोणीही कॉपी पेस्ट करू नये. कथा शेअर करायची असल्यास नावासाहित शेअर करावी. 

© ® सायली विवेक

🎭 Series Post

View all