हे बंध रेशमाचे पर्व 2 - भाग 3

Love story

 सकाळी त्याला जाग आली तेव्हा रुमचं  दार उघडलं होतं. तो डोळे चोळतच आत पळाला. पण नेहा रुम मध्ये नव्हतीच. त्याने जाऊन किचन मध्ये बघितलं तिथेही ती नव्हती. मग त्याने बाकीच्या खोल्या चेक केल्या. पण नेहाचा कुठेच पत्ता नव्हता. त्याला काहीच सुचत नव्हतं. तो पुन्हा रूम मध्ये आला तर त्याला बेडवर एक चिठ्ठी ठेवलेली दिसली. 

आता पुढे 

' जास्त खुश होऊ नकोस तुला सोडून मी कुठेच जाणार नाहीये. मार्केटला जातेय. थोड्या वेळात परत येईन. तुझ्यावर अवलंबुन राहून माझी कामं होणार नाहीत..'  


आनंदने ती चिठ्ठी वाचली आणि तो हसला. वेडी आहे माझी नेहु.. रागावली तर आहे. पण मी काळजी करत राहीन म्हणून चिठ्ठी लिहून गेल्या आहेत मॅडम. चला डॉक्टर साहेब मॅडम घरी नाहीयेत आता लागा कामाला. मनातल्या मनात बडबडत तो उठला. 

किचन मध्ये जाऊन काय काय सामान घरात आहे ते चेक केलं आणि ती येइपर्यंत दोघांसाठी तो नाश्त्याची तयारी करण्याचं त्यानं ठरवलं.  थोड्या वेळाने जिन्यात तिची पावलं वाजली तसं त्याने हातातलं काम पटापट आवरलं. सगळं नीट झाकून ठेवलं आणि तो दुसऱ्या रूम मध्ये जाऊन लपला. लॅच की ने दार उघडून ती आत आली. पाहिलं तर सगळं घर आवरलेलं होतं. तोपर्यंत मस्त खमंग वास तिच्या नाकात शिरला. तिचे पाय आपसूकच किचनकडे वळले. तिने उपडी ठेवलेली डिश बाजूला केली तर तिथे मस्त ग्रील्ड सँडविच आणि दुसऱ्या डिश खाली भाजणीचं गरम गरम थालीपीठ तिची वाट बघत होतं. तिने आजूबाजूला कोणी नाही असं बघून पटकन थालिपीठाचा तुकडा तोंडात टाकला. आनंद लांबुनच तिच्या चेहरा न्याहाळत उभा होता.  ती खाण्यात गर्क असतानाच तिला तिच्या कमरेवर कोणाच्या तरी हातांची पकड जाणवली. त्याने मागुन येऊन हळुच तिला मिठीत घेतलं आणि मानेवर ओठ टेकवले. तशी ती शहारली. तिच्या कानाजवळ ओठ नेऊन तो " सॉरी " म्हणाला. तिने त्याला बाजूला केलं आणि ती बाहेर आली. त्याच्या अशा वागण्याने ती सुखावली. पण आपला राग गेलाय हे दाखवणार कोण..!! 


" नेहा....सॉरी ना ग....." तो ही तिच्या मागोमाग बाहेर आला. ती आपली गालातल्या गालात हसत होती. आनंद कडे तिची पाठ होती त्यामुळे त्याला काहीच कळेना. 

" बोल ना.... आता काय कान पकडू का...?? " आनंद 

तरीही मॅडम गप्पच.. ती समोर जाऊन सोफ्यावर बसली. 


" ठीक आहे. नाही बोलायचं ना तुला नको बोलू.. या पेक्षा जास्त मस्का मी कोणाला मारू शकत नाही. मी जातो हॉस्पिटलला. तुझ्यासाठी सुट्टी घेतली होती. पण आता जातो. " त्यालाही आता राग आला होता. तो जायला वळला तोच तिने त्याचा हात धरला आणि आपल्याकडे ओढलं. 


" ओ मिस्टर चिडकू..... या आधी मी किती तुमचा राग सहन केलाय. विसरलात..?? ,बायको जरा चिडली तर लगेच राग येतोय.... " नेहा हसत म्हणाली. 


" हम्म... मग काय. मला नाही मनवता येत कोणाला... " आनंद

" कशाला हवं मनवायला. वेळेत यायचं मग घरी. म्हणजे अशी वेळच येत नाही.." ती हसली. 


तिने मग हळूच त्याच्या गालावर किस केलं आणि ती आत पळाली. तोही तिच्या मागोमाग आत आला. त्याने तिला आपल्या जवळ ओढलं. 

" काल मला रूमच्या बाहेर काढलं होतं कोणीतरी..." त्याने तिच्या डोळ्यात बघत म्हटलं.

" मग आज पण जाणार का बाहेर...?? " तिने हसत विचारलं. 

" शक्यच नाही. पण मला बाहेर ठेवल्याबद्दल तुला शिक्षा मिळणारच आहे..... " 

" नो.... आनंद नो....... मी..... मी ते..... " ती पुढे बोलेपर्यँत त्याने तिच्या ओठांना कैद केलं होतं. थोड्या वेळाने त्याने तिला बाजूला केल.

" कशाला छळतेस नवऱ्याला अशी. आता बघ घरी गेलो की नाव सांगणार आहे मी माझ्या आईला. तुझी सून माझ्याकडे लक्षच देत नव्हती म्हणून..." तो म्हणाला.


" जा सांग.... उलट मीच सांगेन तुमचा मुलगा मला......" त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं आणि हातांची पकड अजूनच घट्ट केली आणि तो म्हणाला , " काय सांगणारेस आईला... मी किती प्रेम करतो तुझ्यावर हे का....? " त्याने अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तशी तीही त्याच्या मिठीत विरघळली...


थोड्या वेळाने दोघेही मग आवरून बाहेर पडले. मनसोक्त भटकले. न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून फिरले. वेगवेगळे पदार्थ ट्राय केले. गार्डनमध्ये बसले... फोटोज काढले.... सगळ्यांसाठी शॉपिंग केली.. वृषालीताई , आप्पासाहेब , गीता मावशी सगळ्यांसाठी काही ना काही घेतलं..रात्री थकून भागून दोघेही परतले आणि झोपले...

................................

त्यांचा भारतात जाण्याचा दिवस हळूहळू जवळ येऊ लागला. आता चार ते पाचच दिवस उरले होते त्यांना परतण्यासाठी..!! एकदा सकाळी वृषालीताईंचा फोन आला. 

" हॅलो... नेहा कशी आहेस बाळा...?? " 

" मी बरी आहे आई. तुम्ही कशा आहात..."

" मला काय झालंय. पण तुमची आठवण येतेय ग फार.. कधी येताय तुम्ही इकडे...." त्यांनी विचारलं.

" आई आम्ही आता तिकडे.......... " ती बोलणार तेवढ्यात आनंदने तिच्याकडून फोन काढुन घेतला. 


" काय ग....... काय म्हणत होतीस....? " 

" आई काही नाही.. ती म्हणत होती आम्ही तिकडे आलो की पुरणपोळी करून खायला घाल आम्हाला. खूप दिवसात खाल्ल्या नाहीत.... " आनंद म्हणाला.

" असं होय.. आलात की करेन पोटभर....." त्या हसल्या.

" आई मी ठेवतो हा फोन. जरा काम आहे नंतर करतो.  " त्याने फोन ठेवला कारण बाजूला नेहा त्याच्याकडे रागाने बघत होती.

" मला का नाही बोलायला दिल आईंशी.....? " 

" अग येडू... आपण तिकडे जातोय ते आईसाठी सरप्राईज आहे.....तिला सांगून कसं चालेल..." तो म्हणाला तसा तिचा चेहरा खुलला. 

त्याने मग परांजपे काकांच्या मुलाला आशिषला फोन करून येणार असल्याचं कळवलं आणि एअरपोर्ट वरती न्यायला बोलवलं. 


............................

त्यांचा भारतात जायचा दिवस उजाडला. फ्लाईट संध्याकाळची होती. त्यामुळे सगळं आवरून ते दोघे दुपारी बाहेर पडणार होते. सकाळी त्यांचे अमेरिकन मित्र , शेजारी सगळे येऊन त्यांना भेटून गेले. तीन साडेतीन वर्षात त्या दोघांनी तिथे देखील खूप सारी माणसं जोडली होती. नेहा आणि आनंदने सगळ्या बॅग्स बाहेर हॉल मध्ये आणून ठेवल्या. थोड्या वेळाने ते निघणार होते. इतक्यात आनंदला हॉस्पिटल मधून फोन आला एक इमर्जन्सी आली होती. त्याला नाही म्हणणं जीवावर आलं होतं. त्याच्या फ्लाईटला अजूनही 4 तास अवकाश होता. म्हणून मग त्याने जायचं ठरवलं. नेहाला त्याने पुढे एअरपोर्टला पाठवलं सोबत बॅग्स देखील दिल्या. तो मग काम झाल्यावर डायरेक्ट एअरपोर्टला येणार होता. नेहाने तिथे पोचल्यावर त्याला मेसेज केला आणि ती त्याची वाट बघत तिथेच बसली.  काही वेळ असाच गेला. ती सारखं घड्याळ चेक करत होती. थोड्या वेळाने फ्लाईटची अनाऊसमेंट झाली. तशी नेहाला भीती वाटू लागली. कारण आनंदचा अजूनही काही पत्ता नव्हता.. तिच्या मनात शंकांचं काहूर उठलं होतं..!

क्रमशः

कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथा कोणीही कॉपी पेस्ट करू नये. कथा शेअर करायची असल्यास नावासाहित शेअर करावी. 

© ® सायली विवेक

🎭 Series Post

View all