Feb 24, 2024
प्रेम

हे बंध रेशमाचे - भाग 39

Read Later
हे बंध रेशमाचे - भाग 39

हे बंध रेशमाचे - भाग 39 


त्या डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील मास्क पोलिसांनी काढला तसं नेहाला धक्काचं बसला.

" डॉक्टर...........डॉक्टर तुम्ही ?? "  तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते.

 

" तुम्ही ओळखता का यांना.....?? " पोलिसांनी विचारलं.

 

" हो.. संजीवनी हॉस्पिटलचे सिनिअर डॉक्टर....डॉक्टर देसाई....!!!! " ती म्हणाली.

 

 

त्यावर डॉ देसाई तिच्याकडे रागाने पाहू लागले. अजूनही ते पोलिसांच्या तावडीतून सुटून जाण्याचा प्रयन्त करत होते. पण पोलिसांनी त्यांना गच्च पकडून ठेवलं होतं. 

 

" नेहा हे सगळं तुला महागात पडेल....." ते काहीशा आवेशाने म्हणाले.

 

" तुम्ही माझं काहीही करू शकत नाही.." ती ठामपणे म्हणाली खरं पण पुढच्याच क्षणी असं त्यांनी का केलं असेल असं तिला वाटलं......" काका काहीच कसं वाटलं नाही तुम्हाला हे सगळं करताना....?? " तिनं अगतिक होऊन विचारलं. त्यावर ते फक्त तुच्छतेने हसले. 


बाकीच्या फॉर्मलिटीज पुर्ण करण्यासाठी  पोलिसांनी उद्या नेहाला पोलिस स्टेशनला यायला सांगितलं. त्यावर तिने सध्या तरी मीडिया पर्यंत ही बातमी फुटू देऊ नका म्हणून पोलिसांना विनंती केली. कारण काही झालं तरी हॉस्पिटलच्या रेप्युटेशनचा प्रश्न होता. पोलिसांनी देखील आम्ही सध्या तरी हे कोणाला कळू देणार नाही असं तिला आश्वासन दिलं आणि ते डॉ देसाई आणि त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांना घेऊन जाऊ लागले. नेहा आणि परब मॅडम देखील जायला वळल्या. तेवढ्यात नेहाला काहीतरी आठवलं आणि ती मागे वळली. धावतच ती पोलिसांच्या इथपर्यंत पोचली.

 

 

" सर....एक मिनिट......आमच्या हॉस्पिटलचे एक डॉक्टर गेले पंधरा दिवस गायब आहेत....यांना त्याबाबत काही माहीत का विचारा...." ती डॉ देसाईंकडे बघत म्हणाली. 


त्यावर ते हसले. पोलिसांनी त्यांची मानगूट पकडली तसे ते बोलायला लागले.

 

 

" तो परंजप्या तुमचा चमचा... त्याला एकदा कळले आमचे उद्योग...लगेच तुम्हाला जाऊन सांगेन म्हणाला.....त्याला मारणारच होतो खरंतर... पण म्हटलं जाऊदे...ठेवलाय त्याला बांधुन...." डॉ देसाई गुर्मीत म्हणाले.

 

" कुठे आहेत ते......सांगा प्लिज...." तिनं काळजीने विचारलं. 

 

 

" त्या ऑपरेशन थेटरच्या बाजूला एक लहान खोली आहे...तिथं खितपत पडलाय म्हातारा....शेवटच्या घटका मोजत...." ते मोठ्याने हसत म्हणाले. 

 


नेहाच्या काळजात एकदम धस्स झालं हे सगळं ऐकून. ती धावतच जिथुन बाहेर पडली होती त्या इमर्जन्सी एक्झिट मधून पुन्हा आत आली. पोलिसही मग डॉ देसाई आणि बाकीच्या लोकांना घेउन गेले. नेहाने त्या ऑपरेशन थेटर मधल्या सगळ्या बाजू धुंडाळल्या. पण तिला कुठेच त्या खोलीचं दार सापडेना. ती हताश झाली. आता परांजपे काकांना इथून कसं बाहेर काढायचं तिला कळेना. तोपर्यंत परब मॅडम आणि तो आनंदचा असणारा माणूसही तिच्या मदतीला आले. त्याने मग भिंती चाचपून पाहायला सुरवात केली. तेवढ्यात एका बाजूची भिंत थोडीशी सरकली. त्या सगळ्यांनी मग जोर लावून तो दरवाजा सरकवला. आतल्या खोलीत बऱ्यापैकी अंधार होता. वरच्या बाजूला फक्त एक छोटी खिडकी होती. त्यांनी मोबाईलच्या उजेडात लाईटचं बटन शोधलं आणि लाईट चालू केले. खोलीच्या एका कोपऱ्यात हातपाय बांधलेले डॉ परांजपे त्यांना दिसले. ते बेशुद्ध होते. नेहाने मग फोन करून इतर वोर्डबॉयना बोलवून घेतलं. डॉक्टरांना तिथून बाहेर काढून त्यांनी वरती हॉस्पिटल मध्ये त्यांना ऍडमिट केलं. त्यांची योग्य ती काळजी घ्यायला सांगून नेहा आणि परब मॅडम तिथून निघाल्या. हे सगळं होईपर्यंत रात्रीचे तीन वाजत आले होते. नेहाने त्यांना गाडीनेच घरकुल पर्यंत सोडलं आणि ती घरी परतली. या सगळ्या धावपळीत ती इतकी दमली होती की घरी आल्या आल्या रूम मध्ये जावुन तिने आपलं अंग बेड वर झोकून दिलं. पडल्या पडल्या आपण आज एवढं सगळं करू शकलो याचाच ती विचार करत होती. तिचा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. विचार करता करताच तिला गाढ झोप लागली....!!


....................................

 


सकाळी तिला जाग आली ती आनंदच्या आवाजाने. ती बेडवर उठून बसली. बघते तर आनंद समोर बसून  तिच्याकडेच एकटक बघत होता. मी स्वप्नात तर नाही ना असं तिला दोन क्षण वाटलं.म्हणून तीने परत डोळे चोळले. 

 

" good morning मॅडम....उठा आता...." तो छान हसत म्हणाला.

 

" तू .....??? तू कसा काय इथे...?? तू तर उद्या येणार होतास ना...??? " ती एका पाठोपाठ एक प्रश्न नुसते विचारत होती. त्यावर त्याला हसू आलं.

 

" अग सेमिनार संपला सो आलो...." तो म्हणाला.

 

 

" मी स्वप्नात तर नाही ना....." असं म्हणून तिने स्वतःलाच चिमटा काढला आणि ती ओरडली. त्याला हसायलाच आलं.

 

" अग मी खरंच आलोय.....घे मला पण चिमटा काढून बघ..." त्याने हात पुढे केला. तिने मग घाबरतच त्याच्या हातावर हळूच चिमटा काढला. 

 

" अरे हो खरंच की......खरच आलायस तू...." तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. 

 

" हो मग......सेमिनारचा एक दिवस कॅन्सल झाला काही प्रॉब्लेममुळे.... सो मग आलो धावत पळत....आल्या आल्या तुमचे पराक्रम कळले...." तो शेवटचं वाक्य जरा रागावून म्हणाला. 

 

" काय कळलं तुला...???.." तिने जरा घाबरतच विचारलं. 

 


" परब मॅडमचा फोन आला होता सकाळी.... तुझा फोन लागला नाही म्हणून त्यांनी मला केला. मी ट्रॅव्हलिंग मध्येच होतो. तू रात्री नीट घरी पोचलीस की नाही यासाठी त्या फोन करत होत्या. म्हटलं एवढ्या रात्रीची तू कुठे गेलेलीस....त्यावर त्यांनी सगळं सांगितलं..." तो तिच्यापासून लांब जात म्हणाला.

 

" काय गरज होती इतकी रिस्क घ्यायची.....तुला काही झालं असत म्हणजे.... are you gone mad ??  " त्याच्या आवाजात राग आणि काळजी दोन्ही तिला दिसत होतं.

 

" सॉरी....पण वेळ कमी होता आणि ते सगळं करणं गरजेचं होतं....नाहीतर आणखी एका माणसाचा वापर करून त्याला त्यांनी फेकून दिलं असत..." ती खाली मान घालून सांगत होती.

 

" अग पण मला सांगायचं ना...मी आलो असतो....माझ्यासाठी सेमिनार महत्वाचा नव्हता....मी सांगितलं असत त्यांना काहीतरी....." तिच्या अशा वागण्याने त्याला काही सुचत नव्हतं. तो इकडे तिकडे फेऱ्या मारत होता. 

 

" आनंद ....आनंद तू प्लिज शांत हो ना..." ती म्हणाली

 

" काय शांत हो.....तुला काही झालं असत तर मी काय केलं असत....का केलंस तू असं..." तो तिच्या काळजीने तिच्या बाजूला बसत म्हणाला. त्याने तिचे हात हातात घेतले.

 

" तुझ्यासाठी.....आणि आपल्या बाबांनी कष्टाने उभारलेल्या हॉस्पिटल साठी....." ती त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली.. " आणि तू असताना काहीही होणार नाही मला...." तिनं छान हसुन म्हटलं.  

 

तिने मग तिन कसं सगळं प्लॅनिंग केलं. काय काय केलं ते सगळं त्याला सांगितलं. ती जे सांगत होती त्याने त्याचा ऊर अभिमानाने भरून येत होता. 

 

........................................

 

 

आनंद आणि नेहा दोघेही पोलीस स्टेशनला आले. कालच्या झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी रीतसर तक्रार नोंदवली. आनंदला डॉ देसाईंना भेटायचं होतं. बाजूच्याच एका खोलीत आनंद आणि डॉ देसाईंना नेण्यात आलं. दोघेही एकमेकांसमोर खुर्चीत बसले. 

 

" काका तुम्ही असं कराल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं....का केलंत पण तुम्ही हे सगळं..." आनंद 

 

त्यावर डॉ देसाई फक्त हसले.... आणि पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक विषादाची छटा पसरली...ते दुसरीकडे बघत बोलू लागले.

 

" पैशासाठी.....खूप हालाखीची परिस्थिती होती आमची घरची तरीतरीही इकडे तिकडे कामं करून आई बाबांनी माझं शिक्षण केलं. पाठीमागच्या चार बहिणी त्यांची लग्न करायची होती.. हाल हाल करतच आई नि बाबा गेले. पुढे मी शहरात आलो नि तुझ्या बाबांशी माझी ओळख झाली. तेव्हा संजिवनी हॉस्पिटल नव्याने सुरू झालं होतं. सुरवातीला दोन चार वर्षे सगळं नीट सुरू होतं. पण माझ्या एकट्याच्या पगारात सगळं भागवायच आणि बहिणींची लग्न करणं शक्य नव्हतं. माझ्या एका दुसऱ्या हॉस्पिटल मधल्या मित्राने मला हा मार्ग सांगितला. पेशंट कडून जास्त फी घ्यायची, काही कारण नसताना रिपोर्ट्स करायला सांगायचे असं त्यानं मला सांगितलं. त्यामुळे जास्त पैसा मिळणार होता. पण श्रीकांतला आणि परंजप्याला हे हे पटलं नाही. श्रीकांतने गरीब लोकांसाठी हॉस्पिटल सुरू केलं काही सुविधा पण दिल्या बरं वाटलं.. पण ज्यांची चांगली परिस्थिती होती ते सुद्धा खोटं बोलून कमी पैशात उपचार करून घ्यायचे तेव्हा चीड यायची. मग जेव्हा श्रीकांत बाहेर जायचा तेव्हा मी छोटे मोठे हात मारू लागलो. बऱ्यापैकी पैसे साठल्यावर सगळ्या बहिणींची लग्न लावून दिली. तरी पैशाची हाव सुटेना.आणि मग एक दिवस श्रीकांत अक्सिडेंट मध्ये गेल्याची बातमी आली. म्हटलं आपल्याला रानच मोकळं झालं.. पण मग तू हॉस्पिटल सांभाळायला लागलास. मला काहीच करता येईना.. मग तुझ्या अभ्यासामुळे तुझं हॉस्पिटलकडे दुर्लक्ष होऊ लागलं त्याचाच मी फायदा घ्यायचा ठरवला आणि पुन्हा एकदा सगळे उद्योग सुरू झाले. पेशंटकडून आम्ही दोन बिल भरून घ्यायचो. एक ओरिजनल असायचं आणि दुसरं बिल वाढीव असायचं. पण ते त्यांना कळायचंच नाही. ओरीजनल बिल्स तुझ्याकडे साइन साठी यायची आणि वरचे पैसे आम्हाला मिळायचे. असंच सगळं चालू होतं. आणि एक दिवस मला त्या मॅडम भेटल्या...त्यांनी मला या सगळ्यांपेक्षा मानवी अवयव जास्त किंमतीला विकले जातात असं सांगितलं. मलाही पैशाची हाव सुटली. आणि मी त्यांची ऑफर ऍक्सेप्ट केली....." 

एवढं बोलून डॉ देसाई थांबले.

 

आनंद हे सगळं सुन्न होऊन ऐकत होता..आपण काय ऐकतोय यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता. तरीही या सगळ्यामागे अजून कोणतरी होत जे फक्त डॉ देसाईंना माहीत होतं. 

 

"  कोण मॅडम.....??? " त्याने विचारलं. 


क्रमशः......

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//