हे बंध रेशमाचे - भाग 35
दिवस भराभर उलटत होते. पावसाचा जोरही आता बऱ्यापैकी कमी झाला होता. तरीही मधूनच एखादी सर डोकावून जाई. आता आनंद आणि मिताली मध्येही पुन्हा एकदा बोलणं सुरू झालं. आपली एक जवळची मैत्रीण म्हणून तो नेहमीसारखच तिच्याशी सगळं शेअर करू लागला. पण तो आधी सगळं येऊन नेहाशी बोले. कोणतीही गोष्ट तिला सांगितल्या शिवाय त्याला हल्ली चैनच पडायचं नाही. वृषालीताई देखील त्यांची सहल संपवून घरी परतल्या होत्या. आनंद आणि नेहाचं सगळं नीट होउदे म्हणून त्यांनी देवाला साकडंच घातलं होतं. आता त्यांचं नव्याने फुलणारं नातं पाहून त्यांनाही बर वाटायचं आणि आपली निवड चुकली नाही याच समाधानही...!!! नेहाशी त्या अगदी सख्ख्या आईसारखी माया करायच्या त्यामुळे नेहाला कधी हे आपलं सासर आहे असं वाटलंच नाही. सुरवातीला आनंदच चिडचिड करणं..तिच्याशी न बोलणं या सगळ्या गोष्टी कधीच मागे पडल्या होत्या. नेहा देखील वृषालीताईंसोबत फिरायला जायची , त्यांना जेवणात मदत करायची. दोघीही अगदी छान मैत्रिणी झाल्या होत्या. त्यामुळे मग कधी कधी त्या दोघींसमोर आनंद एकटा पडे. पण तरीही घरात छान खेळीमेळीचे वातावरण असे. 'जिव्हाळा' बंगला नावाप्रमाणेच प्रेम, आपुलकी, आणि जिव्हाळ्याने कितीतरी वर्षांनी पुन्हा एकदा न्हाऊन निघाला होता....!!! एकदा आनंद सकाळी हॉस्पिटलला जायला निघाला.तयार होऊन तो खाली हॉल मध्ये आला. समोरच किचन मध्ये नेहा पोळ्या करत होती. आनंद हळूच तिच्याजवळ गेला आणि मागून त्याने तिला मिठी मारली. तशी ती दचकली.
" अहो....काय करताय...बघेल की कोणीतरी..." ती म्हणाली.
" कोणीही बघत नाहीये...मी माझ्या बायकोसोबत कधीही राहू शकतो...." तो तिला अजूनच जवळ घेत म्हणाला.
" हो का.....पण आत्ता मला काम आहे...सोडा प्लिज..." पिठाच्याच हातांनी ती त्याचे हात बाजूला करत म्हणाली. पण त्याने आपले हात तसेच तिच्या भोवती गुंफून ठेवले.
" काय यार....जरा तरी राहूदे की माझ्या बायको सोबत मला...दिवसभर ते पेशंट बघून कंटाळा येतो..तुझ्याकडे बघितलं की कसं फ्रेश वाटतं....म्हणून आलो.." आनंद
" हमम...." ती खाली मान घालून लाजत होती.
" लाजतेस वगरे की काय....बघू तरी आमच्या मॅडम कशा लाजतात ते..." तो तिला आपल्याकडे वळवत म्हणाला. ती लाजून चुर झाली...आणि पुन्हा तिने मान फिरवली.
" जा बघु तुम्ही .....मला काम आहेत..." ती त्याला काहीसं दूर करत म्हणाली.
" बघ हा...खरंच जाऊ....आणि तू काय अहो अहो करतेस.....मला नावानेच हाक मारायची नाहीतर मी तुझ्याशी बोलणारच नाही...." तो रूसल्या सारख म्हणाला.
" हे हो काय....." ती जराशी हिरमुसली..." अहो ऐका ना....बरं बाई म्हणते आनंद.....आनंद आटपल का तुझं...?? " ती कसंतरी म्हणाली एकदाची...
तिच्या तोंडून आपलं नाव ऐकताना त्याला छान वाटतं होतं.
" हमम अब आया उंट पहाड के नीचे..." तो हसत म्हणाला आणि परत त्याने तिला जवळ घेतलं...तिलाही ते छान वाटतं होतं... त्याच्या हातांच्या स्पर्शाने ती मोहरली.
" आज जाणार नाहीयेस का घरकुल मध्ये...?" त्याने विचारलं.
" नाही आज काम कमी आहे..संध्याकाळी जाईन थोडा वेळ..." ती त्याचे हात बाजूला करत म्हणाली.
" वा... मग मी पण नाही जात आज हॉस्पिटलला....घरीच थांबतो तुला मदत करायला..." डोळे मिचकावत तो म्हणाला.
" आनंद प्लिज सोड ना...आई येतील.... प्लिज ...चल मला काम आहे रे..." ती त्याला विनवत म्हणाली. पण खरंतर तिलाही त्याचं असं जवळ असणं आवडत होतं.
" एका अटीवर जाईन....." तो तिला सोडत म्हणाला.
" काय आता..." तिला काहीच कळेना. त्यावर त्याने त्याचा गाल पुढे केला....आणि गालावर बोट दाखवून तीला खूण केली. त्यावर ती लाजली आणि लांब जाऊ लागली...तेवढ्यात त्याने हात पकडून तिला जवळ ओढलं....
" कोन हाय का घरात..?.." त्यांच्या हॉल मध्ये कोणतरी आलं. त्या आवाजाने दोघेही बाजूला झाले. नेहाने पटकन गॅस बंद केला आणि दोघेही बाहेर आले.
" अरे, रवी काका...तुम्ही ??.....या बसा ना...." नेहाच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते. ते हॉल मध्ये सगळीकडे नजर फिरवत जरा अवघडूनच त्या सोफ्यावर बसले. नेहाने मग त्यांना पाणी आणून दिलं. ते पाणी प्यायले.
" काय म्हणताय काका....कसे आहात..? " नेहा देखील त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाली. मग आनंदही तिच्या बाजूला येवुन बसला. त्यानेही मग काकांना हाक मारली.
" बरा हाय.... आप्पासायबानी हे दिलया तुमच्यासाठी..." रवी काका हातातली पिशवी नेहाकडे देत म्हणाले. अजूनही ते अवघडून बसलेले आहेत हे तिच्या लक्षात आलं.
" काय दिलंय एवढं......आणि तुम्ही कधी आलात मुंबईत..? " ती त्यांच्याशी बोलू लागली. आनंद फक्त त्यांचं बोलणं ऐकत बसला.
" खाऊ हाय जी तुमच्यासाठी...गंगा मावशींनी करून पाठवलंया....मी कालच आलो इकडं... ते पुतनीच लगीन हाय ना म्हणून आलोया..." रवी काका म्हणाले.
" हो का...पुतणी म्हणजे सदा काकाची मुलगी ना....पण एवढ्या लवकर का करताय लग्न....मला वाटतं ती फक्त वीसेक वर्षाचीच असेल...होय ना...? "
" आवं ताईसाब काय सांगू....पाच महिनं झालं असत्याल.. सदा अक्सिडेंट मध्ये गेला..... ते एका वरसाच्या आत करावं लागतंय ना लगीन म्हणून मग तेच्या पोरीचं लगीन ठरवलेलं...इकडच हाय लगीन म्हणून आलो..." ते म्हणाले.
" बाप रे कधी गेले....मी मध्ये गेले होते आप्पाना भेटायला घरी तेव्हा कोण बोललं नाही मला....अहो पण ते इकडेच होते ना मुंबईत.....कसा झाला अक्सिडेंट..??" नेहा म्हणाली.
" आवं काय सांगू तुमास्नी... दादरला गेला व्हता मित्राकड आनी येताना गाडीवाल्यानं उडवलन....तिथल्याच जवळच्या हास्पिटलात नेलं त्याला पन ते घ्यायलाच तयार न्हायती... बोलले आधी पैशे भरा मगच घेऊ....मग त्यांच्या हातपाया पडून त्याला घेतलानी.पण काय उपेग न्हायी झाला.. मी कळल्यावर गावाकडून आलो इकडं..पण तोपर्यंत आमचा सदा गेला व्हता....शेवटची भेट बी झाली न्हायी...." त्यांनी शर्टाच्या बाहीने आपले डोळे पुसले..आणि ते पुढे बोलू लागले.
" हास्पिटल वाल्यानी दोन दिसाच वीस हजार रुपये सांगितलनि....आमी कुटून देणार एवढे पैशे. पण पैशे दिल्याशिवाय ते बॉडी ताब्यात देईनात...इकडून तिकडून गोळा करून पैशे भरले आनी बॉडी ताब्यात घेतलेली...." ते शून्यात बघत होते.
" कोणत्या हॉस्पिटलला नेलं होतं त्यांना...." इतका वेळ शांत बसलेल्या आनंदने त्यांना विचारलं.
" कायतरी संजीवांनी का कायतरी नाव व्हतं बगा हॉस्पिटलचं...." ते काहीसं आठवत म्हणाले.
संजीवनी हॉस्पिटलचं नाव ऐकताच आनंद आणि नेहाने चमकून एकमेकांकडे पाहिलं.
" नक्की संजीवनी हॉस्पिटल हेच नाव होतं का..." आनंदने त्यांना पुन्हा विचारलं.
" हा हा....हेच हेच नाव व्हतं...." ते म्हणाले.
रवी काकांना फक्त नेहाचा नवरा आनंद डॉक्टर आहे एवढंच माहीत होतं...पण आपण ज्या हॉस्पिटल बद्दल बोलतोय ते त्यांचच हॉस्पिटल आहे याची त्यांना कल्पना नव्हती. आनंद आणि नेहाला काय बोलावं सुचेना. तेवढ्यात ते काका जायला निघाले..
" बरंय मी निघतो...." ते म्हणाले.
" अहो काका बसा ना.... जेवुनच जा..." नेहा त्यांना थांबवत म्हणाली.
" नको ग पोरी...एवढं म्हणालीस हेच लय झालं...जातो मी...." एवढं म्हणून ते निघून गेले.
...............................
आनंद सोफ्यावर विचार करत बसला. आपण ऐकलं ते नक्की खरं का यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो सुन्न झाला होता. आपल्याच हॉस्पिटल कडून असा गलथान कारभार चालु असेल याची त्याला कल्पनाच नव्हती. अक्सिडेंट केस तो स्वतः हँडल करायचा. पण अशी कोणतीही केस आल्याच त्याला आठवत नव्हतं. त्याने लगेच हॉस्पिटलला फोन करून पेशंटच नाव सांगून अशी कोणती केस आली होती का ते विचारलं. त्यावर रिसेपशनिस्ट थोडी गोंधळली. त्याने पुन्हा एकदा विचारल्यावर मात्र तिने होय म्हणून सांगितलं. त्याने फोन ठेवून दिला. मग त्याला आठवलं की तो चार दिवस कॉन्फरन्ससाठी दिल्लीला गेला होता. तेव्हा ती केस आली होती. तो एकटाच शून्यात बघत बसला होता. नेहा त्याच्याजवळ येऊन बसली आणि तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
" नेहा...अग ...मला काय सुचतच नाहीये... आपल्या..?? आपल्या हॉस्पिटलकडून असं व्हावं..??? ....मग आपल्या आणि बाकीच्या हॉस्पिटलल्स मध्ये काय फरक राहिला..." तो म्हणाला.
" हमम.... आनंद खरंतर मलाही तुला काहीतरी सांगायचंय...आपल्या हॉस्पिटलमध्ये नक्की काहीतरी चालू आहे असं मला वाटतं..." ती म्हणाली
" म्हणजे.....??" त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं.
मग नेहाने ती जेव्हा घरकुल मधल्या आजींना घेऊन हॉस्पिटल मध्ये गेली होती तेव्हा घडलेलं सगळं आनंदला सांगितलं. ते ऐकून आनंदला खूप धक्का बसला.अजूनही त्याचा ह्या सगळ्यावर विश्वास बसत नव्हता. त्यालाही थोड्या दिवसांपूर्वी घडलेला डॉ. देसाईंसोबतचा प्रसंग आठवला. त्याच्या डोक्यात विचारांचं थैमान सुरू झालं.
" आनंद आपल्या हॉस्पिटलमध्ये नक्की काहीतरी चालू आहे...आपल्याला हे शोधून काढायलाच हवं..." नेहा आनंदचा हात हातात घेत म्हणाली.
" हमम...." तो त्याच विचारात हॉस्पिटलला निघून गेला.
..............................
त्यानंतर चार दिवसांनी नेहा संध्याकाळी हॉस्पिटल जवळच्या वस्तीच्या इथे NGO च्या काही कामानिमित्त गेली होती. परत येताना तिला बऱ्यापैकी उशीर झाला. रात्रीचे जवळजवळ दहा वाजत आले. आनंद त्या दिवशी संध्याकाळीच घरी आला होता. नेहाला यायला उशीर झाल्यामुळे तो काळजीत होता. नेहा घरी यायला निघाली. वाटेत असणाऱ्या स्मशानभूमीच्या जवळ एका झोपडीवजा घरातून कोणतरी बोलतंय असं तिला वाटलं. तिचा मेन रोड पर्यंतचा जाण्याचा मार्ग त्या घराजवळूनच होता.
" आजच्या पेशंटचे किती पैसे मिळाले...." एक व्यक्ती दुसऱ्याला विचारत होता.
" आज काहीच नाही करता आलं....त्या आनंदच सगळीकडे लक्ष असतं हल्ली... त्याने अकाऊंट डिपार्टमेंटच्या फाईल्स मागवल्या होत्या आज...मला वाटतं त्याला काहीतरी संशय आलाय असं वाटतंय..." दुसरी व्यक्ती म्हणाली.
" हट.... त्याला वेळ कुठे असतो हे सगळं बघायला...आपली माणसं आहेत संजीवनी हॉस्पिटलमध्ये पेरलेली...." पहिली व्यक्ती म्हणाली. आनंद आणि संजीवनी हॉस्पिटलचं नाव ऐकून नेहा त्यांचं बोलणं ऐकत तिथेच थांबली.
" त्या आनंद वर लक्ष ठेवा....तो काय करतो, कुठे जातो सगळी माहिती हवी आपल्याला...." पहिली व्यक्ती. त्याचं बोलणं ऐकून नेहा चांगलीच घाबरली. ती आवाज न करता तिथेच उभी राहिली.
" हो....जोपर्यंत आपले साहेब आहेत तोपर्यंत आपल्याला कसलीच काळजी नको...." दुसरी व्यक्ती.
इतक्यात नेहाचा मोबाईल वाजला. तिने घाबरून तो बंद करण्याचा प्रयन्त केला. त्या आवाजामुळे आतली माणसं सावध झाली आणि ती बाहेर येऊ लागली. त्यांचा अंदाज आल्याने नेहा तिथून जीव घेऊन पळत सुटली.
क्रमशः......
पुढील भाग उद्या संध्याकाळी पोस्ट केला जाईल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा