Feb 24, 2024
प्रेम

हे बंध रेशमाचे - भाग 26

Read Later
हे बंध रेशमाचे - भाग 26

हे बंध रेशमाचे - भाग 26 

आनंद वेळेत दिल्लीला पोहोचला. त्याने घरी फोन करून आईला आणि नेहाला कळवलं आणि तो कॉन्फरन्स साठी निघून गेला. खरंतर आनंद गेल्यानंतर दोन दिवस घरी आप्पांकडे जाऊन यायचा नेहाचा विचार होता. पण आनंदने घराची आणि आईची जबाबदारी तिच्यावर टाकली होती त्यामुळे घरी आप्पांकडे जाण्याचा विचार तिने सोडून दिला.आनंद गेल्यामुळे तिला घर रिकामं रिकामं वाटत होतं. त्यामुळे ती 'घरकुल' मध्ये काम करण्यात आपला वेळ घालवत होती. नेहा मध्ये देखील हळुहळु बदल होत होता. पूर्वी काम करताना , बोलताना घाबरणाऱ्या नेहामध्ये आता आत्मविश्वास येऊ लागला होता. 'घरकुल' मध्ये काम करायला लागल्यापासून तर परब मॅडम तिला प्रत्येक  कामात प्रोत्साहन देत असत. त्यांच्या मते कोणतही काम अशक्य नव्हतं तर आपल्याकडे ते करण्याची प्रबळ इच्छा हवी.त्यामुळे त्या नेहा कडून काम करवून घेत. चुकलं तरी न रागावता तिला ते समजावून सांगत त्यामुळे तिलाही काम करताना छान वाटू लागलं. ती पुस्तकं वाचण्यात , चांगल्या व्यक्तींची भाषणं ऐकण्यात आपला वेळ घालवू लागली.

............................

आनंदची कॉन्फरन्स चार दिवसांची होती. आधीचे दोन दिवस आलेल्या प्रत्येकाची ओळख आणि त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल माहिती विचारण्यात गेले. पहिल्या दिवशी तो खूप उशिरा हॉटेल वर परतला होता. तो खूप दमला होता पण तरी नेहाला एखादा फोन करावा असं त्याला वाटलं. रात्र झाली होती पण तरी फोन करून बघू म्हणून त्याने तिला फोन केला.

"हॅलो......."  आनंद 

" हॅलो....बोला ना ..." पलीकडून नेहा बोलत होती.

"तू जागी आहेस अजून ?? .....मला वाटलं झोपली असशील.." तो म्हणाला

"नाही मला वाटलं तुमचा फोन येईल म्हणून वाट बघत होते" ती म्हणाली

"कसं काय....?" तो आश्चर्याने म्हणाला

त्यावर ती काहीच बोलली नाही.

"हॅलो....आहेस ना तू ?" आनंद

"हो आहे...बोला....कसा गेला आजचा दिवस ? " तिनं विचारलं

"खूप हेक्टिक होता ग....फार कंटाळा आलाय...आता झोपेन.." आनंद

"हा...तुम्ही जेवलात का ? " नेहा

"हो....आम्हाला कॉन्फरन्सच्या इथेच लंच आणि डिनर पण आहे...तुझा दिवस कसा गेला..." आनंद

"छान होता....आज एक नवीन बाळ आणलं घरकुल मध्ये त्यामुळे सगळे खुश होते..." नेहा

मग दोघांनी थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि फोन ठेवून दिला.

आनंदला तिच्याशी बोलून बरं वाटलं. दिवसभराचा त्याचा थकवा थोडासा दूर झाला. मग कपडे बदलून तोही झोपी गेला. पुढचे दोन्ही दिवस त्याचे तसेच बिझी गेले. त्यामुळे त्याला घरी फोन करायलाही मिळाला नाही. सकाळी निघताना मात्र त्याला नेहाची आठवण यायची. ती त्याच्या सगळ्या वस्तू आधीच तयार ठेवायची ते त्याला आठवलं. त्यालाही त्याची सवय झाली होती. कॉन्फरन्सचा शेवटचा दिवस होता. कधी एकदा हे संपवून आपण घरी जातो असं त्याला झालं होतं. त्याचा प्रबंध अप्रुड झाला त्यामुळे तो फार खुश होता. त्या दिवशी त्याच काम लवकर आटपल तसं नेहासाठी म्हणून काहितरी घ्यावं अस त्याला वाटलं. म्हणून तो तिथल्या जवळच्याच भागातील एका दुकानात गेला. त्यानं तिच्यासाठी एक पिंक आणि यलो कॉम्बिनेशनचा रेडिमेड पंजाबी ड्रेस घेतला. गेल्यावर तिला सरप्राईज देऊ असं त्यानं ठरवलं.

..................................

नेहा देखील आनंदची आतुरतेने वाट पाहत होती. परब मॅडमच्या सांगण्यावरून तिनं MA करायचं ठरवलं होतं. तेही तिला आनंदला सांगायचं होतं. एकदा ती घरकुल मध्ये काम करत होती. नव्याने दाखल झालेल्या माणसांची माहिती ती कॅटलॉग मध्ये लिहत होती. थोड्या वेळाने तिथे परब मॅडम आल्या. नेहाची आणि त्यांची छान गट्टी जमली होती. 

"काय मग नेहा मॅडम काय चाललंय...?" त्यांनी तिच्याजवळ येत विचारलं

"मॅडम तुम्ही मला मॅडम नका हो म्हणू मी लहान आहे तुमच्यापेक्षा..." ती उगीचच रागावल्यासारखं करत म्हणाली.

"बरं बाई नाही म्हणत...काय चाललंय.." परब मॅडम

"काही नाही...नवीन आलेल्यांची माहिती नीट लिहुन ठेवतेय मग पीसीला फीड करून ठेवेन. 

त्या दोघी बोलत असतानाच तिथे बर्वे आजी आल्या.

"मॅडम येऊ का आत...?" त्यांनी परब मॅडमना विचारलं

"आजी या की.. बसा....काय म्हणताय.." त्यांनी प्रेमाने विचारलं

"काही नाही...आले सहजच....यांची तिकडे गप्पांची मैफिल रंगलेय मला कंटाळा आला म्हणून आले पाय मोकळे करायला..." आजी खुर्चीवर बसत म्हणाल्या.


"तू अजून गेली नाहीस का घरी...? " कॅटलॉग लिहणाऱ्या नेहाला त्यांनी विचारलं

"नाही ...जाईन आता हे एवढं लिहून झालं की..." ती लिहता लिहता म्हणाली.

"अहो आनंद सर नाहीयेत ना घरी.. म्हणून मग मॅडमना लवकर जावसं वाटत नाही घरी..." परब मॅडम तिला चिडवत म्हणाल्या.

"असं काही नाही हा..." नेहा लाजत म्हणाली.

"होय काय.... कुठे गेलाय आनंद..." आजींनी विचारलं

"दिल्लीला गेलेत कॉन्फरन्ससाठी..." नेहा म्हणाली

"मग तुला घेवून नाही गेला..." आजींनी विचारलं

"नाही त्यांना काम होत खूप म्हणून मग नाही निलं..." नेहा

"हो का....." असं म्हणून आजी आणि परब मॅडम हसू लागल्या...त्यावर नेहा लाजली.

" बरेच दिवस तुला विचारेन विचारेन म्हणत होते....तू त्या हल्लीच्या पोरी घालतात पँटी...त्या फाटक्या फाटक्या पँटी... तसलं काही घालत नाहीस काय... " आजींनी विचारलं

नेहा आणि परब मॅडम दोघींनाही हसू आलं.

"अग आमची नात ....ती घालून फिरत असते...तुमचं काय ते हॉट पॅन्ट की काय म्हणतात ते... ते आठवलं म्हणून म्हटलं तुला विचारू..." आजी म्हणाल्या. 

"नाही...मी नाही घालत जीन्स वगरे...साडी किंवा ड्रेस..." नेहा म्हणाली.

"अगं घालायचं आपण पण....जरा मजा म्हणून कधीतरी....तुला सांगते आमचा सगळा जन्म गेला नऊवारी साडीत....आमच्या वेळी नव्हती कसली मौज मजा...सणाला नवीन साडी मिळायची पण बाकी कुठे फिरणं नाही की काही बदल नाही...तुझ्याकडे बघून मला माझं तरुणपण आठवलं अशी काकूबाई सारखी राहू नकोस हो....आवडत नाही हल्ली नवऱ्यांना...." आजी म्हणाल्या.

आजींचे असे विचार असतील असं नेहाला वाटलंच नव्हतं. 

"आजी म्हणतायत ते खरं आहे नेहा...अग बाकीच्या मुली बघ कशा राहतात ते बिनधास्त... कुठेही फिरतात.....तू पण जरा आता बदल कर स्वतः मध्ये...मस्त राहायचं..खायचं पियायचं...आपले छंद जोपासायचे...प्रवास करायचा...स्वतःसाठी वेळ काढा आता मॅडम..." त्यांनी हसत नेहाला सांगितलं..

"अग आमच्या वेळी अशा पँटी फंटी असत्या ना तर मी मस्त घालून फिरले असते...." आजींच्या या वाक्यावर नेहा आणि परब मॅडम दोघीही हसल्या. 

" मॅडम मी काय म्हणत होते आनंदचा वाढदिवस आहे पुढच्या महिन्यात... लक्षात आहे ना तुमच्या..." आजींनी विचारलं.

" हो आहे ना...आपण या वेळेस काहीतरी वेगळं करू...काय नेहा...? " परब मॅडम म्हणाल्या

"कधी आहे यांचा वाढदिवस...? " तिनं विचारलं.

"म्हणजे....??  तुला माहीत नाही..??.." परब मॅडमनी आश्चर्याने विचारलं
 त्यावर तिन नकारार्थी मान हलवली.

"कधी विचारायची वेळच नाही आली..." ती म्हणाली

"पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला आहे...त्यांचा वाढदिवस ते इथे साजरा करतात सगळ्यांसोबत..." मॅडमनी सांगितलं.

"हो का...मला नाही माहिती.." नेहा बोलली

"असुदे...आता कळलं ना...आपण खूप धमाल करू यावेळी..." मॅडम बोलल्या तस आजी आणि नेहानेही त्यात होकार भरला. मनोमन आनंदला एक छान सरप्राईज द्यायचं नेहाने ठरवलं.


................................

 

दोन दिवसांनी आनंद घरी आला. आल्याबरोबर त्याने त्याचा प्रबंध याप्रूड झाल्याचं त्यानं सांगितलं. त्यामुळे दोघींनाही आनंद झाला. वृषालीताईंनी गीता मावशींना जेवणात गोडाच करायला सांगितलं. मग नेहा सुद्धा त्यांच्या मदतीसाठी किचन मध्ये गेली. नेहाने आनंदच्या आवडी निवडी वृषालीताईंकडून विचारून ठेवल्या होत्या. त्यामुळे तिने त्याच्या आवडीचे गुलाबजाम केले. जेवताना आनंदने आवर्जून तिच्या जेवणाची स्तुती केली. मग तो खोलीत आला. त्याने आणलेला ड्रेस तिथेच बेडवर ठेवला आणि त्यावर एक मेसेजही लिहला. थोड्या वेळाने नेहा रूम मध्ये आली. बेडवर ठेवलेल्या बॉक्सकडे तिचं लक्ष गेलं. आनंद बाजूलाच  पुस्तक वाचत पडला होता. 

"हे माझ्यासाठी आहे...." तिनं तो बॉक्स दाखवत आनंदला विचारलं.

"हो...बघ आवडत का..?" तो म्हणाला

 तिनं बॉक्स उघडून पाहिला आतला ड्रेस बघून ती खूप खुश झाली. बाजूला पडलेला मेसेज तिने पाहिला. त्यावर लिहलं होतं.

' माझ्या सुंदर मैत्रिणीसाठी एक सूंदर भेट...!!'

ते वाचून तिला खूप आनंद झाला.

"Thank you..." ती खुश होवुन म्हणाली.

"आवडला का ? " त्यानं विचारलं

"हो खूप...माझ्याकडेही तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे..." नेहा म्हणाली

"काय ? " त्याने सोफ्यावर उठून बसत विचारलं.

"मी आता MA करणारे आणि ते पूर्ण झालं की Ph.D साठी अप्लाय करायचा विचार आहे." तिनं सांगितलं

" फारच छान.....पण तुझं ग्रॅज्युएशन कोणत्या सब्जेक्ट मधून केलंस...? " आनंदने विचारलं.

"म्हणजे तुम्हाला माहीत नाही....?? " ती बोलली.

त्याने नकारार्थी मान हलवली. 

" BA with first rank in psychology......कोल्हापूरच्या आमच्या कॉलेजमध्ये पहिली आले होते मी..." ती भरभरून सांगत होती.

आनंदला मात्र यातलं काहीच माहीत नव्हतं. ज्या मुलीला आपण आत्तापर्यंत बावळट समजत होतो तीच मुलगी कॉलेजला फर्स्ट आल्याचं सांगतेय आपल्याला याचं त्याला आश्चर्य वाटत होतं आणि तिच्या गुणांकडे न बघता आपण केवळ तिच्या राहण्या वरून तिला मूर्ख बावळट समजत होतो याचं वाईटही वाटतं होतं.

"मला नव्हतं माहिती काही..." तो म्हणाला.

"हमम आपल्यात एवढं बोलायची वेळच नाही आली कधी...पण मला वाटलं आईनी सांगितलं असेल तुम्हाला..." ती म्हणाली. त्यावर तो मानेनेच नाही म्हणाला

"मलाही माहीत नव्हतं..." ती म्हणाली

"काय ...?? " आनंद

"तुम्हाला न चिडता बोलता येतं आणि हसता पण येतं ते..." ती असं म्हणाली त्यावर दोघेही खळखळून हसले.


क्रमशः....

 

हे बंध रेशमाचे या माझ्या पहिल्या वाहिल्या कथेला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिलात. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांना उत्तर देणं शक्य नाही. पण तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मोलाचे आहेत. फेसबुक पेजवरती कथा ईराच्या टीम कडून पोस्ट केल्या जातात. त्यामुळे ज्यांना कथा लगेच वाचायच्या असतात त्यांनी ईराच्या साईट वरती डायरेक्ट येऊन कथा वाचावी आणि त्याचा आनंद घ्यावा. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. त्यामुळे कथा नावासकट शेअर करावी ही विनंती. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//