हे बंध रेशमाचे - भाग 11

Love story

हे बंध रेशमाचे - भाग 11

वृषालीताईंनी आप्पासाहेबांना फोन करून आनंदचा होकार कळवला आणि घराच्या कामासाठी तो लवकरच गावी येणार आहे हे देखिल सांगितले.खरंतर श्रीकांत गेल्यानंतर आनंद दोन तीन वेळा काही कामासाठी गावी येऊन गेला होता.नेहाने आनंदला पाहिलं नव्हतं , पण तो गावी गेला होता तेव्हा त्याने नेहाला पाहिलं होतं..त्यावेळी ती जवळच असलेल्या पिठाच्या गिरणीवरून पीठ घेऊन येत होती..तिला कोणतंही काम हलकं वाटत नसे..घरी काम करणाऱ्या गंगा मावशी आजारी होत्या म्हणून ती स्वतःच त्या दिवशी जाऊन दळप घेऊन येत होती.. नेमकं त्याचवेळी आनंदने नेहाला पहिलं होतं. आनंद आपलं काम आटपल्याने परत निघत होता..कोणीतरी ती आपासाहेबांची मुलगी म्हटल्याच त्यानं ऐकलं....लांबसडक वेणी, पंजाबी ड्रेस, हाताला ड्रेसला पीठ लागलेलं.....त्यामळे पहिल्या भेटीतच नेहा गावंढळ आणि काकूबाई टाईप मुलगी आहे असंच त्याच मत झालं होतं..आणि आता ही अशी मुलगी आपल्या सारख्या एका डॉक्टरची बायको होणार हे त्याला पटत नव्हतं...!!.दोन दिवसांनंतर तो आणि त्याचा मित्र गावी जायला निघाले.आप्पासाहेबांकडेच त्या दोघांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

"काय वो ताई आज कुनी खास मंडली यायची हायत का साहेबांकडं ?" आपासाहेबांच्या घरी काम करणाऱ्या बाया बापड्या नेहाला चिडवत होत्या.ती आज सकाळपासूनच जेवणाच्या तयारीला लागली होती.सगळा स्वयंपाक ती स्वतः करणार होती.बाकीचे फक्त तिला मदत करत होते.

"नाही असं काही नाही ".....नेहा.

"पर काय बी म्हना आज की न्हायी ताईसाहेबांची लईच गडबड हाये व्हय की नाय ग वेणू "....काम करणाऱ्यांपैकीच एक बाई नेहाला चिडवत हसत बोलत होती..

"तर तर वो,कुनाला म्हणून हात लावू देत न्हाईयेत कंच्या कामाला.. समदं स्वतःच करता हायत.." अस बोलून त्या बायका हसत होत्या..

"गपा ग...बाबांकडे यायचेत ते पाहुणे मग जेवण व्यवस्थित नको का ..." नेहा आपलं काम करता करता बोलली.

"मंग येणारे पावने तुमचं कोण न्हाईत का ? " ...त्यांच्या बोलण्यावर नेहा लाजून खोलीत पळाली तशा त्या फिदीफिदी हसल्या. 

....................................

आनंद आणि त्याचा मित्र  विशाल दुपारी बाराच्या सुमारास गावी पोचले.आधी ते घराच्या कामाच्या ठिकाणी गेले.घराचा प्लॅन काढून काय कुठे कसं उभारावं या बाबत त्यांची चर्चा झाली.मोठा बंगला असा नाही पण छोटंसं घरकुल बांधायचं अस आनंद आणि वृषालीताईंनी ठरवलं होतं..त्यानुसारच त्याने मित्राला प्लॅन काढायला सांगितला होता. कौलारू घर...समोर प्रवेशद्वार ..हॉल त्याला लागूनच दोन खोल्या...एका बाजूने आत जाण्यासाठी व्हरांडा त्याला लागून स्वयंपाकघर....दुसऱ्या बाजूला देवघरासाठी जागा...थोडं पुढं गेल्यावर मोठा व्हरांडा...आणि मागची बाजू...तिथे झाडं वगरे लावायची असं त्यानं ठरवलं...मग तिथला सगळा परिसर बघून दोघेही आपासाहेबांकडे आले..ते दारातच त्यांची वाट पाहत होते आनंद आल्याची बातमी त्यांच्या नोकराने आधीच येउन दिली होती..आनंदची गाडी वृंदावन वाड्यासमोर येऊन थांबली.. आनंद आणि विशाल दोघेही गाडीतून उतरले.आनंदने आप्पासाहेबांना वाकून नमस्कार केला.

"या रे या पोरांनो....आनंद ये " आप्पासाहेब त्यांना आत नेत म्हणाले.

"बसा...कसा झाला प्रवास ?" आनंद आणि विशालला त्यांनी दिवाणखान्यात असलेल्या बैठकीवर बसायला सांगितलं.

"छान झाला प्रवास.पहाटेच निघालो त्यामुळे वेळेत पोचलो "........आनंद

दिवाणखान्याच्या बाजूने जो मोकळा व्हरांडा होता त्याच्या बाजूच्या खोलीच्या दाराआडून नेहा आनंदला बघत होती.त्याच तिकडे लक्ष गेलं तशी ती आत गेली.

"गंगा ताई पाणी आणा "...आप्पासाहेब

गंगा मावशी पाणी घेऊन आल्या..दोघांना ही त्यांनी पाणी दिलं.

"नेहाला विचारा जेवणाची तयारी कुठपर्यंत आलेय...पाहुणे आलेत म्हण..." आप्पासाहेबांनी विचारलं

"तयार हाय जी "....गंगा

"वा... बरं आनंद तुम्ही फ्रेश होऊन या तोपर्यंत आम्ही गरम गरम जेवण वाढायला सांगतो...गंगाताई यांना आपली गेस्ट रूम दाखवा.." 

आनंद आणि विशाल दोघेही गंगाताईंच्या मागून गेले..वरच्या मजल्यावर गेस्ट रूम होती ती त्यांनी दाखवली...'आम्ही आवरून येतो' असं आनंदने त्यांना सांगितलं तशा त्या खाली आल्या.नेहाने तोपर्यंत डायनींग टेबल वरती सगळ्यांची ताट मांडली होती.दिवाणखाना आणि स्वयंपाकघर यांच्या मधल्या पॅसेज मध्ये मोठं डायनींग टेबल होतं.त्यावर चंदेरी कलरच पेपर मॅट घातलं होत...बाजूने सात -आठ खुर्च्या...त्याच्या वरती मोठं झुंबर...भिंतीवर पेंटींग्स... टेबल वर आज तर्हेतऱ्हेचे पदार्थ मांडलेले दिसत होते...पुरी, बटाट्याची भाजी, बासुंदी , वरण भात, आमटी शिवाय मसालेभात सोबत रायतं... आंब्याचं लोणचं, कढी फुलके, गुलाबजाम....या सोबतच निरनिराळी फळ  ठेवलेली होती..सगळा सरंजाम टेबलवरती तयार होता..आनंद आणि विशाल आवरून जेवायला आले.. नेहा त्यांना वाढू लागली.तिचं तर आनंदकडे बघायचं सुद्धा धाडस होत नव्हतं.त्यांना वाढून झाल्यावर ती आत जाऊ लागली तस आप्पा म्हणाले..

"बस ना तू पण .....जेव आमच्या सोबतच बस ..." 

"हा ".....नेहा आप्पांजवळची खुर्ची ओढून जेवायला बसली पण ती बरोबर आनंदच्या समोरच होती...शेवटी खाली मान  घालून नेहा जेऊ लागली..जेवण कस झालं असेल नि काय... त्यांना आवडेल ना असे प्रश्न तिच्या मनात येत होते..

"आमची नेहा लाजाळू आहे तशी...." आनंदला बोलण्याच्या उद्देशाने अप्पा म्हणाले. त्यावर तो नुसता हसला....

"काय मग आनंद काय ठरलं घराचं ...प्लॅन वगरे झालाय ना नीट ...." आप्पा

"हो झालाय....इथलाच कॉन्ट्रॅक्टर सांगुया आपण ...तुमच्या माहीतीत कोण असेल तर तुम्ही बोलवाल का उद्या त्यांना....कारण उद्या सगळं ठरवुन मला संध्याकाळी परत जायचंय..." आनंद 

" हो चालेल...मी सांगतो ...उद्या येईल तो कॉन्ट्रॅक्टर...आता तुम्ही जेऊन जरा झोपा ...प्रवासाचे आलायत तर...." आप्पा

"हो...." आनंद

आप्पासाहेबांनी संध्याकाळी आनंदला त्यांची बाग दाखवून आणली..कोणती झाडं आहेत..औषधी वनस्पती, मसाल्याची झाडं... आंबा ,केळीच्या बागा.... थंडगार वातावरण....आणि मन सुखावणारी शांतता.....!!!!! काय नव्हतं त्या बागेत....!!!! बागेतून समोर गावाबाहेर वाहणाऱ्या नदीचा प्रवाह दिसत होता.... आनंद काही वेळ तिथेच बसला....मग तोपर्यंत आप्पानी विशालला बाकीची बाग दाखवली...बागेतल्या फेरफटक्यामुळे आनंदला कमालीचं फ्रेश वाटत होतं.....!!...रात्री देखील नेहाने जेवणाचा छान बेत केला होता...सगळीजण मिळून गप्पा मारत होती..या सगळ्यात शांत होती ती फक्त नेहा.....!!! ती मधूनच चोरून आनंदकडे बघत होती...त्याच्या त्या घाऱ्या डोळ्यांची तिला भीतीच वाटली...तरीही त्याच्याकडे बघत राहावंसं तिला वाटत होतं....!!!!

..............................

दुसऱ्या दिवशी आनंद , विशाल आणि आप्पासाहेब आनंदच्या घराच्या इथे आले.त्याने आप्पाना प्लॅन नुसार कुठे काय असेल हे समजावून सांगितलं.प्लॅन छान होता..अप्पाही खुश झाले. त्याने प्लॅनची एक कॉपी आप्पांकडे दिली आणि त्यानुसार कॉन्ट्रॅक्टर कडून काम करून घ्यायला सांगितलं..

"कसा आहे प्लॅन काका ?" ........आनंद

"छानच आहे हो ..." आप्पा

"पण काका तरीही मला यात काहीतरी missing  वाटतंय.... काय ते लक्षात येत नाहीये पण घर पूर्ण नाही वाटते ....काय करायचं तुम्ही सांगाल का काहीतरी suggestion .....".  आनंद 

"पुढच्या मोकळ्या पॅसेजमध्ये एक छोटासा झोपळा आणि घरासमोर छान तुळशी वृंदावन ......" 

"परफेक्ट ....." आनंदच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडला... कोण बोललं हे बघायला त्यानं मागे वळून बघितलं.......

क्रमशः........

🎭 Series Post

View all