हे बंध रेशमाचे - भाग 20
आनंदने सांगितल्याप्रमाणे नेहाला तो एका NGO मध्ये घेऊन गेला.'घरकुल' असं त्या संस्थेचं नाव होतं. तिथे अनेक वृद्ध जोडपी होती काही अनाथ मुलं होती तर काही नवजात बाळं होती ज्यांना कोणीतरी रस्त्यावर टाकून दिलं होतं...अशी सगळी माणसं तिथं आनंदानं राहत होती. आनंद दरवर्षी स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी त्या संस्थेमध्ये यायचा आणि सगळ्यांसोबत बर्थडे सेलिब्रेशन करायचा.त्यामुळे तिथं असणारी सगळी मुलं , आजी आजोबा त्याची वाट पाहत असायचे. नेहाला घेऊन तो संस्थेच्या संचालकांकडे गेला. त्यांचं नाव होतं डॉ. गिरीजा परब. त्यानं नेहाची आणि त्यांची ओळख करून दिली आणि तुझं काम झालं की फोन कर असं नेहाला सांगून तो निघून गेला. परब मॅडमनी नेहाला त्यांची संस्था दाखवण्या साठी निलं. ती संस्था कशी सुरू झाली मुलांना इथं कस आणलं वगरे सगळी माहिती त्यांनी नेहाला दिली. बोलत बोलत त्या वृद्ध जोडपी राहत असत त्या मजल्यावर आल्या.
" काय मग तुला आवडेल ना इथे काम करायला..." परब मॅडमनी विचारलं
"हो , अगदी एका पायावर.. मी आधीही अनाथ आश्रमात काम केलं आहे..." नेहा
"अरे वा मग काहीच हरकत नाही." परब मॅडम खुश झाल्या
"एक विचारू का ? " नेहा
"हो विचार की ..." मॅडम बोलल्या
" आपण फक्त अनाथ मुलांसाठीच नाही का संस्था चालवू शकत.."
" सुरवातीला जेव्हा संस्था सुरू करायच ठरलं ना तेव्हा आमचा देखील हाच विचार होता. पण मध्ये आम्ही एका बाळाला आणायला नागपूरला गेलो होतो. तिथे कोणालातरी देवळाच्या बाजूला ठेवलेलं सहा महिन्याचं बाळ सापडलं होतं त्यालाच आणायला आम्ही गेलो होतो. येताना परतीच्या वाटेवर आम्हाला दोघे आजी आजोबा भेटले. आमच्या गाडी खाली दोघेही येता येता वाचले..."
" बाप रे....कसं काय...असं का केलं पण त्यांनी ? " घाबरून नेहाने विचारलं
"अग तेच तर सांगतेय..दोघेही जीव देत होते आमच्या गाडीखाली.आम्ही गाडी थांबवून त्यांची विचारपूस केली तेव्हा कळलं त्यांच्या मुलाने त्यांना घरातून बाहेर काढलं होतं. एकुलता एक मुलगा म्हणून त्यांनी घरदार , पैसे त्यांच्या नावावर केले. शेवटी त्याच मुलानं त्यांना घराच्या बाहेर काढलं. जाणार कुठे , काय करायचं हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न होता. शेवटी दोघांनी जीव द्यायचं ठरवलं. सुदैवाने ते आमच्याच गाडी समोर आले. मग काय बाळासोबत आम्ही त्यांनाही घेऊन आलो."
" बरं झालं ...नाहीतर पुन्हा त्यांनी तसा विचार केला असता..." नेहा.
"हो..म्हणूनच आम्ही त्यांना इथे घेऊन आलो. अनाथ मुलांना आजी आजोबांची माया मिळाली आणि त्यांनाही नातवंड....!!!! तेव्हा पासून आम्ही अनाथ मुलं आणि वृद्ध जोडपी किंवा कोणीही एकटे असतील ज्यांना त्यांचं कुटुंब सांभाळत नाही अशांना इथे सहभागी करून घ्यायचं ठरवलं. मुलंही खुश असतात त्यांच्यामुळे...!!!! "
हे सगळं ऐकून नेहा हुरळून गेली. परब मॅडम तिला घेऊन एका खोलीजवळ आल्या. त्यांनी त्या खोलीचं दार वाजवलं. एका आजींनी दार उघडलं.
" काय आजी आत येऊ का..? " त्यांनी दारातूनच विचारलं
" अहो मॅडम या की विचारायचं काय... आणि आज सोबतीला कोण तुमच्या..." आजींनी विचारलं
"यांचीच ओळख करून द्यायला आणलंय... ह्या आपल्या आनंद सरांच्या मिसेस...नेहा मॅडम..." परब मॅडमनी सांगितलं..." आणि या बर्वे आजी...मी तुम्हाला आत्ता येताना सांगितलं ना त्याच ह्या..."
नेहाने त्यांना वाकून नमस्कार केला. तशा त्या भांबावल्या.
"अगं....अगं..असुदे... "असं म्हणत त्यांनी 'सौभाग्यवती भव ' असा आशीर्वाद दिला.
" छान आहे हो " त्यांनी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून बोटं मोडली..
"या आता आपल्या संस्थेसाठी काम करणार आहेत.. म्हणून म्हटलं सगळ्यांशी ओळख करून द्यावी..आधी तुमच्याकडे आलो.." परब मॅडम बोलल्या.
मग आजींनी सगळ्यांना हाका मारल्या आणि बोलावून घेतलं...छोटी मोठी अशी सगळी मिळून पन्नास साठ माणसं होती. नेहाला बघून प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर कुतूहल होते. परब मॅडमनी तिची सगळ्यांशी ओळख करून दिली. संस्थेचं काम कसं चालतं ते तिला नीट समजावून दिलं. दिवस कधी सरला नेहाला कळलं सुद्धा नाही. मग संध्याकाळी ती घरी जायला निघाली. आनंदला फोन करून तिनं सांगितलं. पण ड्रायव्हरला पाठवण्या ऐवजी तो स्वतःच तिला न्यायला आला होता. 'घरकुल ' संस्थेमध्ये काम करायला मिळणार त्यामुळे नेहा फार खुश होती. त्यासाठी तिला आनंदला थॅंक्यू म्हणायचं होतं. तो गाडी चालवत होता. तिनं त्याच्याकडे पाहिलं तो आपल्याच विचारात होता.
" Thank you.." नेहा बोलली
" काय ?? " तो न कळून म्हणाला.
" तुम्ही मला त्या संस्थेबद्दल सांगितलंत आणि दाखवलीत पण त्यासाठी thank you so much..." नेहा
" असं होय...त्यात काय एवढं.. पण मला माहित नव्हतं तू असं काम वगरे करतेस ते..." आनंदने सांगितलं
"कधी तसं बोलायची वेळच नाही आली.....लग्न झाल्यापासून आपण मनमोकळे असं बोललोय का एकमेकांशी....?" ती खिडकीतून बाहेर बघत म्हणाली.
तिच्या या बोलण्यावर मात्र काय बोलावं त्याला कळेना. दोघेही एकत्रच घरी आले. घरी आल्यावर मात्र त्यांच्यात काहीच बोलणं झालं नाही. जेवुन झाल्यावर आनंद टेरेस वरती पाय मोकळे करायला गेला. लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदाच त्याला असं वाटलं की आपण नेहाच्या बाबतीत चुकीचं वागतोय का...आपणच तिला गावंढळ बावळट समजतोय... पण खरंच ती तशी आहे का...? त्याच्या मनात विचार चालु होते. थोडा वेळ वरती फेऱ्या मारून तो खोलीत येऊन झोपला. नेहमीप्रमाणे ती बेडवर आणि आनंद बाजूच्या सोफ्यावर झोपी गेले. त्यांच्यातलं अंतर अजूनही कमी झालं नव्हतं.....
क्रमशः....
पुढील भाग दोन दिवसांनी पोस्ट केला जाईल
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा