हे बंध रेशमाचे - भाग 40
डॉ. देसाईंनी आनंदला त्या मॅडमचं नाव सांगताच त्याला मोठा धक्का बसला. त्याचा त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. तो त्याच तंद्रीत बाहेर आला. नेहा तिथेच बसली होती. तो अजूनही सावरला नव्हता. त्यामुळे मग नेहा ड्रायविंग सीटवर बसली आणि त्याला बाजूच्या सीटवर बसायला लावून ती गाडी घेऊन घरी आली. दोघेही हॉल मध्ये आले. तिने आनंदला पाणी आणून दिलं. तो गटागटा पाणी प्याला. वृषालीताईंनी आनंदची ही अवस्था पाहिली. काय झालंय म्हणून त्यांनी खुणेनेच नेहाला विचारलं. त्यावर तिने त्यांना हातानेच थांबा असं सांगितलं. तो थोडा शांत झाल्यावर नेहाने त्याला काय झालं म्हणून विचारलं. त्याने जे सांगितलं त्याने दोघीही हादरल्या. त्याही परिस्थितीत तिने हलकेच आनंदच्या खांद्यावर थोपटलं. त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू ओघळले होते. ती पूर्ण रात्र गूढ शांततेत गेली.
.................................
मिताली तिच्या घरी छानपैकी गाणी ऐकत पडली होती. आजूबाजूला कोण आहे की नाही याचंही तिला भान नव्हतं. इतक्यात त्यांच्या घरी काम करणाऱ्या बाईने तिला येऊन जाग केलं आणि कोणतरी तुम्हाला भेटायला आलंय अस सांगितलं. तेव्हा ती उठून बसली. तिने समोर पाहिलं तर डॉ. देसाई तिच्या समोरच्या सोफ्यावर येऊन बसले होते.
" तुम्ही........तुम्ही इथे काय करताय ?? " तिने त्यांना दबक्या आवाजात थोडंस रागाने विचारलं.
" मी एवढंच सांगायला आलोय मॅडम की तुम्ही सांगितलेलं काम मला जमणार नाही..." त्यांनी शांतपणे तिला सांगितलं.
" का......? तुमचा योग्य तो मोबदला तुम्हाला मिळतोय ना मग..." ती आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून घेत म्हणाली.
" मी आनंदला यापेक्षा फसवू शकत नाही....काहीही झालं तरी तो माझ्या मित्राचा मुलगा आहे...." ते म्हणाले.
" लवकर आठवलं तुम्हाला हे......मी ज्यावेळी तुम्हाला ही ऑफर दिली तेव्हा कुठे गेलं होतं हे शहाणपण...." ती अजूनही रागातच होती. डॉ. देसाई घरापर्यंत आलेले तिला आवडलं नव्हतं.
" हमम तेव्हा पैशाच्या लोभापायी मी होय म्हणालो....पण आता मला पश्चात्ताप होतोय..." डॉ. देसाई.
" हो का.....आणि या आधी त्याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही पैशाची अफरातफर करत होतात तेव्हा नाही सुचलं का हे....की आपण चुकीचं करतोय म्हणून...." मिताली म्हणाली.
" माझ्या डोळ्यांवर तेव्हा पैशाची धुंदी चढली होती...आणि त्याचमुळे मी तुझ्या जाळ्यात अडकलो...पण आता नाही.. मला आता या दलदलीतून बाहेर पडायचय.." ते म्हणाले
" नाही डॉक्टर.....तुम्ही असं अर्ध्यावर हे काम टाकून जाऊ शकत नाही..जोपर्यंत आनंद पूर्ण उध्वस्त होत नाही...तोपर्यंत हे थांबणार नाही...." ती फार आवेशाने बोलत होती...
" पण आनंदने तुझं काय वाकडं केलंय एवढं....." मिताली ही आनंदची मैत्रीण आहे हे डॉ. देसाईंना माहीतच नव्हतं. त्यामुळे तिच्या अशा रागाचं त्यांना आश्चर्य वाटत होतं.
" काय केलंय....?? माझं आयुष्य उध्वस्त केलंय त्याने...मी जीवापाड प्रेम केलं त्याच्यावर पण त्याने प्रत्येक वेळी मला झिडकारलं..... आधी ती नेहा त्याला आवडतही नव्हती...आणि आता त्याच नेहासाठी त्याने मला दूर केलं...कसं सहन करू मी हे..." ती भयंकर रागात होती.
" हम्मम......पण मग हॉस्पिटलशी त्याचा काय संबंध...?? तिथे हे सगळं घडवून आणायची काय गरज होती.." त्यांनी विचारलं.
" काहीच नाही....खरंतर त्याने माझ्यावर जबरदस्ती केली असा मी त्याच्यावर आरोप करणार होते..त्यामुळे नेहाचा त्याच्यावरचा विश्वास तुटला असता...आणि या परिस्थितीत माझ्याशी लग्न करण्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच राहिला नसता....पण त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मी तुम्हाला त्या बिलावरून बोलताना ऐकलं आणि माझ्या डोक्यात हे सगळं प्लॅनिंग तयार होऊ लागलं...कारण त्यामुळे हॉस्पिटलचं नाव खराब झालं असत आणि या सगळ्यात आनंद अडकला असता...." एवढं बोलून ती काहीसं थांबली.
" आनंदने माझं सुख हिरावुन घेतलं... हॉस्पिटल त्याचा जीव आहे हे मला माहितेय आणि म्हणूनच मी हे सगळं केलं....मला आनंदला उध्वस्त झालेलं बघायचं आहे....पण डॉक्टर तुम्ही असं मध्येच हे सगळं सोडून जाऊ नका..." ती ओरडून बोलत होती.
तेवढ्यात हॉलच्या दारातून टाळ्या वाजवत आनंद आत आला.
" वा मितु वा...... काय डोकं आहे गं तुझं..वा..इतके घाणेरडे विचार येतायत त्यात...." तो तिला डिवचत म्हणाला.
" तू....?? ......तू इथे कसा.....?? म्हणजे डॉ देसाई तुम्ही....?? तुम्ही फसवलंत मला....." तिचा राग अनावर झाला होता.
आनंद आणि डॉ देसाई शांतपणे फक्त तिच्याकडे पाहत होते.
" मी.......मी काही नाही केलेलं....या ...या डॉ देसाईंनी केलंय सगळं....यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवीय..." ती डॉ देसाईजवळ जाऊन बोलू लागली.
" खरा गुन्हेगार कोण आहे ते कळलंय आम्हाला मितु......तू आहेस खरी गुन्हेगार..... मितु तुला मैत्रीण म्हणवून घ्यायला पण लाज वाटतेय ग मला..... किती छान होती आपली मैत्री.....कुठे कमी पडलो मी......का वागलीस तू अशी..?? तू इतक्या खालच्या पातळीला जाशील अस मला कधीच वाटलं नव्हतं....." तो तिचे खांदे पकडून तिला गदगदा हलवत विचारत होता.. हे विचारताना त्याच्याच डोळ्यातून पाणी येत होतं .
" तूच जबाबदार आहेस या सगळ्याला......तू जर तेव्हाच माझं प्रेम स्वीकारलं असतस तर आज ही वेळच आली नसती.......काय पाहिलंस त्या नेहात एवढं की तिच्यासाठी तू मला नाही म्हणालास...." ती जोरजोरात बोलत होती.
" कारण मी तिच्याशी कसाही वागलो तरी ती कायम माझ्या सोबत होती...मला माझी चूक कळेपर्यंत ती थांबली....माझ्या चुका तिने पोटात घातल्या....तुझं माझ्यावर प्रेम होतं ना मग मला असं त्रासात टाकताना तुला काहीच वाटलं नाही....प्रेम म्हणजे फक्त लग्न , जवळ असणं नाही....आपल्या माणसाला सुखी झालेलं बघणं हे देखील प्रेमच असत.....!!!! जाऊदे कोणाला सांगतोय मी हे.....मला तुझ तोंडही पाहायची इच्छा नाही..." एवढं बोलून तो जायला वळला. पण मिताली पुन्हा त्याच्या पुढे जाऊन उभी राहिली.
" सॉरी.....सॉरी आनंद.... खरंच तू एकदा माफ कर मला....मी पुन्हा अशी कधीच वागणार नाही...." ती त्याच्यापुढे हात जोडत म्हणाली..
" नाही मितु...... सॉरी मिस मिताली देसाई या सगळ्याला आता खूप उशीर झालाय...." असं म्हणून तो तिला बाजूला ढकलतो आणि सोबत आणलेल्या पोलिसांना हाक मारतो.
पोलिसांना पाहून मिताली पुन्हा गयावया करू लागते पण आनंद तिच्याकडे दुर्लक्ष करतो. पोलीस तिला हाताला धरून घेऊन जातात. डॉ. देसाई देखील पोलिसांच्या सोबत जातात....त्यांच्या मागोमाग आनंदही तिथून बाहेर पडतो. पोलीस व्हॅन मध्ये मितालीला बसवण्यात येत. तो फक्त एकदा तिच्याकडे बघतो...' तू असं करायला नको होतंस मितु..' असं तो मनात म्हणतो. गालावर आलेला अश्रूचा ओघळ तो हातानेच टिपतो आणि गाडीत बसून निघून जातो.....
.......................
आनंद पोलीस स्टेशन वरून आल्यावर नेहाला सगळं सांगतो. डॉ देसाईनी सांगितलेली मॅडम दुसरी तिसरी कोणी नसून मितालीच आहे हे जेव्हा आनंदला कळत तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो... ती असं काही पाऊल उचलेलं असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्याच विचारात तो घरी येतो. नेहाला सगळं सांगितल्यावर तो तिच्या मांडीवर डोकं ठेऊन खूप रडतो. कारण त्याचे दुरावलेले सगळे मित्र त्यालमितु मुळे पुन्हा भेटतात. मिताली एक फ़्रेंड म्हणून खरंच त्याच्या साठी स्पेशल होती.आणि तिच त्याच्याशी असं वागली होती त्यामुळे त्याला काही सुचत नव्हतं. पण या सगळ्याचा सूत्रधार मितालीच असल्यामुळे तिला त्याची शिक्षा मिळणं आवश्यक होतं. मग नेहाने डॉ. देसाईंचीच यासाठी मदत घ्यायची ठरवली आणि पोलिसांच्या मदतीने त्यांनी मितालीला पकडलं.. आपल्यामुळे आनंद आणि मितालीची मैत्री तुटली याचं तिला वाईटही वाटत होतं...!!
.............................
परांजपे काकाही दोन दिवसांनी शुद्धीवर आले. आनंद आणि नेहा दोघेही त्यांना जाऊन भेटले. नेहाचे त्यांनी खूप आभार मानले. 'ती नसती तर माझं काय झालं असत काय माहित ' ते अस म्हणताना आनंदने अभिमानाने नेहाकडे पाहिलं. हळुहळु त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. लवकरच ते पुन्हा एकदा संजीवनी हॉस्पिटलला जॉईन झाले. या सगळ्या प्रकारानंतर मात्र आनंदच कशातच लक्ष लागत नव्हत.. अशातच त्याला MS साठी अमेरिकेचं कॉलेज मिळाल्याचं त्याच्या एका सरांनी फोन करून त्याला सांगितलं. त्यामुळे तो खुश झाला. थोड्या वेळासाठी का होईना तो हे सगळं विसरला.. त्याने मग मनाशी काहीतरी ठरवून नेहाशी आणि आईशी बोलायचं ठरवलं.
......................................
त्यानंतर पंधरा दिवसातच त्याने आई आणि नेहाला घेऊन MS साठी अमेरिकेला जायचं ठरवलं. संजीवनी हॉस्पिटलची सगळी जबाबदारी त्याने परांजपे काकांवर टाकली....त्यामुळे आता त्याला कसलीच काळजी नव्हती. पण वृषालीताई इतक्या लांब अमेरिकेला यायला तयार नव्हत्या. मग त्यावर उपाय म्हणून त्यांनी गावाला नवीन घरात जाऊन राहणं पसंत केलं. आनंद त्यांना असं एकट्याला ठेवायला तयार नव्हता. तरीही गावी आपली सगळी जिवाभावाची माणसं आहेत तुम्ही काळजी करू नका असं वृषालीताईंनी सांगितल्यावर त्याचा जीव भांड्यात पडला..शेवटी तो आणि नेहा दोघेच अमेरिकेला जायला निघाले....आनंद आणि नेहाच्या नात्याचे रेशमी बंध आता कायमस्वरूपी अतुट झाले होते ....!!!!! नातं कोणतही असुदे त्या नात्यात प्रेम, आपुलकी , विश्वास या सगळ्यांसोबत संयम आणि आपल्या जोडीदाराला समजून घेणंही असावं लागतं... तरच ते नात फुलत आणि टिकतंही...आजच्या काळात माणसांना गरज असते ती प्रेमाची नि आपुलकीची... प्रत्येकालाच वाटत असतं समोरच्याने आपल्याला समजुन घ्यावं पण हेच आपणही करायला हवं ना.....?? आपल्याप्रमाणेच आपला जोडीदारही कामं करतो, थकतो , आपल्या अडीअडचणीच्या वेळी आपल्या सोबत ठामपणे उभा राहतो.... आणि हे सगळं करत असताना त्यालाही स्वतःच्या काही भावना आहेत, विचार आहेत , मत आहेत.....असा जर प्रत्येकाने विचार केला तर कोणतंच नातं तुटू शकत नाही...!!!! नात्याचे बंध हे अदृश्य असतात पण तेच बंध तुटणाऱ्या धाग्याचे आहेत की रेशमाचे आहेत हे आपल्यावरून ठरतं......!!!!!
समाप्त....
माझ्या पाहिल्या वहिल्या कथेला वाचकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे खूप खूप आभार...!!! कथेला एवढा प्रतिसाद मिळेल असं मला वाटलंच नव्हतं. तुमचं प्रेम असंच राहूदे... सध्या मी ' तुला पाहते रे ' नावाची कथा आपल्या इरावर लिहत आहे. त्याही कथेला तुम्ही तितकाच प्रतिसाद द्याल अशी मला आशा आहे...लवकरच आपण व्हिडीओ मार्फत भेटू....पण त्या आधी तुम्हाला माझ्या पुढील लिखाणातून कोणती स्टोरी वाचायला आवडेल ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा. म्हणजे माझ्याकडून एखादी लव्ह स्टोरी नाहीतर सस्पेन्स स्टोरी वाचायला आवडेल ते मला नक्की कमेंट करून सांगा...तुमच्या उत्तराची मी वाट पाहतेय.. सर्वाना खूप खूप धन्यवाद....!!!!
सायली विवेक.