हे बंध रेशमाचे - भाग 38

Love story

हे बंध रेशमाचे - भाग 38

नेहाच्या डोक्यात काहीतरी कल्पना तयार होऊ लागली. पण आनंद नसताना असं धाडस करणं योग्य की अयोग्य तिला कळेना. तिने मग परब मॅडमची मदत घ्यायचं ठरवलं. कारण त्याच तिच्यासाठी जवळच्या आणि विश्वासु माणूस होत्या. परब मॅडमना फोन करून तिने त्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी घातल्या. त्यांनीही तिला मदत करण्याच आश्वासन दिलं. आनंदच्या त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे उद्या हॉस्पिटल मध्ये काहीतरी घडणार होतं. त्यानुसार त्या सगळ्याची तयारी आजच करायला हवी होती. तिने आनंदच्या विश्वासू माणसाला परत फोन केला आणि हॉस्पिटल मधल्या लोकांवर आणि त्याच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवायला सांगितलं. आनंदला एकदा फोन करून विश्वासात घ्यावं का असा विचार तिच्या डोक्यात येऊन गेला. पण उगीचच तो तिकडे काळजी करत राहील म्हणून तिनं त्याला सांगायचं टाळलं. 

........................................

दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदचा तिला फोन आला. ती नुकतीच झोपेतून उठत होती. रात्रभर ती हॉस्पिटलचाच विचार करत होती. शेवटी तिच्या डोक्यात एक प्लॅन तयार झाला आणि पहाटेच्या दरम्यान तिला झोप लागली. त्यामुळे सकाळी जरा उशिराच तिला जाग आली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रिन वरती आनंदच नाव वाचून तिला छान वाटलं.

" हॅलो....गुड मॉर्निंग मिसेस देशमुख...." पलीकडून आनंद मोठ्या उत्साहात तिच्याशी बोलत होता.

" गुड मॉर्निंग......" ती अजूनही जरा पेंगुळलेली होती. जांभई देत ती कसतरी म्हणाली.

" हे काय अजून उठली नाहीयेस का....?? " तिचा आवाज ऐकून त्याला आश्चर्य वाटलं.

" हो.....ते रात्री जरा झोपायला उशीर झाला ना.....आआहहहहह...." तिने अजून एक जांभई दिली.

" का तो......माझी आठवण येत होती का...?? " त्याने अगदी साळसूदपणे विचारलं. 

" नाही......मी जरा पुस्तक वाचत पडले होते..." तिने हॉस्पिटल बद्दल सांगणं टाळलं.

" म्हणजे .....मी गेल्यापासून तुला एकदाही माझी आठवण आली नाही का....?? " आनंद

" असं काही नाही...." ती लाजत म्हणाली.

" मग कसं........ फार आठवण येतेय ग तुझी म्हणून फोन केला...तुला पण मी घेऊन यायला हवं होतं...." तो म्हणाला

" हो का.....मग इथे हॉस्पिटलकडे, घराकडे कोण लक्ष देईल...." ती पटकन बोलून गेली. काय बोललो ते लक्षात येताच तिने जीभ चावली.

" हो......ते एक टेन्शन आहेच अजून हॉस्पिटलचं.....लवकरात लवकर सगळं शोधायला हवंय....मी तिकडे आलो की त्यातच लक्ष घालणारे....." त्याचा थोडासा मुड ऑफ झाल्यासारखं तिला वाटलं. 

" हो ते बघू आपण....तुमचं लेक्चर आहे ना आज...ऑल द बेस्ट...." ती छान हसत म्हणाली.

" हो थॅंक्यू डिअर......चल मी निघतोय आता...संध्याकाळी फोन करेन. बाय. " आनंद

" बाय..." म्हणून तिने फोन कट केला.


त्याचा फोन आल्याने तिचा मुड एकदम फ्रेश झाला. तिने एक मोठा आळस दिला आणि उठून ती आवरायला गेली. दिवसभरात तिने तिची सगळी कामं उरकली. गाडी शिकल्यामुळे ती आता स्वतःच सगळीकडे एकटीने फिरायची. त्यामुळे तिला आता कसलीच भीती किंवा दडपण वाटत नव्हतं. संध्याकाळी सगळं आटपून ती घरी आली. आनंदचा लेक्चर छान झाल्याचा फोन आला. वृषालीताई आणि नेहा दोघींशीही तो बोलला. थोडा वेळ इकडंच तिकडंच बोलून त्यांनी फोन ठेवला. त्याचा फोन झाल्यानंतर नेहाने वृषालीताईंना विश्वासात घेऊन सगळं सांगितलं. नेहाच्या अशा वागण्याचं त्यांना कौतुक वाटतं होतं आणि थोडी भीतीही....!!! पण काय करणार आजची रात्र फार महत्वाची होती.. आनंदचा पुन्हा फोन आला तर त्याला यातलं काहिही सांगू नका असं नेहाने त्यांना बजावलं. रात्रीचे साडेनऊ वाजत आले. नेहाने गीता मावशी आणि बाकी ड्रायव्हर काकांना घरावर नीट लक्ष ठेवायला सांगितलं. पार्किंग मधून आवाज न करता तिने हळूच गाडी बाहेर काढली आणि हॉस्पिटलच्या दिशेने गाडी वळवली.

...............…....................

तिने हॉस्पिटलच्या पार्कींग मध्ये थोड्या अंधाऱ्या भागात गाडी पार्क केली आणि ती आत आली. लिफ्टने न जाता मुद्दाम ती जिन्याने दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या आनंदच्या केबिनकडे गेली. जवळजवळ साडेदहा वाजत आले होते. केबिनचं दार उघडून ती आत आली. आनंदने ठेवलेला तो माणूस आपलं काम करत होता. त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं तसं तो उठून उभा राहिला आणि त्याने तिला बसायला सांगितलं. तो लॅपटॉपवर सीसीटीव्ही फुटेजेस बघत होता. त्याने नेहाला पूर्ण माहिती दिली. सगळे सीसीटीव्ही व्यवस्थित काम करत होते. बाकीच्या मजल्यांवर अजूनही काही पेशंटची गोळ्या औषध देणं, त्यांची सलाईन चेक करणं, त्याचं प्रेशर चेक करणं या गोष्टी नाईट ड्युटीला असणाऱ्या नर्स करत होत्या. त्याने तिला स्टोअर रूमच्या दिशेने जाणाऱ्या कॉरिडॉर मधला सीसीटीव्ही दाखवला. नऊच्या सुमारास जनरल वोर्ड मधल्या पेशंटला हलवण्यात आलंय असं त्यानं तिला सांगितलं. पण त्या पेशंटला कुठे नेलंय ते त्यांना कळेना. पण त्याच्या अंदाजानुसार स्टोअर रूमच्या आत असलेल्या दारापलीकडेच तो व्यक्ती असावा असं त्याला वाटलं. तिने त्याला आपला प्लॅन नीट समजावून सांगितला. 

..............................

रात्री बाराच्या सुमारास एका पेशंटला स्टोअर रूमच्या दिशेने नेण्यात आले. त्याच्यासोबत दोन नर्सेस , दोन डॉक्टर आणि एक वोर्डबॉय होता. स्टोअर रूमच्या आतल्या दरवाज्याचं लॉक त्यांच्यापैकी एका डॉक्टरनी पुढे होऊन उघडलं आणि त्या पेशंटला तिथुन आत नेण्यात आले. प्रत्येकाचे चेहरे मास्कनी आणि ऑपरेशन कॅपनी झाकले होते. त्यांच्यामध्ये नेहा आणि तो माणूसही वेष बदलून गेले होते. त्या दरवाज्यातून आत गेल्यावर नेहा आणि तो सगळीकडे बघतच राहिले. आतमध्ये एक पूर्ण ऑपरेशन थेटर तयार केलेलं होतं. वरती स्पॉट लाईट ...पेशंटला ठेवण्यासाठी जागा...बाजूच्याच भांड्यात सीझर, कापूस आणि बाकी ऑपरेशनसाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आले होते. नेहा सोबत असणाऱ्या माणसाने तो जनरल वोर्ड मधलाच पेशंट असल्याचं तिला हळू आवाजात सांगितलं. त्या पेशंटच उद्या ऑपरेशन होतं पण त्या आधीच त्याला इकडच्या रूम कडे का आणलं गेलंय ते त्यांना कळेना. बाकीच्या नर्स आणि डॉक्टर सोबत ते दोघेही ऑपरेशनची तयारी करू लागले. काय घडतंय याचा नेहाला अंदाज येऊ लागला. तशी तिच्या शरीरातून एक भीतीची लहर गेली....तिचं पूर्ण अंग शहारलं..!! त्या पेशंटची एक किडनी ऑपरेशन करून काढायची होती असं तिला डॉक्टरांच्या बोलण्यातून लक्षात आलं. कसही करून त्या व्यक्तीला तिला वाचवायचं होतं. डॉक्टर बोलण्यात गुंतले होते हीच संधी साधून तिने आपल्या सोबतच्या माणसाला खूण केली. त्याने हळूच त्या पेशंटचे सलाईन वगरे काढून त्या पेशंटला स्टेचर वरून सरकवायला सुरवात केली. तोपर्यंत नेहाने दुसऱ्या नर्सला आणि वोर्डबॉयला बोलण्यात गुंतवून ठेवलं. त्याने हळुहळु पेशंटला सरकवून इमर्जन्सी एक्झिटच्या दारातून बाहेर नेले. तो पेशंट अजूनही बेशुद्ध होता. त्याने हॉस्पिटलच्या वोचमनला शिटी मारून त्या पेशंटला न्यायला सांगितलं आणि तो आत आला. तोपर्यंत डॉक्टर आणि बाकीच्यांचे लक्ष त्याच्याकडे गेलं. 

" इथला पेशंट कुठे गेला..??.." डॉक्टरनी विचारलं. 

कोणीच काही बोलायला तयार होईना. तेव्हा त्यांना राग आला.  रागाने त्यांनी त्यांच्याजवळच रिव्हॉल्व्हर बाहेर काढलं तसे सगळेच घाबरले. ते पत्येकाला विचारू लागले. त्यांना नेहा आणि त्या माणसाचा संशय वाटला म्हणून त्त्यांनी त्या दोघांनाही आपल्या चेहऱ्यावरचे मास्क बाजूला करायला सांगितले. समोर नेहाला पाहून त्या डॉक्टरना आश्चर्य वाटलं.


" नेहा मॅडम तुम्ही.....???? तुम्ही इथे कशा....??? " ते गडबडीने म्हणाले. 

अजूनही डॉक्टरांच्या चेहऱ्यावर मास्क तसेच होते. त्यामुळे ते नक्की कोण आहेत ते नेहाला कळेना. ती काहीच न बोलता उभी होती.


" आता तुम्हाला सगळं कळलंय तर....तुम्ही इथपर्यंत आलायत पण तुम्ही इथून बाहेर जाऊ शकत नाही..." असं म्हणून त्यांनी तिच्या दिशेने रिव्हॉल्व्हर रोखलं. 


तिने मान खाली घालून आपल्या ड्रेसच्या खिशातून स्प्रे बाहेर काढला आणि कोणाला काही कळायच्या आतच त्या डॉक्टर्स आणि नर्सच्या डोळ्यात स्प्रे उडवून ती दोघ इमर्जन्सी एक्झिटच्या दरवाज्यातून पळाली.. त्यांच्यापाठोपाठ ते डॉक्टरही बाहेर आले. ती एमर्जन्सी एक्झिट मेन गेटच्या बाजूच्या भिंतीतूनच बाहेर पडत होती. सगळे जण मेन गेटपाशी आले. डॉक्टर्स वगरे अजूनही स्प्रे उडाल्यामुळे डोळे चोळत उभे होते..त्यांनी समोर पाहिलं तर पोलीस उभे होते. पोलिसांना पाहून त्यांची भीतीने गाळणच उडाली. ते तिथून पळून जाऊ लागले. तसं पोलिसांनी चारही बाजूने त्यांना घेरलं. नेहा परब मॅडम जवळ येऊन थांबली. तिच्या सांगण्याप्रमाणे त्या वेळेत पोलिसांना घेऊन हजर झाल्या. त्यामुळेच गुन्हेगार पकडले गेले होते. पोलिसांनी त्या डॉक्टरच्या चेहऱ्यावरचे मास्क बाजूला केले. त्यांना पाहून नेहाला फार आश्चर्य वाटले.


" डॉक्टर.......तुम्ही ...." तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.

क्रमशः.......

🎭 Series Post

View all