हे बंध रेशमाचे - भाग 32

Love story

हे बंध रेशमाचे - भाग 32

नेहा पळतच टेरेसवर आली. मोरपंखी रंगाची काठाची साडी त्यावर मंगळसुत्र, छोटासा बकुळीहार....हातात हिरव्या आणि सोनेरी बांगड्या...कानांत झुमके...कपाळाला चंद्रकोर...आणि पिन लावून मोकळे सोडलेले केस...ती खूप लोभस दिसत होती ....!!! ती वरती आली पण तिथे पूर्ण काळोख होता म्हणून मग तिने आनंदला हाका मारल्या.तसे सगळीकडचे लाईट लागले. तिनं पाहिलं तर पूर्ण टेरेस लायटिंग लावून सजवला होता. मधोमध पडदे लावून चोकोनी डेकोरेशन केलं होतं. त्यात दोन पाट..होमकुंड अस सगळं ठेवलेलं तिला दिसलं. त्याच्या बाजूला एक मोठा हार्ट शेप गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवला होता...त्याच्या बाजूने सुगंधी कँडल ठेवल्या होत्या..त्यामुळे वातावरणात त्याचा सुगंध पसरला....ती हे सगळं बघून खूप खुश झाली...इतक्यात तिला पाठीमागून कोणाचीतरी चाहूल लागली. तिच्या केसात अलगद एक मोगऱ्याचा गजरा माळला गेला. मोगऱ्याच्या वासाने तिला छान वाटलं. आनंद तिच्या समोर आला..तशी ती छान लाजली आणि तिने त्याला मिठी मारली. पुन्हा त्याच्यापासून लांब होत तिनं पाहिलं तर तोही छान कुर्ता घालून आला होता. तिला काही कळेना न राहवून तिने विचारलंच....

" हे काय आहे सगळं....." ती गोंधळून म्हणाली.

" शशशशश.........." त्याने तिला तोंडावर बोट ठेवून सांगितलं आणि तिला घेऊन पडदे लावले होते तिथे आला. त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला...

" नेहा आपलं लग्न फार अचानक ठरलं....मी सुरवातीला या सगळ्यासाठी नकारच दिला होता पण आईच्या इच्छेसाठी मी हे लग्न केलं..मला तू अजिबात आवडत नव्हतीस..." तो काहीसं दुसरीकडे बघत म्हणाला.

".............." तो काय बोलतोय ते ऐकत ती शांतपणे उभी राहिली. 

" लग्नाच्या वेळी माझं मन कशातच नव्हतं...मी माझ्याच विचारात होतो ग....पण तुझ्या सोबत राहून समजायला लागलं की आपण जसं एखाद्या माणसाला समजतो तसा तो असतोच असं नाही...मी खूप चुकीचं वागलो तुझ्याशी....खरचं मला माफ कर..." तो खाली मान घालून म्हणाला.

"असं नका म्हणू तुम्ही...." तिनं त्याच्या तोंडावर हात ठेवत म्हटलं.तसं त्यानं तिचा हात खाली करत हातात घेतला आणि म्हणाला...

" आणि म्हणूनच मी आज तुझ्यासाठी हे सगळं केलंय.. आज आपण पुन्हा नव्याने सुरवात करणार आहोत. लग्नात दिलेली वचनं मला आठवत ही नाहीयेत...पण आज मी अग्नीच्या साक्षीने पुन्हा एकदा तुला वचन देणार आहे..." असं बोलून तो गुडघ्यावर खाली बसला...

" माझी लाईफ पार्टनर म्हणून मला आयुष्यभर साथ देशील ? " त्याने हात पुढे करत विचारलं. 

" हो...." तिनं त्याच्या हातात हात देत म्हटलं. 

मग त्याने त्या होमकुंडात अग्नी पेटवला. तिचा हात हातात घेवुन तिला म्हणाला...

" लग्नातली वचनं मला आठवत नाहीयेत....पण मी मला जमेल तशी वचनं आज तुला देणारे....थोडी आधुनिक आहेत पण समजून घे..." तो हसून म्हणाला.त्यावर तिनंही छान हसून मान डोलावली.

त्यांनी अग्नी भोवती एक फेरा पूर्ण केला

" मी तुला पहिलं वचनं देतो की मी सगळ्या सुख दुःखात तुझ्या सोबत असेन.." पुन्हा त्यांनी एक फेरा पूर्ण केला.

" माझ्या प्रत्येक गोष्टीत पत्नी म्हणून तुला समान हक्क असेल ....."

नेहाला हे सगळं विलक्षण वाटत होतं..आनंद फक्त त्याचं प्रेम व्यक्त करत नव्हता तर एक पत्नी म्हणून त्याच्या आयुष्यातलं नेहाचं स्थान अढळ करत होता..हे सगळं बघून ती खूप हरखली...त्याच्या या सरप्राईजमुळे ती त्याच्या नव्याने प्रेमात पडली. त्यांनी अग्नी भोवती तिसरा फेरा पूर्ण केला. 

" माझ्याकडून कोणत्याही प्रकारे तुझा अपमान होणार नाही याची मी काळजी घेईन. " 

आनंद देत असलेली सगळी वचनं आजच्या काळात एका स्त्री साठी....एका पत्नी साठी म्हणून कितीतरी मोलाची आहेत असं नेहाला वाटलं. त्यांनी चौथा फेरा पूर्ण केला.

" एक व्यक्ती म्हणून तुझ्या मतांचा , तुझ्या भावनांचा कायम आदर करेन.." 

आनंदने नेहाकडे पाहिलं...ती त्याच्या मागून चालत होती. दोघांचेही हात एकमेकात गुंफले होते. ती किती खुश होती हे तिच्या चेहऱ्यावरून त्याला कळत होतं. त्यांनी अग्नी भोवती पाचवा फेरा पूर्ण केला.

"कितीही भांडणं झाली तरी आपलं नातं कधीच तुटू देणार नाही..." 

हे वचन देताना त्याच्या डोळ्यासमोर नेहाला तो प्रत्येकवेळी ओरडायचा ते आठवलं....आणि काहीसं वाईटही वाटलं..मग त्यांनी गोल फिरून सहावा फेरा पूर्ण केला.

" तुझ्या स्वाभिमान आणि आत्मसन्मानाला कधीही ठेच लागू देणार नाही." 

नेहा तर त्याच्याकडे नुसती पाहत त्याच्या मागून चालत होती... अगदी भान हरपल्यासारखी...!! आनंदच वेगळंच रूप तिला आज दिसत होतं..आणि त्यांनी अग्नी भोवती शेवटचा फेरा पूर्ण केला..

" आता सगळ्यात महत्त्वाचं वचन...." आनंद 

" काय ते...." नेहा

" पुढच्या सगळ्या जन्मात मी बायको म्हणून तुलाच book करून ठेवलंय..."

" हो का...." ती हसून म्हणाली.

" हो म.....?? तुला नको का मी.....?? " तो लटक्या रागाने म्हणाला..

" नाही असं काही नाही अगदी....पण म्हणजे पुढच्या जन्मी पण काही choice नाही आम्हाला....." ती त्याची मस्करी करत म्हणाली..

" जा तू....मी एवढं केलं त्याच काहीच नाही.... मला बर्थडे च गिफ्ट पण दिलं नाही कोणी..." तो तिच्यापासून लांब जात काहीसं रागावून म्हणाला....

" बाप रे......केवढा तो राग....गालावर फुगा नुसता...." ती आलेलं हसू दाबत म्हणाली.... त्यावर त्याने फक्त रागावून मान हलवली. ती हळुच त्याच्या जवळ गेली...


" बघू तरी किती मोठा फुगा आलाय ते....मोठी टाचणी शोधावी लागेल फुगा फोडायला...." 

ती हसत हसत त्याच्या जवळ गेली..तिनं हळूच त्याच्या गालावर एक किस दिला आणि ती खाली रूमकडे पळाली...आनंदला दोन मिनिटं काही कळलंच नाही काय झालं ते....पण जेव्हा कळलं तेव्हा तो खूप खुश झाला..त्याने आजूबाजूला पाहिलं तर नेहा कुठेच दिसेना...मग तोही टेरेसचे लाईट बंद करून रूम मध्ये आला..नेहा रूम मध्येच पाठमोरी उभी होती..तो आत आला आणि त्याने खोलीचं दार लावून घेतलं. तिच्या जवळ तो आला आणि तिला फिरवून आपल्याकडे वळवलं... ती लाजून तशीच उभी राहिली..तो एका हाताने हनुवटी वर करून तिचा चेहरा बघत होता इतक्यात तिने लाजून दोन्ही हातानी आपला चेहरा झाकून घेतला .....मग आनंदने तिला ओढून आपल्या मिठीत घेतलं....

" I love you Neha .....Love you forever..." तो म्हणाला.

" Love you too..." नेहा म्हणाली. 

दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले. आनंद आणि नेहाच्या संसाराला आता खऱ्या अर्थाने सुरवात झाली होती....ती रात्र त्यांच्या प्रेमाची साक्ष देत गडद होत गेली...!!!

..........................

आनंदच तर आता नेहाशिवाय पान हलत नसे. थट्टा, मस्करी.... थोढीशी कुरबोरी... करत त्यांचं नातं फुलत होतं..दिवसेंदिवस नेहाच्याही व्यक्तिमत्वात बदल होत होता. 'घरकुल'ची काम ती आता तेवढ्याच आत्मविश्वासाने करू लागली. देणगीदारांकडून देणगी मिळवणं...अनाथ मुलांना आपल्या NGO मध्ये घेवुन येणं... मुलांना , आजी आजोबांना लागणाऱ्या गोष्टी त्यांना चांगल्या आणि  वेळेत पुरवण्याकडे तिचा कटाक्ष असे..त्यांचं जेवण, औषध , गोळ्या , मेडिकल चेकअप हे सगळं ती आता एकहाती पाहू लागली होती. त्यामुळे परब मॅडमचा बराचसा भार कमी झाला. त्या आता NGO चा प्रसार करण्यासाठी बाहेर जावू लागल्या.तेव्हा घरकुलची जबाबदारी नेहावर असे. ती सगळं व्यवस्थित सांभाळतहोती. आनंद देखील तिला जमेल तेवढी तिच्या कामात मदत करे...संध्याकाळी घरी आल्यावर दिवसभराच्या सगळ्या गोष्टी दोघेही एकमेकांना सांगत...त्यामुळे घरातही खेळीमेळीचं वातावरण राही...त्या दोघांना असं पाहून वृषालीताईंना बरं वाटे..आनंद पुन्हा पहिल्या सारखा वागायला लागल्याचं समाधान त्यांना होतं.... आणि हे सगळं शक्य झालं होतं ते नेहामुळे....!!!! 

.…........................

एकदा घरकुल मधल्या एका आजींना चक्कर आली. त्यामुळे नेहा त्यांना घेवून त्यांच्याच संजीवनी हॉस्पिटलला आली. त्या आजींना दोन दिवस ताप येत होता. पण कशाला उगीच आपल्यामुळे बाकीच्यांना त्रास असं वाटून त्यांनी ते अंगावर काढलं. तापामुळे त्यांचं जेवणही कमी झालं होतं. नेहाने त्यांना ऍडमिट केलं. काही आवश्यक फॉर्मलिटीस तिने पूर्ण केल्या. त्या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची ती मालकीण होती तरीही त्याचा कोणताही मोठेपणा न दाखवता ती बाकीच्यांप्रमाणे डॉक्टर काय सांगतात त्याची वाट पाहत बसली. मागोमाग आजींचे यजमान देखील हॉस्पिटलला आले..आजींना अशी चक्कर आल्यामुळे ते चांगलेच घाबरले होते....मग नेहाने त्यांना समजावून पुन्हा घरकुल मध्ये पाठवून दिलं.. नव्याने आलेले डॉक्टर्स आणि बाकीचा स्टाफ नेहाला ओळ्खत नव्हता त्यामुळे सामान्य माणसांना जशी वागणूक मिळते तशीच तिला दिली जात होती..तिने मुद्दाम फोन करून आनंदला यातलं काहीच सांगितलं नाही..आजींना पहिल्या मजल्यावरच्या ICU मध्ये ठेवण्यात आलं होतं...दोन दिवसांनी आजींना शुद्ध आली... नेहाने त्यांना पाणी दिलं...त्यांच्यासाठी ती घरून डबा घेवुन आली होती...आजींच्या डोळ्यात तर पाणी आलं...आपली सख्खी लेकही करणार नाही इतकं नेहा आपल्यासाठी करते याचंच त्यांना अप्रूप होतं... चार दिवसांनी आजींना घरी सोडण्यात आलं. रिसेपशनिस्ट कडून नेहाने आजीचं बिल घेतलं..पाच ते सहा दिवसाचं त्यांचं बिल जवळजवळ पंचवीस हजाराच्या आसपास होतं.. ते बघून आजोबांच्या पायाखालची जमीनच सरकली..कारण बिल भरण्याइतपत पैसे त्यांच्याजवळ नव्हते. नेहाने ते बिल पुन्हा एकदा नीट पाहिलं...बिलामध्ये काहीतरी गडबड असल्याचं तिला वाटलं......

क्रमशः.....


काही इमर्जन्सी मुळे मी गेले तीन चार दिवस बिझी होते. त्यामुळे भाग पोस्ट करायला उशीर झाला..त्याबद्दल क्षमस्व..मला आहे की वाचक मंडळी समजून घेतील. पुढील भाग उद्या संध्याकाळ पर्यंत पोस्ट केला जाईल. तुमचे अभिप्राय वाचून खरंच खूप छान वाटलं की तुम्ही कथा किती मिस करताय.या कथेवर असेच प्रेम करत राहा. पुढील भाग एक दिवसाच्या फरकाने पोस्ट केले जातील...

🎭 Series Post

View all