हे बंध रेशमाचे - भाग 17

Love story

हे बंध रेशमाचे - भाग 17

आनंदला घेऊन आप्पासाहेब लग्नमंडपात आले. लग्न विधींसाठी तिथे एक स्टेज लावण्यात आला होता. आप्पा , आनंद आणि इतर मंडळी स्टेजवर आली. गुरुजींनी दोन पाट समोरासमोर ठेवले. नातेवाईकांपैकीच एकाला मध्ये अंतरपाट धरायला त्यांनी बोलावलं.सर्वांना अक्षता वाटण्यात आल्या .आनंदला अंतरपाटाच्या एका बाजूच्या पाटावर उभं राहायला सांगितलं आणि  गुरुजींनी मंगलाष्टका म्हणायला सुरवात केली. तो पाटावर उभा राहिला. एक मंगलाष्टक झाल्यावर त्यांनी मुलीला घेऊन यायला सांगितलं.नेहाचे मामा तिला घेऊन लग्न मंडपात आले आणि त्यांनी तिला पाटावर उभं केलं. मंगलाष्टका सुरू होत्या. नातेवाईक उत्साहाने मंगलाष्टक म्हणत होते. नेहाच्या डोळ्यात आसवं उभी राहिली होती. पण तिनं हळूच जवळच्या रुमालाने आपले अश्रू टिपले.मग दोघांच्याही हातात हार देण्यात आले.गुरुजींनी शेवटचे मंत्र म्हणून अंतरपाट दूर केला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. पिवळया रंगाची आणि गडद निळ्या काठाची साडी...त्यावर गळ्यालगत चिंचपेटी , थोडा खाली पेंडलंच गळ्यातलं... एक मोठा हार..हातात हिरव्या आणि सोनेरी बांगड्या...मेहेंदीने भरलेले हात... काळेभोर डोळे , नाजूक ओठांवर गुलाबी रंगाची लिपस्टिक..लग्नाला साजेसा मेकअप आणि हेअर स्टाईल..कपाळाला नक्षीदार मुंडावळ्या...!!!! नेहाचं ते साजरं रूप आनंद पाहतच राहिला....!! आनंदने देखील बदामी रंगाची शेरवानी आणि पायजमा त्यावर मरून रंगाची ओढणी....डोक्यावर फेटा..कपाळाला टिळा आणि मुंडावळ्या...या वेशात छान दिसत होता.दोघांनी एकमेकांना हार घातले. सर्वांनी वधूवरांवर अक्षता टाकल्या... फटाक्यांची आतषबाजी झाली..सनई चौघडे वाजू लागले.....!!!!

.............................

गुरुजींनी कन्यादानाच्या विधींसाठी आप्पासाहेबांना स्टेजवरती बोलावले. आनंद आणि नेहाचे हात एकमेकांवर ठेवून आप्पानी पळीने पाणी सोडले. गुरुजी मंत्र म्हणत होते आणि आप्पांचे डोळे मात्र पाण्याने वाहत होते..त्यांना बघून नेहाच्याही डोळ्यात पाणी आलं होतं.. कन्यादान हे सगळ्यात मोठं दान का आहे हे त्यांना आज जाणवलं..इतकी वर्षं प्रेमाने सांभाळलेला आपल्या पोटचा गोळा एका माणसाच्या भरवशावर आपण देऊन टाकतो याचं त्यांना नवल वाटलं......!!!!!! साश्रु नयनांनी त्यांनी नेहाचं कन्यादान केलं आणि ते डोळे पुसत स्टेजवरून खाली आले. नेहाची आई आज हवी होती असं त्यांना फार वाटत होतं...मग गुरुजींनी पाटावर मंगळसुत्र ठेवुन त्यावर त्यांना हळदी कुंकू घालायला सांगितलं. आनंदने त्याप्रमाणे केलं आणि नेहाच्या गळ्यात मंगळसुत्र घातलं...तिनं ते हातात धरुन नीट पाहिलं..आणि स्वतःशीच हसली. प्रत्येक विधीचे फोटोग्राफर छान फोटो काढत होता. लग्नाचे विधी चालू होते. दुसरीकडे आप्पासाहेबांना नातेवाईक येऊन भेटून जात होते. बाजूच्या मांडवात जेवणाच्या पंगती वाढायला सुरवात झाली. एका मागून एक पदार्थ  वाढले जात होते. जेवणाचा सगळीकडे घमघमाट सुटला होता. बाकीची मंडळी आपल्या आपल्या ओळखीची माणसं बघून त्यांच्याशी गप्पा मारत होती. आप्पासाहेबांच्या लेकीचं लग्न त्यामुळे पंचक्रोशीतील सगळे मान्यवर आणि मोठया घरातील व्यक्ती आल्या होत्या. आप्पासाहेब त्यांचा पाहुणचार करण्यात गुंतले होते. गुरुजींनी सप्तपदीच्या विधीला सुरवात केली. आधी मंत्र म्हणून होमात टाकण्यासाठी लाह्या ते आनंद आणि नेहाच्या हातात देत होते. दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले आणि होमात लाह्या टाकल्या..त्याच्या पहिल्या वाहिल्या स्पर्शाने नेहा मोहरली. मग होमाभोवती एक फेरी मारून फुलांनी तयार केलेल्या सप्तपदीवरच्या पहिल्या सुपारीला पाय लावायला गुरुजींनी सांगितलं. तसं करताना ते त्यांच्याकडून वचनही म्हणून घेत होते. सप्तपदी पूर्ण झाली...दोघेही लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले गेले....सप्तपदी चालू असताना दिली जाणारी सहधर्माची , जबाबदारीची, कौटुंबिक सुखं दुःखाची वचनं आनंदने मात्र फक्त लग्नाच्या विधींपूर्तीच म्हटली होती. 'कोणत्याही गोष्टीत मी तुझ्या सोबत नसेन तू माझी बायको कधीही होऊ शकणार नाहीस ' असं त्यानं मनाशी ठरवलं. नेहा मात्र खूप खुश होती. वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करून ते पुन्हा स्टेजवर आले. रीसेप्शन साठी दोघंही चेंज करायला आपापल्या खोलीत गेले. वृषालीताईंनी घेतलेली पैठणी नेहाला आणून दिली. मोरपंखी रंगाची आणि जांभळ्या काठाची सुरेख पैठणी होती. नेहा तयार होऊन पुन्हा स्टेजवर आली. आनंद देखील छान सूट घालुन आला. मग फोटोग्राफरने त्यांचे फोटो काढायला सुरवात केली. दोन्ही घरचे नातेवाईक येऊन भेटून जात होते नव्याने प्रत्येकाशी ओळख होत होती. सगळेजण आवर्जून फोटो काढत होते. मग त्या दोघांनाही जेवणासाठी सगळे घेऊन गेले. 

.........................

जेवणाची शेवटची पंगत नातेवाईकांसाठी होती. त्यांच्या मधोमध दोन पानांवरती आनंद आणि नेहाला बसवण्यात आलं. जिलबीचा बेत होता. ताटं वाढण्यात आली. सगळे पदार्थ वाढून झाले. तसे सर्वांनी त्यांना घास भरवण्याचा आग्रह केला. नेहाला खूप छान वाटतं होत. ती उठुन नेहाला घास भरवत होती तसा सगळ्यांनी उखाणा उखाणा असा एकच गलका केला. हो म्हणून तिनं छान उखाणा घेतला.

नव्या जीवनाची सुरवात ही खास
आनंदरावांना भरवते प्रेमाचा घास...

असं म्हणून तिनं त्याला जिलबीचा घास भरवला. पण सगळ्यांनी खूप आग्रह करूनही आनंदने मात्र नाव घेतलं नाही. त्याने फक्त दाखवायला तिला थोडस भरवलं आणि तो जेवू लागला..


क्रमशः.......


काय मग वाचकहो तुम्हालाही लग्नाला जाऊन आल्यासारखं वाटलं ना...? आजचा भाग कसा वाटला ते जरूर कळवा. पुढील भाग परवा सकाळी पोस्ट केला जाईल. कथेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन. कथा आवडल्यास नावसाहित शेअर करावी

🎭 Series Post

View all