हे बंध रेशमाचे - भाग 16

Love story

( पुढील भाग पोस्ट करत असताना भाग 16 चुकून डिलिट झाला होता. त्यामुळे ज्या वाचकांना तो वाचायला मिळालेला नाही त्यांच्यासाठी हा भाग पुन्हा पोस्ट करत आहे. या नंतर मात्र कथेचा पुढील भाग म्हणजे भाग 21 पोस्ट केला जाईल. )

हे बंध रेशमाचे - भाग 16

आनंदच्या केबिन मधून मिताली रडतच बाहेर आली. तिथून बाहेर पडताना मात्र 'या अपमानाची मी नक्की परतफेड करेन आनंद ' असं तिन मनाशी ठरवलं. मिताली गेल्यावर आनंद विचार करत होता.मी जरा जास्तच चिडलो का तिच्यावर ?...पण जाऊदे तिनेही मला समजून घ्यायला हवं होतं..असं स्वतःशीच म्हणत त्याने पुन्हा अभ्यासात डोकं घातलं.MS साठी प्रबंध सादर करायचा होता आणि त्यासाठी त्याला पुढील महिन्यात दिल्लीला जायचं होतं.हॉस्पिटल आणि अभ्यास या पलीकडे त्याला सध्या काही सुचत नव्हतं. लग्नाच्या गडबडीत आपले दिवस फुकट जातील त्यामुळे आधीच तो आपली एकेक कामं मार्गी लावत होता. त्याच्या कामांमुळे त्याला बाकी ठिकाणी लक्ष देणं जमत नव्हतं. त्यामुळे लग्नासाठीची खरेदी सुद्धा वृषालीताई आणि मितालीने मिळून केली.आनंदसाठी एक शेरवानी आणि एक सूट घेतला.नातेवाईकांना देण्यासाठी वस्तू आणि नेहासाठी छान पैठणी घेतली.वृषालीताई, मिताली यांनी देखील आपल्यासाठी साड्या खरेदी केल्या.
.............................

लग्नाला आता दहा बारा दिवसच शिल्लक होते.वृषालीताई, मिताली , आनंद आणि सगळे नातेवाईक गावी आले.लग्नाआधी नवीन घराची वास्तुशांत करण्यात आली.त्या सगळ्याच्या तयारीत आणि कार्यक्रमात चार दिवस निघून गेले.त्यामुळे आता लग्नाला आठच दिवस शिल्लक होते.घराला छान डेकोरेशन केलं.सगळीकडे कागदी फुलांच्या माळा, लायटिंग, तोरण...सगळं सजवलं होतं.इकडे आपासाहेबांच्या घरी देखील लग्नाच्या तयारीला आता हळूहळू वेग आला होता. आप्पासाहेबांच्या घरीचं लग्न होणार होत त्यामुळे तिकडेही उत्साहाचं वातावरण होतं.वाड्यासमोर मंडप उभारला.त्याला छान लायटिंग केलं. केळीचे खोंड आणून प्रवेशद्वारावर लावले.त्यामुळे आता खऱ्या अर्थाने ते लग्न घर वाटत होतं. संगीताताई आणि बाकी बायकांनी मिळून रुखवताचे पदार्थ केले. मोठे लाडू...रव्याचा,चुरमुऱ्याचा , बुंदीचा....ते दोरे फिरवून पॅकिंग केलं.लहानमोठ्या करंज्या...केळीचा फणा.. त्यावर रंगाने नेहा आणि आनंदच नाव काढलं...मोठ्या चकल्या..वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या..गाजराच्या, खोबऱ्याच्या, कोहळ्याच्या....त्यांना वेगवेगळे आकार देवुन सजवलं...!!!! घरात खूप माणसं जमली होती.सगळ्या कार्यक्रमांना ..सर्वांच्या आनंदाला उधाण आलं होतं.नेहाची सर्वजण मस्करी करत होते.सासरी कसं वागायचं कसं नाही याच्या आपापल्या परीने सूचनाही देत होते त्यामुळे ती बावरली होती.कोणाचं ऐकू आणि कोणाचं नाही हेच तिला कळेना.त्यात आप्पाना सोडून जाण्याच्या विचाराने तिला काही सुचत नव्हतं. 

....................................

लग्नाच्या आधी चार दिवस दोन्ही घरी नेहा आणि आनंद याचं केळवण होतं. त्यांच्या आवडीचे पदार्थ केले होते.विधीवत ग्रहमक (केळवण) पार पडला.दुसऱ्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम होता.नेहाच्या कॉलेजच्या मैत्रिणी मेहंदी काढायला आल्या होत्या.

"चांगली मेहंदी काढा गं..." संगीता ताईंनी सांगितलं

"हो नवऱ्याचं नाव दिसलं नाही पाहिजे असं काढा...राहूदे शोधत रात्रभर.." असं बोलल्यावर एकच हशा पिकला. 

नेहा छान लाजली.तिला खूप छान वाटत होतं.एका नव्या घरी जाण्याची हुरहुर होतीच तरीही....थोडी भीती पण वाटत होती..मेहंदी काढून पूर्ण झाली.आनंदच नावही मेंदीत छान कोरलं गेलं..मेहंदीतही आणि नेहाच्या मनावरही.....!!!!! हळद , सीमांत पूजन हे लग्नाच्या आधीचे कार्यक्रमही छान पार पडले.सर्वांनी खूप धमाल केली. हळदीला आणि मेहंदीच्या कार्यक्रमाला देखील सगळे मनसोक्त नाचले.दुसऱ्या दिवशी लग्न होतं त्यामुळे सगळ्यांना वेळेत झोपायला आप्पासाहेबांनी पिटाळले. मग ते नेहाच्या खोलीत आले.ती बेड वर बसून आपल्या बॅगा भरत होती. तिचं लक्ष आप्पांकडे गेलं.ते किंचित दमल्यासारखे तिला जाणवले..

"काय मग झाली का सगळी तयारी..." आप्पानी बेडवर समोर बसत विचारलं

"हो झाली..." नेहा

"काही राहिलं तर नाही ना ? " अप्पा

"नाही...." नेहा

" आता उद्यापासून मी घरी एकटा...." डोळ्यात आलेलं पाणी लपवत ओठांवर हसू आणून एक बाप सांगत होता.
त्यांच्या ह्या बोलण्यावर मात्र तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं .ती उठुन आप्पांजवळ आली.त्यांच्या कुशीत शिरून ती खूप रडली.नकळत अप्पांचेही डोळे पाणावले होते.आजपर्यंत आप्पानी तिला फुलासारखं जपलं होत.तिचे सगळे लाड पुरवले होते.आई बापाची माया तिला दिली होती.लहानपणीचे, कौतुकाचे सगळे क्षण नेहाच्या डोळ्यांसमोरून जात होते. रडता रडता तिला कधी झोप लागली कळलंच नाही.आप्पानी तिला हलकेच खाली झोपवलं आणि पांगरून घातलं.तिच्या डोक्यावर प्रेमाने थोपटलं.खोलीतून बाहेर जाताना त्यांनी पुन्हा एकवार नेहाकडे पाहिलं.आपली पोर दुसऱ्याला देताना एका बापाला किती कठोर व्हावं लागतं हे त्यांना जाणवलं....!!!!! तिला जाग येऊ नये म्हणून आलेला हुंदका हातानेच  दाबून ते आपल्या खोलीत निघुन गेले....!!!

..........................................

दुसऱ्या दिवशी एकच धांदल उडाली. सकाळपासूनच घरी लाऊडस्पीकर वरती संगीत सुरू झालं.आप्पासाहेबांच्या लेकीचं लग्न होतं त्यामुळे गावातील प्रत्येक माणूस आपल्या घरातलं कार्य असल्यासारखा राबत होता. अंगणात लग्नाचे विधी करण्यासाठी फुलांच्या माळा आणि रंगीबेरंगी पडद्यानी सजवलं होतं. बाजूलाच मंडप उभारून तिथे जेवणाच्या पंगती वाढायची व्यवस्था केली होती. आप्पासाहेबांचा वाडा आज माणसांनी फुलून गेला होता. साड्या नेसून , दागिने घालून बायका मिरवीत होत्या. दुसरीकडे जेवण तयार होत होत. त्याचा घमघमाट सर्वत्र पसरला होता. वृषालीताई , आनंद आणि बाकीचे नातेवाईक सुद्धा तयार होऊन वाड्यात आले. बायकांनी ओवाळून आनंदला आत घेतलं. आप्पासाहेब आनंदच्या हाताला धरून लग्न मंडपात घेऊन आले.


क्रमशः.....

🎭 Series Post

View all