हे बंध रेशमाचे - भाग 14

Love story

हे बंध रेशमाचे - भाग 14


आनंदच्या विचारातच नेहा जिना उतरत होती.त्यामुळे खाली उभ्या असलेल्या मितालीकडे तिचं लक्ष नव्हतं. खाली उतरताना तिचा मितालीला धक्का लागला..

"काय ग दिसत नाही का ?" ....मितालीने ओरडून विचारलं

"अं.... ते चुकून लागला धक्का.....सॉरी हा ....." नेहा

"चुकून काय जरा बघून काम करत जा की ...." मिताली

'म्हणजे ही काय आपल्याला काम करणारी समजतेय का..?' नेहाच्या डोळ्यात पाणी तरळलं होत.कसंबसं तीन ते थोपवल.

एव्हाना सगळयांचच लक्ष त्या दोघींकडे गेलं होतं.नेहा काही न बोलता तिथेच उभी होती.आवाज ऐकून वृषालीताई बाहेर आल्या.काय झालंय ते त्यांच्या लक्षात आलं.त्यांनी रागाने आनंदकडे पाहिलं.पण तो काहीच न कळल्यासारखा शांत उभा होता.त्यांना वाटत होतं त्यानं स्वतःहून पुढे होऊन नेहाची ओळख करून द्यावी पण तो जागचा हलला नाही..

"अग मिताली शांत हो...ही नेहा आनंदची होणारी बायको " वृषालीताईंनी तिची ओळख करून दिली

"काय......??? " ........मितालीला आश्चर्य वाटत होते...... 'ही आनंदची होणारी बायको आहे...?' ती मनात म्हणाली

"आणि नेहा ही मिताली आनंदची कॉलेज फ्रेंड..." 
"हॅलो ...मितालीने चेहऱ्यावर उसनं हसू आणत हात पुढे केला.
"हॅलो ....नेहाने ही हात मिळवला.

साखरपुड्याची तयारी बघण्यासाठी वृषालीताईंनी मितालीला सकाळी लवकरच यायला सांगितलं होतं.आणि आल्या आल्याच नेहाचा तिला धक्का लागला होता.नेहा त्यावेळी फॉर्मल कुर्ता पायजमा असा साधा पंजाबी ड्रेस घालून होती..साखरपुडा संध्याकाळी मग सकाळपासून काय नटून राहायचं...कामात मदत पण करू असं ठरवून ती मदत करायला येत होती.. त्यामुळे मितालीने तिला काम करणाऱ्यांपैकीच एक ठरवलं होतं.....वृषालीताईंनी मग मितालीला सांगितलं की तू नेहाची तयारी कर जेवण वगरे आटपल की...मितालीने देखील हो म्हटलं. मग ती कोणाला काय हवं नको ते बघायला गेली.नेहा देखील बाकीच्या तयारीसाठी वरती खोलीत गेली.'आपल्याला मिताली एवढं बोलली मग आनंद तिला काहीच कसं बोलला नाही' हा विचार काही तिच्या डोक्यातून जाईना...


................................

संध्याकाळी चार वाजता गुरुजी आले..विधिवत साखरपुडा करायचा होता त्यामुळे त्यांनी वेळेत सुरवात केली. मुलगा आणि मुलीला घेऊन यायला त्यांनी सांगितलं. अप्पांनी दिलेली छान काठाची गुलाबी साडी नेसून नेहा तयार झाली.मितालीला तिची तयारी करायला सांगितलं होतं पण ती काही मदत हवीय का हे विचारायला सुद्धा आली नाही तिला..नेहाच्या सोबत आलेल्या गावातल्या मैत्रिणींनी तिला सजवलं..लांब केस असल्यामुळे ...समोरून पीळ देऊन केसांची छान हेअरस्टाईल केली पाठीमागे मोठा अंबाडा त्यात ब्रोच अडकवला..डोळ्यात काजळ... मस्कारा...हलकासा मेकअप.. ओठांवर फिकट लाल रंगाची लिपस्टिक...कपाळावर नाजूक चंद्रकोर ....नाकात मोत्याची नथ....हातात हिरव्याआणि सोनेरी बांगड्या... गळ्यालगत नाजूकशी ठुशी....आणि बकुळीहार...समोरून कर्ली करून सोडलेल्या दोन बटा...!!!!.नेहा तयार झाली...!!!!..तिच्या मैत्रिणी तिला तयार करता करता चिडवत होत्या.....

"काय ग तुझ्या नवऱ्याला काय हसता येत नाही वाटतं..." त्यातली एक म्हणाली
"मग काय माशी सुद्धा हलत नाही तोंडावरची..." दुसरी
"असुदे ग....तरी चांगला आहे तो...कामाचं टेंशन असेल..." ती त्यांना म्हणाली खरं पण ती  स्वतःचीच समजूत घालत होती .....तशा सगळ्या फिदीफिदी हसल्या
"तुला ग कधी सांगितलं ..." तशी ती लाजली

................................

नेहाची तयारी झालेय का ते पाहायला संगीताताई वरती आल्या.खूप सुंदर दिसत होती नेहा....!!! 
"छान दिसतेय हो आमची लेक ..." त्यांनी तिची हनुवटी हातात घेऊन किंचित वर केली..
"काय ग आत्या आता तू पण ...." नेहा
संगीता ताईंनी थोडंस काजळ घेऊन नेहाच्या कानामागे टेकवल..
"कोणाची दृष्ट नको लागायला..." असं म्हणून संगीता ताई तिला खाली घेऊन आल्या.
नेहाच लक्ष पाटावर बसलेल्या आनंदकडे गेलं.मरून कलरचा स्टँड कॉलरचा रेशमी कुर्ता आणि अफव्हाईट पायजमा...घालून तो गुरुजी सांगतील तसे विधी करत होता. त्याचसोबत त्याचे दुरचे काका काकु देखील बसले होते..मग गुरुजींनी नेहाला आणि अप्पासाहेबाना बोलवलं...गणेशपूजन आणि बाकी विधी झाल्यावर त्यांनी नवरा मुलगा आणि मूलगीला बोलवलं

.................................


नेहा आणि आनंद एकमेकांच्या समोर आले.तो पहिल्यांदाच तिला अस नटलेलं पाहत होता..काठापदराची साडी...त्यावर नाजूक दागिने... नथ त्यामुळे मुळातलं तिचं देखणं रूप अजूनच सुंदर दिसत होतं.. दोन क्षण का होईना त्याला तिच्याकडे पाहत राहावंसं वाटलं...तिचं मात्र तिकडे लक्षच नव्हतं ती खाली मान घालून उभी होती..कोणतरी जोरात खाकरलं...तसा आनंद भानावर आला...आणि एकच हशा पिकला.......

"आता काय तिलाच बघायचं आहे हा आनंद"...जमलेल्यांपैकी कोणतरी बोललं

"आधी साखरपुडा आटपा नि मग बघत बसा एकमेकांकडे ..." तशी ती लाजली...आणि पुन्हा सगळे हसले

गुरुजींनी अंगठ्या आणायला सांगितल्या...वृषालीताईंनी आनंदच्या हातात अंगठी दिली..संगीतताईंनी देखील नेहाकडे आनंदची अंगठी दिली..दोघेही लग्न ठरल्या नंतर आज पहिल्यांदाच इतकं जवळून एकमेकांना पाहत होते
....नेहाने हात पुढे केला..तस त्याने हलकेच तिच्या बोटात अंगठी घातली....नेहा हातात अंगठी घेऊन होती पण आनंद आपल्याच विचारात होता...

"आनंद हात पुढे करतोयस ना...नेहा थांबलेय..." वृषालीताईंनी आनंदला जाग केलं ...तसा त्यानं हात पुढे केला....नेहाने त्याला अंगठी घातली. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. त्याच्या मित्रांनी कागदी फटाके फोडले..दोघांनी एकमेकांना पेढा भरवला. मग दोघेही आप्पासाहेबांच्या वृषालीताईंच्या , संगीता आत्याच्या पाया पडले.

.........................

रात्री श्रीखंड पुरीचा बेत होता.. आलेली मंडळी जेऊन रात्री निघुन गेली.नातेवाईक आणि  बाकीची माणसं सकाळी निघणार होते. आनंद जेवल्यावर आपल्या रूम मध्ये गेला.नेहा आणि अप्पा सुद्धा उद्याची जायची तयारी करण्यासाठी वरच्या खोलीत गेले..साखरपुडा  छान झाल्याचं जमलेल्या लोकांनी आवर्जून वृषालीताईंना सांगितलं आणि सूनही अगदी साजेशी आहे असं म्हटलं....साखरपुडा नीट पार पडल्याने वृषालीताईंच्या  चेहऱ्यावर समाधान पसरलं होत.....!!!!


क्रमशः...

हा भाग कसा वाटला ते आवर्जून कळवा..आणि तुमच्याही साखरपुड्याच्या , लग्नाच्या काही गमतीशीर आठवणी असतील तर  कॉमेंट्स मध्ये जरूर कळवा...तुमचे किस्से वाचायला आम्हालाही आवडेल..धन्यवाद...

🎭 Series Post

View all