Feb 24, 2024
प्रेम

हे बंध रेशमाचे - भाग 13

Read Later
हे बंध रेशमाचे - भाग 13

हे बंध रेशमाचे - भाग 13


हळू हळू साखरपुड्याचा दिवस जवळ येत होता..त्यामुळे इकडे आप्पासाहेबांची देखील धावपळ चालू होती.दोन दिवसांनी त्यांना साखरपुड्यासाठी मुंबईला जायचं होतं..नेहासाठी त्यांनी छान गुलाबी रंगाची साडी आणि आनंदसाठी अंगठी घेतली..सर्वाना त्यांनी कामाला लावलं होत.त्यांचा काम करण्याचा उत्साह बघून सगळी नोकर मंडळी , नेहा, संगीता आत्या देखील जोरात तयारीला लागले.....साखरपुड्यात करावे लागणारे मानपान, कपडेलत्ते, बाकीच्या वस्तू सगळं घर पॅकिंग करण्यात गुंतल होत...मधूनच सगळी नेहाची मस्करी पण करत होते...पॅकिंग करता करता मस्तपैकी गप्पा, चहा नाश्ता....असा कार्यक्रम चालू होता......


........................


"नेहा आटपल की नाही तुझं ....?  दामू, गंगा ताई बॅगा नेऊन ठेवा गाडीत ...." आप्पांच्या सूचनेप्रमाणे सर्वजण काम करत होते..

"साहेब हे कुठे ठेऊ ...." दामू 

"ठेव माझ्या डोक्यावर....गाडीत नेऊन ठेव त्यात द्यायच्या वस्तू आहेत तिकडच्या लोकांना....आटपा रे निघायची वेळ झाली...." अप्पासाहेब

छोटेखानी साखरपुडा होता तरी अप्पांची किती गडबड चालू होती.त्यांच्या एकुलत्या एक लेकीचा साखरपुडा होत होता..त्यामुळे स्वारी खुश होती..सर्व तयारी झाली आता ते मुंबईला जायला निघत होते.इतक्यात नेहा तयार होऊन आली.नेव्ही ब्लु कलरचा लॉंग कुर्ता त्यावर गोल्डन कलरची नाजूक डिझाईन..पिस्ता कलरचा पायजमा...आणि त्याच रंगाची एम्ब्रॉडरी केलेली ओढणी..केसांची सागरवेणी घालून ती एका बाजूला घेतली होती....चेहऱ्यावर हलकासा मेकअप...आणि गोड हसू.....!!! कॅज्युअल लुक मध्येही नेहा छान दिसत होती....ती आल्यावर सर्वजण गाडीत बसले..अप्पा, नेहा , संगीताताई आणि गावातील काही जिवाभावाची माणस अशी सगळी मुंबईला जायला निघाली.....

 

......…........................


दुपारच्या सुमारास 'जिव्हाळा' बंगल्यासमोर अप्पासाहेबांची गाडी येऊन थांबली.वृषालीताई आणि गीता मावशी स्वागताला उभ्या होत्या.साखरपुडा दुसऱ्या दिवशी होता तरीही प्रवासाचा क्षीण जाण्यासाठी वृषालीताईनी सगळ्यांना आदल्या दिवशीच बोलावलं होतं.सगळे गाडीतून खाली उतरले.. 'जिव्हाळा'......!!!! नेहाने बंगल्याचं नाव वाचलं...तिनं सगळीकडे नजर फिरवली..बंगल्याच्या पुढच्या भागाला रोषणाई केली होती..दारात रांगोळ्या आणि दाराला तोरण सजल होत...आवारात छोटुशी बाग...एका बाजूला लॉन आणि त्यामध्ये शेड टाकून बसायला टेबल खुर्च्या होत्या..बऱ्यापैकी पाहुणे मंडळी आलेली दिसत होती.तिला थोडं बावरल्या सारख झालं.

"ये ग नेहा....ये , अप्पासाहेब या..." वृषालीताईंनी त्यांचं हसून स्वागत केलं..त्या नेहाला आत घेऊन गेल्या..त्यांच्या पाठोपाठ आलेली सर्व मंडळीही आत गेली..प्रशस्त हॉल..मोठं झुंबर ....हॉल मध्ये लायटिंग केलं होतं..एका बाजूला मोठं शोकेस होत...आनंदला मिळालेल्या ट्रॉफीज तिथे लावल्या होत्या...समोरच आतल्या भागात किचन...त्यांच भिंतीला लागून जिना होता...नेहाला त्या नवीन जागेच अप्रूप वाटत होतं आणि थोडस दडपणही...वृषालीताईंनी आलेल्या पाहुण्यांना वरच्या मजल्यावर फ्रेश होण्यासाठी पाठवलं..वरच्या मजल्यावर चार रूम होत्या.त्यापैकी तीन रूम पाहुण्यांसाठी दिल्या होत्या... त्यातली शेवटची रूम आनंदची होती.... या सगळ्या लोकांमध्ये नेहाची नजर मात्र आनंदला शोधत होती...पण तो तिला कुठेच दिसत नव्हता......

........................

संध्याकाळी आनंद घरी आला..घरी सगळी पाहुणे मंडळी जमली होती.त्याला खरतर कोणाच्यातही मिक्स होणं आवडत नव्हतं त्यामुळे तो आल्यावर आपल्या रूम मध्ये निघुन गेला..नेहा मात्र खट्टू झाली आपल्याकडे साधं पाहिल पण नाही अस तिला वाटलं.वृषालीताईंनी सगळ्यांची राहण्याची, जेवणाची छान व्यवस्था केली होती...दुसऱ्या दिवशी साखरपुडा असल्याने त्यांची लगबग चालू होती. प्रवासामुळे नेहा देखील दमली होती त्यामुळे ती वरती खोलीत जाऊन झोपावं असा विचार करून वरच्या मजल्यावर आली. नवीन जागा असल्याने आपली रूम कोणती ते तिच्या लक्षात येईना ...त्यामुळे ती चुकून आनंदच्या खोलीत शिरली...आत आल्यावर तिच्या ते लक्षात आलं.भिंतीवर आनंदचा मोठा फोटो लावला होता..'कसला भारी दिसतोय ....!!! ' ती मनातच म्हणाली त्याची रूम ती बघू लागली.रूम चांगलीच मोठी होती...खोलीला छान क्रीम कलरच पेंट केलं होतं...तर एका भिंतीवर छान वॊयलेट कलर देऊन त्यावर डिझाईन काढलं होत..मोठा बेड..समोरच वोर्डरोब...त्याला लागून ड्रेसिंग टेबल...समोरच परफ्युमच्या बोटल्स...दुसऱ्या टेबलवरती शोपिसेस ठेवली होती आणि तिथेच आनंदची एक फोटोफ्रेम पण होती.. तीन ती हातात घेतली आणि फोटो पाहू लागली........इतक्यात बाथरूमच दार उघडून आनंद बाहेर आला....नेहाला आपल्या रूममध्ये बघून त्याला राग आला...

"तू...?? ......तू काय करतेस इथे ....?? 

त्याच्या बोलण्याने नेहा दचकली..

"मी......मी ते ...."  घाबरून तिच्या हातातून फ्रेम निसटणार इतक्यात त्यानं ती पकडली.आणि जागेवर ठेवली.

"माझ्या वस्तुंना मला न विचारता हात लावलेला मला आवडत नाही..."  तो रागावून बोलत होता

त्याच्या अशा बोलण्याने ती चांगलीच घाबरली होती..काय बोलावं तिला सुचेना.घाबरून ती त्याच्या रूममधून निघून गेली.....आणि पाहुण्यांसाठीच्या असलेल्या रुममध्ये येऊन  झोपली.पण तिला झोप लागेना..सारखा तिला आनंदचा तो रागावलेला चेहरा आठवत होता..तिला काहीच कळत नव्हते..' आपण तर चुकून गेलो होतो त्याच्या खोलीत.बोलायला पण दिलं नाही मला..किती चिडला लगेच...हा आपल्याशीच असं का वागतो ?......मी काय केलं याच....??.याला मी पसंत नाही का..??? '..असे विचार तिच्या डोक्यात घोळत होते..त्याच विचारात तिला कधी झोप लागली कळलं पण नाही.


.................................

दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच घरात धांदल सुरू झाली.साखरपुडा संध्याकाळी असला तरी जवळचे नातेवाईक यायला सुरुवात झाली होती. येणाऱ्या पाहुण्यांचा चहा- नाश्ता सगळीकडे वृषालीताईंना लक्ष द्यावं लागतं होतं. आनंदही उठून तयार होऊन आला होता.येणाऱ्या पाहुण्यांशी तो उसनं हसू आणून का होईना पण सगळ्यांमध्ये मिक्स होऊन बोलत होता.खरतर इतकी माणसं हे समारंभ त्याला काहीच आवडत नसे.पण आज त्याचाच साखरपुडा होता त्यामुळे त्याचा नाईलाज होता.किमान आईसाठी तरी त्याला असं वागावं लागत होतं.नेहा देखील आपलं आवरून खाली येत होती. जिन्यातूनच तिनं आनंदकडे पाहिलं तो सगळ्यांशी हसून खेळून बोलत होता...तिला कळतच नव्हतं 'काल आपण पाहिलेला रागीट आनंद खरा की आत्ता सगळ्यांशी मनमोकळं बोलणारा आनंद खरा...??'

 


क्रमशः.....

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//