हे बंध रेशमाचे -भाग 2

A love story

हे बंध रेशमाचे....भाग 2


"कालच आले.घर नवीन बांधाव असा विचार चालू आहे.म्हणून आले.म्हटलं तुमची देखील भेट होईल."
"कसे आहात तुम्ही ?" वृषालीताईंनी आप्पासाहेबांची विचारपूस केली...
"आम्ही सगळे मजेत आहोत..आता तुम्ही आलायत तशा चार दिवस राहा इकडे. मग आपण निवांत बोलू." आप्पा म्हणाले
"अहो, नाही नाही घराच्या कामाचं ठरवुन मला दोन दिवसात परत जायचंय.तिकडे आनंद एकटा आहे ना त्यामुळे."वृषालीताईंनी आपली अडचण सांगितली
"ठीक आहे,बघू आपण"..आप्पांनी नोकरांना सांगून वृषालीताईंची बॅग त्यांच्या गाडीतून आणायला सांगितली.

.............
वृषालीताईंना गावी येऊन एक दिवस होऊन गेला.नेहाने त्यांना गावात काय काय सुधारणा झाल्यायत, कोणते नवीन उद्योग सुरू झालेत हे सर्व वृषालीताईना सांगितलं.शिवाय त्यांना आपल्या अनाथ आश्रमात घेऊन गेली.त्यांनी देखील मुलांसाठी खाऊ घेतला होता.मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून वृषालीताईंना समाधान वाटले.मग नेहाने त्या मुलांना छान गोष्ट सांगितली सगळी मुलं , तिथे काम करणाऱ्या सेविका, वृषालीताई तल्लीन होऊन नेहाची गोष्ट ऐकत होते.गोष्ट संपली आणि मुलांची जेवणाची सुट्टी झाली..मग नेहा आणि वृषालीताई घरी परतल्या.येताना वृषालीताईंनी त्यांचा फोननंबर आश्रमाच्या व्यवस्थापकांना दिला आणि कोणतीही मदत लागली तर जरूर कळवा अस आग्रहाने सांगितलं.

..................
आप्पासाहेब जोशी हे एक प्रख्यात वकील होते.खरतर त्यांनी आता त्यांची प्रॅक्टिस बंद केली होती.पण तरीही लोक सल्ला विचारण्यासाठी त्यांच्याकडे येत असत.अप्पासाहेब आपल्या गावाच्या विकासासाठी अडलेली काम मार्गी लावून देण्याचा प्रयन्त करीत.अडल्या नडलेल्या लोकांसाठी ते धावून जात.लोकांना शक्य होईल तेवढी मदत करीत असत.त्याचे हेच गुण नेहात देखील आले होते.पण नेहा लाजरी बुजरी होती.हुशार होती परंतु कोणतेही काम करताना तिला भीती वाटायची.आणि एकदा का ते काम झाले की आनंदाने सर्वाना सांगायची.नेहाच ग्रॅज्युअशन पर्यंतच सगळं शिक्षण कोल्हापूरलाच झालं होतं.कला शाखेतून मानसशास्त्र या विषयाची तिने पदवी घेतली होती.पूर्ण कॉलेज मधून ती पहिली आली होती त्यावेळी आप्पासाहेबांना किती आनंद झाला होता.आज तिचे यश बघायला तिची आई हवी होती असे त्यांना फार वाटत होते...

................
आप्पासाहेब आणि वृषालीताईंचे पती श्रीकांत हे दोघे लहानपणापासूनचे मित्र होते. दोघेही शाळा कॉलेजपासून एकत्र....दोघेही हुशार...बारावी नंतर आप्पासाहेब लॉ कॉलेजला गेले तर श्रीकांतनी मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतलं.त्यामुळे दोघांचं भेटणं फार होत नसे.पण तरीही दोघे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते.सगळ्या गावाला त्यांची मैत्री माहीत होती...वर्ष निघून गेली नि श्रीकांत डॉक्टर झाले आणि आप्पासाहेब वकील झाले...त्यानंतर दोघांचीही लग्ने झाली...आधी श्रीकांतरावांच आणि वर्षभराने आप्पासाहेबांच सुद्धा लग्न झालं...श्रीकांतराव आपल्या पत्नीसह मुंबईत राहत होते.तर आप्पासाहेब आपल्या गावीच पत्नीसोबत राहत होते.श्रीकांतरावांनी कष्ट करून मुंबईला स्वतःच सुसज्ज अस हॉस्पिटल उभारलं..गावातून शहरात उपचारासाठी येण्याऱ्या लोकांची सोय व्हावी हा त्या मागचा हेतू होता.अप्पासाहेब देखील गरजूंची मदत करीत त्यांना न्याय मिळवून देत.

कालांतराने श्रीकांतराव आणि वृषालीताई याना मुलगा झाला. त्याच नाव आनंद. तर आप्पासाहेब व नीलिमा ताई याना मुलगी झाली...तीच नेहा !!!....पण निलीमाला दुर्धर आजाराने ग्रासले होते..सर्व डॉक्टर ,वैद्य झाले होते पण काही उपाय झाला नाही. नेहा चार वर्षाची असतानाच त्या गेल्या. आप्पांवर मुलीची जबाबदारी पडली होती. श्रीकांतराव आणि वृषालीताई त्यावेळी गावी येऊन गेले. आप्पाना त्यांनी धीर दिला...खरतर तेव्हाच ते नेहाला घेऊन मुंबईला येणार होते.वृषालीताई नेहाची जबाबदारी घेण्यास तयार होत्या. पण आप्पानीच मुलगी तरी माझ्याजवळ असुदे अस म्हणून नेहाला सांभाळलं होत.
"जशी ती तुझी मुलगी आहे तशीच ती आमची देखील मुलगी आहे. आम्ही तिला मायेनेच वागवू" श्रीकांतराव म्हणाले.

.....................
त्या प्रसंगानंतर त्याचे गावी येणे झाले नाही....त्यामुळे आज कितीतरी वर्षांनी वृषालीताई गावी आल्या होत्या...घराच्या कामासोबतच आणखी एक गोष्टीसंबंधी आप्पांशी बोलण्यासाठी त्या मुद्दाम आल्या होत्या..त्या योग्य संधीची वाट पाहत होत्या....

क्रमशः.... 

🎭 Series Post

View all