हवास मज तू

Letter writing competition

प्रिय अमुक तमुक  , 

              नाव वाचूनच तू म्हणशील असं काय लिहिलं आहेस..?? पण काय करणार अजुन तू माझा झाला नाहीयेस ना...!! तुझं नाव नेमकं काय असेल ते कसं कळणार म्हणुन तू सध्या तरी अमुक तमुकच. तू हसशील मला हे वाचुन. पण त्यानिमित्ताने का होईना तुझ्या चेहऱ्यावर गोड हसू येईल आणि ते हसू तसंच राहावं यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन. तुला माहितेय मी सांगायचे माझा नवरा मला असा हवा , तसा हवा , हे नको , ते नको. पण आता या अपेक्षांपेक्षाही तुझ्या भेटीची ओढ जास्त लागली आहे...!!! माणसाच्या अपेक्षा तशा कधीच पूर्ण होत नाहीत. एक झाली की दुसरी उगवतेच. त्यामुळे तुझ्यावर अपेक्षांचं ओझं मी लादणार नाही. पण माझ्या काही इच्छा नक्कीच आहेत. सांगु का ?? नवीन घर , नवीन वातावरण या सगळ्यात ऍडजस्ट व्हायला मला वेळ जाईल. तेव्हा तू सांभाळून घेशील ना मला...??  फक्त बायको म्हणुन नाही तर एक व्यक्ती म्हणुन. लग्न ठरवताना आपण कितीही एकमेकांच्या आवडी निवडी सांगितल्या असल्या तरी लग्न झाल्यानंतर त्या खऱ्या अर्थाने कळत जातात हो ना..?? मी खूप रागावते. राग आला की माझा अबोला सुरू होतो. पण अशा वेळी तुझ्या केवळ प्रेमळ हाकेने देखील माझा राग विरघळेल. पण ती गोड प्रेमाची हाक मारशील ना तू...??  तुझ्या मिठीपेक्षाही तुझं बोलणं कदाचित जास्त सुखद असेल माझ्यासाठी....!!! 

                     प्रत्येकाच्या घरी आई राबत असते. अशा वेळी दोन कौतुकाचे शब्द तिच्या अंगावर मूठभर मांस चढवतात. पण कदाचित आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती असल्याने तोंडभरून कधी त्या राबणाऱ्या बाईचं कौतुकच होत नाही रे.  तसं तू होऊ देऊ नकोस हा आपल्या आईंच्या बाबतीत आणि माझ्या आईच्या बाबतीत देखील. दोघींचं देखील तू तितकंच कौतुक करावसं असं वाटतं मला. सासरी प्रत्येकाला समजुन घ्यायला मला थोडा वेळ लागेल. अशा वेळी सगळं कसं हाताळायच यासाठी तुझी खूप मोठी मदत लागेल मला. करशील ना..?? तुझ्या कामाचा , तुझ्या भावनांचा मी नेहमीच आदर करेन. प्रत्येक गोष्टीत तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहीन. पुरुषांना देखील वेगळं काय हवं असत. आपल्या जोडीदाराचा आपल्यावर असणारा विश्वास हीच खरी ताकद असते त्यांची. हो ना..??  मग कोणतंही आव्हान त्यांच्यासाठी कठीण नसतं. 

                कोणाहीसाठी आपला जोडीदार हा स्पेशलच असतो. तसाच तू माझ्यासाठीही असशील. तुझ्यासाठी मी नुसती म्हणायला स्पेशल नाही तर तुझ्या विचारांतून , तुझ्या वागण्यातून , तुझ्या कृतीतून मी तुझ्यासाठी खास आहे हे मला कळू दे इतकीच इच्छा आहे. स्त्री पुरुष समानता म्हणतात रे सगळी पण तसं नसत. आपल्याच बायकोवर आपण कोणाच्याही देखत ओरडत असतो , तिला वाटेल तसं बोलत असतो. तिच्यातल्या उणीवा दाखवत असतो. ते बदलणं हे आता नवीन लग्न करणाऱ्यांच्या हातात असतं. आपल्या जोडीदाराच मत , त्याच्या भावना तू आदर करावास. नवऱ्याचा ,सासरच्या मंडळींचा आदर करावा हे मुलीला लहानपणापासून शिकवतात रे. पण मला वाटतं की मुलांनाही शिकवायला हवं. केवळ आपल्या बायकोचा नाही तर तिच्या कुटुंबाचा देखील आदर ठेवायला हवा ना..? तुला वाटेल खूपच अपेक्षा आहेत हिच्या. पण बदल हवा असेल तर तो आपण स्वतःपासूनच सुरवात करायला हवा ना. तू दमुन आल्यावर तुझ्यासाठी प्रेमाने चहा पाणी नाश्ता करताना दिवसभर मीही कुठेतरी दमलेली असेल अशी जाणीव ठेवलीस तर आपल्याला बोलायला शब्दांचीही गरज पडणार नाही. जीवापाड प्रेम फक्त स्पर्शापुरत मर्यादित न ठेवता ते काळजीतून , तुझ्या हालचालीतून जाणवलं की प्रत्येक बायकोला आभाळ ठेंगण झाल्यासारखं वाटतं...!!! अजुन काय बरं अपेक्षा करणार ती... !!! 
                पत्र खूपच लांबल का रे...?? पण मग तुझ्याशी बोलायला वेळ मिळेल की नाही माहीत नाही. त्यामुळे आधीच तुला पत्रातून सगळं सांगतेय. रागावू नको हा. 
                                                        तुझीच , 
                                                   होणारी बायको. 

         

© ® सायली विवेक