हवास मज तू!भाग -६६

वाचा एका प्रेमाची अनोखी कथा.
हवास मज तू!
भाग -६६.

मागील भागात :-

विहान कोल्हापूरहून मुंबईला येण्यासाठी निघत असताना त्याला पंकज भेटतो. विहानसोबत कोरडेपणाने वागणाऱ्या मनीषाला पंकज त्याच्याशी थोडे प्रेमाने वागण्याचा सल्ला देतो.

आता पुढे.


"काय समजू? विहान आता लहान राहिला नाहीये. त्याच्याशी वागण्यातला कोरडेपणा कमी करा. कधी त्याच्यावर देखील माया करा. नाहीतर तुमच्या वागण्याने पोर दुरावेल आणि तुम्हाला कळणार देखील नाही." तो तिला समजावत म्हणाला.

"ते माझे मी बघून घेईन." ती आत जात म्हणाली.

"अहो वहिनीसाहेब, अशाने सगळं कठीण होऊन जाईल. त्याच्याकडून तुम्हाला माया हवी असेल तर तुम्हालाही तुमच्यावतीने थोडी माया उधळावी लागेलच की." तो हसत खुर्चीवर बसला.


"विहानच्या तोंडून एकदा का शशांकच्या बर्बादीची बातमी ऐकली ना की मी धन्य होईल. विहानसाठी मनात असलेले संपूर्ण प्रेम मी त्याच दिवसासाठी तर राखून ठेवले आहे." त्याच्यासमोर मोकळे होत मनीषा उत्तरली.

"तथास्तु! तो दिवस लवकरच येईल अशी करतो." तिच्या हातावर हात ठेवत पंकज म्हणाला.

******


"विनीत, कीर्ती सर्व फाईल्स रेडी आहेत ना?" केबिनमध्ये तिच्यासमोर उभ्या असलेल्या दोघांना शौर्या विचारत होती.


"येस मॅम. तुम्ही सांगितले ते करेक्शन सुद्धा केले आहेत." विनीत.


"द्याट्स गुड. मिस्टर दास आणि त्यांच्या सीईओसमोर आपले इंप्रेशन डाऊन व्हायला नको." लॅपटॉप बंद करत ती उभी झाली.


"मॅम, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तसेही आमचे प्रेजेंटेशन मिस्टर दासना आवडले असावे म्हणून तर त्यांनी त्यांच्या सीईओला यात लक्ष घालायला सांगितलेय. तेव्हा हे फायनल झालेच म्हणून समजा." कीर्ती म्हणाली.


"लेट्स सी. मला अशा कोरड्या शब्दांपेक्षा मिटिंगमधल्या परफॉर्मन्सवर जास्त विश्वास आहे. चला आता. इतर गोष्टी नंतर होतील."

तिच्या बोलण्याचा रोख ओळखून ते दोघे केबिनबाहेर पडले आणि काही वेळाने शौर्यादेखील निघाली. जाताना आपसूकच तिची नजर नव्याच्या केबिनकडे गेली. केबिन आतून बंद होती म्हणजे नव्या आली आहे याचा तिला अंदाज आला आणि किंचित चिंतेने ओढलेल्या तिच्या चेहऱ्यावरची कळी आपसूक उमलली.


शौर्या गेली तेव्हा केबिनच्या काचेतून नव्याची नजरदेखील तिच्यावर खिळली होती. शौर्याच्या चेहऱ्यावरचे स्मित बघून तिच्या डोळ्यात टचकन अश्रू उभे राहिले.


'दी किती हॅपी आहे? डॅडशी, माझ्याशी असे वागून हिला नेमके काय मिळते आहे? इतकी वर्ष माझी पाठराखण करणारी दी खरी? की आत्ता अशी वागणारी दी खरी? सत्तेसाठी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो हे केवळ ऐकले होते. आता तर प्रत्यक्ष अनुभवत आहे.

पण तिला असे वागण्याचे काय कारण होते? फक्त एकदा जरी तिने डॅडला म्हटले असते की तिला ऑफिस जॉईन करायचे आहे, कंपनीवर तिला मालकी हक्क हवा आहे तरी त्याने काहीच आढेवेढे न घेता तिला ते दिले असतेच की. मग तरीही असे का वागतेय ही? केवळ विहान तिला हवाय म्हणून?'


विहानचे नाव ओठात येताच तिने पुन्हा त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला. कालपासून त्याचा मोबाईल अजूनही बंदच दाखवत होता.


'विहान, कुठे आहेस रे तू? का त्रास देतो आहेस? ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम केलेय त्यांनी मला असा छळण्याचा प्रणच केलाय का? मोबाईल बंद आहे म्हणून काय झाले, साधा एक निरोप तरी ठेवायचा होता ना?

कुठे आहेस, कसा आहेस? काहीच माहिती नाहीये. जीवाची नुसती तगमग होते आहे. माझं मन का कळत नाहीये तुला?

प्रेमात पडू नये म्हणतात ते खरेच आहे. सुरुवातीला सुंदर वाटणारे प्रेम पुढे जाऊन अशा वेदना देईल हे मला कुठे ठाऊक होते? मला नकोय हे प्रेम आणि नकोच हा त्रागा.' ती हुंदका देऊन रडायला लागली.


'मी स्वार्थी झालेय का? केवळ माझाच विचार का करतेय मी? विहान कुठल्या संकटात तर नसेल ना? त्यामुळे त्याचा मोबाईल बंद असेल का? दीने तर त्याला काही केले नसेल ना?'

शेवटच्या विचाराने तिच्या हाताला कंप सुटला आणि हृदयाची धडधड वाढू लागली. डोके गरगरतेय नि तोल जातोय असे जाणवताच ती मटकन खुर्चीवर बसली. घाईघाईत पर्समधील चॉकलेट काढून तिने तोंडात टाकले. आज येताना नाश्ता करायचा राहून गेला याची तिला आठवण झाली आणि तिने रिसेप्शनवर कॉल केला.

"मे आय कम इन मॅम?"

रिसेप्शनवर फोनच्या नुसत्या वाजणाऱ्या रिंगचा आवाज ऐकून चिडचिड व्हायला सुरुवात होणार तोच तिला केबिनच्या दारात रिसेप्शनिस्ट हातात ट्रे घेऊन उभी दिसली.

"मॅम, तुमच्यासाठी नाश्ता आणलाय." ट्रे टेबलवर ठेवून स्मित करत ती म्हणाली.


"एक मिनिटं, मला नाश्ता हवाय हे तुला कसे ठाऊक?" नव्याने आश्चर्याने विचारले.


"फोन करून कळवले होते ना." ती म्हणाली.

"कुणी?"

"आपल्या बॉसनी." जाता जाता ती उत्तरली.


ती गेल्यावर नव्याने ट्रे मधील पदार्थावर नजर फिरवली. तिच्या आवडीचे इडली सांबार आणि ज्युस बघून आतापर्यंत चाललेली चिडचिड आणि त्रागा नाहीसा झाला. इडलीचा आस्वाद घेत तिने मनात शशांकचे आभार मानले.

'डॅड, यू आर रिअली ग्रेट. तूच इथे फोन केला होता ना? आणि तुझ्या लक्षात येतेय ना, आजही इथला स्टॉफ तुलाच बॉस समजतो. दी कसेही वागू दे, मी ही कंपनी लवकरच माझ्या ताब्यात करेन आणि तुला परत सीईओच्या खुर्चीवर बसलेले बघेन, तेव्हा कुठे माझ्या आयुष्याचे काहीतरी सार्थक झाले असे वाटेल रे.'
तिच्या चेहऱ्यावर एक समाधान पसरले होते.

******

"मी सांगितलेले काम केले ना?" शौर्या रिसेप्शनवर कॉल करून विचारत होती.

"येस मॅम. आत्ताच काही वेळापूर्वी." रिसेप्शनिस्ट उत्तरली.

"गुड." स्मित करत शौर्याने कॉल कट केला.

ऑफिसबाहेर पडताना तिला शशांकचा मेसेज आला होता आणि निवी ब्रेकफास्ट न करताच आलीय हे कळले होते. त्यामुळे कारमध्ये बसण्यापूर्वी तिने रिसेप्शनवर फोन करून तशा सूचना दिल्या होत्या.


"वेलकम मॅम. इट्स मिस्टर दास." हॉटेल मध्ये पोहचल्यावर मिस्टर दास तिचे स्वागत करत होते.


"ओह! थँक यू अँड ग्लाड टू मिट यू मिस्टर दास." ती स्मित करत म्हणाली.

खरे तर मिस्टर दास स्वतः तिला वेलकम करतील ही अपेक्षा नव्हती. त्यामुळे तिचा जरासा गोंधळ उडाला होता पण तिने तो जाणवू दिला नाही. गोंधळ तर विनीत आणि कीर्तीचा सुद्धा उडाला होता. परवाच्या प्रेजेंटेशनमध्ये याच मिस्टर दासपुढे त्यांची थोडीफार भंबेरी उडाली होती.

एका प्रोफेशनल पद्धतीने त्यांनी ते डील केले असले तरी मनातून दोघेही धास्तावले होते. आता मात्र तेच थोडे खडूस वाटणारे दास चक्क स्वतःहून शौर्याला वेलकम करत होते तेही इतक्या विनम्रतेने की; विनीत आणि कीर्ती दोघेही बुचकाळ्यात पडले.


"मॅम, मिटिंगसाठी बुक केलेला हॉल या दिशेने आहे. तुम्ही माझ्यासोबत यावे." मिस्टर दास अदबीने म्हणाले.

कीर्ती आणि विनीतसह शौर्या त्याच्या मागे निघाली. हॉलमध्ये मिटिंगची तयारी झाली होती पण तिथे कोणीच उपस्थित नव्हते.


"मिस्टर दास, हे काय आहे? आम्हाला वेळ देऊन तुमचे बॉस कुठे गेलेत?" तिने घड्याळाकडे नजर टाकत विचारले.


"मॅम, जस्ट वेट फॉर टू मिनिट. ते येतच आहेत. तसेही ही डील शेवटच्या टप्प्यात आली आहे, तेव्हा पॅनिक न होता कॉमर्फ्टेबल असा."


"आणि इतर दुसऱ्या कंपनीचे सीईओ? ते कुठे आहेत?"

"आमच्या सरांचे काम अगदी काटेकोर असते. त्यांनी दिलेल्या वेळेत सर्व मिटींग्स पार पाडल्या आहेत. आजची ही शेवटची मिटिंग आहे." दासने तिला जादाची माहिती पुरवली.


"ओह." म्हणत ती गप्प झाली. मनात मात्र त्याच्या सीईओचे कौतुक चालले होते. त्याची काम करण्याची पद्धत बघून तिच्या ओठावर हलके स्मित उमटले अन त्याला भेटण्याची उर्मी जागृत झाली.


"सॉरी, गाईज. तुम्हाला दोन मिनिटं वाट बघावी लागली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो." ती विचारात असताना एक आवाज कानावर पडला. त्यासरशी तिच्यासह खुर्चीवर बसलेले विहान आणि कीर्ती दोघेही उभे राहिले.

"प्लीज सीट." आपल्या खुर्चीवर बसत त्याने इतरांकडे नजर फिरवत आज्ञा केली.


"सर, हे मिस्टर विनीत आणि या मिस कीर्ती. परवा यांनीच एसके कंपनीच्या वतीने प्रेजेंटेशन सादर केले होते." मिस्टर दासने माहिती दिली.


"आणि सर, या मिस शौर्या केळकर, सीईओ ऑफ एसके इंटरप्रायझेस. मॅम, मीट अवर सीईओ मिस्टर यश पाटील." दोघांची ओळख करून देत मिस्टर दास म्हणाले.

यश आल्यापासून ती त्यालाच न्याहाळत होती. हा इथे कसा? या प्रश्नात अडकत असतानाच मिस्टर दासने त्याच्या कंपनीचा त्याची सीईओ म्हणून ओळख करून देताच तिचे डोळे आणखी विस्फारले.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
*******

🎭 Series Post

View all