हवास मज तू!भाग -६४

खरंच का प्रेम फसवे असते? वाचा एका प्रेमाची अनोखी कथाव.
हवास मज तू!
भाग -६४

मागील भागात :-
भूतकाळ आठवल्यावर शशांक अस्वस्थ होतो. त्याच्या छातीत परत दुखायला लागते. इकडे विहानशी भेट न झाल्यामुळे व्यथित झालेल्या नव्याची झोप पळाली असते. तो कुठे गेला असेल? हा प्रश्न तिला छळत असतो.

आता पुढे.

तिच्यासोबत रोमँटिक डेटचा मस्तपैकी आनंद घ्यायचा असे काहीसे त्याचे झाले होते. नाहीतरी तिला लग्नाची घाई होतीच, मग एकत्र वेळ घालवायला कशाची हरकत होती?

मनात आलेल्या विचारांना त्याच्या मनानेच धुडकावून लावले. घरात पाऊल टाकल्याबरोबर आईची प्रतिमा समोर उभी राहिली आणि मग डोळ्यात आसू आणि हसू दोन्ही भाव एकत्रितपणे उभे ठाकले.


कुंडीतील गुलाब खुडून त्याने तो नाकापाशी नेत अलगद हुंगला. तो मंद गुलाबी सुगंध नाकातून त्याच्या हृदयात उतरला.


'डिअर नव्या, तुला वाटले असेल आज आपण मस्त एकांत अनुभवावा. बट सॉरी डिअर. आपल्या एकांतापेक्षा तुला मी दुसराच अनुभव अनुभवायला देणार आहे.. विरहाचा अनुभव!

एकदा याचा आस्वाद तर घेऊन बघ. तुला आवडेल की नाही माहित नाही पण मला मात्र जाम मजा येईल.'

त्याच्या ओठावर लहानसे स्मित उमटले आणि हळूहळू त्या स्मिताचे रूपांतर एका मोठया हास्यात झाले. त्याचे ते गडगडाटी छद्मी हास्य ऐकता ऐकता त्याच्याच डोळ्यात पाणी जमा झाले.


'आई गं, यशाची अगदी जवळ येऊन मी पोहचलोय. बिचारी ती निवी अशी माशासारखी तळमळतेय आणि तिला तसं बघून मला आणखी मजा येतेय. जास्त आनंद तर तेव्हा होतो जेव्हा तिची लाडकी बहीण शौर्या तिला कसलीच मदत करू शकत नाही.

तिला अंधारात ठेवून आतापर्यंत मी सगळे बेत आखत होतो. आता थेट तिच्यासमोर मी अशी चाल खेळेन की तिलाही शेपूट हलवत पळ काढावा लागेल.' तो पुन्हा फिसकन हसला आणि कारची चावी घेऊन बाहेर पडला.

'सॉरी नव्या, तुला न सांगताच मी बाहेर जात आहे. आपले भेटायचे ठरले होते, तसे स्वप्नात तुला मी भेटेनच. तोपर्यंत बाय बाय.' त्याची कार मुंबईबाहेर पळू लागली होती.

*****


दोनदा डोअरबेल वाजली तेव्हा पेंगुळलेल्या अवस्थेत मनीषा दार उघडायला आली. रात्रीच्या या प्रहरात कोण आले असेल याची तिला पुसटशी देखील कल्पना नव्हती. दार उघडले आणि समोर उभ्या असलेल्या विहानला बघून तिच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी आश्चर्य उमटले.


"विहान? तू यावेळेला इथे कसा?" त्याला आत न घेताच तिने पहिला प्रश्न केला.


"तुझ्यासाठी. तुझी आठवण आली आणि मग मला राहवलंच नाही. मग आलो निघून." तो आत येत उत्तरला.


"हो रे. पण एवढया रात्रीचा?"


"आई, तुला भेटायला मला वेळेचे बंधन घालणार आहेस होय? यू आर माय स्वीट मदर. तुझ्यासाठी तर मी केव्हाही येऊ शकतो."

तो म्हणाला त्यावर ती मंद हसली.


"खूप भूक लागलीय गं. माझ्यासाठी तुझ्या हातची स्पेशल डिश बनवशील काय?" त्याने विचारले. पोटात खरंच भुकेचा डोंब उसळला होता.


"तू फ्रेश हो, तोवर मी जेवणाची तयारी करते." ती स्वयंपाकघरात जात म्हणाली.

तो आंघोळ करून आला तेव्हा खरंच मनीषाने डायनिंग टेबलवर त्याचे ताट तयार केले होते. गरमागरम पिठलं भाकरीचा घास जिभेवर ठेवताच त्याची रसना तृप्त झाली.


"आई, ही चव किती दिवसांनी मी अनुभवतोय गं. तुझ्या हातचे पिठलं भाकरी म्हणजे माझा वीक पॉईंट आहे. पंचपक्वानाचे ताट एका बाजूला आणि माझ्या लाडक्या आईच्या हातचे पिठले भाकरी दुसऱ्या बाजूला. आय रिअली मिस धिस." तिला एक घास भरवत तो म्हणाला.


"अरे, माझे केव्हाचेच आटोपलेय. तू निवांत जेव." त्याच्या पाठीवर हात फिरवत ती म्हणाली.


"आता सांग, कुठपर्यंत प्रगती झालीय? कारण तू म्हणाला होतास की जोपर्यंत यश हाती लागत नाही तोपर्यंत तू या घरात पाऊलसुद्धा ठेवणार नाहीस आणि आता अचानक आलास. मग याचा अर्थ काय समजू?" तो शेवटचा घास तोंडात टाकत असताना मनीषाने इतकावेळ मनात खदखदणारा प्रश्न उपस्थित केला.


"काय समजशील?" मिश्किलपणे हसत त्याने प्रतिप्रश्न केला.

"आई, अगं तुझा मुलगा यशाच्या अगदी जवळ येऊन ठेपलाय. ती नव्या तर प्रेमात पार वेडी झालीये. इतकी आंधळी झालीय म्हणून सांगू की तिला मी म्हणेल ती प्रत्येक गोष्ट पटते.

नव्या म्हणजे माझा हुकूमाचा एक्का आहे. तिला समोर ठेवून वार केला ना की जिंकल्याचा जो फील येतो तो खूप भारी असतो. शौर्याची मानसिकता मला बऱ्यापैकी कळलीय. त्यामुळे ती पुढे काय करेल हे आधीच ठाऊक असते. जरा जास्तच हुशार आहे, त्यामुळे तिच्याशी खेळायला जाम मजा येतेय."


"आणि शशांक?" तिने अधीरतेने विचारले. तो जे बोलत होता ते ऐकूनच तिचा चेहरा आनंदाने केवढा तरी फुलला होता.

"शशांक केळकर खूप हुशार आहे. त्याच्यापासून जरा सावध राहा. असे तूच मला सांगितले होतेस ना?" तिची नक्कल करत तो म्हणाला.

"अगं पण तो तर अगदी फुसका बार निघाला. त्याला स्पेशली काही करायची वेळच येत नाही. त्या शौर्याने ऑफिसमध्ये पाय ठेवला आणि याची रवानगी हॉस्पिटल मध्ये झाली.

आता नव्या त्याला आमच्या लग्नाची गळ घालेल आणि ते आटोपले की याचा स्वर्गाचा मार्ग मोकळा होईल. त्याला वर पोहचवायला त्याच्या मुलीच त्याला मदत करत आहेत." तो फिसकन हसत म्हणाला.


"वाह रे माझ्या लेकरा, कसल्या कसल्या गोष्टी ऐकवत आहेस! दिल तर एकदम खूष होऊन गेलाय. तो स्वर्गात आणि मग मी कंपनीत. अहाहा! नुसत्या कल्पनेनेच मनाला किती गुदगुल्या होत आहेत." ती स्वप्नरंजनात गुंतत म्हणाली.


"आई, तुझे स्वप्न लवकरच पुरे होईल. माझ्या बाबाला ज्यांनी माझ्यापासून, तुझ्यापासून हिरावलेय त्यांना मी बरबाद केल्याशिवाय आता मागे हटणार नाही." त्याच्या मुठी रागाने वळल्या.


"बस! ही अंगार अशीच तेवत राहू दे म्हणजे तुला तुझे ध्येय लवकर प्राप्त होईल. आता रात्र बरीच झाली आहे, झोपतोस ना?" त्याच्या केसातून हात फिरवत ती म्हणाली.


"हो गं आई, तू सुद्धा निवांत झोप. बस, आणखी काही दिवस. मग मी तुला सोबत घेऊन जाईन. तुझे असे एकटीने जगणे खूप झालेय. माझ्यासाठी खूप त्रास सहन केला आहेस." तो भावनिक होत म्हणाला.

*****

त्याच्या खोलीतील बिछान्यावर त्याने अंग टाकले. मुंबईपासून कोल्हापूरपर्यंतचा प्रवास! तो शिणला होता. बेडवर पडल्यापडल्या झोप येईल हे त्याला ठाऊक होते. यावेळी मात्र त्याचा अंदाज चुकला. अंगात इतका थकवा भरला असतानाही झोपेने त्याच्याशी असहकार पुकारला होता.

डोळे मिटले की नव्याचा निरागस चेहरा नजरेसमोर येत होता. त्याच्यावर विश्वास टाकणारे तिचे काळेभोर डोळे त्याला आठवत होते. मन उगीचच अस्वस्थ झाले होते.

'काय होतंय हे? रोज आईच्या आठवणीत डोळ्याला डोळा लागायचा नाही आणि आज आईजवळ असूनसुद्धा तेच होतेय. फक्त आज आई नव्हे तर नव्या आठवतेय. पण का? तिला त्रास झालेला बघून तर मला आनंद होतो.

आजही ती माझ्या विरहाने तळमळत असेल या नुसत्या कल्पनेनेच मी किती खूष होतो? मग आता अचानक काय होते आहे? का हा अस्वस्थपणा? कसली ही तळमळ?' विचाराने त्याच्या डोक्याचा भुगा व्हायला लागला होता.


'कुठेतरी चुकतोय का मी?' त्याने स्वतःला प्रश्न केला.


'पण का चुकेन? बाबावर माझं केवढं प्रेम होतं? बाबांचाही खूप जीव होता. त्यांचा लाडका शोन्या होतो मी. ते गेल्यानंतर ही हाक माझ्या कानावर कधी पडलीच नाही. आईने तर शौनक हे नावच टाकून दिलं. शाळेपूरता तेवढा मी शौनक कारखानीस. तिच्यासाठी मात्र केवळ विहान आणि आता विहान इनामदार.

मी आजवर खूप तडपडलोय, बाबासाठी रडलोय. माझ्यावर ज्यांच्यामुळे ही वेळ आली त्यांना मग मी असं सहजासहजी कसे सोडू?

नो विहान, तुला आणखी स्ट्रॉंग बनावे लागेल. नव्याच्या काळ्या डोहात मला हरवायचे नाहीये.' स्वतःला समजावण्याच्या तो प्रयत्न करत होता.

नेहमी स्वतःच्या भावनांना काबूत ठेवणारा तो आज मात्र त्याच्या मनाला आवरू शकत नव्हता. अस्वस्थता जास्तच वाढली तेव्हा तो बेडवरून उठून स्वयंपाकघरात गेला. फ्रिजमधील थंडगार पाण्याची बाटली त्याने घशात रिकामी केली.

पाण्याच्या गार स्पर्शाने त्याच्या घशाला थंडावा मिळाला पण मन शांत झाले नाही. तो दार लोटून अंगणात आला. बाहेर रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. त्याने पावसाचे थेंब अलगदपणे हातावर झेलले. काही थेंब चेहऱ्यावर उडाले, ते त्याने तसेच राहू दिले.


आजवर असे पावसात तो कित्येकदा भिजला होता. मुळातच त्याला पाऊस आवडायचा. जणू मित्रच त्याचा. त्याच्याशी तो आपल्या मनाचे हितगुज साधायचा. आजही हा मित्र जणू त्याच्या मदतीला धावून आला होता. हा मात्र मनीचे भाव सख्याला न सांगता त्याच्या रंगात रंगून गेला होता.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
*******

🎭 Series Post

View all