हवास मज तू! भाग -२२

वाचा नव्या आणि विहानची एक अनोखी प्रेमकथा.
हवास मज तू!
भाग -२२

मागील भागात :-
विहान नव्यासोबत त्याचा वाढदिवस साजरा करतो आणि त्याचवेळी तिला प्रपोज देखील करतो.

आता पुढे.

त्याच्या मिठीतील तो क्षण संपूच नये असे वाटत असताना त्याने अलवार स्पर्शाने तिला मीठीतून दूर केले.

"आता निघायचं? बरीच रात्र झालीये. मी इथे एकटा राहत असलो तरी तुझी फॅमिली तुझी वाट बघत असेल ना?" तो काळजीने म्हणाला.


"हम्म. जायला तर हवेच." ती नाईलाजाने मान हलवत तयार झाली.


"नव्या, एक सेल्फी काढूया? ती तिचा मोबाईल घेत असताना त्याने विचारले.


"ओ माय गॉड! फोटोसेशनशी कायम वाकडं असणाऱ्या द ग्रेट विहानला सेल्फी काढायची आहे?" तिच्या ओठावर खट्याळ हसू आले.


"तर? माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय असा हा दिवस आहे. एक फोटो तर हवाच." मोबाईलचा कॅमेरा उघडत तो म्हणाला.

तिच्यासोबत जेमतेम एक फोटो घेतला असेल तसा
त्याचा मोबाईल बंद झाला.

"शीट! याची आत्ताच बॅटरी जायची होती. म्हणजे माझा मोबाईल पण म्हणतोय की विहान, नो फोटोसेशन प्लीज." तो हसत म्हणाला.


"डोन्ट वरी. माझा मोबाईल आहे ना." तिने त्याच्या हातात मोबाईल दिला.

त्याने तिचा हात हातात घेत आपल्या चेहऱ्यासमोर हात ठेवत फोटो काढले. त्यात निवी तर स्पष्ट आली पण हात समोर आल्यामुळे त्याचा चेहरा गायब झाला.


"ही कसली रे सेल्फी? यात तू दिसतो तरी आहेस का?" तिचा चेहरा खट्टू झाला.


"रागावू नकोस ना गं. हे मी मुद्दाम केलंय. तू तुझ्या ग्रेट दी ला लगेच आपले फोटो पाठवशील म्हणून."

"हो, तर काय झाले? तसेही दी तुला बघण्यासाठी किती आतूर आहे हे तुला ठाऊक नाही. तिच्या लाडक्या बहिणीला कोणीतरी प्रपोज करतो आणि तो मुलगा कोण आहे हे तिला कळायला नको का?" तिने खट्टू होत नाक फुगवले.


"अशी नाक फुगवून किती गोड दिसतेस यार. तुझे हे रूप ना आज रात्रभर माझ्या डोळ्यासमोरून हटणार नाही. झोपेचे पार खोबरे होणार आहे आणि हे चालेल मला." तिच्या नाकाला हळूच म्हणाला.


"मी काय बोलतेय नि तुझं काय चाललंय? विहान.."


"श्श! त्रागा नको ना करुस." तिच्या ओठावर बोट टेकवून तिला गप्प करत तो तिच्या जवळ सरकला.

"तुझी दी किती एक्साइटेड आहे हे मलाही माहिती आहे, म्हणूनच इतक्यात माझे फोटो दाखवायला नाही म्हणतोय. मला तिला सरप्राईज द्यायचे आहे. एकदा तिला आपल्याला भेटायला येऊ तर दे, मग प्रत्यक्षात भेटेनच की. तू अडवलेस ना तरीही भेटेन." शब्दांची साखरपेरणी करत तो तिला समजावत होता.

त्याच्या गोड बोलण्याची मात्रा लगेच कामी पडली आणि ती हलकेच हसली.

"मला हे असलं काही सुचलं नसतं रे. तुझं डोकं तर भारीच चालतंय."

"म्हणजे आता रागावली नाहीस ना?" तिचा अंदाज घेत त्याने विचारले.


"अहं. तसेही तुझ्यावर फार काळ मी कुठे रागावू शकते?" ती गोड हसली.


"थँक यू." प्रतिसादात्मक तोही हसला.

"बरं, आता निघूया? बराच उशीर झालाय." तिच्यासाठी कारचा दरवाजा उघडत तो म्हणाला.

ती मान डोलावून आत बसली. आज किती हलके हलके वाटत होते. मनातल्या भावनांची देवाणघेवाण झाली होती. इतके दिवस हृदयात सांभाळून ठेवलेल्या भावना बाहेर पडल्या होत्या.

'माझ्या लोकांचा किती विचार करतो हा विहान? दी ला त्याला सरप्राईज द्यायचे आहे. घरी मला कोणी काही बोलायला नको म्हणून लवकर पोहचायचे आहे. विहान आयुष्यभर असाच राहशील ना रे? माझी अशीच काळजी घेशील ना?' त्याच्याकडे बघून गालातल्या गालात हसत ती स्वतःशी बोलत होती.

तिच्या एकटक पाहण्याने त्याने भुवई उंचावत काय झाले म्हणून विचारले तसे काही नाही म्हणून तिने मान हलवत नजर समोर केली.


"नव्या, आपण एका नात्यात बांधले जाणार आहोत. आता अशी एकमेकांपासून लपवाछपवी का करायची? तुझ्या मनात जे वाटतंय ते तू अगदी बिनधास्त बोलू शकतेस. अगदी काहीही. तुझे पर्सनल, प्रोफेशनल, फॅमिलीअर.. अगदी काहीही. तुला वाटेल ते तू माझ्याशी बोलू शकतेस." तिच्याकडे बघून तो म्हणाला.


"थँक यू. यू नो विहान हे असं सगळं मी माझ्या दी सोबत शेअर करते. इच अँड एव्हरीथिंग. आणि ती सुद्धा कितीही मोठा प्रॉब्लेम असेल ना तरी एकदम चुटकीसरशी तो सोडवते." एक लांब श्वास घेत ती म्हणाली.


"मी तुझ्या दी ची जागा तर नाही घेऊ शकणार; बट आय प्रॉमिस की माझ्यामुळ तुला कसला त्रास देखील होऊ देणार नाही." त्याने स्टीअरिंगवरचा एक हात काढून अलगद तिच्या हातावर ठेवला.


"आणि तू तुझ्या दीबद्दल एवढं बोलतेस ना, तर आता मलाही तिला भेटायची खूप ओढ लागलीय. तू एवढी गोड आणि हुशार आहेस तर तुझी दी तर.."


"तिच्याबद्दल तर तू काहीच अंदाज लावू शकणार नाहीस. तिला केवळ एकच करता येतं. प्रेम, प्रेम आणि फक्त प्रेम. कुणाकडून कसलीच अपेक्षा नाही, फक्त देत राहावं एवढंच तिला ठाऊक आहे." ती काहीशी हळवी झाली.


"आय विश, की लवकरच आमची भेट व्हावी."


"हम्म." ती मंद हसली. "ए, सॉरी विहान. तुला वाटायचे की ही केवळ स्वतःच्या बहिणीबद्दलच बोलत असते. आजचा आपला दिवस आणि त्यातही तिचाच विषय." तिला थोडे संकोचल्यासारखे झाले.


"वेडी आहेस का? उलट मला फार आवडतेय हे. माझ्या वाटेला वेगवेगळ्या नात्याचे सुख फारसे असे आलेच नाही गं. त्यामुळे जेव्हा तू तुझ्या फॅमिलीबद्दल भरभरून बोलतेस ना तेव्हा ऐकत राहावं असंच वाटतं." तिला सहज करत तो म्हणाला.


"विहान, डोन्ट वरी. जेव्हा तू माझ्या फॅमिलीला भेटशील ना, तेव्हा नाती म्हणजे काय? याचा प्रत्यय तुला येईल. तसाही तू आता फॅमिली मेंबर झाला आहेसच की. घरचे सगळे तुला भेटायला फार उत्सुक आहेत."

"तू आपल्याबद्दल घरी सांगितलेस देखील?" त्याची प्रश्नार्थक नजर.

"हम्म. मी घरच्यांपासून फार काळ काही लपवून ठेवू शकत नाही." ती किंचित हसली.


"नव्या, मी असा एकटाच. मला तुझ्या घरचे स्वीकारतील ना गं?" त्याचा स्वर काहीसा कातर झाला होता.


"ऑफ कॉर्स. तसेही तुझ्यात नाकारण्यासारखे आहे तरी काय? पण तरीही कोणाला काही प्रश्न पडलाच तर माझी स्वीट सिस्टर आहे ना? माझी शौर्या दी. ती सगळं नीट करेल. बघ, परत दीचा विषय निघाला." तिने डोक्याला हात मारला.


"यू नो विहान, दी शिवाय मी अपूर्ण आहे यार. तिचा विषय निघणार नाही असा एकही दिवस उगवणार नाही. प्लीज तेवढं समजून घेशील ना?"

त्याने तिच्या नाकाला चिमटीत घेत हसून मान डोलावली.

"बाय द वे, तुला कुठे सोडून देऊ? म्हणजे तुझ्या घरचा पत्ता माहिती नाही म्हणून विचारतोय." तो.


"समोरून दुसऱ्या चौकात सोडलेस तरी चालेल. मी जाईल तिथून."


"वेडी आहेस का? इतक्या रात्री तुला असं रस्त्यावर सोडणार का?"


"बरं बाबा. चौकात चल. तिथून तिसऱ्या घरापुढे कार थांबव. मग तर झालं?" ती हसली खरी पण मनात अपराधीपणाची भावना येत होती.

पाच मिनिटांनी दोघे त्या घरापाशी पोहचले.


"इथेच ना?" त्याने कारचा ब्रेक दाबत विचारले.


"हो. निघ तू आणि पोहचलास की एक मेसेज कर. बाय." ती उतरत म्हणाली.


"आता इथवर आलोच आहे तर घरच्यांना भेटून जातो की." तो बाहेर येत म्हणाला.

"अरे, नको. म्हणजे खूप रात्र झालीये ना, तर तुलाही परत जायला उशीर होईल आणि काळजी करू नकोस, मी लवकरच सगळ्यांना तुला भेटवेल." ती स्वतःला सावरत म्हणाली.

"ओके देन, बाय. गुडनाईट." तो परत आत बसला.
तिने हात हलवत त्याला बाय केले.


तो जाईपर्यंत ती त्या घराच्या गेटजवळ उभी होती. त्याची कार दिसेनाशी होईपर्यंत श्वास रोखून धरला होता. एकदाचा तो नजरेआड झाला आणि तिने 'हुश्श!' करत श्वास सोडला.

आपण त्याला आपल्या घरापर्यँत घेऊन जाऊ शकलो नाही याचे तिला वाईट वाटत होते.

'डॅड, तू त्याला आत्ता बघायला हवा होतास. किती केअरिंग आहे यार! आणि मी आजच्या स्पेशल दिवशी त्याच्याशी खोटं बोलले आणि असं परक्याच्या घराला स्वतःचे घर सांगून इथे घेऊन आले.

विहान आय एम सॉरी रे. मला तुझ्याशी खोटं बोलायचं नव्हतं, पण इतक्यात खरंही सांगता येत नव्हतं, म्हणून असे वागले. तू समजून घेशील ना?'

ती स्वतःशीच बोलत उभी होती आणि तेवढ्यात तिच्याजवळ एक कार येऊन थांबली. कारचा आवाज ऐकून तिचे नॉर्मल झालेले श्वास पुन्हा वाढले.

कारमध्ये कोण असेल? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
*******

🎭 Series Post

View all