हवास मज तू. भाग -१६

वाचा नव्या आणि विहानच्या प्रेमाची कथा.


हवास मज तू!
भाग -सोळा.

मागील भागात :-
सुनंदा आणि ललिताला आपल्या मनातील सांगून नव्या ऑफिसला पोहचते. तिथे मात्र तिच्या शोधक नजरेला विहानचे दर्शन होत नाही. दोघे भेटल्यानंतर त्यांचे छोटेसे भांडण होते.

आता पुढे.


"ओके, फाईन. तू जर माझ्याशी असाच वागणार असशील तर मी आज लंच करणार नाही." तिने धमकीवजा मेसेज करून मोबाईल बंद करून टाकला.


'शीट! घरून निघताना किती चांगल्या मुडमध्ये मी होते. याने पूर्ण वाट लावून टाकली. आता मला खरंच जेवायचे नाहीये.' लॅपटॉप मध्ये डोके टाकत तिने स्वतःला कामात गुंतवून टाकले.


ती कामाला लागली होती पण होणारी चिडचिड मात्र थांबत नव्हती. हळूहळू रागाबरोबर डोळ्यात पाणीही जमा होऊ लागले होते. नव्या जरी नाजूकशी असली तरी असे रडणे बिडणे तिला नाही आवडायचे. डोळ्यात उभे असलेले अश्रुंची तिला जाणीव झाली आणि रागानेच तिने टेबलपीस उचलून जोरात भिरकावले. 


तिचे टेबलपीस फेकणे आणि त्याचवेळी तिच्या केबिनचे दार बाजूला सरने याचा योग जुळून आला आणि दाराला आपटून 'धडाम' असा आवाज ऐकू येण्याऐवजी 'आह' असा हलका आवाज तिच्या कानावर पडला.


नव्याने नजर वर करून पाहिले, केबिनचे दार लोटून विहान आत आला होता आणि तिने फेकलेला टेबलपीस त्याच्या पायाला स्पर्शून गेला होता. हे तिला कळूनही त्याच्याकडे न बघता तिने नजर परत लॅपटॉप मध्ये घुसवली आणि आपण कामात किती दंग आहोत असे भासवण्याचा अयशस्वी प्रयत्न करू लागली.


"मारायचेच होते तर किमान मला पूर्णपणे आत तरी येऊ द्यायचे, म्हणजे निशाणा अचूक लागला असता. असे काचेतून बघून मी येतोय हे कळताच टेबलपीस फेकला ना?" तिच्या टेबलकडे येत तो स्मित करून म्हणाला.


"मी इतकी कावेबाज नाहीये मिस्टर विहान. एखाद्यावर वार करायचा झाला तर डायरेक्ट करते. आडून नाही." ती नजर वर न करताच म्हणाली.


"सॉरी. चुकलंच माझं. पण माझ्या चुकीचा राग जेवणावर का काढतेस? मागच्यावेळी तुला झालेला त्रास मी पाहिलाय. त्यामुळे हे जेवण घेऊन आलोय. नव्या प्लीज, थोडं खाऊन घे ना, नाहीतर परत त्रास होईल." विहान अगदी मनातून बोलत होता.


"मला होणाऱ्या त्रासाने तुला काय फरक पडतो?" तिने त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकत विचारले.


"फरक पडतो आणि ते तुलाही ठाऊक आहे. माझ्यामुळे तू हर्ट झालेले मला नाही गं सहन होत. प्लीज, खा ना." चमच्याने एक घास तिच्या समोर घेत तो म्हणाला.


"थँक्स पण मला माझे हात आहेत. मी खाऊ शकते." त्याच्या हातातील चमचा ओढून घेत ती.


"थँक यू." तो स्मित करून म्हणाला.

तिने परत एक नजर त्याच्यावर टाकली. आता त्या नजरेत राग नव्हता. खरे तर त्याच्या नुसत्या येण्यानेच तिचा राग मावळत आला होता.


"तुम्ही जाऊ शकता. माझं मी खाऊन घेईन." ती म्हणाली तसे तो जायला निघाला.


"मिस्टर विहान.."

हाय! परत तिचा गोड आवाज त्याच्या कानावर पडला.


"तुम्ही काही खाल्लं नाहीत हे मला माहितीये. सो तुम्हीसुद्धा तुमचे लंच करून घ्या. जेवला नाहीत तर तुमची अवस्था काय होते हे मलाही ठाऊक आहे." तिचे बोलणे ऐकून त्याच्या ओठावर पुन्हा हास्य उमटले. तिच्याकडे वळून अंगठा दाखवून तो बाहेर निघून गेला.


तो गेल्यावर ओठ रुंदावून तिने जेवायला सुरुवात केली. त्याच्या चेहऱ्यावर दिसलेली काळजी तिला सुखावून गेली होती. आतापर्यंत होणारी चिडचिड नाहीशी झाली होती. जेवण आटोपल्यावर ती फ्रेश मुडने तिच्या कामाला लागली.

******


"निवी? एवढया सकाळी कुठे गेली होतीस?" दुसऱ्या दिवशी सकाळी तिने बाहेरून आत यायला आणि ललिता आजीला आतून बाहेर निघायला एकच गाठ पडली.


"अगं, ते जरा बाहेर गेले होते." आजीला असे अनपेक्षितपणे समोर बघून ती भांबावली.


"बाहेर म्हणजे? मॉर्निंग वॉकला का?" आजीतील डिटेक्टिव्ह जागा झाला.


"अं? हो." ती गडबडून उत्तरली.


"एवढं नटून? म्हणजे आज चक्क पंजाबी ड्रेस वगैरे घालून तू मॉर्निंग वॉकला गेली होती? त्यात कपाळावर देवीचे कुंकू वगैरे..?" तिच्या प्रश्नांनी नव्याची भंबेरी उडत होती.


"आजी, अगं म्हणजे मी ते वॉक करतच गेले होते, ते पण मॉर्निंगला म्हणजे मॉर्निंग वॉकच झाले ना? हं, आता चालता चालता देवीच्या मंदिरापर्यंत पोहचले तर दर्शन घेऊन आले. त्याचे हे कुंकू." तिला धड खोटेही बोलता येत नव्हते आणि खरेही सांगता येत नव्हते.


"निवी, देवीकडे कसले साकडे वगैरे घातले होतेस का?" तिच्या मनाची चलबिचल ललिताने बरोबर ओळखली.

उत्तरादाखल नव्याने छोटेसे स्मित करून मान डोलावली.


"सारे काही तुझ्या मनासारखे घडू दे." ललिताने तिच्या डोक्यावर हात ठेवला.

"बरं, आता लवकर आत जा. नाहीतर तुला अशा कपड्यात बघून तुझे मॉम डॅड प्रश्नांच्या फैऱ्या झाडतील. रविवार आहे म्हणून बरं आहे, दोघे झोपून आहेत. नाहीतर तुझी काही खैर नव्हती." तिला आत पिटाळत ललिता हसून म्हणाली तशी नव्या देखील लगबगीने आत गेली.


'पोर प्रेमात ठार वेडी झालीय. आंधळी झाली नाही म्हणजे मिळवलं.' स्वतःशीच बोलत ललिता त्यांच्या बागेत फिरायला गेली.

"आह.."

खोलीत तेजगतीने जाण्याच्या प्रयत्नात तिच्या पायाच्या अंगठ्याला दरवाजाचे टोक लागले. ती तशीच वेदनेने कळवळत आत प्रवेशली. बाथरूममध्ये जाऊन पाय स्वच्छ धुतले आणि बेडवर येऊन बसली.


तिचे नाजूक गुलाबी पाय लालसर झाले होते. त्यात अंगठ्याला लागून त्यातून थोडे रक्तही येत होते.

विहानची नोकरी जाऊ नये म्हणून तिने मनात देवीला रविवारी अनवाणी पायाने दर्शनाला येण्याचे कबूल केले होते आणि तोच शब्द पाळायला ती भल्या पहाटेच शुचीर्भूत होऊन ती बाहेर पडली होती. परत येईपर्यंत कोणी उठणार नाही असा तिचा समज होता पण ललिताने तिला पकडले होते


'विहान, तुझ्या नजरेत, तुझ्या काळजीत, तुझ्या वागण्यात तुला माझ्याबद्दल काय वाटतंय ते मला जाणवतेय. आता ते मला तुझ्याकडून ऐकायचे आहे. त्यासाठी तू जेवढा वेळ घेशील, मला तो मान्य आहे.'

बोटातून येणारे रक्त कापसाने वेचत ती मनात त्याच्याच विचारात गुंतली होती. डेटॉलचा स्पर्श जखमेच्या ठिकाणी होताच तिला चर्र आग झाली.

"आँऽऽ" वेदनेने ती परत कळवळली.

'मिस्टर विहान, टेल मी वन थिंग, वेदनेशिवाय प्रेमाला पूर्णत्व येऊ शकत नाही का हो?' त्याच्या विचारातच तिने अलगद डोळे मिटून घेतले आणि बेडवर स्वतःला झोकून दिले.


"नव्या, बाळा ऊठ ना. आज तुमची सक्सेस पार्टी आहे ना? तुला जायचे नाहीये का?" काही वेळानंतर दारावर टकटक करत सुनंदा तिला हाका देत होती.


"मॉम, पार्टी रात्री आहे. आत्ता झोपू दे ना गं." बेडवरूनच तिने आळसावलेल्या स्वरात उत्तर दिले.


"अगं, म्हणजे रात्र होईपर्यंत तू उठणारच नाहीयेस का?" सुनंदा थोडीशी चिडली होती.


"सुनंदा, अगं पोरीवर केवढी ओरडतेस? झोपू दे जरा वेळ. आपल्या घरी नाहीतर काय सासरी जाऊन ती इतका वेळ लोळत राहणार आहे का?" लालिता नव्याची बाजू सावरत म्हणाली.


"आई, हे तुम्ही बोलताय? अहो, उशिरा उठेलेले तुम्हालाच तर चालत नाही ना?"


हम्म. मीच बोलतेय आणि माझ्या नातीने असे एखाद्या दिवशी उशिरा झोपलेले मला चालते." ललिता खमक्या आवाजात म्हणाली; तसे सुनंदाने लेकीला उठवायचा नाद सोडून दिला.

*******

"सजना ना है मुझे सजनी के लिए.."
मोबाईलमधून नव्याचा डीपी बघत विहान गुणगुणत होता. गाण्यातील स्वतःच बदललेले शब्द ऐकून तो स्वतःवर हसला.

"सो, माय ड्रीमगर्ल! टुडे फायनली आय एम गोइंग टू टेल यू समथिंग, फॉर व्हिच यू आर एगर्ली वेटिंग." डीपीतील फोटो झूम करत तो म्हणाला.

"पण खरंच तुला सांगू ना? की नको सांगू?" भुवई वर उंचावत तो.

त्याने काही वेळापूर्वीच त्याच्या गॅलरीतील तोडून आणलेला गुलाब हातात घेतला.

"सांगू? की नको?"

"नको? की सांगू?" एकेक पाकळी टेबलवर खुडून ठेवत तो त्याचा नेहमीचा खेळ खेळू लागला.

नेहमीप्रमाणेच आजही त्याने हा खेळ अर्ध्यावर सोडून दिला आणि आनंदात एक शीळ घालत तो आरशासमोर उभा राहिला.

"हेय जेन्टलमन, यू आर टू हँडसम!" तयार होताना आरशात बघून त्याने स्वतःलाच कॉम्प्लिमेंट दिले.

अंगावरची टी शर्ट, त्यावर घातलेले जॅकेट, त्याला मॅचिंग होणारी पॅन्ट आणि पायात लेदरचे शूज. सोबतीला जेलने व्यवस्थित सेट केलेले केस, ट्रिम केलेली दाढी आणि ओठावरचे मोहक हसू आणि शेवटी मारलेल्या डिओचा सुगंध..आधीच हँडसम असणारा तो आणखी हँडसम दिसणारच ना.

स्वतःची स्तुती केल्यानंतर तो बाहेर आला.

'डिअर नव्या, आय एम कमिंग. तू आज कशी दिसते आहेस ते बघायला मी खूप एक्सायटेड आहे.'

मनात बोलत त्याने कारचा दरवाजा उघडला. सिटबेल्ट ऍडजस्ट करून त्याने म्युझिक सिस्टिम सुरु केली. आवडीची गाणी ऐकत फ्रेश मुड घेऊन त्याची कार पार्टीच्या ठिकाणी निघाली होती.

नव्याशी विहान मनातील बोलू शकेल का? वाचा पुढील भागात.

:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all