हवास मज तू. भाग -१४

खरंच का प्रेम फसवे असते?


हवास मज तू.
भाग -चौदा.

मागील भागात:-
शशांकसमोर नव्या आपण विहानच्या प्रेमात आहोत हे कन्फेन्स करते. रात्री शौर्याला देखील ते सांगते. शौर्या मात्र तिच्या काळजीत असते. त्यावर शशांक तिला समजवतो.

आता पुढे.


"निवीची इतकी काळजी करणं सोड. तिच्यासाठी आम्ही सगळे आहोत की इथे. तू तुझ्याकडे देखील थोडं लक्ष दे. तिच्यावर जेवढं प्रेम करतेस ना, त्यातील निम्मे जरी प्रेम स्वतःवर करशील तर मला जास्त आवडेल." तो पुन्हा प्रेमळ स्वरात म्हणाला.

"हं. ठीक आहे. बाय." त्याच्या सल्ल्यावर तिने रुक्षपणे मोबाईल बंद करून ठेवून दिला आणि पुस्तकाचे पान पलटवायला लागली.

ती पुस्तकाचे पान पलटवत होती खरी, पण जीव अजूनही नव्यामध्ये गुंतला होता.


"एनी प्रॉब्लेम?" बाहेरून आलेली शिरीन तिला विचारत होती.


"ना." मान हलवत शौर्या उत्तरली.


"मग अशी उलटी बुक का पकडून बसलीहेस?" गंभीर चेहरा करत शिरीन.


"हो?" शौर्याने पटकन हातातील पुस्तकाकडे नजर टाकली. ते सुलटेच होते.


"यूऽऽ" शौर्या तिच्या मागे उशी घेऊन धावली. थोडया मस्त्या झाल्यावर शौर्याच्या चेहऱ्यावरची चिंता कमी होऊन ती थोडी फ्रेश झाली.


"शिरीन, थँक यू डिअर. तू इथे आहेस म्हणून मी खूश तरी असते. नाहीतर एकटीने कसे जगले असते गं?" ती भावनाविवश होत म्हणाली.


"ओए, ऐसा थँक्स बोलकर पराया मत कर यार. आफ्टरऑल हर एक फ्रेंड जरुरी होता है." तिला मिठी मारत शिरीन म्हणाली.


"हम्म. तरीही थँक यू."


"एवढं असेल ना तर फक्त थँक यू ने काम नाही चालणार. आज माझ्यासाठी पिझ्झा ऑर्डर कर."


"नो वे, इतक्यात तुझे रोजचे पिझ्झा खाणे सुरु आहे."


"शौर्या, डार्लिंग प्लीऽऽज." शिरीन तिला मस्का मारत म्हणाली तशी शौर्या खुदकन हसली.


"ओके, करते पण आजच्यानंतर असे रोज रोज खाऊ देणार नाही हं." तिच्या डोक्यावर टपली मारत शौर्या.


"यू आर सो स्वीट! थँक यू." शिरीनने तिला पुन्हा एकदा झप्पी दिली.

*****


"शौर्याशी काय बोलणे सुरु होते? निवीची का जास्त काळजी करतेय ती?" कॉल कट झाल्यावर शशांक मागे वळणार तोच सुनंदाचा आवाज त्याच्या कानावर आला.


"सिस्टर्स बॉण्डिंग, आणखी दुसरं काय?" शशांक खांदे उडवत म्हणाला.


"अहं, दुसरे काहीतरी आहे हे मात्र नक्की. तसेही मला आणि आईंना निवी बदलल्यासारखी वाटते आहे."


"काहीही काय गं? तुम्ही दोघी जास्तच तिच्या मागे लागता,म्हणून तसं वाटत असेल." तो बेडवर बसत म्हणाला.


"नाही रे, आम्हाला तर डाऊट आलाय." त्याच्याशेजारी बसत ती.


"कसला?"


"घाबरतोस कशाला? फार असं काही नाही. आईला आणि मला वाटलं, म्हणजे आम्हाला दोघींना मिळून असं वाटतंय की..?" तिने एक पॉज घेतला.


"अगं थांबलीस का? सांग की." पाण्याचा घोट घेत तो.


"की आपली निवी प्रेमात पडलीय." ती चटकन बोलली आणि शशांकच्या तोंडातून पाणी बाहेर आले.


"अरे, जरा हळू. एवढं रिऍक्ट व्हायची काय गरज आहे? प्रेमातच पडलीये ती, कुठे पळून गेली नाहीये." त्याच्या डोक्यातून हात फिरवत ती म्हणाली.


"आता कसं वाटतंय?" त्याच्या डोक्यातून हात काढत ती.

"काय वाटायचं?"


"अरे आपली लेक प्रेमात पडलीये आणि तुला काहीच कसं वाटत नाही?" सुनंदा जराशी चिडली होती.


"काय? मला तर खूप भारी वाटतेय. असं वाटतंय की तिच्या रूपात आपण दोघे पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडतोय." तिला जवळ घेत तो म्हणाला.


"काहीतरीच तुझं." तिचा चेहरा लाजेने लाल झाला.


"एक मिनिटं, शशी तुला हे आधीच ठाऊक होतं का? म्हणजे निवी खरंच प्रेमात पडलीये?"

"हम्म." तो मान डोलावून म्हणाला.


"इट इज नॉट फेअर. तुम्ही दोघांनी मला सांगितले सुद्धा नाही." ती चेहरा फुगवून म्हणाली.


"अगं राणी, मलासुद्धा आजच कळले." तो तिला मिठीत घट्ट करत म्हणाला.


"सुनंदा, आपली निवी मोठी झालीये. तिला तिचे लाईफ एंजॉय करू दे. आपण आपले लाईफ एंजॉय करूया."


"अरे, तुला कळत कसं नाही? या सर्व गोष्टींसाठी ती खूप लहान आहे."


"राणीसरकार, तुम्ही तिच्या वयाची असताना आपल्या लग्नाची बोलणी सुरु होती हे विसरलात का?" तिच्याकडे रोखून बघत त्याने विचारले.


"आपली गोष्ट वेगळी होती." त्याच्या केसांशी चाळा करत ती म्हणाली.


"आपल्यापेक्षा या पिढीची गोष्ट निराळी आहे. तेव्हा तू जास्त टेंशन घेऊ नकोस, आपल्या नवऱ्याकडे तेवढे लक्ष दे." तिला जवळ ओढत शशांक म्हणाला.


"तू पण ना." त्याच्या छातीवर हलकेच मारत ती त्याच्या मिठीत विसावली.

******

दिवसभराच्या घडामोडीने निवीची झोप उडाली होती. या कुशीवरून त्या कुशीवर कितीतरी वेळा पलटून झाल्यावर तिने परत मोबाईल हातात घेतला.


मोबाईल उघडायचा, व्हाट्सअँप मध्ये जाऊन विहानचा डीपी बघण्याचा प्रयत्न करायचा आणि मग पुन्हा हिरमुसून मोबाईल बाजूला ठेवायचा एवढेच काय तर काम ती मघापासून करत होती.


आपल्या हिरोला मात्र त्याची कुठे फिकीर होती? व्हाट्सअँप डीपी ठेवणे, स्टेटसला फोटो लावणे असल्या गोष्टीपासून तर तो कितीतरी लांब होता.


तिने पुन्हा एकदा मोबाईल घेतला. फेसबुक, इंस्टाग्रामवर तरी तो कुठे असेल म्हणून शोध घेऊ लागली. पण सोशल मीडियाशी त्याचे जणू वाकडे असावे, कारण तो कुठेच नव्हता. आता तिला थोडा राग येऊ लागला होता.

मनातल्या मनात त्याला शिव्या वाहत ती व्हाट्सअँपकडे वळली. यावेळी कधी नव्हे तो विहान तिला ऑनलाईन दिसला आणि इतक्या वेळेपासून त्रागा करणाऱ्या तिच्या मनाला थोडा दिलासा मिळाला. 


"हाय! अजूनपर्यंत तू जागी आहेस?" त्याचा मेसेज आला तशी तिच्या ओठावरची रेष रुंदावली.


"हम्म." तिने रिप्लाय दिला.


"काय झाले? बरं आहे ना?"


"हम्म." ती.

"नव्या, मी तुला डिस्टर्ब केलेय का? सॉरी. मला ऑनलाईन दिसलीस म्हणून मेसेज केला पण असं वाटतंय की तुला बोलायचे नसेल."

"तू डीपीला फोटो का ठेवत नाहीस?" त्याच्या लांबसडक बोलण्याला तिने एका वाक्यात प्रश्न केला.

"व्हॉट?" तिच्या अनपेक्षित प्रश्नावर काय रिऍक्ट व्हावे त्याला कळलेच नाही.

"म्हणजे बघायला हँडसम आहेस, एवढा डॅशिंग आहेस तर डीपीला एखादा चांगला फोटो ठेवू शकतोस ना." तिचा एकचज हेका चालला होता.


"म्हणजे तुला मला बघायचं होतं का?" त्याच्या डोक्यात जरासा प्रकाश पडला.


"मला का तुला बघायचे असेल? मी ते सहजच बोलले." चोरी पकडल्याचे एव्हाना तिच्या लक्षात आले होते.


"ॲक्च्युली मी तुझा फोटो बघत होतो म्हणून मला वाटलं की तुलाही मला बघायचे असेल. बट लिव्ह इट. तुला का मला बघावं वाटेल ना?" हातातील गुलाबपाकळी तोडून टेबलवर ठेवत त्याने मेसेज केला.


"तुला का मला बघावंस वाटलं?" त्याच्या मेसेजने तिचा चेहरा फुलला होता.


"आय डोन्ट नो. मे बी यू नो बेटर द्यान मी." त्याने रिप्लाय दिला.

"बरं, आता उत्तर शोधत बसू नकोस. झोप नाहीतर उद्याला लेट होईल तर आरके सर दोघांचीही शाळा घेतील." हसऱ्या चेहऱ्याच्या दोन स्मायली पाठवल्या.


तिच्याही चेहऱ्यावर हसू फुलले. गुडनाईटचा मेसेज पाठवून ती ऑफलाईन झाली.

'आय डोन्ट नो. मे बी यू नो बेटर द्यान मी.' त्याचा मेसेज तिने परत नजरेखालून टाकला.

'याला सगळं माझ्याकडून काढून घ्यायचं असतं. कदाचित प्रपोज देखील मलाच करावे लागणार आहे, असं दिसतेय. देवा आमची जोडी अशी रे कशी बनवलीस? अख्ख्या जगाला कळतेय की आम्ही एकमेकांना लाईक करतोय. हा मात्र आधी माझ्याच तोंडून वदवणार दिसतेय.'

गालातल्या गालात हसत तिने शेवटी मोबाईल बाजूला ठेवला आणि अलगद डोळे मिटले.

******

'नव्या डार्लिंग, मी तुझ्या प्रेमात आहे हे माझे मला कळलेय. तुझेही तुला कळले हे मला माहिती आहे. पण प्रथम कोण वदेल? तू? का मी? मी? का तू?'
हातातील गुलाब पाकळ्या खुडण्याचा खेळ थांबवत तो स्वतःशीच हसला.

आजच्या गुलाबपाकळ्या देखील नेहमीप्रमाणे अर्धवटच विखुरल्या होत्या. उरलेला अर्धा गुलाब तसाच ओठावर ठेवून तो झोपी गेला.

******

"निवी, जरा बोलायचं होतं तुझ्याशी." ती पायात शूज चढवून निघणार तोच सुनंदाने हाक दिली.


"मॉम, मी नाश्ता केलाय. दूध प्याले. माझे इन्सुलिनचे पाकीटदेखील सोबत घेतले. आता मी निघू? बाय, बाय, बाय." कालप्रमाणे आजही ती वेळेपूर्वी तयार झाली होती.


"निवी, तू आमच्याशी असं नाही वागू शकत." ललिताने ठेवणीतले शस्त्र हाती घेतले, तशी ती गडबडली.


"आज्जी, काय झालेय? तू का अशी रडते आहेस? मॉम?" ललिताला प्रश्न विचारता विचारता तिने सुनंदाकडे पाहिले तर तिच्याही डोळ्यात पाणी होते.

ललिता आणि सुनंदाच्या डोळ्यात का पाणी आले असावे? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
*****

🎭 Series Post

View all