हवास मज तू! भाग -९

खरंच का प्रेम फसवे असते? वाचा एका प्रेमाची नवी कथा.


हवास मज तू!
भाग - नऊ.

मागील भागात आपण पाहिले की नव्याचे मिस्डकॉल बघून शौर्या तिला फोन करते. तिचा आवाज ऐकून आणि तिला बघूनच नव्या प्रेमात पडलीय याचा ती अंदाज लावते
आता पुढे.

इकडे डोक्यातील विचार झटकून शौर्या पुस्तकाकडे वळली. पुढच्या महिन्यात तिची एमबीएची अंतिम परीक्षा होती आणि मागच्या वर्षाप्रमाणे यंदाही टॉप करायचे होते.

तिने पुस्तक हातात घेतले खरे पण तिची लाडकी निवी मात्र डोक्यातून जाईना. लहान असताना तिच्या मागे मागे पळणारी, प्रत्येक गोष्टीत तिच्यावर अवलंबून असणारी निवी आता अचानक मोठी झाली असे तिला वाटू लागले होते.


'निवी, तू कितीही मोठी झालीस ना तरी माझ्यासाठी माझी गोडुली प्रिन्सेसच आहेस गं. मी कायम तुझ्यासोबत असेल. तुझ्या सुखासाठी देवाला नेहमी प्रार्थना करेल. लव्ह यू निवी.'

पुस्तक बाजूला ठेवून ती परत डोळे मिटून पडली. तिची लाडकी बहीण यावेळी तिथे असती तर एक घट्ट मिठी मारली असती असे तिला वाटले. 'आय लव्ह यू माय डिअर, अँड आय प्रॉमिस की मी नेहमीच तुझ्या सुखाचाच विचार करेन.' मनातल्या मनात नव्याला वचन देऊन ती तशीच झोपी गेली.

******

शौर्याशी बोलणे झाल्यावर नव्या बेडवरून उठून आरशासमोर उभी राहिली. 'निवी तू ब्लश करते आहेस.' शौर्याचा आवाज अजूनही तिच्या कानात पिंगा घालत होता.

'खरंच का माझ्या गालावर ही प्रेमाची लाली चढलीय?' आरशात बघून तिने स्वतःला प्रश्न केला. उत्तरादाखल तिच्या लाल गालावरची लालिमा आणखी गडद झाली.


'विहान, दोन दिवसांच्या भेटीत तू मला आवडायला लागला आहेस, हे खरं असेल का? त्या दिवशी मी रोडवर तुझ्याशी भांडले, नेमकं त्याच क्षणात तू माझ्या मनात घर केले असावेस. नाहीतर मला त्रास होईल हे ठाऊक असताना देखील मी माझे ताट तुझ्या पुढ्यात का ठेवले असते?' ती विचारमग्न होऊन आरशात स्वतःला निरखत होती.


'ही आत्मीयता होती, की तुझ्याप्रती ओढ? की दी म्हणते तशी प्रेमाची चाहूल? मला ठाऊक नाही. खरंच ठाऊक नाही. पण जर हे प्रेम असेल तर आवडेल मला. खूप खूप आवडेल.' तिने स्वतःभोवती गर्रकन एक गिरकी घेतली.

स्वतःच्या विचाराचे तिला खुदकन हसू आले. मन अगदी हलके हलके झाले होते. खोलीत अंधार करून तिने स्वतःला बिछान्यावर स्वतःला झोकून दिले. एक गोड लहर तिला अलगद स्पर्शून गेली. डोळे मिटून स्वप्नरंजनाच्या दुनियेत तिने प्रवेश केला होता.

******

कॉफीचा मग तोंडाला लावून विहान सोफ्यावर मस्तपैकी रेलून टीव्ही बघत बसला होता. समोरच्या टेबलवर एकावर एक ठेवलेले त्याचे पाय हळूवार हलत होते. डोळ्यात एक वेगळीच चमक जाणवत होती.
दहादा चॅनल बदलवून देखील डोक्यात असलेली नव्या काही जात नव्हती. उलट टीव्हीवरच्या बायकांमध्येही त्याला तीच दिसू लागली होती.

"मिस्टर विहान " त्याने नव्याच्या अंदाजात स्वतःलाच हाक दिली आणि स्वतःच त्या कल्पनेने हसायला लागला.

"पार वेडं केलं आहेस नव्या तू मला. खरं तर तुझ्यात वेडं व्हायला मलाही आवडत आहे." कॉफीचा मग खाली ठेवत तो म्हणाला.

"पण याहून जास्त काय आवडेल ठाऊक आहे? जेव्हा तू माझ्या प्रेमात वेडी होशील, ठार वेडी होशील, तो क्षण अनुभवणं. मी वाट बघतोय त्या क्षणाची." त्याच्या ओठावर मंद स्मित पसरले होते.

तो उठून टीव्हीसमोर उभा राहिला. टीव्हीतील गाणं म्हणणाऱ्या नायिकेच्या ठिकाणी त्याला परत तीच दिसू लागली तसा त्याने टीव्ही बंद केला.


"माय डिअर नव्या, जशी तू मला प्रत्येक ठिकाणी दिसतेस तसा मीही तुला दिसतो का? नसेल दिसत तर लवकरच दिसायला लागेन. जळी स्थळी, काष्ठी पाषाणी.. सगळीकडे फक्त आणि फक्त विहान. तुझा विहान." मोबाईलमध्ये तिचा डीपी बघून तो पुन्हा तिच्यात हरवत होता.

"हरवून जाशील तू. माझ्यासारखी. माझ्यातच." त्याने पुन्हा घोट घेतला.

"पण आत्ता तुला काय वाटतं? आवडतो ना मी तुला? तसे तुझ्या नजरेत दिसलेच ते, पण मला तुझ्या तोंडून हे ऐकायचे आहे. ए, एक गेम खेळूया?" तिला इमॅजिन करून त्याचे बोलणे सुरूच होते.


हातातील मग बाजूला ठेवून तो बाल्कनीत आला. बाहेर मंद वारा सुटला होता. त्या प्रसन्न गारव्यात त्याच्या ओठांतून एक शीळ उमटली.

बाल्कनीत कुंड्यांमध्ये फुललेल्या फुलझाडांच्या सुगंधाने त्याच्या मनाला पुन्हा उभारी आली. एका कुंडीत फुललेल्या लाल गुलाबाला त्याने हळूच गोंजारले.


"सॉरी डिअर, पण मला तुला तोडावे लागेल. शेवटी प्रश्न माझ्या प्रेमाचा आहे." त्या फुलाची माफी मागून तो ते आत घेऊन आला.
नाकाजवळ गुलाब घेऊन त्याने एक लांब श्वास घेत त्याचा मंद सुगंध मन भरून हुंगला आणि मग त्यावर अलगद ओठ टेकवले.

"शी लव्हज मी.."

"शी हेट्स मी.."

प्रत्येक वाक्यासरशी तो एकेक गुलाबपाकळी खुडून टेबलवर ठेवत होता. अर्ध्या पाकळ्या टेबलवर जमा झाल्या होत्या. त्याच्या हातात आता अर्धे फूल उरले होते.

"शी लव्हज मी." त्याने पुन्हा एक पाकळी खुडली आणि ओठाला लावून खाली पसरलेल्या पाकळ्यात तिला ठेवले.

"गेम ओव्हर!" पुढच्या क्षणी हातातील उरलेला गुलाब खाली ठेवत तो म्हणाला.

"डिअर नव्या, मला माहिती आहे, हा गेम असाच अर्ध्यावर संपणार आहे. कारण तोवर तू माझ्या प्रेमरंगात मनसोक्त रंगलेली असशील."

त्याने हसून उरलेले गुलाबफूल ओठांना लावले आणि मग परत बाल्कनीत जाऊन उभा राहिला. त्याचा फ्लॅट दहाव्या मजल्यावर होता. बाहेरचे झोपी गेल्यामुळे शांत शांत असलेले जग, वर आकाशात चमचमणारे तारे मधूनच नाकाला भिनणारा त्याच्या बाल्कनीतील फुलांचा गंध!

आज त्याला हे सर्व हवेहवेसे वाटत होते. एरवी बाहेरून घरी आला की टीव्हीत घुसणारा तो, आज मात्र त्याला बाहेरचे जग जास्त जवळचे वाटत होते.

'माझ्या यशाची पहिली पायरी मी लवकरच ओलांडणार आहे. मग तो कळस गाठायला फारसा वेळ नाही लागणार.' मिश्किल हसत तो आकाशातील ताऱ्यात गुंतला.


रात्रीच्या अंधारात उजळलेले ते टिपूर चांदणं तो डोळ्यात साठवत होता. अचानक गालावर एक थेंब केव्हा येऊन विसावला त्याचे त्यालाही कळले नाही. चांदण्यात हरवताना नकळत तो त्याच्या बालपणाच्या आठवणीत हरवला होता. आठवणीच्या त्या गर्दीत त्याला दिसला त्याचा बाबा, ज्याचे बोट पकडून तो रोज रात्री आकाशातील ताऱ्यांची सफर करत असायचा. असा त्याचा बाबा, त्याला अवघ्या आठ वर्षांचा असतानाच सोडून गेलेला त्याचा बाबा!


डोळे पुसून आर्द्र मनाने तो आत परत आला. आतापर्यंत आनंदात असलेले त्याचे मन सैरभैर झाले होते. असे मन जागेवर नसले की टीव्ही नाहीतर मोबाईलमध्ये तो जुनी गाणी ऐकत बसायचा. आज त्याला तेही करावेसे वाटत नव्हते.


टीव्हीजवळच टेबलवर ठेवलेले एक फोटो त्याने हातात घेतला. एका मध्यमवयीन स्त्रीचा तो फोटो होता. फोटोतील भावहीन असलेला चेहरा बघून त्याने तो फोटो हृदयाशी धरला.

"आई, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद परत आणल्याशिवाय मला चैन पडणार नाही. आय प्रॉमिस यू, तो दिवस लवकरच उगवेल. तुझा मुलगा लवकर खूप काही अचिव्ह करेल. तुझ्या सर्व इच्छा.. छे! एकच तर इच्छा आहे तुझी. ती इच्छापूर्ती अगदी जवळ आलीय असं समज. मग मीही तुझ्या कुशीत असेल.

तुझ्या प्रेमळ स्पर्शासाठी, तुझ्या मिठीसाठी आसूसलोय गं मी. आई, आय मिस यू. मिस यू लॉट." फोटोला हृदयाशी कवटाळत त्याने अश्रूला वाट मोकळी करून दिली.

******

"अहो साहेब, आज तुम्ही इतक्या उशिरापर्यंत कसे झोपून आहात?" सकाळी नऊ वाजता कामाला आलेल्या काकूंनी विहानला विचारले. तीन-चारदा बेल वाजवल्यावर कुठे त्याने दरवाजा उघडला होता. डोळ्यावर अजूनही झोप तरळत होती.


"काकू, इतक्या सकाळी का आलात तुम्ही? झोपेचं अगदी खोबरं करून टाकलंत." आळसावलेल्या आवाजात तो बोलला तशा त्या काकू हसायला लागल्या.


"काय साहेब, जागे व्हा जरा. नऊ वाजलेत आता. रात्रभर प्रेयसीच्या स्वप्नात होतात की काय?" हातात झाडू घेत ती कामाला लागली.

"काय नऊ वाजलेत?" तो एवढया जोरात ओरडला की त्याची झोप घाबरून पार पळूनच गेली.

"काकू, चला, बाजूला व्हा. मला ऑफिसला उशीर झालाय. मला माझं आवरू द्या आधी." त्याच्या बेडरूममध्ये झाडू घेऊन गेलेल्या तिला त्याने बाहेर काढले आणि ब्रश करतच तो बाथरूम मध्ये घुसून शॉवरखाली उभा राहिला.

पुढच्या दहा मिनिटात तो बाहेर आला तेव्हा ऑफिसला जाण्यासाठी पूर्णपणे तयार झाला होता.


ऑफिसमध्ये वेळेत पोहचू शकेल का विहान? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
******

🎭 Series Post

View all