हवास मज तू! भाग -आठ

खरंच का प्रेम फसवे असते?


हवास मज तू!
भाग -आठ.

मागील भागात आपण पाहिले की नव्या आणि विहानची डिनर डेट झाल्यानंतर ती घरी परतते तेव्हा शशांकने तिच्या लग्नाचा विषय काढतो आणि तिच्यासाठी एखादा घरजावई शोधेन असे तो गमतीने म्हणातो. रात्री विहानच्या आठवणीने तिच्या डोळ्यावरील झोप उडते आणि मग ती शौर्याला मेसेज करते.

आता पुढे -


"हाय दी, काय चाललंय?" इतका वेळ बेडवर लोळत पडलेल्या नव्याने शेवटी शौर्याला मेसेज केला.

केव्हाची ती निद्रादेवीच्या प्रसन्नतेची वाट पाहत होती, पण डोळे मिटले की तिच्या नजरेसमोर विहानचा हसरा चेहरा येत होता. ती हॉटेलमधून निघाली तेव्हा तो त्याच्या कारला रेलून तिच्याकडे बघतोय हे तिला जाणवले होते. त्याच्या त्या नजरेत काहीतरी वेगळे भाव तिला जाणवले होते.


'मलाच असे वाटतेय की खरंच त्याच्या मनात माझ्याबद्दल काही आहे?' नकळत तिच्या मनात येऊन गेले आणि त्या प्रश्नाने ती झटकन उठून बसली.

'नो निवी, असा विचार तरी कसा करू शकतेस? दोन दिवसांपूर्वी तर तो तुला भेटला आणि लगेच त्याच्याबद्दल असा विचार?' स्वतःच्या मनावर आवर घालण्याची तिची धडपड सुरू होती.


त्याच्या हातात दिलेला हात, अन त्याचा तेव्हाचा उबदार स्पर्श तिला अजूनही परत तिथे घेऊन जात होता. अचानक अंगावर रोमांच उभे झाल्यासारखे वाटले, आणि तिने डोक्याला हात मारला.


'निवी, व्हाट्स गोइंग यार?' ती स्वतःलाच विचारत होती.

जेव्हा तिच्या प्रश्नांची उत्तरं तिला मिळेनाशी झाली तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून तिने मोबाईल हातात घेतला.
शौर्या दीला फोन करू की नको या द्वन्द्वात अडकलेल्या तिने सरतेशेवटी मेसेज केला आणि हातात मोबाईल तसाच ठेवून तिच्या प्रत्युत्तराची वाट बघत बसली.


"सॉरी, यार निवी. मी जरा अभ्यासात गुंतले होते म्हणून मोबाईलकडे लक्ष गेले नाही. बोल काय म्हणतेस?" पाच एक मिनिटात शौर्याचा रिप्लाय आला.


ही पाच मिनिटे नव्याला किती कठीण गेली तिचे तिलाच ठाऊक. मोबाईल हातात घेऊन मेसेज बघितल्याच्या रेघा केव्हा निळ्या होतात याकडेच तिचे लक्ष लागून होते. शौर्याचा रिप्लाय आला तसे तिचे ओठ रुंदावले आणि इतका वेळ लागला म्हणून ती हिरमुसली देखील.

"दी, मला ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये. कट्टी " तिने रागाचे दोन तीन इमोजी टाकून मेसेज पाठवला आणि तोंड फुगवून बसली.


तिचा मेसेज गेला नि पुढच्याच क्षणी शौर्याचा कॉल आला. "अगं माझी राजकुमारी, का रुसलीहेस अशी? सॉरी ना." नव्याने फोन उचलल्याबरोबर हाय हॅलो न म्हणता शौर्याने बोलायला सुरुवात केली.


"दी, आता ना तुझ्याशी मी बोलणारच नव्हते पण तुझा आवाज ऐकला नि राग पळाला माझा." खुदकन हसून नव्या म्हणाली.


"भोळीच आहेस." तिचे बोलणे ऐकून शौर्याला हसू आले. "बरं बोल, एवढ्या रात्री मेसेज केलास, सगळं ठीक आहे ना?" तिच्या स्वरातील काळजी स्पष्ट दिसत होती.


"हम्म, तशी बरी आहे मी." शब्दांची जुळवाजुळव करत नव्या उत्तरली.

"तशी बरी म्हणजे? आणि तुझ्या आवाजाला काय झालेय? निवी, एनी प्रॉब्लेम बेटू? मी व्हिडीओ कॉल करू का?" शौर्याची काळजी अधिक गडद झाली.

"नो, दी. मी ओके आहे. जस्ट तुझा आवाज ऐकायचा होता." नव्या.

"आणि मला जस्ट तुला बघायचे आहे. निवी प्लीज पिक अप द कॉल." व्हिडीओ कॉल कनेक्ट करत शौर्या म्हणाली.

"निवी, काय झालेय तुला? चेहरा का असा गुलाबी दिसतोय?" तिला बघून शौर्याने पुन्हा प्रश्नांची सरबत्ती केली.

"दी, अगं खरंच काही नाही." नव्या बोलत तर होती खरी पण 'गुलाबी चेहरा' हे ऐकून तिचा चेहरा आणखी गुलाबी झाला.


"एक मिनिट, निवी तू ब्लश करते आहेस. हेय, प्रेमात बिमात पडलीस तर नाही ना?" तिचा चेहरा एकटक न्याहाळत शौर्याने बॉम्ब टाकला.

"दी, प्रेमात पडल्यावर चेहरा ब्लश करतो का?" तिच्या शब्दांना पकडत निव्याने प्रतिप्रश्न केला. बोलताना चेहऱ्यावरची गुलाबी झालर आणखीन गडद होत होती.

"ओ माय गॉड! निवी यू आर इन लव्ह! खरंच." शौर्या तर ओरडलीच.

"दी, असं काही नाही आहे."

"मग कसं आहे? आणि हे काय तू चक्क लाजते आहेस? क्या बात है!" शौर्या.

"दी, म्हणजे मलाच कन्फर्म नाहीये. म्हणजे बहुतेक मी पडलेय प्रेमात, पण खरंच प्रेमात पडलेय का? ते शुअर नाहीये." शब्दांना गोल गोल फिरवत ती म्हणाली.

"पण मी हंड्रेड पर्सेंट शुअर आहे निवी, की तू प्रेमात पडलीहेस. ए, कोण आहे गं तो? कुठे भेटला? कसा आहे? त्याचा फोटो पाठव ना." ती एका दमात सगळं जाणून घ्यायला बघत होती.

"अगं, तू माझी खरंच मोठी बहीण आहेस ना? मला रागवायचे सोडून अशी प्रोत्साहित काय करतेस?" नव्या हसून.

"निवी, तू तर प्रिन्सेस आहेस माझी. तुला कसं रागावणार ना? ते जाऊ दे. मला त्याचे नाव सांग ना." शौर्या.

"दिदूडी, आधी मला कन्फर्म तर होऊ दे मग सगळ्यात पहिले तुलाच सांगेन."

"प्रॉमिस?"

"पक्कावाला प्रॉमिस."

"ओके डिअर. चल मी फोन ठेवते आता. अभ्यास बाकी आहे आणि तू झोप हं. स्वप्नात तुझा राजकुमार येईल त्याच्याशी गप्पा मारत राहू नकोस." मिश्किल हसत शौर्याने फोन कट केला.

'निवी, वेडूली प्रेमात देखील पडलीये. किती लवकर मोठी झालीय माझी प्रिन्सेस.' मोबाईलवरचा नव्याचा फोटो बघून शौर्या गालात हसली.

'लव्ह यू निवी. अशीच नेहमी हसत रहा. माझ्या वाटेचे सुख देखील तुझ्या भाग्यात लाभू दे.' फोटोवर ओठ टेकवत तिने डोळे मिटले.
 

"हेय, शौर्या. व्हाट हॅपॅन्ड? मिसिंग युअर लिटल सिस?"

तिच्या डोळ्यातून थेंब ओघळला आणि तेवढ्यात बाहेरून आलेल्या तिच्या रूम पार्टनर शिरीनचे लक्ष तिच्याकडे गेले. शौर्या आपल्या बहिणीसाठी कसली वेडी आहे हे तिला चांगलेच ठाऊक होते.

शौर्या आणि शिरीन दोघी रूमपार्टनर्स आणि क्लोज फ्रेंड्स देखील. दोन वर्षापासून दोघी एकत्र होत्या. एकच कॉलेज, एकच होस्टेल आणि योगायोगाने दोघींना रूमदेखील एकत्रच मिळाली होती. त्यात दोघीही भारतातून आलेल्या. शिरीन कॅथालिक तर शौर्या हिंदू. दोघींच्या स्वभावात देखील कमालीची तफावत.

पण ही तफावत त्यांच्या मैत्रीच्या नात्यात कधीच आड आली नाही. उलट दोघींनाही एकमेकींच्या मनातील लगेच कळायचे. आत्ताही शौर्या तिच्या लहान बहिणीचच्या आठवणीत बुडालीय हे शिरीनला लगेच कळले होते.

"हम्म. शिरीन, मला वाटायचं माझी लहान बहीण लहानच आहे पण ती मोठी झालीय गं. प्रेमात पडलीय ती." शिरीनकडे डोळे किलकीले करून बघत शौर्या म्हणाली.


"वॉव! द्याट्स ग्रेट. ती लहान असून तरी प्रेमात पडलीय आणि तू अजूनही तशीच आहेस, कोरडीठाक. स्वतःच्या लहान बहिणीकडून काहीतरी शिक जरा." शिरीन.


"शिरीन, यू आर इम्पॉसिबल. हे असं लव्ह बिव, कमिटमेंट्स मला नाही जमायचं. जैसी भी हूं ऐसेही भली हूं." शौर्या खांदे उडवत म्हणाली.


"भली नाही, मॅड आहेस तू. लुक एट मी, इथे न्यूयार्कला आल्यापासून मला तिसरा बॉयफ्रेंड आहे आणि तू? माझी मैत्रीण शोभत देखील नाहीस."

शिरीनचे बोलणे ऐकून शौर्या तिला खाऊ की गिळू नजरेने बघू लागली.

"ओये, ऐसे घुर मत. तो पिटर गेल्या वर्षभरापासून तुझ्या मागे लागलाय. एकदा तरी चान्स देवून बघ म्हटलं तरी तुझी नकारघंटाच वाजत असते." शिरीन आता तिला घुरत म्हणाली.

"शिरीन, त्या पिटरचा विषय काढू नकोस. डोक्यात जातो यार तो आपल्या. आणि तसेही तुला माहित आहे की माझे व्हिजन किती क्लिअर आहे ते. नो लव्ह, नो लग्न, अँड नथिंग ऑल. इथून गेले की मी आणि माझी फॅमिली. लाईफ एंजॉय करण्याचा बस आपला हाच सिम्पल फंडा आहे." शौर्या तिला पुन्हा तेच समजावून सांगत होती.


"ओके. मी तरी कोणाच्या मागे डोकं आपटत आहे? सी, मी आणि हॅरी मुव्हीला जातोय. तू आम्हाला जॉईन होशील का?" चेहऱ्यावर पावडरचा शेवटचा हात फिरवत शिरीनने विचारले.

"ना बाबा, कबाब में हड्डी नाही बनायचेय. तू जा. मला माझा अभ्यास आहे."

शौर्याने स्पष्ट नकार दिल्यावर शिरीन 'बाय डार्लिंग' म्हणून निघून गेली.

इकडे डोक्यातील विचार झटकून शौर्या पुस्तकाकडे वळली. पुढच्या महिन्यात तिची एमबीएची अंतिम परीक्षा होती आणि मागच्या वर्षाप्रमाणे यंदाही टॉप करायचे होते.

तिने पुस्तक हातात घेतले खरे पण तिची लाडकी निवी मात्र डोक्यातून जाईना. लहान असताना तिच्या मागे मागे पळणारी, प्रत्येक गोष्टीत तिच्यावर अवलंबून असणारी निवी आता अचानक मोठी झाली असे तिला वाटू लागले होते.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
******

🎭 Series Post

View all