Mar 02, 2024
प्रेम

हवास मज तू. भाग -सात.

Read Later
हवास मज तू. भाग -सात.


हवास मज तू!
भाग -सात.

मागील भागात :-

प्रोजेक्ट फाईनल झाल्याच्या आनंदात नव्या आणि विहान डिनर साठी बाहेर जातात. गप्पांच्या ओघात ती त्याला शौर्याबद्दल सांगते. आता पुढे.


"लग्न? छे रे. ती शिकतेय. बाहेरच्या शहरात असते. बरं आता निघायचं का? दिलेल्या वेळेत जर मी घरी नाही पोहचले ना तर खरंच माझे डॅड इथे पोहचतील." ती आपली पर्स सांभाळत उठली.

बील पे करून दोघेही हॉटेलबाहेर आले. दोघांच्याही मनात अजूनही खूप काही बोलायचं होतं. पण वेळ कसा निघून गेला कळलेच नाही.


'बाय' म्हणून ती तिच्या कारजवळ आली.


"नव्या.." त्याच्या आवाजात एक वेगळीच जादू होती. तिने झटकन त्याच्यादिशेने मान वळवली. नजरेत मात्र असंख्य प्रश्न होते.


"थॅंक यू." तो तिच्याजवळ येत म्हणाला.


"फॉर व्हॉट?" भुवई उंचावून ती.


"मी विचारले आणि तू माझ्यासोबत आलीस त्यासाठी. इथे एकटाच असतो ना मी, त्यामुळे कधीकधी खूप लो फील होत असतं. पण आज तुझ्या सोबतीने भारी वाटलं, त्यासाठी. खूप दिवसानंतर कुणातरी जवळच्या व्यक्तीसोबत वेळ घालवलाय असं वाटलं मला." त्याचे डोळे पाणावले.


"अरे, असा हळवा का होतोस? मी आहे ना? म्हणजे एक फ्रेंड म्हणून मी आहे तुझ्यासोबत." आपले बोलणे सावरत ती म्हणाली. "तुला कधीही असं एकटं वाटलं तर तू कॉल करून माझ्याशी बोलू शकतोस." ओठावर स्मित आणून ती.


"आणि यासाठी सुद्धा रिअली थँक्स. दोन दिवसांपूर्वी कारचा धक्का लागल्यामुळे भांडणारे आपण दोघे असे एकत्र डिनरला येऊ असा विचारही तेव्हा मनात आला नव्हता आणि आज आपण एकत्र आहोत. कमाल ना?" त्याचाही मूड जरा निवळला होता.

"नव्या, फ्रेंड्स?" ती काही बोलण्यापूर्वीच त्याने आपला हात समोर केला.


तिनेही हसत त्याच्या हातात तिचा हात दिला. मनात एक सॉफ्ट कॉर्नर केव्हाच तयार झाला होता. आता एका नात्याला सुरुवात देखील झाली होती.


"चल, निघते मी. फायनली बाय आता." त्याच्या हातून हात सोडवून घेत तिने कारचा दरवाजा उघडला.


ती निघून गेली. विहान मात्र त्याच्या कारला रेलून तिचा विचार करत उभा होता. त्याच्या ओठावर एक गूढ हसू उमटले होते.


'नव्या, तुला ठाऊक नाही तुझ्या या स्पर्शात काय जादू आहे ते.' तिने मिळवलेल्या हातावर दुसरा हात हलकेच घासत तो मनात म्हणाला. काही क्षणापूर्वीचा स्पर्श तो अजूनही अनुभवत होता.


तिचे एकेक रूप त्याच्या नजरेसमोरून सरकत होते. त्याची कार तिच्या कारला आदळली तेव्हा भांडणरी ती, ऑफिसमध्ये उशीर झाला तेव्हा जड झालेल्या श्वासांच्या हेलकाव्यात उभी असलेली ती, क्षणार्धात पूर्ण विश्वासाने प्रेझेंटेशन सादर करणारी ती. त्याच्या हातात चक्कर येऊन पडणारी ती आणि आज अख्खे दोन तास त्याच्यासमवेत घालवणारी ती.

'बहुधा तुझ्या प्रेमात पडलोय मी. तुलाही माझ्याबद्दल काही वाटू लागलंय का? मनात कित्येकवेळा एकाच प्रश्नांची उजळणी चालली होती.

ओठ रुंदावून तो त्याच्या कारमध्ये बसला. आज खूप हलके हलके झाल्यासारखे त्याला वाटत होते. आनंदाच्या भरात त्याने कार सुरू केली. एरवी असा आनंदी असला तर अगदी भरधाव निघाला असता तो. पण आज कसलीच घाई नव्हती. त्याला हे आनंदाचे क्षण निवांत जगायचे होते. मध्यमगतीने कार पळवत तो त्याच्या फ्लॅटकडे निघाला होता.

*******

"निवी, मग कशी झाली तुझी डिनर डेट?" आनंदी चेहऱ्याने घरात प्रवेश करत नाही तोच हॉलमध्ये बसलेल्या शशांकने तिला प्रश्नाच्या घेऱ्यात ओढले.


"डॅड, व्हॉट मिन बाय डेट? साधं जेवायला गेले होते मी." नव्या गोंधळून उत्तरली.


"तेच म्हणायचं होतं गं. बाकी विहान तसा चांगला मुलगा आहे. व्हॉट यू थिंक?" त्याने परत गुगली टाकली.


"आज्जी, अगं काय झालंय तुझ्या लेकाला? बरा आहे ना तो?" नव्याने आपला मोर्चा ललिताकडे वळवला.


"आत्तापर्यंत लाडक्या लेकीच्या काळजीने त्याच्या काळजाचे पाणी पाणी झाले होते. आता तू आल्याबरोबर नॉर्मल झालाय." ललिता हसत उत्तरली.


"डॅड काय हे? माझी किती काळजी करशील? लहान आहे का मी आता?" हळवे होत तिने शशांकच्या गळ्यात हात गुंफले.


"हम्म. ऑफिसमधील तुझं कर्तृत्व पाहिलं की वाटतं माझी निवी मोठी झालीय. पण निवी कितीही मोठी झालीस तरी तू माझ्यासाठी लहानच आहेस ना गं?" तिच्या केसातून हात फिरवत शशांक.


"परत इमोशनल?" आता तिच्याही डोळ्यात पाणी जमा होऊ लागले.


"शशी, अरे या भावना तिच्या लग्नापर्यंत राखून ठेवा. नाहीतर आत्ताच आपल्या घरात पूर वाहायला लागेल." दोघा बापलेकीला असे हळवे झालेले बघून सुनंदा त्यांच्याजवळ येत म्हणाली.


"मम्मा काय हे? हे लग्नाचे मध्येच कुठून आले? डॅड तूच सांग हिला की मी लग्न बिग्न अजिबात करणार नाहीये."
लटक्या रागाने नव्या.

"हो, सुनंदा माझ्या लेकीचे लग्न करून मी तिला दूर पाठवणार नाही हं." तिच्या बोलण्याला दुजोरा देत शशांकने डोळे मिचकावले. "मी तर तिच्यासाठी घरजावई शोधणार आहे." त्याच्या पुढच्या बोलण्यावर ललिता आणि सुनंदा दोघीही हसायला लागल्या.


"डॅड, तू पण ना. मी आता तुझ्याशी बोलणारच नाही जा आणि काय रे तुम्ही सगळे माझ्या लग्नावर का टपले आहात? तुझी ती प्रिन्सेस आहे ना? तिचं वय झालंय. तिचे लग्न उरकून टाका आधी." फणकाऱ्याने त्याच्यापासून दूर जात ती निवी म्हणाली.


"हो, निवीच्या बोलण्यात पॉईंट आहे हं. शशांक शौर्याच्या लग्नाचा आपण खरोखरीच सिरीयसली विचार करायला हवा." ललिता म्हणाली.


"नो, नेव्हर." शशांक गंभीर चेहरा करून म्हणाला. "शौर्या माझी प्रिन्सेस आहे आणि अजून शिकते आहे ती. तिच्या लग्नाचा कसा विचार करू? हं तिचा तसा काही विचार असेल तर ठीक आहे पण मला तरी अजून असं काही वाटत नाही." तो.


"बघितलं? त्याच्या प्रिन्सेस साठी कसा जीव तुटतोय ते? आणि माझ्यासाठी काहीच नाही. मुझे तो कोई प्यार ही नही करता." आपला चेहरा लटकवून ती बाजूला बसली.


"हो? खरंच?" सुनंदा तिला गुदगुल्या लावत म्हणाली तसे ती खळखळून हसायला लागली.


"मम्मा, सॉरी सॉरी. मला माहितीये तुम्हा सर्वांचं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे. पूरे आता." तिची हसता हसता पुरेवाट लागली.


"निवी, तू अशी नाजूक तब्येतीची. तुझ्यात आम्हा सगळ्यांचा जीव अडकलाय गं राणी. आम्ही पुढे असू नसू पण शौर्या तुला कधीच अंतर देणार नाही याची खात्री आहे आम्हाला. तूही तिच्या सोबतीने कायम उभी राहशील ना?" सुनंदाचा स्वर ओला झाला तसे नव्याने तिला घट्ट मिठी मारली.


"मॉम, मला माहितीये की दी तुमची शान आहे बट डोन्ट फॉरगेट की ती माझीही जान आहे आणि अशी असण्या नसण्याची भाषा का बोलतेस? आपण सर्व एकत्र आनंदाने राहणार आहोत. दी ला एकदा परत तर येऊ दे. मग मी तिला कधी जाऊच देणार नाही." निवीच्या डोळ्यात थेंब जमा झाले होते.

"मी सुद्धा." शशांक त्या दोघींना आपल्या मिठीत बंदिस्त करत म्हणाला.


ललिता डोळ्यातील पाणी पुसत त्या त्रिकुटाकडे पाहत होती. शौर्या इथे असती तर हे चौकोनी कुटुंब एका फ्रेममध्ये किती सुंदर दिसले असते असे तिच्या मनात येऊन गेले.

"आई, डोन्ट वरी. शौर्या परत आली की फक्त आणि फक्त आनंदाचे वारेच घरात वाहतील. आपलं घर कायम असंच एकमेकांसोबत समाधानी राहिल." ललिताच्या मनाची अवस्था हेरून सुनंदाने तिला एक मिठी मारली.


"आज्जी, तुझंदेखील माझ्यापेक्षा दी वर जास्त प्रेम आहे ना?"

"हम्म. आता तूच तिच्यावर एवढा जीव टाकतेस तर मलाही थोडं जास्त प्रेम करावे लागेल ना?" ललिता हसून म्हणाली.


"ॲक्च्युली यू आर राईट." आजीच्या चेहऱ्यावरचे हसू बघून तिलाही बरे वाटले. "चला, मी आता फ्रेश होते."ललिताची एक पापी घेत ती तिच्या रूममध्ये पळाली.

'बाप्पा, माझ्या दोन्ही नाती अशाच हसत राहू दे.' ललिताताईंनी मनातच देवाला आळवणी घातली.

******

"हाय दी, काय चाललंय?" इतका वेळ बेडवर लोळत पडलेल्या नव्याने शेवटी शौर्याला मेसेज केला.

केव्हाची ती निद्रादेवीच्या प्रसन्नतेची वाट पाहत होती, पण डोळे मिटले की तिच्या नजरेसमोर शौनकचा हसरा चेहरा येत होता. ती हॉटेलमधून निघाली तेव्हा तो त्याच्या कारला रेलून तिच्याकडे बघतोय हे तिला जाणवले होते. त्याच्या त्या नजरेत काहीतरी वेगळे भाव तिला जाणवले होते.

दोघांनाही जाणवत आहेत त्यांच्या त्यांच्या मनातील भाव, तेच भाव एकमेकांनाही जाणवतील का? कळण्यासाठी स्टे ट्यून्ड!
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//