हवास मज तू!भाग-६२

कथा एका फसव्या प्रेमाची.
हवास मज तू!
भाग-६२

मागील भागात :-
शेखरला त्याच्या चुकीची जाणीव होते आणि ती मयंक व शशांकची माफी मागतो. दोन दिवसांनी शैली मयंकबरोबर तो एका मीटिंगला बाहेर जातो.

आता पुढे.


"पण तसे झाले नाही. मिटिंगनंतर तिचा कॉल येईपर्यंत आपण फोन करायचा नाही असा तिचा नियम होता म्हणून मी सुद्धा केला नाही. नंतर मात्र वेळ वाढत गेला तसे काळजीने मीच तिघांनाही फोन करायला लागलो. शैली, दादा, शेखर.. तिघांनाही.

रिंग जात होती मात्र एकानेही कॉल रिसिव्ह केला नाही आणि माझे काळीज आणखी धडधडायला लागले." सांगताना तेव्हाची काळजी आताही त्याच्या चेहऱ्यावर पसरली होती.


"तू तेव्हा काय केलंस?" शौर्याचा आवाज रडवेला झाला होता. पुढे काहीतरी वाईट घडले असावे याचा तिला अंदाज आला होता.

"शेवटचा पर्याय म्हणून मी ड्राइव्हरला कॉल केला. तेव्हा कळलं की तो घरी आहे. हे तिघे आपल्या नवीन जागेकडे गेले होते आणि शेखरनेच त्याच्याकडून कारची चावी घेत त्याला घरी जायला सांगितले होते.

हे ऐकले नि माझे अंतःकरण पुन्हा जोरात धडधड करायला लागलं. शेखरवर कसला संशय नव्हता पण काहीतरी चुकीचे घडत तर नाही आहे ना?असे मनात येत होते.

मी तसाच कार घेऊन तडक तिकडे निघालो. ऑफिसच्या एका सहकाऱ्याला सोबत म्हणून घेतले होते. मनात कसले कसले विचार येत होते. माझे कितीतरी वेळा कॉल करणे सुरु होते आणि त्यावर एकाचाही रिप्लाय येत नव्हता.

ती जागा शहरापासून थोडी दूर होती. अजून पूर्णपणे कामाला सुरवात झाली नसल्यामुळे तिकडे फारशी माणसे फिरकत नव्हती. दुरूनच दादाची कार दिसली तेव्हा कुठे मनाला हायसं वाटलं. पण तो आनंद फार वेळ टिकला नाही.

प्लॉटवर आम्ही पोहचलो. त्यांना हाका मारल्या. तेव्हाही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. माझ्यासोबत आलेल्या सहकाऱ्याचे बाजूला लक्ष गेले आणि तो ओरडला. मी पाहिले तर तिथे दादा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि काहीच अंतरावर शेखर आणि शैली सुद्धा. शैली शेखरच्या बाजूला पडली होती आणि तिच्या हाताशेजारी एक सुरा होता." त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.


"काका, हे खूप भयानक आहे. मला नाही ऐकायचे." शौर्या भीतीने थरथरत म्हणाली.

"मम्मा, पप्पासोबत असे कसे घडू शकते? आजवर तुम्ही सर्वांनी मला त्यांचा अपघात झाला होता हेच सांगितलं होतं आणि आज तू काय बोलतो आहेस?" तिचा हुंदका अनावर झाला.


"सत्य, जे आजपर्यंत मी तुला सांगू शकलो नव्हतो. मला इतक्यात तरी सांगायचे नव्हते. पण प्रिन्सेस, तुला शेखरबद्दल जाणून घ्यायचे होते म्हणून आज सांगणे भाग पडले." तिचा हात हातात घेत तो रडू लागला.


"म्हणजे? काका त्या शेखरने मम्मा -पप्पाना मारले?" तिने कापऱ्या स्वरात विचारले.


"नाही, शेखरने नव्हे तर या प्रकरणात शैलीला दोषी ठरवले गेले. तिच्या हाताजवळ पडलेला सुरा, त्यावरचे तिच्या हाताचे ठसे, दादा आणि मयंकच्या पोटावरील केलेल्या वाराची शक्ती हे सगळं तिच्याशी मॅच होत होतं."


"तू खोटं बोलतोहेस. मम्मा अशी का करेल?" तिच्या तोंडून स्पष्ट शब्दही उमटत नव्हते.

"मी असे कधीच म्हणालो नाही पण पुरावे हेच बोलत होते. शेखरपासून आत्मरक्षणासाठी तिने असे केले
असावे असे न्यायालयात निर्णय देण्यात आला.


त्यानंतर मनीषाने आमच्यावर वेगळीच केस करण्याचा पाय उचलला. शैलीने शेखरचा जीव घेऊन त्याच्या कुटुंबाला, मुलाला अनाथ केले त्याचा तिला मोबदला हवा होता.

अनाथ तर आम्ही झालो होतो. दादाचे छत्र हरवले होते. एसके कपंनीची सर्वेसर्वा गेली होते. आमच्या छोट्याश्या परीचे आईबाबा तिला पोरके करून गेले होते. आम्ही कोणाला न्याय मागणार? कुणाजवळ फिर्याद करणार? आणि कुणाची?

मला स्वतःचा राग येत होता. दादा म्हणाला त्याप्रमाणे शेखरला कंपनीतून काढून टाकले असते तर कदाचित असे काही घडले नसते. पण शेखर मित्र होता गं माझा.

मला वाटलं की तो आत्ता कुठे सेटल होतो आहे. एसके मधून बाहेर पडला तर इथले सिक्रेट बाहेर जायची भीती होती त्यापेक्षा इथला जॉब सोडल्यावर त्याला बाहेर दुसरीकडे कुठे काम मिळणार नाही याची मला जास्त काळजी होती. त्याला तिथून बाहेर पडू न देण्याचा माझा इतकाच स्वार्थ होता. त्याची परिणती मात्र सर्वस्व हरवण्यात झाली.

शौर्या, मी तुझा अपराधी आहे बाळ. माझ्यामुळे तू तुझ्या मम्मापप्पाच्या प्रेमाला मुकलीस. मला माफ कर."
तिच्यासमोर हात जोडून तो रडू लागला.


"काका, असे नको ना रे बोलूस. या सगळ्यात तुझी काय चूक? माझी मम्मा खूप शूर होती हे मी लहानपणापासून तुझ्याकडून ऐकत आलेय पण तिला केवळ मी फोटोतच भेटलेय रे. मला तर तिच्याबद्दल फारसं आठवत सुद्धा नाही.

मी मम्मा म्हणून काकूकडे पहिलं आणि तुझ्यात पप्पाला शोधत राहिले. एका अनाथ मुलीला तुम्ही जे प्रेम दिलेत ते मला कोणीच देऊ शकले नसते." त्याला मिठी मारत ती म्हणाली.


"प्रिन्सेस, तू अनाथ नाहीस गं राणी. आपल्याकडे जे आहे ते सगळं तुझं आहे. तू त्या वैभवाची खरी वारसदार आहेस. मी तर केवळ राखणदार. उद्या ऑफिसला येऊन तू मला खुर्चीवरून उठवून तू त्यावर बसलीस ना तरी माझी काही तक्रार नसेल.

हे सारं काही हातून निसटू नये म्हणून तर मनीषाने जो मोबदला मागितला ते मी तिला देऊ केला कारण ही कंपनी मला बुडताना बघायची नव्हती. तिच्याशी पैशाचा व्यवहार करून ते प्रकरण तिथेच थांबवलं.

शैलीची, दादाची आणखी बदनामी मला नको होती. खरे खोटे काय? त्याची शहानिशा देखील नको होती. मला तू हवी होतीस. माझ्या दादाची प्रिन्सेस! आणि खऱ्या प्रिन्सेस सारखे जगायला जे वैभव जवळ होतं ते टिकवणे भाग होते."

"काका, तू खूप ग्रेट आहेस रे. तूच काय? काकू, आजी सर्वच ग्रेट आहात. आय एम सो लकी टू हॅविंग यू." त्याच्या कुशीत मुसमुसत ती म्हणाली.


"शौर्या, तू आमची लेक होतीस. तुला सांभाळणे आमची जबाबदारी होती. पण सुनंदाने यात खूप साथ दिली. मी खूप एकटा पडलो होतो गं. त्यावेळी तिने स्वतः माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला.

माझी प्राथमिकता तू होतीस. ती प्राथमिकता तिने स्वीकारायची तयारी दाखवली आणि आमचं लग्न झालं. तिने तुला आणि आईला दोघींनाही जीव लावला. निवीचा जन्म झाला आणि तुम्ही दोघी एकमेकींचा जीव झालात." तिचा हात हातात घेत तो म्हणाला.


"हे सगळं आजवरचं आपल्या आयुष्यातील गुपित. हे असे तुझ्यासमोर येईल असे मला वाटले नव्हते. सांगायचे तर होतेच पण इतक्या घाईत, आपला देश सोडून अशा परक्या ठिकाणी नक्कीच नव्हते. पण कदाचित नियतीच्या मनात हेच असावे. तुझ्या मम्मा पप्पाचा भूतकाळ चुकीच्या पद्धतीने तुझ्या समोर येण्यापेक्षा मीच तुला सारं सांगून टाकलं.

मन म्हणतं शैली निर्दोष आहे, ती असे करू शकणार नाही. पण हे सगळं का घडलं? कसं घडलं ते माहित नाही. त्याचा खुलासा व्हावा, असेही वाटत नाही. मी तुला एक चांगले आयुष्य देऊ शकलो, यातच धन्यता मानतो.

पण शौर्या तुला शेखरबद्दल कोणी सांगितले? आणि काय? ज्यामुळे तू इतकी अस्वस्थ झालीस. मला इथे बोलावून घेतलेस. मी तर तुझ्यापुढे भूतकाळाचे पुस्तक पूर्णपणे उघडून बसलोय. आता मला तुझ्याकडून ऐकायचे आहे." तिच्या हातावर दाब देत तो म्हणाला.


"शौनक.." ती अश्रू पुसत म्हणाली.


"कोण शौनक?" त्याने कुतूहलाने विचारले.


"शौनक कारखानीस. माझा इथला मित्र. मागच्या वर्षी इथेच भेटला. चांगली फ्रेंडशिप झाली. शेवटच्या वर्षाला होता. दोन दिवसापूर्वी तो इंडियात परतणार होता तेव्हा म्हणून मी त्याला भेटायला गेले. तर त्याच्या कडे मम्मा, पप्पा तू.. सर्वांचे फोटो होते. त्यावर क्रॉस केलेले. मी त्याला विचारल्यावर तो म्हणाला की मला या सर्वांचा बदला घ्यायचा आहे. या लोकांमुळे माझे आयुष्य, माझे बालपण करपले.

मी त्याला असे का करतोस म्हणून विचारले तर त्यानेच मला म्हटले की तुझ्या काकाला शेखर कारखानीस बद्दल विचार. तेव्हा तुला कळेल की मला कसला बदला घ्यायचा आहे." तिला सांगताना रडू येत होते.


"म्हणजे हा शौनक शेखरचा मुलगा आहे?"

"हो आणि तो खूप डेंजर आहे काका. त्याचे काहीतरी प्लॅनिंग सुरु आहे. मम्मा पप्पांना तर मी लहानपणीच गमावलेय पण आता तुला हरवायचे नाहीये रे. मला तू हवा आहेस." त्याला बिलगत ती पुन्हा रडायला लागली.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all