हवास मज तू!भाग -६१

वाचा शैली आणि शशांकच्या मैत्रीची कथा!
हवास मज तू!
भाग -६१

मागील भागात :-
शशांक शौर्याला शेखर आणि शैलीबद्दल सांगत असतो.
आता पुढे.

"जर असे घडले असते तर किती बरे झाले असते ना? पण दुर्दैवाने असे काहीच घडले नाही. उलट तिच्याबद्दलचे त्याचे प्रेम वाढतच गेले." आवंढा गिळत शशांक उत्तरला.


"पण तुला कसे ठाऊक?"


"त्यानेच ते शैलीला सांगितले होते आणि तिने आम्हाला." बोलताना डोळ्यातून थेंब त्याच्या गालावर येऊन विसावला.


"आम्ही ऑफिससाठी नवी जागा घेतली होती कारण होतं ते ऑफिस आता लहान पडू लागलं होतं. त्या दिवशी आम्हा चौघाची त्याचसंबंधी चर्चा सुरु होती. त्यानंतर दादा आणि मी साईट बघायला गेलो. शेखर आणि शैली दोघं तिच्या केबिनमध्ये काम करायला लागले.

त्या दिवशी त्याचा नूर काहीसा वेगळा होता हे घरी आल्यावर शैलीने आम्हाला सांगितले.


"वेगळा म्हणजे?" शौर्याच्या चेहऱ्यावर प्रश्नभाव उमटले.


"बऱ्याच संदर्भावर बोलताना त्यांचे एकमत व्हायचे. त्या दिवशी त्याने तिच्यासमोर तोच धागा पकडला.." शैलीने सांगितलेली घटना त्याला स्पष्ट आठवत होती.


"..शैली, तुला एक जाणवतेय?" समोर असलेल्या फाईलवरून नजर फिरवत शेखर तिला म्हणाला.


"काय?"


"आपण बरेचदा सारखे विचार करतो, सारखे निर्णय घेतो आणि खूपदा ते बरोबरही असतं."


"हो रे. मलाही हे बरेचदा जाणवले." ती स्मित करत म्हणाली.


"हे तेवढे जाणवले पण काही गोष्टी तुला कधीच जाणवल्या नाहीत ना? आपले विचार जुळतात, निर्णयक्षमता सारखी आहे, तिही जुळते. पण मन जुळावेत असे तुला कधीच वाटले नाही का गं?" तिच्या चेहऱ्यावर नजर गाढून त्याने प्रश्न केला.


"मला काही कळेल असे बोलशील?"


"शैली, उगीच काही कळत नसल्याचा आव आणू नकोस. तुझ्याबद्दल मला काय वाटतं हे तुला ठाऊक आहे. कॉलेजपासून तू माझ्या हृदयात वसली आहेस यार. माझ्याबद्दल एकदा तसा विचार करावा असे तुला कधीच वाटले नाही का गं?" टेबलावर हात ठेवून उठत त्याने विचारले.


"नाही आणि इतक्या वर्षांनी या गोष्टीला काही अर्थ उरला असेल असेही मला वाटत नाही. मयंक आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे. भलेही कंपनीच्या निर्णयाचे आमच्यात एकमत होत नसतील पण मनाने आम्ही एक आहोत. त्यात दुमत नाहीये." ती शांतपणे उत्तरली.


"पण माझं काय? मी आजही तिथेच अडकलोय. तुझ्या प्रेमात आकंठ बुडालो आहे. मनीषाशी लग्न केले खरे पण मन तुझ्यातच अडकले आहे. मनीषा तर.."


"शेखर, पुरे. यापुढे मला तुझा एकही शब्द ऐकायचा नाहीये." शैली रागाने फणफणत होती.

"शैली.."

"प्लीज." हातातील पर्स उचलत ती उठली.

"शैली, ऐक तर."

"शेखर, मला आता घरी जायचेय. काही कामासंदर्भात बोलायचे असेल तर मेल करू शकतोस." त्याचे पुढे काही न ऐकता ती ताडताड पावले बाहेर टाकत निघाली.

******

"काय गं? आज लक्ष कुठेय? शौर्याशी देखील जास्त वेळ खेळली नाहीस आणि आता जेवताना सुद्धा काहीतरी बिनसल्यासारखं दिसत आहे. ऑफिसमध्ये काही झालंय का?" रात्री ललिताने जेवताना तिचे निरीक्षण करत म्हटले तसे तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले.


"काही नाही." मान हलवून ती नाही म्हणाली खरी पण डोळे काहीतरी झालंय याची ग्वाही देत होते.


"शैली, ऑफिसमध्ये आम्ही असेपर्यंत तर तू नॉर्मल होतीस मग आम्ही गेल्यावर काही झाले का? शेखर काही बोलला का?" अगदी मनात हात घालून नेमक्या गोष्टीला बाहेर काढावे तसे शशांकने तिला विचारले.


"लोकं आपल्याला फार गृहीत धरतात का रे? म्हणजे कोणाशी मोकळेपणाने वागले याचा अर्थ आपण त्या व्यक्तिमध्ये इन्व्हॉल्व्ह आहोत असे होते का?" ती त्याच्याकडे पाहून म्हणाली.


"म्हणजे शेखर तुला काही म्हणाला का?" आता मयंकदेखील त्यांच्या चर्चेत सहभागी झाला.


"हम्म. म्हणजे तो म्हणाला की मी त्याचा विचार करायला हवा होता.." तिच्या केबिनमध्ये त्यांचा घडलेला संवाद तिने सर्वांसमोर कथन केला.


"शेखर मूर्ख आहे का? त्याला तुझ्याशी असं बोलण्याची हिम्मत कशी झाली? यापुढे मला तो आपल्या कंपनीtत अजिबात नको आहे. मी आत्ताच त्याला फोन करून फायर केल्याचे सांगतो." मयंकच्या हाताच्या शिरा रागाने फुगल्या होत्या.


"मयंक.."

"दादा, ऐक ना. तू आत्ता असं काही करू नकोस. उद्या त्याच्याशी बोलून काय ते ठरवूया." शशांक त्याला शांत करत म्हणाला.


"शशी, तू त्याची बाजू घेऊन मला शांत करू नकोस. तो तुझा मित्र असला तरी शैली माझी बायको आहे. तिला असे बोललेले मी कधीच सहन करणार नाही." तो तणतणत म्हणाला.


"दादा, मी काय बोलतोय ना हे तुला कळले नाहीये. शैली तुझी बायको आहे तर ती माझीही बेस्ट फ्रेंड आहे. तिला असे कोणी बोलले तर मलाही खपणार नाही.

हे बघ, कॉलेजमध्ये असताना त्याने कित्येकदा शैलीला ती आवडते म्हणून सांगितले असेल पण शैलीने त्याला दरवेळी नकार दिला. त्यामुळे आमची मैत्री कमी झाली नव्हती. त्याला जे वाटत होतं ते मनात न ठेवता तो स्पष्ट बोलत होता मात्र त्या गोष्टीचा आमच्या नात्यावर कधी परिणाम पडला नाही.

आजही त्याने तेच केलं असेल. जे मनात आहे ते ओठावर आले. त्याला वाटलं की शैलीने त्याला निवडायला हवे होते, ते तो बोलला. आता या गोष्टीचा आपल्यावर किती परिणाम पडू द्यायचा हे आपण ठरवायचे ना."


"शशी, तू त्याची वाकिली करतो आहेस? आता आपण कॉलेज गोइंग स्टुडन्ट राहिलो नाही आहोत. त्याच्याबरोबर माझाही संसार आहे, हे त्याने लक्षात ठेवायला हवे होते." ती डोळे पुसत म्हणाली.


"शैली, तू अशी हायपर होऊ नकोस. मी त्याची वाकिली का करू यार? पण दादा म्हणतो ते सुद्धा पटत नाहीये ना गं. प्रॅक्टिकली थोडा विचार करा ना. शेखर आपल्या कपंनीच्या प्रत्येक गोष्टीत सहभागी आहे. आपले सिक्रेट्स, आपले सक्सेस पॉईंट्स याची त्याला खडान् खडा माहिती आहे.

तो इथून बाहेर पडला आणि दुसरीकडे जॉईन होऊन आपले सगळे सिक्रेट्स शेअर केले तर आपलाच लॉस आहे ना? म्हणून म्हणतोय की घाईत निर्णय घेऊ नका. हा एक चान्स म्हणून त्याकडे दुर्लक्ष कर. अर्थात मी त्याला माझ्या शब्दात सुनावेनच. पण असं नोकरीवरून काढणं वगैरे नको. पण जर परत तो असा काही वागला तर मग मात्र त्याला इथे जागा नसेल, एवढं मात्र निश्चित.

मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला पटतंय ना?" त्याने बोलताना दोघांकडे पाहिले.

"हम्म. ठीक आहे. पण ही शेवटची संधी. त्यानंतर मला जर तो परत असा काही बोलला तर आपल्या कंपनीची दारे त्याच्यासाठी कायमची बंद होतील, हे सांगून ठेवते." ती बेडरूममध्ये जात म्हणाली. तिच्या मागोमाग शेखरही गेला.

******

"म्हणजे मिस्टर शेखर विरुद्ध तुम्ही कोणतीही ॲक्शन घेतली नाही होय ना?" बोलताना शशांकने पॉज घेतला तसे शौर्याने त्याला बारीक नजर करून विचारले.

"अगदीच तसे नाही. शेखरला मी कॉलेजपासून ओळखत होतो, शैलीच्या आधीपासून. त्याला शैली आवडायची हे सोडले तर बाकी मनाने तो वाईट नव्हता गं. असे नसते तर आमची तिघांची मैत्री टिकलीच नसती.

दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला आला, पण नेहमीसारखा तो नव्हता. आपण चुकलोय याची त्याला जाणीव झाली होती. त्याने दादाची आणि माझी माफीसुद्धा मागितली. त्याला आणखी काहीतरी बोलायचे होते पण दादाने आता कसलेही एक्सप्लॅनेशन नको म्हणून विषय तिथेच थांबवला."


"आणि मम्मा?"


"तिच्या डोक्यातून त्याचे वागणे गेले नव्हते.म्हणून मग ती दोन दिवस ऑफिसला आली नाही. दोन दिवसानंतर एक मिटिंग होती. मोठे प्रोजेक्ट होते, त्यामुळे तिला ती अटेंड करणे भाग होते. दादा, शैली आणि शेखर तिघेही मिटिंगला एकत्र गेले होते.

मिटिंग दुपारपर्यंत आटोपायला हवी होती. त्या अनुषंगाने पाच वाजेपर्यंत त्यांनी ऑफिसला परत येणं अपेक्षित होतं. पण.." बोलताना त्याचा कंठ दाटून आला.

"पण काय?"

"पण तसे झाले नाही. मिटिंगनंतर तिचा कॉल येईपर्यंत आपण फोन करायचा नाही असा तिचा नियम होता म्हणून मी सुद्धा केला नाही. नंतर मात्र वेळ वाढत गेला तसे काळजीने मीच तिघांनाही फोन करायला लागलो. शैली, दादा, शेखर.. तिघांनाही.

रिंग जात होती मात्र एकानेही कॉल रिसिव्ह केला नाही आणि माझे काळीज आणखी धडधडायला लागले." सांगताना तेव्हाची काळजी आताही त्याच्या चेहऱ्यावर पसरली होती.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.


🎭 Series Post

View all