Feb 27, 2024
प्रेम

हवास मज तू!भाग -६०

Read Later
हवास मज तू!भाग -६०
हवास मज तू!
भाग-६०

मागील भागात :-
शशांक शौर्याला शेखर बद्दल सांगत असतो. शौर्याच्या पहिल्या वाढदिवशी तो अचानक त्यांच्यापुढे येतो. पाच वर्षांच्या काळात काय काय घडले ते तो सांगतो.
आता पुढे.

"त्यात तिचा झालेला प्रेमभंग. नाही म्हणायला तिचे मयंक दादावर प्रेम होते आणि त्याने शैलीशी विवाह केला त्यामुळे ती दुखावली होती. माझ्या मनाची अवस्था देखील थोडयाफार फरकाने तिच्यासारखीच होती.

आधीच आईवडिलांविना वाढलेला मी, त्यात आता एकटा पडलो होतो. दोघेही काहीसे समदुःखी, त्यामुळे आमच्या भेटीगाठी वाढीला लागल्या आणि मनासोबत आम्ही शरीरानेही कधी जवळ आलो कळलेच नाही." बोलताना त्याला भरून येत होते.


"त्यानंतर त्याच वर्षभरात आम्ही लग्न केले. दोन वर्षात रजनी थोडी निवळली. तिच्या आयुष्यात परत प्रेम आले आणि लग्न करून तिने त्याच्यासोबत संसार थाटला. आता गोव्याला असते. तिकडेच स्थिरावलीय. तिचे बरे चालले आहे. दिड दोन वर्षांची मुलगी, नवरा यात ती खूष आहे.


आमचेही तसे बरे चालले होते. आत्या, मनी, मी आणि माझा मुलगा सगळे मजेत होतो. दोन वर्षांपूर्वी लहानशा आजाराचे निमित्त होऊन आत्या गेली. मनीचा जणू एक आधारच गमावला. आईवर तिचा रजनीपेक्षाही फार जीव होता. मी दिवसभर कामाला आणि ही बाळासोबत घरी असायची. कधी कधी आपल्याच जगात वावरायची.

काही दिवस सुट्टी घेऊन तिच्यासोबत वेळ घालवायचा म्हणून मी घरी राहिलो. त्यानंतर कामावर गेलो तर कळले की मालकाने मला कायमचे कामावरून कमी केले आहे. कंपनी तोट्यात चालत होती आणि टप्याटप्यात वर्कर्स कमी होणार आहेत हे मला ठाऊक होतं. पण माझा नंबर इतक्यात येईल याची पुसटशी देखील कल्पना नव्हती.

जवळचे होते नव्हते पैसे संपत आले. बायको-मुलाची आबाळ होऊ लागली तसा परत मुंबईला आलो. भाड्याच्या दोन खोल्या घेतल्या. शोधाशोध करून कामही मिळवले. पण तुटपुंज्या पगारात खर्च भागणे कमी झाले म्हणून परत शोधाशोध करायला लागलो. आज दुपारी अचानक पेपरला तुमच्या कंपनीची ऍड दिसली त्यानुसार मी मुलाखतीसाठी आलो पण तोवर सगळं आटोपले होते.

नतंर कळले की मालकाच्या मुलीचा वाढदिवस आहे म्हणून मग पत्ता काढत इथे आलो. एवढीच माझी कहाणी. याउपर पुन्हा काही विचारायचे असेल तर विचारू शकता." तो नजर वर करत म्हणाला.


"तुझा मुलगा.."


"नुकतेच मागच्या महिन्यात त्याने तिसरे वर्ष पूर्ण केले. आता चौथे सुरु झालेय." शैलीच्या प्रश्नाचा रोख कळून त्याने उत्तर दिले.


"तू इथे, आमच्याकडे आला आहेस हे मनीला माहिती आहे?" मयंकने विचारले.


"नाही." त्याने मान हलवली. "मी कामावर गेलोय हेच तिला माहिती आहे."


"तू तुझ्या बायकोला सांगावे की नाही हे तुझे वैयक्तिक मत आहे. पण ऑफिसच्या कामात घरातील वाद, टेंशन याचा शिरकाव व्हायला नको, त्याचबरोबर आमच्या कुटुंबावर मनीची सावलीही पडायला नको. हे जर तुला मान्य असेल तर तू उद्यापासून जॉईन होऊ शकतोस." मयंक स्पष्टपणे म्हणाला.


"थँक यू दादा. भूतकाळातील एवढ्या कटू आठवणी असूनदेखील तू मला जॉब ऑफर करतो आहेस, हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे." शेखरच्या डोळ्यात पाणी होते.


"थँक यू काय रे? तूच मघाशी म्हटलेस ना की कधीकधी ओळख नसताना सुद्धा आपण मदत करतो, मग तू तर आमचा दोस्त आहेस आणि मदत म्हणून नव्हे तर तुझ्यात ते कॅलिबर आहे म्हणून तुला आम्ही ही ऑफर देत आहोत." शैली त्याला म्हणाली.

"अभिनंदन मित्रा, तू आता आमच्या कपंनीचा एक भाग झाला आहेस, तुझे खूप खूप स्वागत आहे." शशांकने त्याला उबदार मिठी मारली.

******

"काका, हे सगळं किती गुंतागुंतीचे आहे रे. ज्या मुलीला पप्पा नाही म्हणाला, तिच्याशी तुझ्या मित्राने लग्न केले आणि वर तुम्ही त्याला आपल्या कंपनीत जॉब देखील दिला?" हे सगळं ऐकून शौर्या कळवळून म्हणाली.


शेखर कारखानीस म्हणजे नेमका कोण? तिच्या कुटुंबाशी त्याचा काय संबंध हे तिला उलगडले होते. पण तरीही मनात प्रश्न होताच की शौनक असा का वागला, त्याला कशाचा बदला घ्यायचा आहे? याचे कोडे मात्र अजून सुटले नव्हते. शशांकच्या म्हणण्यानुसार त्यांनी तर शेखरची मदत केली होती, मग तरीही शौनकच्या मनात ही बदल्याची कसली आग तेवत होती? याचा उलगडा व्हायचा बाकी होता.


"हो, सगळी गुंतागुंत झाली होती खरी, पण त्यावेळी त्या गुंत्यापेक्षा आम्हाला आमचा मित्र जास्त जवळचा वाटला. मनीची, तिच्या आईच्या वागणुकीची सजा शेखरला का मिळावी, असेही मनात वाटून गेले.

आणि त्यापेक्षा सगळ्यात जास्त कुणाचा विचार आला माहितीये?"


"कोणाचा?" शौर्याने प्रश्न केला.


"शेखरच्या मुलाचा. आमच्या घरात नुकतीच एक परी आली होती. तिचा सगळा राजेशाही थाट होता आणि त्याचवेळी आमचा मित्र, शेखरचा मुलगा सर्वसाधारण आयुष्य जगत होता. त्यात त्याची काय चूक होती?

मुलाबद्दल ऐकून आम्हाला वाईट वाटलेच पण जास्त भावनिक झाली ती शैली. कारण ती आता एक आई होती आणि आपल्या बाळाला सगळ्यात बेस्ट लाईफ कसे मिळेल याचा ती विचार करत होती.

नकळत तिच्या मनाने शेखरच्या मुलाची तुलना स्वतःच्या मुलीशी केली आणि त्याला झुकते माप देत तिने शेखरला चांगल्या पदावर रुजू केले."

"मम्मा खरंच ग्रेट होती यार." शौर्याच्या डोळ्यात शैलीबद्दल अभिमान होता.

"हम्म. शी आल्वेज. पण कधी कधी हाच मोठेपणा आपल्याला नडतो हे कधी तिच्या लक्षातच आले नाही. मैत्रीवर तिचा खूप विश्वास होता, पण प्रत्येक मित्र हा पक्का आणि सच्चा मित्र नसतो हे तिला कळलेच नाही." तो हळवे होत म्हणाला.


"म्हणजे? त्याने काय केले?" शौर्या काळजीने म्हणाली.


"सुरुवातीला तर काहीच नाही. शेखर ऑफिसमध्ये आला खरा पण त्याच्यासाठी कुठलीच पोस्ट रिकामी नव्हती. आदल्या दिवशी ज्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू झाले होत्या त्या सगळ्या भरल्या होत्या. शैलीच्या मनात शेखरला जी पोस्ट द्यायची होती त्या जागेवर सुनी.. सुनंदा जॉईन झाली होती. तिची माझी ओळख तिथेच झाली आणि आमच्या नात्याला सुरुवात झाली. तो वेगळा विषय आहे.

शैलीने शेखरला शब्द दिला होता त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला आला. शैलीसमोर पेच पडला होता. तो तिने खूप चांगल्या प्रकारे हाताळला. तिने त्याला आपला असिस्टंट म्हणून नेमले. त्यामुळे नव्याने येऊन सुद्धा त्याची बिझनेसमधली डायरेक्ट इन्व्हाल्व्हमेंट वाढली.

आमच्या सोबत मिटींग्स अटेंड करणे, क्लाईंट्स बघणे हे सगळे त्याला जमू लागले. मुळात तो हुशार होता आणि आता त्याच्या गंजलेल्या बुद्धीला चांगली धार लागत होती. त्याचा फायदा त्याला होत होता, त्याचबरोबर कंपनीला सुद्धा होत होता.

त्याची विनयशीलता, कोणताही प्रॉब्लेम चुटकीसरशी सोडवण्याची वृत्ती यामुळे लवकरच तो कंपनीच्या गळ्यातील ताईत झाला. शैलीचा असिस्टंट केवळ म्हणायला असला तरी आता त्याचे वेगळे स्थान निर्माण झाले होते." शशांक सांगत होता.


"हे तर चांगलेच घडत होते ना." शैली.


"हम्म. वरकरणी पाहता सारे चांगलेच घडत होते. आम्ही सगळे त्याच्यावर जाम खूष होतो. खूष तर तोही होता. केवळ चांगल्या पगाराची नोकरी मिळाली म्हणून नव्हे तर त्याबरोबर त्याला शैलीचा सहवास देखील लाभत होता म्हणून तो जास्त खूष होता."

"व्हॉट?"

"कॉलेजमध्ये असताना त्याचे तिच्यावर प्रेम होते. एकतर्फी प्रेम. म्ह्टले तर आकर्षण. त्याने त्याच्या भावना कित्येकदा तिच्यासमोर व्यक्त केल्या होत्या. पण शैलीने दरवेळी त्याला नकार दिला. ती त्याला केवळ एक मित्र समजत होती. तो मित्र होता पण मैत्रीची पायरी सोडून पुढे जाऊ पाहत होता.


शैलीचे दादासोबत लग्न झाले तेव्हा मनातून तो थोडा दुखावला होता. नतंर त्याने पुढली पाच वर्ष कोल्हापूरला काढली. लग्न, मुलं झाली तरी हृदयाच्या एका कोपऱ्यात तिच्या बद्दलच्या भावना काही अंशी दडल्या होत्या. इथे आल्यावर त्याला परत तिचा सहवास लाभला आणि पुन्हा त्याच्या प्रेमभावना जागृत झाल्या." त्याच्या चेहऱ्यावर राग जमा झाला होता.


"पण असे कशावरून? कदाचित तो ते विसरून पण गेला असेल असे सुद्धा होऊ शकते ना?" तिने शंका व्यक्त केली.


"जर असे घडले असते तर किती बरे झाले असते ना? पण दुर्दैवाने असे काहीच घडले नाही. उलट तिच्याबद्दलचे त्याचे प्रेम वाढतच गेले." आवंढा गिळत शशांक उत्तरला.


"पण तुला कसे ठाऊक?"


"त्यानेच ते शैलीला सांगितले होते आणि तिने आम्हाला." बोलताना डोळ्यातून थेंब त्याच्या गालावर येऊन विसावला.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
********

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//