Feb 29, 2024
प्रेम

हवास मज तू!भाग -५९

Read Later
हवास मज तू!भाग -५९
हवास मज तू!
भाग-५९

मागील भागात :-
भूतकाळाची कथा सांगत असलेल्या शशांकला शौर्या शेखर बद्दल विचारते.
आता पुढे.


"..आणि तू? तुला शिकायची गरजच नाहीय. तुझ्या रक्तातच आपला बिझनेस भिनला आहे." तो तिला समजावत म्हणाला.


"माझं सोड रे. आपण तर शेखर कारखानीस बद्दल बोलणार होतो ना? इतक्या वर्षात तो कुठे मध्येच गायब झाला?" तिने पुन्हा मुख्य विषयात हात घातला.

"शेखर कुठे गेला, हे तर आम्हालाही ठाऊक नव्हतं." शेखरचे नाव घेताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.


"असे कसे? तूच तर मला म्हणाला होतास की तुला त्याच्याबद्दल माहित आहे."


"मला सांग, तुला शेखरबद्दल काय माहित आहे? हे नाव तुला कसे कळले?" त्याने तिला प्रतिप्रश्न केला.


"एसके, हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही, हे तुलाही माहित आहे. प्लीज खरं काय ते सांग ना मला." ती नाक फुगवून म्हणाली.


"हो, हो. असे चिडू नकोस. तू जेव्हा मला एसके म्हणतेस ना, तेव्हा असं वाटतं तुझ्या मुखातून शैलीच बोलते आहे. तिच्या आवाजातील तीच जरब, तोच लाघवीपणा, तेच प्रेम, तसेच चिडणे, कधीतरी रुसून बसणे.. सारेच्या सारे अगदी तसेच्या तसे तू कसे उचललेस गं?

तुझं एसके बोललेलं मला फार आवडतं. तुझ्या रूपात शैलीच जवळ आहे असे वाटत असते." तो कातर स्वरात म्हणाला.

"काका.."

"हो, सांगतो पुढे." तो खिन्न स्मित करत बोलू लागला.

"तुझा पहिला वाढदिवस आम्ही दणक्यात साजरा केला. आपल्या घरात साजरा होणारा तो पहिला मोठा कार्यक्रम होता. शैली आणि दादाचे लग्न देवळात झाले होते. तो आनंदप्रसंग असला तरी तेव्हा साजरा करण्याची आपली परिस्थिती आणि मनस्थिती दोन्ही नव्हती.

यावेळी तसे नव्हते. आमच्या लाडक्या प्रिन्सेसचा वाढदिवस होता. तो सोहळा साजरा करण्यात आम्ही कसलीही कसर सोडली नव्हती.


सायंकाळ पासून सुरु असलेला समारंभ आटोपायला रात्री बारा वाजले होते. त्यानंतर सगळी पांगापांग झाली. पाहुणे मंडळी गेली होती. तूही थकून झोपी गेलीस. घरातील आवराआवर करून नोकरमंडळीही परत गेली होती. आम्ही चौघेच जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पा मारत होतो.


बंगल्यावरच्या रोषणाईमुळे 'शौर्या व्हिला' बाहेरून पूर्णपणे उजळून निघाला होता, आणि त्या प्रकाशात कोणीतरी बाहेर उभे आहे हे शैलीला दिसले. आम्हाला वाटलं तिला काहीतरी भास झाला असेल किंवा कुणी भटकी व्यक्ती असेल. पण तिचं म्हणणं होतं की ती व्यक्ती तिच्याकडे बघून हात हलवतेय."
सांगता सांगता भूतकाळाचे पडदे पुन्हा हलू लागले होते.


"..मयंक, खाली गेटजवळ कोणीतरी आहे रे. बघ ना."


"अगं, कोणी रस्त्यावरून जाणारा माणूस असेल. तू का एवढं टेंशन घेतेस?"


"अरे, त्याने इकडे बघून दोनदा हात हलवला. आपण खाली जाऊन बघूया का?"


"तू थांब. आम्ही बघतो. दादा चल रे." शशांक उठत म्हणाला.

ते दोघे खाली गेले आणि पुढच्या पाचच मिनिटात बाहेरच्या व्यक्तीला आत घेऊन आले.


"शेखर?" शैलीचा तर डोळ्यावर विश्वासच बसेना. ललिताची अवस्था देखील काहीशी तशीच झाली होती.


"अरे, इतकी वर्ष तू होतास तरी कुठे? आणि आज अचानक कसा काय आलास?" तिच्या प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली.


"अगं, हो, हो. त्याला आधी बसून नीट श्वास तर घेऊ दे. काही खायला प्यायला दे. नतंर काय ते प्रश्न विचार." ललिता तिला थांबवत म्हणाली.


"नाही, खायला काही नकोय. थोडे पाणी तेवढे दिलेस तर चालेल." तो शैलीकडे बघून म्हणाला.


"अरे असं कसं? आज माझ्या लेकीचा वाढदिवस आहे, तुला किमान केक तरी खावाच लागेल." ती स्वयंपाकघरात जात म्हणाली.


"शेखर, काय अवस्था झालीय तुझी? आणि इतका दिवस कुठे होतास यार?" ती गेली तसा त्याच्याजवळ येत शशांकने विचारले.


"अच्छा, म्हणजे माझी आठवण आहे म्हणायची. मला तर वाटलं होतं की तुम्ही मला विसरूनच गेलात." तो खिन्न हसत म्हणाला.


"असे कसे विसरणार? ऑफ्टरऑल आपण मित्र आहोत." त्याला पाणी आणि केक देत शैली म्हणाली.


"त्याच मैत्रीच्या नात्याला आठवून मी तुमच्याकडे आलोय. मला नोकरीची खूप गरज आहे रे. तुमच्याकडे काही व्हॅकन्सी आहे का?" तो खोल आवाजात विचारत होता.


"दिली नोकरी. आता सांग, इतकी वर्ष तू होतास तरी कुठे?" शैली त्याला शब्द देत म्हणाली.


"शैली, नोकरी म्हणजे काही भाजीपाला नव्हे, की मी मागितली आणि तू माझ्याबद्दल काही जाणून न घेता देवून टाकलीस. इतकी वर्ष मी कुठे आणि कुणासोबत होतो हे ऐकल्यावर तुझा विचार बदलला तर?" तो सांशकतेने म्हणाला.

"नाही बदलणार रे. तू आमचा मित्र आहेस. प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगी आम्हाला तुझी आठवण यायची, पण तू कुठे आहेस आहेस याचा पत्ता नव्हता.

कॉलेजमध्ये असताना आपण तिघांनी काहीतरी बिझनेस करायचा असा विचार केला होता हे आठवतं ना? पण नेमक्या वेळी तू गायब झालास. बरं, ते असो. आता परत आला आहेस तर एसके इंटरप्रायझेस मध्ये तुझे स्वागतच आहे." ती ठामपणे म्हणाली.


"शैलीचे म्हणणे मलाही पटतेय. दादा तुझे काय मत आहे?" शशांकने मयंकला विचारले.


"तुम्हा दोघांना पटल्यावर माझे आणखी दुसरे काय म्हणणं असेल? पण काय रे शेखर? तू इतकी वर्ष कुठे होतास?" मयंकने मूळ मुद्यात हात घातला.


"मी कोल्हापूरला होतो." तो खिन्नपणे म्हणाला.


"कोल्हापूर? अरे, इतकी वर्ष तिथे काय करत होतास?" शशांकने आश्चर्याने विचारले.


"मी लग्न केलं."


"काय? आणि तू हे आम्हाला आत्ता सांगत आहेस?" शैली.


"कुणाशी? हे विचारणार नाहीस का?" त्याने एकदा शैलीकडे आणि मग मयंककडे नजर वळवली.


"कुणाशी?" मयंकचा प्रश्न.


"मनी.. मनीषा. तुमच्या आत्याची मुलगी." तो उत्तरला तसे शशांक आणि मयंक दोघेही ताडकन उभे झाले.


"काय? म्हणजे आत्या या दोघींना घेऊन कुठे गेली हे तुला ठाऊक होतं?" मयंकच्या नजरेत राग होता.


"पण तू तर रजनी कुणासोबत तरी पळून गेली असे आम्हाला सांगितले होतेस. म्हणजे तू आधीपासूनच त्यांच्यात शामिल होतास तर." शशांकने विचारले.


"नाही. चुकीचा अर्थ काढू नका. मला रजनीबद्दल बाहेरून समजले होते म्हणून मी तुला ते बोललो. पण त्या आधीच ही मंडळी मुंबईतून बाहेर गेली होती. मी तुला सांगितले आणि त्याच दिवशी काकांचा मृत्यू झाला. नकळत त्यासाठी मी स्वतःला जबाबदार ठरवले.

त्या घटनेनंतर आठवडा उलटला असेल, मी गावाकडे जायला निघालो तर रेल्वेस्टेशनवर मला मनिषा भेटली. अनपेक्षितपणे.

खरे तर तुम्हाला भेटायला म्हणूनच ती आली होती. पण माझ्याकडून तिला काकांबद्दल समजले आणि ती तिथूनच परतीच्या प्रवासाला निघाली.

तिचा चेहरा पार कोमेजला होता. बोलल्यावर कळले की
रजनीला काही तरी प्रॉब्लेम आहे म्हणून ती तुमच्याकडे कडे मदतीचा हात मागायला आली होती पण काका गेले हे ऐकून तिची हिंमत झाली नाही."


"म्हणून मग तू तिला मदत केलीस?" उपरोधाने शशांक म्हणाला.

"त्यावेळी मला ते योग्य वाटले होते, म्हणून मदत करायचे ठरवले. पण त्याचा अर्थ मी तुमच्याशी प्रतारणा करत होतो असे नव्हते. कधी कधी आपण मदत तर अनोळखी लोकांचीसुद्धा करतो ना? मनीषाला तर मी ओळखत होतो." तो क्षणभर गप्प बसला.

"रजनी प्रेग्नन्ट होती. तिला त्या मुलाने फसवले होते पण ही मात्र बाळाला जन्म द्यायचा म्हणत होती. लहान वय आणि बाळाची खुंटलेली वाढ यामुळे डॉक्टरांनी तिला अबॉर्शनचा सल्ला दिला. त्यामुळे ती पार खचली होती, जीवाचं बरं वाईट करायला निघालेली ती कशीबशी त्यातून वाचली पण बाळ मात्र दगावले.

ती एकप्रकारे मनोरुग्ण झाली होती. एकटी एकटी रहायची. त्यात तिच्या आईला टायफाईड झाला. तिची आणि आईची जबाबदारी एकट्या मनीषावर येऊन पडली. त्यांचे दवाखाने, पथ्य पाणी करताना तीच कोमेजत होती.

त्यात तिचा झालेला प्रेमभंग. नाही म्हणायला तिचे मयंक दादावर प्रेम होते आणि त्याने शैलीशी विवाह केला त्यामुळे ती दुखावली होती. माझ्या मनाची अवस्था देखील थोडयाफार फरकाने तिच्यासारखीच होती.

आधीच आईवडिलांविना वाढलेला मी, त्यात आता एकटा पडलो होतो. दोघेही काहीसे समदुःखी, त्यामुळे आमच्या भेटीगाठी वाढीला लागल्या आणि मनासोबत आम्ही शरीरानेही कधी जवळ आलो कळलेच नाही."
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
*******

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//