Mar 01, 2024
प्रेम

हवास मज तू!भाग -५८

Read Later
हवास मज तू!भाग -५८
हवास मज तू!
भाग-५८

मागील भागात :-
शैलीला दिवस गेल्याचे तिला कळते. त्या बातमीमुळे आनंदाऐवजी ती काहीशी नाराज होते. मयंकची प्रतिक्रिया काय असेल याची तिला भीती वाटत असते.

आता पुढे.

"आई.."

"तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं म्हणून मी बोलायला आले. शैली, आईपण अनुभवणं खूप आनंददायी असतं. देवाने तुझ्या पदरात ते दान घालायचे ठरवले तर तू अशी मागे सरु नकोस." तिला जवळ घेत ललिता म्हणाली.


"पण मयंक?" तिच्या डोक्यात तेच विचार होते.


"बाप व्हायला त्यालाही आवडेलच की. तो तुला काही मुद्दाम घरी बसवणार नाही याची मला खात्री आहे." तिच्या शंकेचे निरसन करत ती उत्तरली.


"आई, मला झेपेल ना हो सर्व?"


"का झेपणार नाही? आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत ना? ऑफिसमध्ये हे दोघं आणि घरी मी तुझी काळजी घेईन. आता तर झालं." ललिता हसून म्हणाली.


"हो. पण हे एवढंच नाहीये.."


"शैली, आपण एकमेकांना परके नाही ना गं आहोत. मनात जे आहे ते बिनधास्त बोल ना." ललिता सौम्यपणे म्हणाली.


"आई, मला माझ्या बाळाचे पहिले पाऊल त्याच्या हक्काच्या घरात टाकायला आवडेल. या घराचे आपल्यावर खूप उपकार आहेत. आपल्या वाईट आणि चांगल्या प्रसंगी याचीच आपल्याला साथ लाभली. पण मला वाटतं माझ्या बाळाचे स्वागत आपल्या स्वतःच्या घरात व्हावे. आपण आजवर जे सोसलंय त्याचे घाव त्याच्या वाट्याला येऊ नये, एवढंच." ती मनातील बोलून गेली.


"एवढंच ना? मग आपलं घर बांधायला घेऊया की. आपल्या घराण्याच्या अंशाचे स्वागत आपल्या हक्काच्या घरी होईल हा माझा तुला शब्द आहे." ललिताने तिला प्रेमाने जवळ घेतले.


"सुनबाईचे कौतुक सुरु आहे असं दिसतंय. कसले शब्द देणं सुरु आहे म्हणायचे?" तेवढ्यात मयंक बाहेरून आत आला.


"माझी सून आहेच कौतुक करण्यासारखी. आता तिच्या मनासारखे घराचे बांधकाम करायला सुरुवात करा." त्याला वाटीतील साखर देत ललिता म्हणाली.


"असा अचानक प्रस्ताव? काही खास कारण?" त्या तिघांवरून नजर फिरवत त्याने विचारले.


"हम्म. कारण तर खास आहे. नऊ महिन्यानंतर एक नवा पाहुणा आपल्या घरी येतो आहे. माझ्या सुनेची इच्छा आहे की त्या पाहुण्याचे स्वागत त्याच्या हक्काच्या घरात व्हायला हवे, म्हणून हा प्रस्ताव." ललिता मिश्किलपणे म्हणाली.


"नऊ महिने? नवा पाहुणा? म्हणजे मला काही कळलं नाही."


"दादासाहेब, म्हणजे लवकरच तुमचे प्रमोशन होणार आहे, एक नवे पद तुमची वाट बघत आहे." शशांक त्याचा गोंधळ दूर करत म्हणाला.


"म्हणजे? शैली तू परत दुसरीकडे नवी ब्रँच उघडायचा विचार करते आहेस का?" त्याने विचारले तसे शशांकने डोक्यावर हात मारून घेतला.


"ब्रँच ऑलरेडी उघडली आहे. गधड्या, तू लवकरच बाबा होणार आहेस." ललिता त्याचा कान पिळत म्हणाली.


"काय?" त्याचा चेहरा आनंदमिश्रित आश्चर्याने एकदम मोठा झाला.


"आई अगं, एवढी मोठी आनंदाची बातमी तुम्ही सरळपणे सांगू शकत नव्हता का? माझ्या डोक्यात नुसता गुंता करून टाकला.

शैली, आय एम सो, सो, सो हॅपी यार. ही केवढी मोठी
गुडन्युज आहे? आय लव्ह यू सो मच." तिला उचलून एक गिरकी घेत तो म्हणाला.


"अरे, हळू. ती आता एकटी नाही आहे. तिच्या उदरात आपल्या काळजाचा तुकडा आहे." तिला उचललेले बघताच ललिता काळजीने म्हणाली.


"तुला त्रास तर नाही ना झाला?" ललिता म्हणाली तसे त्याने शैलीला लगेच खाली ठेवले.


"अहं." ती डोळ्यातील पाणी टिपत म्हणाली. सर्वांच्या प्रेमाने ती भारावून गेली होती.


"शैली, तुला काही त्रास होतोय का? तुझ्या डोळ्यात पाणी का आले?" तिला जवळ घेत त्याने काळजीने विचारले.


"मयंक तू ना वेडा आहेस. कधी कधी बायकोच्या मनात काय चाललंय ते ओळखता यायला हवे. आता ती नुसती बाई राहिली नाहीय तर आई होणार आहे.

तिला आत घेऊन जा आणि तूही फ्रेश हो. नतंर डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून घ्या." ललिता त्याला समजावत म्हणाली.


"शैली, आय एम सो हॅपी." खोलीत गेल्यावर तिला मिठीत घेत तो म्हणाला.


"आता ना तू कुठले काम करायचे नाही. ऑफिसमध्ये तर अजिबात पाय ठेवायचा नाही. घरी राहायचं, तुला जे आवडतं ते खायचं आणि काळजी घ्यायची." तिच्या कपाळावर ओठ टेकवत तो म्हणाला.


"हे सगळं डॉक्टरांनी म्हणू दे. तेव्हाच मी ऐकेन." ती गाल फुगवून म्हणाली.


"डॉक्टरांना काय कळतं? हे आपलं बाळ आहे तेव्हा आपल्याला काळजी घ्यावी लागेल ना? डॉक्टरांचे काय काम?"


"तुला ना अती आनंदामुळे हर्षवायू झाला आहे. आपण आईबाबा होणार असलो तरी डॉक्टर म्हणजे त्या विषयाची शास्त्रशुद्ध अभ्यास करणारी व्यक्ती असते. त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं. तेव्हा त्यांनी जे सांगितले तेच आपल्याला ऐकावे लागेल." ती त्याला हलकी चापट मारत म्हणाली.


"बरं, राणीसरकार तुम्ही म्हणाल तसेच. पण काय गं, माझी प्रिन्सेस तुला पाय वगैरे मारते का गं?"


"इतक्या लवकर कुणाचच बाळ पाय वगैरे मारत नसतो." ती हसून म्हणाली.


"आणि काय रे? एकदम प्रिन्सेस होय? तुला कसं माहित की ती मुलगी आहे?" ती.


"कारण बाळ आणि मी एका टीममध्ये असणार आहोत. त्यामुळे त्याला माझी आवड ठाऊक आहे. शैली, तू माझ्यासोबत आहेसच पण मला आता तुझी बालपणीची इवलीशी प्रतिकृती हवी आहे आणि बाळ आपल्या बाबाचं ऐकते म्हणतात. सो, इट्स ए बेबी गर्ल." तिच्या पोटाची पापी घेत तो म्हणाला.


"खरंच तू खुळा झालाहेस. जा आता फ्रेश होऊन ये. नतंर हॉस्पिटलला जायचे आहे." त्याला बाथरूममध्ये पिटाळत ती म्हणाली.

*******

"..दिवस कसे भरभर सरत होते. त्या काळात आम्ही सगळे खूप खूष होतो. बाबा गेल्यानंतर इतक्या वर्षांनी आई मनापासून आमच्यात परतली होती.

शैलीचे डोहाळे पुरवणे, तिला हवं नको बघणे यातच तिचा दिवस सरत होता. तिच्या चेहऱ्यावरचे मावळलेले तेज परत येऊ लागले होते." शौर्याचा हात पकडून शशांक पुढे बोलू लागला.


"दादा तर त्याची प्रिन्सेस येणार म्हणून खूप आनंदी होता. त्याने त्याच्या प्रिन्सेसचे नावही ठरवले होते, शौर्या! आणि त्या नावावरूनच आपल्या घराचे नामकरण करण्यात आले, 'शौर्या व्हिला.' नऊ महिने संपेपर्यंत आपला व्हिला तुझ्या स्वागतासाठी सज्ज झाला होता."


"पप्पांना बेबीगर्ल येईल असं एवढया कॉन्फिडन्टली कसं काय वाटत होतं?" तिने हळव्या स्वरात विचारले.


"काय माहित? कदाचित तुमच्यातील आंतरिक नात्याच्या ओढीमुळे त्याला ते वाटले असेल. पण खरंच तुझा जन्म झाला आणि आमच्या आयुष्यात चैतन्याचे वारे वाहू लागले.


तुझं दिसणं, हसणं, रडणं.. सारं काही आमच्यासाठी एक आनंदोत्सव होता. खूप गोड होतीस यार तू, रादर अजूनही आहेस. ती आमची गोडुली प्रिन्सेस आजही तशीच आहेस." तिच्या हाताची पापी घेत तो म्हणाला.


"ओ, हाऊ स्वीट. मी किती लकी आहे रे. तुम्ही सर्व माझ्यावर किती भरभरून प्रेम करता." शौर्या हळवी झाली होती.


"लकी तर आम्ही आहोत. तू घरात आलीस तेच मुळी लक्ष्मीच्या पावलांनी. तसा आपला बिझनेस फायद्यात होताच पण तुझ्या पायगुणाने तो आणखी विस्तारला. वर्षभरात दुपटीने वाढला. नवीन एम्प्लॉयी भरती करावे लागले.

आम्ही सगळेच राब राब राबायचो. श्वास घ्यायला वेळ मिळायचा नाही. रोजच्या मिटींग्स, नवनवे क्लाईंट.. एवढ्या भरभराटीची आम्ही कधी कल्पनाच केली नव्हती. त्यामुळे काम वाढले तरी थकवा असा यायचा नाहीच. उलट घरी आल्यावर तुझ्या बाळलिलांनी आणखी उत्साहित झाल्यासारखे वाटायचे.

आई म्हणायची, शौर्या म्हणजे आपल्या घरची लक्ष्मी आहे. आपल्या घराची, व्यवसायाची तीच खरी वारसदार आहे. एसके म्हणजे आता कुणी नसून फक्त शौर्या केळकर आहे."


"आजी खूप भोळी आहे रे." ती किंचित हसून म्हणाली.


"नाही गं राणी. उलट आईला माणसांची पारख आहे. तुझ्यातील कलागुणांना तिने आधीच ओळखलं होतं. तू जर आपल्या कंपनीत जॉईन झालीस ना तर ती कुठल्या कुठे नेऊन ठेवशील याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही."


"नको रे. मला ना हे असले दगदगीचे आयुष्य नकोय. आपल्याकडे जे आहे ते निवीचे आहे. मी तर मस्त एखाद्या एनजीओशी जुळणार आहे." ती हात वर करत म्हणाली.


"कळायला लागल्यापासून तुझं हेच सुरु आहे. मागच्या वर्षी तू आपल्या कंपनीत काही दिवस राहिलीस तेव्हा पाहिलेस ना, किती प्रोग्रेस झाला होता? निवी लहान आहे गं शौर्या. ती आत्ता कुठे हे शिकतेय.

आणि तू? तुला शिकायची गरजच नाहीय. तुझ्या रक्तातच आपला बिझनेस भिनला आहे." तो तिला समजावत म्हणाला.


"माझं सोड रे. आपण तर शेखर कारखानीस बद्दल बोलणार होतो ना? इतक्या वर्षात तो कुठे मध्येच गायब झाला?" तिने पुन्हा मुख्य विषयात हात घातला.

कुठे गेला असेल शेखर? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
********

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//