Mar 01, 2024
प्रेम

हवास मज तू!भाग -५६

Read Later
हवास मज तू!भाग -५६
हवास मज तू!
भाग -५६

मागील भागात :-
रजनी कुणासोबतरी पळून गेली असे शेखर शशांकला सांगतो. त्याची शहानिशा करायला शशांक आणि बाबा जुन्या घरी येतात. तिथे दुसऱ्याच इसमाला बघून ते त्याला जाब विचारतात.

आता पुढे.

"मी कोण म्हणजे? मी या घराचा मालक आहे. तुम्हाला कोण हवे आहे?" त्याने वैतागून विचारले.


"मालक म्हणे. अरे या घराचा मी मालक आहे. आमच्या आक्कीला हे घर मी बक्षीसपत्र म्हणून दिले आहे. आहे कुठे ती?" बाबांचा आवाज करडा झाला होता.


"बाबा, तुम्ही थोडे शांत व्हा ना." शशांक त्यांचा हात पकडत म्हणाला.

"बाबा तुम्हाला काही चुकीचे बोलले असतील तर माफ करा. कसे आहे ना की काही दिवसापूर्वी हे घर बाबांनी आमच्या आत्याच्या नावाने करून दिले होते. तिला भेटायला म्हणून आलो तर अनोळखी व्यक्ती बघून आमचा गोंधळ झाला.

तुम्ही हे घर तुमचे म्हणताय तर मग आत्या कुठे आहे?" शक्य तितक्या शांत स्वारात शशांक बोलत होता.

"ते तेवढं मला माहिती नाही. मागच्या आठवड्यात एका दलालमार्फत तिने माझ्याशी घराचा सौदा केला होता. पूर्ण पैसे हातात देताच त्यांनी घर रिकामे करून दिले.

त्यानंतर आमचा काहीच संबंध आला नाही. ती पैसे घेऊन कुठे गेली मला काही ठाऊक नाही." शशांक शांतपणे विचारत होता त्यावर त्या माणसानेही शांत बोलून त्याला माहिती दिली. वर घराचे कागदपत्र देखील दाखवले.

तो जो बोलत होता त्यात खोटेपणा नव्हता आत्याने खरंच ते घर विकले होते. कागदोपत्री तरी तेच खरे होते.

"शशी, परत चल. या घराची पायरी पुन्हा चढणार नाही असे ठरवले होते तरीही आक्काच्या काळजीपोटी आलोच. पण ती नाही सुधारायची. तिच्या लोभी वृत्तीला कसलीच सीमा नाही." बाबा अडखळत कसेबसे म्हणाले.


"बाबा, तुम्हाला काही त्रास होतोय का? कुठे काही होतेय का?" त्यांचा डगमगणारा स्वर ऐकून तो काळजीने म्हणाला तोच त्यांनी त्याच्या खांद्यावर आपले अंग टाकले.


"बाबा, बाबा.." त्याचे ओरडणे ऐकून आत गेलेला तो पुरुष बाहेर आला.


"अहो, बहुतेक यांना झटका आला असावा असे वाटत आहे. त्यांना तातडीने दवाखान्यात न्यावे लागेल. मी नाक्यावरून लगेच रिक्षा घेऊन येतो." बाबांची अवस्था बघून तो भला माणूस अंगात सदरा चढवत रिक्षा आणायला गेला.

******

"सॉरी, इथे येईपर्यंत उशीर झालाय. त्यांना आलेला झटका इतका तीव्र स्वरूपाचा होता की दहा पंधरा मिनिटातच त्यांचे प्राण गेले. त्यांना काही मानसिक ताण, स्ट्रेस वगैरे होता का?"डॉक्टर शशांकला विचारत होते पण त्याच्या कानावर ते शब्दच आदळत नव्हते.

'सॉरी, इथे येईपर्यंत उशीर झालाय..' डॉक्टरांचे हे शब्द ऐकताक्षणीच त्याच्या सगळ्या संवेदना बधिर झाल्या होत्या.


"शशांक.." त्याच्या पाठीवर एक थाप पडली.

त्याने अनोळखीपणे तिकडे पाहिले.

"अरे, असा काय बघतोस? मला ओळखलं नाहीस का? मी अमित. दहावीपर्यंत एकाच शाळेत होतो. आता एमबीबीएस करतोय. तू इकडे कसा?" अमितने त्याला आठवण करून दिली.

अमितच्या शब्दाने अचानक त्याच्या नेणिवा जाग्या झाल्या. कोणीतरी ओळखीचे समोर बघून त्याचा बांध फुटला.


"अमित, तू डॉक्टर आहेस ना? एकदा बाबांना चेक करून बघ ना. इथले डॉक्टर बाबांविषयी काहीही वेडवाकडं बोलत आहेत रे. तू तपासून सांग ना." अमितकडे आशेने बघत तो म्हणाला.

अमितने बेडवर असलेल्या त्याच्या बाबांकडे पाहिले. स्टेथो लावून हृदयाची गती तपासायचा प्रयत्न केला आणि मग तिथे असलेल्या सिनिअर डॉक्टरकडे एक नजर टाकून त्याच्याशी मेडिकलच्या भाषेत थोडे हितगुज साधले.


"शशांक, काकांना हृदयविकाराचा जोराचा झटका आला आणि त्यांचे हृदय काम करणे बंद झाले आहे. सॉरी रे, ते आपल्याला सोडून गेलेत." अमितच्या डोळ्यात पाणी होते.

त्याचे बोलणे ऐकून शशांक हुंदके देऊन रडू लागला. सत्यापासून कितीही दूर जायचा प्रयत्न केला तरी ते बदलणार नव्हते. त्याच्या डोळ्यासमोर ललिताची प्रतिमा उभी राहिली. तो तिला हे कसे सांगणार होता.


"घरी कळवलेस?" अमितच्या प्रश्नावर त्याने नकारार्थी मान हलवली.


"मग कळवून घे. इथे काही फार्मॅलिटीज कराव्या लागतील. दादाला इथे बोलावून घे. तसे मी सोबत आहेच." त्याच्या खांद्यावर हात ठेवत अमित म्हणाला.


"मी हॉस्पिटलचा फोन वापरू शकतो?" डोळे पुसत त्याने विचारले.

अमितच्या परवानगीने त्याने तिथल्याच एका फोनवरून एक कॉल केला.

"शैली.."

"शशी, काय झाले? घरी सर्व ठीक आहे ना? तुझा आवाज असा का येतो आहे?"

त्याने फक्त तिच्या नावाचा उच्चार केला होता तरी त्याच्या आवाजावरून तिने काहीतरी घडलेय हे ओळखले.

"शैली, बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय. तू इथे येशील का? दादाला सांगायची माझी हिंमत झाली नाही गं. तू त्याला एक कॉल कर ना." तो स्फून्दत म्हणाला.

"शशी, तू काळजी करू नकोस. मी इथून निघते आणि मयंकलाही कळवते, ओके? पण नेमके काय झाले ते सांगशील का?" त्याला धीर देत तिने विचारले.

"तुम्ही या तर खरे. मग आपण बोलूया." आलेला हुंदका दाबत तो म्हणाला.

प्रसंग गंभीर आहे हे तिने लगेच ओळखले आणि मयंकच्या ऑफिसमध्ये कळवून ती लगेच हॉस्पिटलला निघाली.


"शशीऽऽ " बाकड्यावर मान खुपसून रडत असलेल्या शशांककडे तिने धाव घेतली.


"अरे, असा रडतोहेस? बाबा बरे होतील ना. आपण डॉक्टरांशी बोलूया. मी आलेय ना आता? तू काळजी करू नकोस." त्याला उठवत ती म्हणाली.


"शैली, सगळं संपलय गं. आता डॉक्टरांशी बोलून काहीच उपयोग नाही." त्याने एक हुंदका दिला.


"शशी..? तू काय बोलतोयस?" झटका लागल्यासारखे तिने त्याचा हात झटकला.

"बाबा आपल्याला सोडून गेलेत." तिला मिठी मारून तो परत रडू लागला.

"शशी.. हे कसे शक्य आहे?" तिने तोंडावर हात ठेवला.

"तू.. तू आधी शांत हो बघू. हे पाणी पी." बॅगेतील बॉटल काढून त्याला पाणी देत ती म्हणाली.

"आता काय झालेय ते नीट सांग." पाणी पिऊन झाल्यावर त्याचा हात हातात घेत तिने हळूवारपणे विचारले.

"सकाळी तू आणि दादा ऑफिसला गेल्यावर शेखर घरी आला होता. त्याने सांगितले की.." स्वतःला सावरत त्याने घडलेला प्रसंग तिच्या कानावर घातला.

"मी बाबांना तातडीने इथे घेऊन आलो पण त्यांची प्राणज्योत आधीच मालवली होती आणि मी काहीच करू शकलो नाही."


"शशी.." मागून आलेल्या मयंकने त्याचे बोलणे ऐकले होते.ते ऐकून त्याचा चेहरा घामाघूम झाला.

"मयंक, तू सावर स्वतःला. तूच असा पॅनिक होशील तर बाकीच्यांनी काय करायचे? तू बस इथे." त्या परिस्थितीत दोघांना सावरण्याचे काम तिच्या एकटीवर पडले होते.

"शशी, मयंक, घरी आईला सांगावे लागेल. तेव्हा मी जाते. तुम्ही दोघं इथल्या ॲम्ब्युलन्सने या." डोळ्यातील पाणी पुसत ती म्हणाली. यावेळी भावनिक न होता थोडेसे प्रॅक्टिकल वागणे गरजेचे आहे हे तिला कळत होते.


"मी आत्याला सोडणार नाही. तिच्यामुळे आपले बाबा गेले. ती असे का वागली याचे स्पष्टीकरण तिला द्यावेच लागेल." शशांक आवेशाने म्हणाला.


"शशी, आता कुणाकडूनही कसलेही स्पष्टीकरण नको की आणखी काही नको. त्या आत्याची आणि तिच्या मुलीची आपल्यावर सावलीही नको रे. बाबांना आपण गमावलेय आता पुन्हा कोणाला गमवायचे नाहीये." त्याला मिठीत घेत मयंक समजावत म्हणाला.


घरी गेल्यावर ललिताला हे कळले तेव्हा तिने जोरात हंबरडा फोडला. बहिणीच्या काळजीपोटी ते घरून निघाले होते आणि त्याच बहिणीमुळे त्यांच्या वाटेला हे भोग आले होते.

नवऱ्याच्या मृत्युनंतर ललिता एकाकी पडल्यासारखी झाली केवळ स्वतःत गुरफटून राहू लागली. त्या गर्तेतून बाहेर काढण्याचे काम शैलीने हाती घेतले.

तिचे कॉलेज संपले होते. काही दिवसांसाठी तिने ऑफिसमधून रजा घेतली आणि आपला वेळ ललितासोबत घालवू लागली.

ललिताचा एकांगीपणा वाढत होता.आईसाठी शैली घरी थांबायची म्हणून मग शशांकने नोकरी धरली.

बाबांना जावून आठ नऊ महिन्यांचा काळ लोटला होता. त्यांचे विम्याचे आणि नोकरीची काही रक्कम हाती आली आणि शैलीच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना फेर धरू लागली.

"मयंक, ऐक ना. आपण एक छोटासा बिझनेस सुरु करायचा?" एका रात्री त्याच्या मिठीत असताना तिने विषय काढला.

कसला बिझनेस? आणि त्याला लागणारा पैसा कुठून उभा करायचा?" त्याने तिला उलट विचारले.

शैलीच्या कल्पनेला आकार द्यायला मयंक साथ देईल का? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//